Follow by Email

Saturday, March 30, 2013

माझ्याशी झालेले “ शिवरायांचे ऐसे बोलणे ........”


माझ्याशी झालेले
“ शिवरायांचे ऐसे बोलणे ........”
दादरला शिवतीर्थावर गेलो होतो. शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसलो. थंड वाऱ्याची झुळुक आली. मन थोडे स्थिरावले. इकडे तिकडे बघत होतो. आणि कानात शब्द घुमले. “ अशीच अमुची आई असती , आम्हीही सुंदर झालो असतो ..” प्रत्यक्ष शिवराय माझ्याशी बोलतायत असा क्षणभर भास झाला. ते दिल्लीला झालेले बलात्कार प्रकरण आठवले, शिवरायांनी फाशीच दिले असते त्या स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या तरुणांना. मी पुनः शिवरायांच्या पुतळ्याकडे बघू लागलो. आणि खरोखरच शिवराय माझ्याशी बोलत होते. मी ऐकत होतो. मी हाताला चिमटा घेऊन पहिला. शिवराय म्हणत होते ...
“ काय मला बघायला समोर बसला आहात काय? थोडे अंतरावरच बसा. मला ह्या कबुतरांनी अगदी वैताग आणलाय, सगळी घाण करून ठेवतात. वास येतो नुसता. आम्हा साऱ्या पुतळ्यांचे हे असेच हाल होतात . आम्हाला चांगल्या जागी का हलवत नाहीत. त्या पुराण वस्तूसंग्रहालयात नको. एखाद्या ए सी मॉल मध्ये बरे असेल. तेथे कृत्रिम धबधबाही असेल. सुवासिक वातावरण असेल. छान ,थंड ,स्वच्छ सुंदर जागा असेल. त्या लंडन – न्यूयॉर्क मध्ये ते मादाम टूसो ह्यांचे  मेणाचे पुतळे असलेले म्युझीअम आहे म्हणे. जगातले सगळे नावाजलेले लोक पुतळ्यासारखे उभे आहेत म्हणे. तो अमिताभ आणि शाहरुखखान पण पुतळ्यासारखे उभे आहेत.पहायला गेलेले सारे भारतीय लोक,त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतात म्हणे. ते पुतळे फार मजेत असतात, असे ऐकले. नाहीतर मला उन्हातान्हात उभे केले आहे. येथे, गेटवे वर आणि त्या जुहूच्या समुद्रकिनारी. तसा मी सगळीकडे असाच उभा आहे. त्या प्रतापगडावर , राजगडावर, आणि जवळ जवळ महाराष्ट्रातील सगळ्या मोठ्या शहरात. सर्वत्र माझा पुतळा असतो. माझ्या नावाचा चौक असतो. रस्ता असतो. नाटकाचा हॉल असतो. आतातर म्हणे अरबी समुद्रात जगातले सगळ्यात चांगले स्मारक उभे करणार आहेत म्हणे. त्या अमेरिकेतील स्वतन्त्रातादेवीच्या पुतळ्यासारखे. म्हणजे मुंबई बघायला येणाऱ्या लोकांना एक चांगला पिकनिक स्पॉट. त्या अरबी समुद्राच्या दमट हवेत, माझे मात्र फार हाल होतील. चौपाटीवर टिळकांचा पुतळा आहे ना? “ती निधडी छाती ,धीट मराठी थाट,आदळतो जीवर अजून पश्चिम वात” असे त्या प्रसिद्ध कवीला टिळकांच्या पुतळ्याकडे पाहून वाटले.