Tuesday, March 5, 2013

पुस्तकांच्या जन्मकथा


पुस्तकांच्या जन्मकथा
( कावड,रामप्रहर,अवाक्षर आणि इतर ...)
मी असाच चुकून “प्रकाशक” झालो. आणि मला जीवन समृद्ध करणारा अनुभव मिळाला.मी प्रकाशक कसा झालो ह्यासंबंधी मी जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा न कळत “पुस्तकांच्या जन्मकथा “ सांगण्याचा मोह मला होतो.
मी संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे विकणारा एक व्यावसायिक. मुळचा पदार्थविज्ञानाचा संशोधक.स्वतःचा छोटासा व्यवसाय करणारा. प्रकाशन व्यवसाय हा माझा नवा उपक्रम. तो खऱ्या अर्थाने अर्थार्जनाचा व्यवसाय नव्हता. कारण नुसत्या प्रकाशन व्यवसायावर – ते ही मराठी ललित लेखनाच्या प्रकाशनावर- प्रकाशक जगू शकत नाही.आणि त्या अर्थाने पोटार्थी व्यवसाय म्हणून मी तो स्वीकारलेला नव्हता. मी संगणकाच्या व्यवसायाशी निगडीत होतो आणि आहे. २५-३० वर्षापूर्वी डीटीपी तंत्रज्ञान हे संगणकाच्या माध्यमातून पुढे येत होते. त्याची नुकतीच सुरुवात झाली होती. आज इंटरनेटच्या माध्यमातून वेब पब्लिशिंग हे एक मोठे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. डीटीपी आणि लेझर प्रिंटींग ह्यांच्या विकासामुळे मी न कळत प्रकाशन क्षेत्रात ओढला गेलो व पंचवीस वर्षापूर्वी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना  स्वतंत्र  धंदा म्हणून तीन डीटीपी केंद्रे सुरु करून दिली. काही पुस्तकांची कामे आमच्याकडे येऊ लागली.परचुरे प्रकाशनाचे जी ए कुलकर्णी ह्यांचे “ कुसुमगुंजा” आणि “ माणसे आरभाट आणि चिल्लर” ही दोन पुस्तके संगणकीय अक्षर जुळवणीसाठी आमच्याकडे आली होती.आम्ही त्या पुस्तकाची अक्षर जुळवणी आणि पृष्ठ रचना केली होती  तेंव्हाच माझ्या डोक्यात विचार आला की आपणही स्वतःच प्रकाशक व्हावे व चांगली देखणी, सुंदर व विचार करावयास लावणारी, वेगळी पुस्तके बाजारात आणावी.पुस्तकांचा व लेखकांचा विचार सुरु झाला. माझ्या आवडीचे लेखक शोधत होतो. आणि पहिलाच विचार आला तो “मराठवाडा” दैनिकाचे झुंजार पत्रकार अनंत भालेराव ह्यांच्या लिखाणाचा. त्यावेळी दैनिकाची संपादकीय खुर्ची सोडून अनंतराव विविध लिखाणाकडे वळले होते. “ पेटलेले दिवस” प्रसिद्ध झाले होते. “ मांदियाळी “ हे पुस्तक मौज प्रकाशनाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते व प्रकाशनाची वाट पाहत तसेच पडून होते.त्या वेळी अनंतराव आजारी होते पण त्यांचा  लिखाणाचा झपाटा चालूच होता. “ कावड “ हे सदर ते लिहीत असत. पत्रकार अनंतराव साऱ्या महाराष्ट्राला माहीत होते. परंतु अनंतरावातील साहित्यिक “ कावड “ मध्ये प्रकर्षाने दिसत होता. ते लिखाण सर्वस्वी  वेगळे होते. मला खूप आवडले होते.
चांगल्या संपादकाची दोन वैशिष्टे असतात. १) चालू राजकीय ,सामाजिक घडामोडीवर जनमत तयार करणे. २) वर्तमान पत्राच्या माध्यमातून समाज मन व्यक्त करणे. आपले सारे जीवनच राजकारणाने व्यापून टाकलेले असते.राजकारणाचे बरे वाईट परिणाम आपल्या जीवनावर कळत न कळत होत असतात. आपण राजकारणापासून कितीही अलिप्त असलो तरीही त्याचे परिणाम भोगत असतो. अशावेळी आपली काही मते तयार होतात. आपल्याला जे वाटते ते अग्रलेखातून किंवा स्तंभ लेखनातून व्यक्त करणारा ‘संपादक’ आपल्याला आवडतो. अर्थात हे प्रत्येक बाबतीत खरे असते असे नाही. अनंतराव हे असे संपादक होते की जे मला त्यांच्या अग्रलेखामुळे आवडत असत. कारण त्यांची समाज मनाची जाण उल्लेखनीय होती. ते मला आवडणारे संपादक होते
“ कावड” मधील लिखाण सर्वच अर्थाने वेगळे होते.मला आवडणारे ते सदर होते. त्या लिखाणाचे चांगले संकलन करून सुंदर पुस्तक काढावे असा विचार डोक्यात आला. पुस्तक “देखणे “ असावे, निर्मीती सुंदर असावी. हा एक विचार तंत्रज्ञ असल्यामुळे प्रभावी होता. अनंतरावाचे लिखाण लक्षवेधी तर होतेच.  पुस्तक निर्मीतीही सुंदर झाली पाहिजे असा माझा  ध्यास होता. त्यातूनच माझे पहिले प्रकाशन “ कावड” पुस्तक बाजारात आले. अनंतरावांच्या राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा ठसा मराठवाड्यातील लोकांना चांगलाच माहीत होता. दै.मराठवाडा म्हणजे अनंतराव , हे समीकरण सर्वांनाच ठाऊक होते. त्यांच्या लेखणीचा प्रभाव इतर महाराष्ट्रावर ही दिसू लागला होता. "मराठवाडा मोलाचा नि तोलाचा" हे राज्यकर्त्यांना समजू लागले होते. त्याहीपेक्षा अधिक चिरंतन अशा त्यांच्या भाषा शैलीचा माझ्यावर विशेष प्रभाव होता. आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याचा अनमोल ठेवा असलेला  “कावड” ह्या स्तंभ लेखनावर आधारित ग्रंथ प्रसिद्ध करावा असे वाटू लागले. मराठवाड्याच्या साहित्य संस्कृतीचा हा ठेवा मला फार मोलाचा वाटला.शब्दांतून व्यक्त होणार्या ह्या अलौकिक भाषा सौंदर्याला उत्कृष्ट रचनेचे कोंदण असावे व तशी पुस्तक निर्मिती करावी असे वाटू लागले. मी अनंतरावांना भेटलो. विचार बोलून दाखवला. त्यांना माझी पूर्वपिठीका माहीत होती त्यामुळे त्यांना थोडेसे आश्चर्यच वाटले." हा काय नवा उद्योग सुरु करतोयस?", असे ते म्हणाले. त्या नंतर ते “ हो “ म्हणाले. प्रा सुधीर रसाळ, प्रा भगवंत देशमुख आणि अनंतराव ह्यांनी लेखांची निवड केली. आणि मी प्रकाशनाचे काम हाती घेतले. चित्रकार श्याम जोशी ह्यांनी मुखपृष्ठाचे सुंदर चित्र काढले. अरुण नाईक ह्यांच्या छापखान्यात पुस्तक छापले.
माझ्या ह्या पहिल्याच प्रकाशनाचे खूप कौतुक झाले. “ पुस्तक फार छान काढले आहे , देखणे आहे “ असा अभिप्राय कविवर्य कुसुमाग्रजांनी पत्र लिहून कळविला. मन आनंदून गेले.

