Saturday, March 2, 2013

हा देश कधी कधी माझा आहे .........


हा देश कधी कधी माझा आहे .........
आजची परिस्थिती पाहिली की  असे वाटू लागते कि हा देश कुठे चालला आहे? हा एक चमत्कारिक देश आहे. ह्या देशात केंव्हाही , काहीही घडू शकते. जगात ११ आश्चर्ये आहेत.आमच्या देशात रोज एक नवे आश्चर्य घडत असते.येथे काहीही घडू शकते.हा देश तरीही चालला आहे.
मला नेहमीच आश्चर्य वाटू लागते की आपण २१ व्या शतकात सर्वात प्रभावशाली देश होऊ शकू का ? आपण पुढे कसे जाणार ? तरीही रतन टाटा, नारायण मूर्ती, अब्दूल कलाम ह्यांच्यासारखे लोक एक नवी आशा निर्माण करतात. आपली मान उंच करतात. न कळत छाती फुगत जाते. मायावती , मुलायमसिंग , ममता , जयललिता, येद्दीयुरप्पा, नारायण राणे, चौताला  अशा मंडळीकडे बघितले की घोर निराशा वाटू लागते. समाजजीवनाशी सतत खेळणाऱ्या ह्या राजकीय लोकांची तोंडे बघितली की विलक्षण संताप येतो.  काही तरुण मंडळीना तर हा देश सोडून जावा असे वाटते . त्यात काय चूक आहे,असे आता मलाही वाटू लागले आहे. पण जाणार कुठे. इथेच जन्मलो, इथेच मरावयाचे आहे . “ जीना यहां , मरणा यहा" अशी अवस्था.हा देश कधी कधी माझा देश आहे , असे वाटणे निश्चितच चांगले लक्षण नाही, नवी बेकार असलेली पिढी अतिरेकी झाली तर आश्चर्य वाटावयास नको. संवेदनशील माणसाला उबग येतो.
अतिशय कष्ट करून ,प्रामाणिकपणे व्यवसाय करणेही फार कठीण होवून बसले आहे. सरकारी नोकरीत ही चांगल्या आय ए एस , आय पी एस अधिकार्याला नोकरी करणे कठीण झाले आहे. वाईट तडजोडी करून जगणे असह्य झाले आहे. साध्या छोट्या व्यवसायिकाला किती लोकांना सांभाळावे लागते.महानगर पालिका, राज्य सरकारी कर्मचारी, सेल्स कर ,प्रोफेशनल कर, चुंगी कर , वीज खाते, पाणी खाते , टेलिफोन खाते ह्या खा खा खाणारया खात्यांना सारखी भेट देणे , वेळ वाया घालविणे , काम न होणे, चिरी मिरी मागणारे हे भिकारी पाहिले की चीड येते.ह्या कार्यालयातील शिपाई, कारकून, कलेक्टर,कमिशनर ,हे सारे अधिकारी कसले? ते तर भिकारी. मंत्र्याचे दलाल.ही सगळी किडलेली यंत्रणा कधी स्वच्छ होणार. अण्णाच्या आंदोलनाचे काय झाले ते आपण बघतो आहोतच . ह्या यंत्रणेला कसली चाड नाही, हे सारे आपल्या आयुष्यात बदलेल असा आशावाद नसताना नव्या पिढीने पुढे काय करावे हे सांगण्याचा आपल्याला काय अधिकार ?
सूर्य रोज वेळेवर उगवतो , उर्जा देतो. न चुकता मावळतो. त्याचे काम तो बिनभोबाट करतो. खंड ही पडू देत नाही, अविरतपणे त्याचे काम तो करीत असतो. तो सकाळी आपल्याला जागा करतो व  जगण्याची नवी आशा ,नवी उमेद देतो. नवे सामर्थ्य देतो.संध्याकाळी निघून जातो आणि मन उदास होते. अंधार निर्माण करतो. उद्याचा उष:काल . आमच्या देशाला हा उद्याचा उष:काल दिसणार आहे काय?
माझ्या ६५ वर्षाच्या ह्या जीवनात मी काय मिळविले असे जेंव्हा माझे मलाच विचारतो तेंव्हा हे लक्षात येते की ज्ञानार्जन केले नसते तर काहीच झाले नसते. नव्या युगात सरस्वती जेथे आहे तेथेच लक्ष्मी नांदते हे नारायण मूर्ती सारख्या व्यक्तीने सिद्ध केले आहे.लक्ष्मीच्या दारी सरस्वती क्वचितच असते. पण ह्या नव्या युगात सरस्वतीच्या दारीच लक्ष्मी आहे हे नक्की हे आय.टी. इंडस्ट्रीने जगाला दाखवून दिले आहे. माझा तरी असा अनुभव आहे, हा बदल फार महत्वाचा आहे , हे लक्षात असणे महत्वाचे आहे.