होते. कोणाचे तिकडे लक्षच नसते. भेळ खायला येतात मुंबईकर. मी गेटवे असाच उभा आहे पण समुद्राकडे माझी पाठ आहे. मी हॉटेल ताज कडे बघत असतो. त्या कसाब टोळीने पार उध्वस्थ करून टाकले होते ताज. तो पश्चिम वारा, तिकडे जुहूवर आदळत असतो माझ्या निधड्या छातीवर. पण सगळे मुंबईकर  भेळपुरी खाताना दिसतात मला. झुणका भाकर केंद्र दिसत नाही. हे महापालिकेचे माझ्यावर प्रेम करणारे सैनिक साफसफाईकडे लक्षच देत नाहीत. स्वतःला सैनिक म्हणवतात. त्यांना भारतीय सैन्यात का पाठवत नाहीत? सैनिकीकरणाची फार गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत होते सैनिकीकरण आवश्यक . पण त्यांचे कोण ऐकणार? त्यांचे समाजसुधारणेचे विचार ही कोणी ऐकले नाहीत. त्यांची वैज्ञानिक दृष्टी ही कोणी घेतली नाही.  नुसते हिंदुत्व हिंदुत्व करतात ही सगळी मंडळी. माझे पुतळे कशाला उभे करतात हेच समजत नाही. सैनिकी शाळा , सैनिकी महाविद्यालये काढा. तिकडे तवांग सीमेवर सैनिकांची फार गरज आहे. सगळ्यांना लष्करी शिक्षण सक्तीचे करा. किमान दोन  वर्षे लष्करात काम केल्याशिवाय कोणतीही नोकरी देऊ नका. अगदी राजकीय पक्षातसुद्धा प्रवेश देऊ नका. शिस्त हवी.लष्करी शिक्षण हवे. त्या एन. सी. सी  व ए. सी. सी मध्ये हा तरुण वर्ग जातच नाही. ते ट्रेनींग सक्तीचे करा. सर्व तरुण विद्यार्थ्यांना दोन वर्षे सीमेवर काम द्या. चीन तुमच्या दारात उभाच आहे. नुसते पुतळे उभे कशाला करतात? नुसता माझा जयजयकार करतात. सकाळ संध्याकाळ माझा जप करतात.
माझेच काय? त्या गांधीजीचेही असेच झाले. डॉ आंबेडकर ह्यांचेही असेच झाले. तिकडे तर मायावतींनी उभारले पुतळेच पुतळे. डॉ आंबेडकर, शाहू महाराज, कांशीराम आणि स्वतः खुद्द मायावती. सर्वांचे पुतळेच पुतळे. पुतळ्यांचे  आंबेडकर पार्क. त्यांच्याबरोबर हत्तींचेही पुतळेच पुतळे. काझीरंगामध्ये हत्तींची संख्या कमी झाली पण ह्या पार्कमध्ये इतके हत्ती पाहून कोणी काझीरंगाला जायलाच तयार नाही असे म्हणतात. हत्ती पाहायला सगळे लखनौला जातात म्हणे . मायावतींनी त्या कबुतरांचे काय केले? त्यांच्या पुतळ्यावर बसतात का लखनौची कबुतरे?”
मी म्हणालो ,” शिवाजी राजे , खरे आहे तुमचे म्हणणे. मला ही वाटते, पुतळे नकोच. बरे झाले. तुम्ही माझ्याशी हे बोललात. मी सांगून बघतो सगळ्यांना. कोणाचेच पुतळे नको. काहीतरी ठोस करून दाखवा. तुमच्यासारखे. गांधीजी सारखे. डॉ आंबेडकरांसारखे.”
पण माझे ऐकणार कोण? तिकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीय. अरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार. जागाही निश्चित केलीय. 
स्मारक लवकर पूर्ण झाले तर येईन भेटायला.   