शब्द व भाषा या मानवी अभिव्यक्तीच्या व अस्मितेच्या माध्यमाद्वारे व्यक्तिचित्रे , मृत्युलेख, राजकीय भाष्य ,समाज प्रबोधन, आणि अनुभव कथन या निरनिराळ्या विषयावरील बेचाळीस निवडक स्तंभ लेखाचा संग्रह म्हणजे  “ कावड”.”ऋतू प्रकाशनाचे हे पहिलेच प्रकाशन असून देखील उत्कृष्ट निर्मिती हा ह्या ग्रंथाचा विशेष आहे “ ,अशी प्रतिक्रिया “ रविवार सकाळ” मध्ये समीक्षकांनी नोंदवली.”लक्षवेधी पुस्तक” म्हणून त्याचा उल्लेख अनेकदा झाला. “ कावड” चे मुद्रण आणि मांडणी उत्कृष्ट आहे असा अभिप्राय अनेकांनी नोंदवला.
 ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ परभणीला विजय तेंडुलकराच्या हस्ते झाला होता.“ शब्द नव्हे शस्त्र” ,असा अनंतरावाच्या लेखन शैलीचा गौरव करणारे तेंडुलकरांचे  ते भाषण खूप रंगले आणि गाजले.  सर्व मराठवाड्यातून निरनिराळ्या ठिकाणाहून ,दुरदुरची मंडळी कार्यक्रमाला आली होती. दीड दोन हजार लोक पुस्तक प्रकाशनासाठी येतात आणि अनंततरावाचे पुस्तक विकत घेतात हा अनुभव विलक्षण होता.अनंतराव ह्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे ही सारी मंडळी जमली होती. विजय तेंडुलकरही भारावून गेले होते. बहुधा , अनंतरावाचा तो शेवटचा सार्वजनिक कायक्रम असावा. त्या दिवशीचे त्यांचे भाषण मनाला चटका लावणारेच होते. “ कावड” चा प्रकाशन समारंभ सर्वांनाच भारावून टाकणारा होता. कार्यक्रमाच्या स्मृती आजही ताज्याच वाटतात. जेंव्हा जेंव्हा मी मराठवाड्यात जातो तेंव्हा तेंव्हा सारेच जण त्या कार्यक्रमाची आवर्जून आठवण काढतात .