काय गंमत आहे बघा, आपण जगण्यासाठी प्रयोजनच्या  शोधात असतो. Purpose in life  ?कशासाठी हे सारे? कोणासाठी ? असा प्रश्न आपल्याला पडत असतो तेंव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की आपण स्वतःसाठी सुद्धा जगले पाहिजे.आप्त स्वकीय तर असतातच. त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावयाचा तर असतोच.त्यांच्यासाठी जगावयाचे तर असतेच. पण आपलेही काही जगणे असतेच. आपलीही काही स्वप्ने असतात . आपले ही काही छंद असतात . आनंदाची अनेक रूपे असतात. विश्वाचे गूढ उकलण्यासाठी आपल्याच तंद्रीत असलेला एखादा शास्त्रज्ञ, काव्यानंदात रमलेला रसिक ,काव्य निर्मितीत छांदिष्ट झालेला कवी, शिल्पकलेत रमणारा कलाकार , वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करणारा शल्य विशारद, सतत दुसर्याच्या हितासाठी धडपडणारा समाजसेवक, हे सारेच जगण्यासाठी आसुसलेले. जीवन गाणे गाणारी ही विलक्षण “माणसे” आहेत.म्हणूनच आपल्या जगण्याला खरा अर्थ प्राप्त होत असतो.
काही व्यक्ती जीवनदायी प्रेरणा देत असतात.अशी खूप उदाहरणे देता येतील. लहान मुलासारखे निरागस व्यक्तिमत्व असलेले ए. पी. जे. अब्दुल कलाम, अतिशय जिद्दीने एकटीच लढणारी मेधा पाटकर , शांत पण कळकळीने काम करणारे एस एम जोशी, "Promise is Promise" म्हणणारे व त्यासाठी एक लाखात दिमाखदार मोटारीची निर्मिती करणारे रतन टाटा, शून्यातून नवनिर्मिती करणारे नारायण मूर्ती, प्रचंड पैसा असून ही सामान्य व्यक्तींच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी धडपडणारया संवेदानाशील व्यक्तिमत्वाच्या सुधा मुर्ती ( त्यांना जीवनाचे वेगळे प्रयोजन सापडले असेच वाटते ).
आपण तर खूपच सामान्य माणसे. दारिद्र्याचेचटके बसल्यानंतर केवळ शिक्षणाच्या म्हणजे बुद्धिमत्तेच्या भांडवलावर जीवन उभे करताना थोडेसे वैतागलेलो. सामान्य माणसाला तर हे भोगावे लागतेच. पैसा हा हवाच असतो .त्यासाठी अनेक नोकऱ्या कराव्या लागतात . स्वतंत्र व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडावे लागते. .वरचा वर्ग व खालचा वर्ग.”आहे रे ,आणि नाही  रे “ त्यांचे बरे असते. आपल्याला ह्या दोन्ही वर्गाना जवळून पाहता येते. आपण मात्र मधले. आपल्याला फाइव्ह स्टार जगणे माहीत नसते अधूनमधून जवळून मात्र पाहता येते. तर खालच्या थरातील दारिद्र्याचे चटकेही ही सहज समजू शकतात.कारण आपल्याजवळ असलेले संवेदनशील मन . ते तीव्रतेने जाणवले नाही तर आपलीही जाणीव फारच बोथट होते. त्यालाच मध्यमवर्गीय जगणे म्हणतात.
ह्याच मध्यम वर्गीय लोकांना नेहमी वाटत असते की “ भारत हा कधी कधी माझा देश आहे.” हे वाटणे बरोबर नाही हे राज्य कर्त्यांना कधीतरी समजेल काय? कारण हे मध्यम वर्गीयच ह्या देशाचा कणा आहे. आपला प्रवास .....सुखाचा .....दुःखाचा,,,,,वेदनेचा,,,,निखळ आनंदाचा.....सुखद सहवासाचा.....हव्या हव्याशा वाटणाऱ्या कोमल तरल भावनांचा .....नको असणाऱ्या आठवणींचा....... यशाच्या ध्येयतार्याकडे झेपावणारा .....अगतिकतेचा ......... विलक्षण निसर्ग सौंदर्यात हरवलेला.....भीषण वादळासारखा नको असणारा ....संपवणारा ..... अंतर्मुखतेतून अध्यात्माकडे नेणारा ...... भौतिक सुखाची उधळण करणारा ..... स्वतःला विसरणारा .......नको असणारा ..... हवा असणारा .....  हा प्रवास चालूच राहणार मरणापर्यंत.....आणि त्या नंतरही ,,,,,,
मेरा भारत महान ..... 
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

No comments:

Post a Comment