Wednesday, March 27, 2013

जिद्द हरवलेली माणसे


जिद्द हरवलेली माणसे
जगणे, भोगणे आणि संपवणे

अमेरिकेवर आलेल्या आर्थिक संकटाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. बरीच वर्षे अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीयानाही विलक्षण चटके बसू लागले आहेत. लॉसएनजीलीस मधील एका भारतीयाने स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारून स्वतः आत्महत्या केली हे भयानक वृत्त वाचले. एम.बी.ए( फाय्नानंस) असलेला  ४०-४२ वर्षाचा हा भारतीय इतके भयंकर कृत्य करतो ह्याचा अर्थ मानसिक तणाव किती असह्य झालेला असेल व जगणे संपवण्याचा विचार प्रबळ होऊन अघोरी कृत्य करण्यास तो कसा प्रवृत्त झाला असेल हे ऐकून मन सुन्न होते. माणूस इतका असहाय्य का होतो? त्याला इतकी टोकाची भूमिका का घ्यावीशी वाटते? त्याची मनोदुर्बलता काय दर्शविते? आर्थिक प्रश्न नं सोडवता इतके टोकाची जीवन संपवण्याची भूमिका घेणारी ही माणसे ४२ वर्षाच्या आयुष्यात काहींच कसे शिकत नाहीत. ह्याचा अर्थ निव्वळ पैसा पैसा म्हणून करिअरच्या मागे लागणारी ही दुबळी माणसे वयानी वाढली पण जगण्याचा अर्थच हरवून बसली. ह्यांची मानसिक वाढ झालीच नाही. असेच म्हणावे लागते. भारतात अनेकांना “अमेरिकेचे स्वप्न “ दिसत असते. अशाच एका भारतीयाच्या  “अमेरिकन स्वप्ना”चा झालेला हा चक्काचूर. जगण्याचा अर्थच हरवून बसलेली ही माणसे . त्याना जगणे कळलेच नाही.
आजूबाजूला अतिशय गरीबीतही खूप आनंदी दिसणारी माणसे बघीतली की ह्या सुबत्तेमुळे मानसिक दृष्ट्या दुबळी असलेली ही माणसे पाहिलीकी मन विचारते की हे असे का? आयुष्यात “आनंद” कसा मिळवायचा हे ही शिकवायला पाहिजे. इतर शिक्षण काय कामाचे? आयुष्याचा अर्थ नं उमगणारी ही दुबळी माणसे म्हणजे समाज अविकसित असल्याचे लक्षण होय.
मुंबईच्या जुहू येथील एका पबमध्ये २५० मुले-मुली डीस्कोचा आनंद घेत असताना कोकेन सारखी नशा  आणणारे पदार्थ सेवन करताना न्याक्रोटीक पथक छापा घालून त्यांना पकडते. ही बातमी मन सुन्न करणारीच आहे. २५ ते ३० हजार रुपये खर्च करून रेवस पार्टीत सामील होणारी ही उच्चभ्रू समाजातील ही मुले-मुली. त्यांच्याकड एवढा पैसा येतो कुठून? ह्यांचे आई-वडील त्यांना एवढे पैसे देतात कसे? कोणत्या मार्गांनी ते हे पैसे कमावतात? हे पब- बार असे अवैध मार्गाने व्यवसाय तरी कसा करतात? अशा घटना मुंबई-पुणे आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात घडताना दिसतात. सुनील दत्तचा मुलगा संजय दत्त , प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल, शक्ती कपूरचा मुलगा अशी कितीतरी उदाहरणे समोर येतात. मोठ्या लोकांचे सोडा. पण मध्यम वर्गातील मुलेही ह्या सापळ्यात अडकताना दिसत आहेत. ह्या मुलांचे हे स्वैर वागणे काय दर्शविते आहे?
पैसा मिळवून समृद्धी प्राप्त झाल्यावर हे मार्ग का आवडू लागतात? समाजाची जडणघडण बिघडत आहे ह्याचेच हे लक्षण आहे. त्यांच्या जगण्याचे हे नवे अर्थ समजणे कठीण आहे.
अलीकडेच जवळच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील एका वाढत्या वयाच्या तरुणाने बेकारीला कंटाळून , व लग्न होत नसल्यामुळे स्वतःला गळफास देऊन लटकावून घेतले. आत्महत्या केली पण भाऊ आणि वडिलांना इतका मन:स्ताप होऊन बसला की तेच वेडे होतात की काय अशी अवस्था निर्माण झाली. जाणारा गेला पण राहणार्याला जगणे कठीण होऊन बसले. पोलीस अधिकारी सांगत होते की अशी संख्या वरचेवर वाढत आहे आणि आम्हाला ही एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली आहे. म्हणजे एका बाजूला खूप पैसा आहे म्हणून तर दुसऱ्या बाजूला पैसा नसल्यामुळे. ही सामाजिक दुखणी बरी झाली नाही तर सर्वांचेच जगणे कठीण होणार आहे हे निश्चित.
त्याच वेळी दिवसातून २०-२२ सिगारेट ओढून क्यान्सर च्या विळख्यात अडकलेली जवळची माणसे बघीतली की मन विषन्न होते. सिगारेट –तंबाखूचा विळखा पडलेली माणसे आपल्या शरीराची वाट लावतात व क्यान्सरच्या असाध्य दुखण्यामुळे तडफडत मरताना पाहिलीकी मन उदास करतात. दोन घटकांचा हा धूर ओढण्याचा क्षणिक आनंद,  आप्तस्वकीयांना कायमचे दु:ख देऊन जातो. मरण वेदना देणारी ही जीवन अवस्था जीवनाचे मोल अधिक ठळकपणे सांगते. जगण्याचा नवा अर्थ आपणास कळतो. पण तो जीव निघून जातो. आपण काहीच करू शकत नाही. समाज अविकसीत असल्याचेच हे लक्षण आहे.
जगण्यासाठी आसुसलेला जीव महत्वाचा असतो. हे आसुसलेपण जिद्दीतून येते. जिद्द आशा- आकांक्षातून निर्माण होते. जगण्यासाठी प्रयोजन असावे लागते. प्रयोजन नसेल तर जगण्याला अर्थच उरत नाही. जिद्द आणि प्रयोजन हरवलेली ही माणसे . त्यांना मार्ग दाखवला तरच ह्यात बदल होतील. 