“ एखाद्या कुमार गंधर्वाने मैफिलीत शांतपणे मांडलेल्या एखाद्या रागातला धीमा ख्याल असो की सहज बोलता बोलता गळ्यातून निघालेली लकेर असो , तिच्या मधून कुमारचं गंधर्वपण आपल्या अस्तित्वाची खूण पटविल्याशिवाय रहात नाही . “ कावड “ मधले तुमचे लेखन “ झरा मुळचाचि खरा “ ह्याची आल्हाददायक साक्ष पटवून देते. अचानक धनलाभ व्हावा तसा ग्रंथ लाभ झाल्याच्या आनंदात मी आहे “ अशी प्रतिक्रिया पुस्तक मिळाल्यावर व्यक्त केली ती महाराष्ट्राचे लाडके दैवत  पु ल देशपांडे ह्यांनी.

श्रीखंड्याने एकनाथांच्या घरच्या रांजणात रोज कावड घातली . अनंतरावांनी वाचकांच्या रांजणात घातलेल्या कावडीचे रसग्रहण करताना प्रा ग प्र प्रधान म्हणतात “ परिपक्व पत्रकाराच्या व्यक्तिमत्वाचा विलोभनीय अविष्कार म्हणजे “ कावड”.असे खूप काही लिहून आले. पंतप्रधान नरसिंहराव ह्यांनीही ह्या पुस्तकाचे कौतुक केले. ते अनंतरावांचे चाहते होते व मराठी साहित्याचे रसिक वाचक होते. अनुवादक होते.

प्रकाशकाला मान्यवरांचे अभिप्राय जसे मोलाचे वाटतात तसेच सामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया ही खूप काही सांगून जातात. श्री न सा सत्तूर  लिहितात , “ माझे जीवनच मुद्रणालयमय झाले आहे. कारण मी मुद्रित शोधक म्हणून येरवडा कारागृहातील शास्त्रीय मुद्रणालयातून निवृत्त झालो. वाचनाची गोडी. त्यातील निवडक विचार टिपणे हा माझा छंद . मराठवाड्याचा संपूर्ण इतिहास मला “कावड” मधून भावला. ही कावड अनेकांच्या घरी आपले म्हणणे सांगत राहील.” किती बोलका अभिप्राय.

“कावड”च्या प्रकाशनामुळे विजय तेंडुलकरांची खूप जवळून ओळख झाली. तसे ते माझे आवडते लेखक होतेच. .१९६९-७६ च्या काळात मी मुंबईला पदार्थ विज्ञानात Ph.D. चा अभ्यास करीत होतो. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याचे जीवन एकाकी असते. अशा वेळी काहीतरी विरंगुळा हवा असतो. मराठी नाटक पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम होता. त्या काळात प्रायोगिक रंगभूमीचे बहारीचे दिवस होते. तेंडूलकर आणि खानोलकरांची नाटके गाजू लागली होती. तेंडुलकरांची “ कोवळी उन्हे “ आणि “ रातराणी “ ही सदरे मला खूप आवडत असत. तेंडूलकर माझे आवडते लेखक होते. मी ऋतू प्रकाशनासाठी  दुसऱ्या पुस्तकाच्या शोधात होतो. आणि मला तेंडुलकरांची आठवण झाली. अधून मधून त्यांची भेट होत असे. ओळख वाढली होती. समाज मन बदलण्यासाठी मनापासून लिहिणाऱ्या तेंडुलकरांचे “ रामप्रहर” हे सदर लोकसत्तेत प्रसिद्ध होत होते. अधून मधून वाचीत असे. कारण मी मटा घेतो. लोकसत्ता कधी कधीच वाचतो. अनंतराव हे तसे पत्रकार. “ कावड “ ही त्यांची साहित्य सेवा. तेंडूलकर हे नाटककार. पण “ रामप्रहर” ही त्यांची पत्रकारिता. सुरुवातीला ते लोकसत्तेत ,आणि त्याहीपूर्वी ते अत्र्यांच्या ” नवयुग- मराठा” मध्ये होते. तसे ते पत्रकार ही होते. “ रामप्रहर” चे लेखन ही त्यांची आगळी वेगळी पत्रकारिता. एका भेटीत तेंडूलकरानी “ रामप्रहर” ची कात्रणे वाचावयास दिली. व्यवसायानिमित्त दौर्यावर असताना मोकळा वेळ मिळाला तेंव्हा मी ते लिखाण एका दमात वाचून टाकले आणि पुस्तक प्रकाशित करावयाचे ठरविले. तेंडूलकर लगेच “हो” म्हणाले. आणि ऋतू प्रकाशनाचे दुसरे पुस्तक बाजारात आणले. वसंत सरवटे ह्यांनी मुखपृष्ठ तयार केले. तेंडुलकरानीच स्वतः लेखांची निवड केली. एका पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकाची सहज झालेली ही निर्मिती.

अल्प शब्द शैलीतून खूप काही सांगून जाणाऱ्या मनस्वी सारस्वताचे प्रबोधन म्हणजे “रामप्रहर”. खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा विचार करणारा मनस्वी लेखक म्हणजे विजय तेंडूलकर . तो तुमच्या –माझ्यातला आहे. आपल्याशी तो मनापासून गप्पा मारतो .संवाद साधतो आणि जगण्यासाठी बरेच काही देऊन जातो. म्हणूनच तेंडूलकर मला आवडतात. त्यामुळे “कावड” आणि “रामप्रहर”  मला मराठी साहित्यातील सुंदर ललित लेणी वाटतात. ह्या दोन प्रतीभावंत लेखकांचा मी “प्रकाशक “ झालो ह्याचा मला आनंद होतो. हे मला मिळालेले यश आहे.”कावड” च्या पाठोपाठ तेंडुलकरासारख्या श्रेष्ठ लेखकाचे पुस्तक आपण मिळविले आणि देखण्या स्वरूपात प्रकाशित केले. “ हार्दिक अभिनंदन , उज्वल यशाची ग्वाही देणारे या प्रांतातले आपले हे पदार्पण आहे. माझ्या शुभेच्छा आपल्यासाठी आहेतच. “ – वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी पुस्तक मिळाल्यावर दिलेली पत्ररुपी पोचपावती खूप मोलाची वाटली.हा एक आनंद क्षण अनुभवयास मिळाला
.
विजय तेंडुलकरानी  एकदा सहजच अवधूत परळकरांचे स्तंभ लेखन मला वाचावयास दिले होते. निखील वागळे ह्यांच्या साप्ताहिकातून ते लिखाण करीत असत . मला ते लिखाण खूप आवडले. तेंडूलकराचे वैशिष्ट्य असे की ते नेहमी नव्या लेखकांना लिहावयास प्रोत्साहन करीत असत. त्यांच्याकडे अनेक होतकरू लेखक येत असत. ते त्यांना लिहिते करीत असत. त्यांना अवधूतचे लिखाण खुप आवडलेले होते. काही कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या लेखांचे वाचन ही केले होते. मी अवधूतचे “ अवाक्षर” प्रकाशित केले. त्या पुस्तकाला दोन पुरस्कारही मिळाले तेंडुलकरामुळेच माझी अवधूतचशी ओळख झाली. दुसऱ्या पुस्तकातून तिसरे पुस्तक निघाले. “अवाक्षर”चा  विशेष म्हणजे प्रत्येक लेखासाठी सुंदर असे अर्कचित्र. त्यामुळे सजावट देखणी झाली आहे असे अनेकांनी फोन करून आणि पत्र लिहून कळविले होते.
ह्या तीनही पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सारे स्तंभ लेखन करणारे लेखक. खूप काही सांगणारे. मनस्वी लेखक.
रंग शास्त्र आणि रंग तंत्रज्ञान ह्या विषयाचा मी संशोधक. नवे नवे तंत्रज्ञान कसे आत्मसात करून भारतातील उद्योगात त्याचा कसा वापर करता येईल ह्यासाठी मी बरीच वर्षे खर्च केली. गणक यंत्राचा उपयोग करून रंग तंत्रज्ञान कसे उपयोगात आणावयाचे ह्याचा मी अभ्यास केला होता. अनेक परीषदामधून व्याख्याने दिली होती. कार्यशाळा घेतल्या होत्या. त्या विषयाशी संबंधित “ Understanding  Computer Color Matching “ हे माझे स्वतःचेच पुस्तक छापले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ह्या क्षेत्रात माझे नाव आपल्या देशात आणि परदेशात झाले.  
“मला तुमच्या पुस्तकाची तुलना रॉल्फ क्युनी ह्यांच्या पुस्तकाशी करण्याचा मोह होतो.( त्यांनी पहिल्यांदा ह्या विषयावर पुस्तक लिहिले होते ) तुमचे पुस्तक हे उद्योग क्षेत्राला अधिक उपयोगी आहे. (I cannot help but compare your book to that of Rolf Kuehni ( First comprehensive book) . I must say that yours seems to be both more practical in its approach and also more useful as reference.)” ही प्रतिक्रिया होती Terri Downes  ह्या अमेरिकन कंपनीच्या अध्यक्षाची.
Color Research & Application ह्या अमेरिकन नियतकालिकातून लिहिलेल्या समीक्षेत Professor Alan लिहितात....
“This book ,written with obvious sincerity and deep feeling by an experienced  PRactioner, is not only an exposition of computer color matching but also a plea for more wide spread and intelligent use of computer in color formulation and control. In the latter capacity, it succeeds very well. In summary, if you are not familiar with CCM and want a crash course, this book is not for you. But if you would like to spend some time with your colleague from India while he takes you by the arm and talks, in his own fashion, about how he uses CCM and how it can be improved, you will enjoy reading this book.” हा एका अमेरिकन शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक असलेल्या व्यक्तीचा अभिप्राय मला खूप काही समाधान देऊन गेला.ह्या पुस्तकाची निर्मिती करताना मी खूप प्रयोग केले होते. त्यावर ते आवर्जून  लिहितात ...“ The layout is attractive , with boxed-in quotations, aphorism, or illustrations on almost every page” .ही पुस्तक मांडणीवरची प्रतिक्रिया खूपच बोलकी वाटते. मनाला आनंद देते. प्रकाशन व्यवसायात ह्या गोष्टीला ही मी खूप महत्व दिले होते ते ह्या मुळेच. पुस्तक सुंदर असावे , देखणे असावे आणि त्यात महत्वपूर्ण लिखाण असावे. त्या नंतर माझे दुसरे पुस्तक, “Understanding  Science and Technology  of Color “ हे  संपूर्णपणे रंगीन व आकर्षक छपाईत काढले आणि त्याचे उद्योग क्षेत्रात खूप चांगले स्वागत झाले.
अशा ह्या तीन ललित व दोन शास्त्रीय पुस्तक निर्मितीच्या कथा. माझा अनुभव समृद्ध करून गेल्या.
(मुंबई आकाशवाणी वर केलेल्या पुस्तकांच्या जन्मकथा” ह्या माझ्या भाषणावर आधारित हे लेखन)
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

No comments:

Post a Comment