Sunday, March 24, 2013

माझ्या आठवणी : विजय तेंडुलकरांच्या


प्रत्यक्ष ओळख नसतांना
मला भेटलेले विजय तेंडुलकर
१९६९ ते १९७६ ह्या काळांत मी यु डी सी टी मध्ये पदार्थविज्ञानात पीएच. डी चे संशोधन करीत होतो. मराठी नाटक बघणे हा माझा छंद होता. तो माझा विरंगुळा होता. प्रायोगिक रंगभूमीवर जे घडत होते ते मला आकर्षित करीत असे. त्यावेळी मी जर सापडत नसेल तर माझे मित्र मला शोधण्यासाठी नाट्यगृहात येत असत. इतका मी नाटकवेडा होतो. मी सर्व प्रकारची नाटके पाहत असे. बाळ कोल्हटकर ते वसंत कानेटकर, विजय तेंडूलकर ते गिरीश कर्नाड, राकेश मोहन ते बादल सरकार. तेजपाल सभागृहामध्ये  होणारी नाटके बंद झाली तेंव्हा छबिलदास चळवळ सुरु झाली. बहुतेक नाटकांचे पहिले प्रयोग मी तेंव्हा  पाहिले आहेत. सखाराम बाईंडर आणि गिधाडे ह्या दोन्ही नाटकांचे पहिले प्रयोग पाहिले होते. एका पहिल्या प्रयोगाला शेवटच्या रांगेत बसलेले नाटककार विजय तेंडूलकर ही जवळून बघितले होते. त्यावेळी मला तेंडुलकरांचे सगळ्यात जास्त आवडलेले नाटक म्हणजे “ अशी पाखरे येती “. जब्बार पटेल ह्यांनी सादर केलेले ते अप्रतिम नाटक. अनेक दिवस मी त्या नाटकातील अलिबागच्या नायिकेच्या शोधात होतो. म्हणजे अशी मुलगी कुठे दिसते का हे शोधीत होतो. मला वाटते माणसाच्या मनाची अशी अवस्था जेंव्हा असते तेंव्हा त्याला अशी पात्रें किंवा कलाकृती ( सिनेमा-नाटक) आवडू लागतात. बहुधा नाटककाराची ही अशी अवस्था असते किंवा तो अशा पात्रांना शोधून काढतो.
हसत खेळत  , थट्टा मस्करी करीत वेगाने पुढे जाणारे नाटक म्हणजे  “ शांतता , कोर्ट चालू आहे “. ह्या नाटकाचा शेवट जेंव्हा जवळ येतो तेंव्हा मन सुन्न करणारा अनुभव घेऊन आपण नाट्यगृह सोडतो. त्यानंतर मी बघीतले ते “ गिधाडे”. मन अस्वस्थ करणारा हा नाट्यप्रयोग . डोकं दुखविणारा हा प्रयोग. मला वाटतं आशयगर्भ नाटकाच्या सामर्थ्याचा विचार केला तर नाटककाराने तो परिणाम ह्या नाटकातून साधला होता असे हे वेगळे आणि जबरदस्त नाटक. त्याला माधव मनोहर ह्यांनी मराठी रंगभूमीवर “वयात आलेले नाटक” असे म्हंटले होते.  
"सखाराम बाईंडर"चा तर खूप बोलबाला झाला.. “ हे माझं घर आहे. इथं माझं राज्य आहे. मला पाहिजे तसेच करायला पाहिजे. राहायचे असेल तर राहा. नाहीतर खुशाल निघून जा – तुझ्या सारख्या पुष्कळ बघितल्या. “ असा अरेरावीपणा असलेला सखाराम बाईंडर तुमच्या – माझ्यात किंवा बहुसंख्य पुरुषात असतो – ही मनुष्य प्रवृत्ती स्पष्टपणे सखारामच्या भूमिकेत दिसून येते. त्या नाटकाने बरेच वादळ निर्माण केले होते. त्यानंतरचे “ घाशीराम कोतवाल “ . त्या नाटकाला तर आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली. मोहन आगाशे पुढे आले.वादळे निर्माण करणारा नाटककार अशीच तेंडुलकरांची प्रसिद्धी झाली होती. "पाहिजे जातीचे " ह्या छबिलदास रंगभूमी चळवळीतून नाना पाटेकर पुढे आला.
त्याच वेळी चि त्र्यं खानोल्कारांचे ‘अवध्य ‘ आणि “एक शून्य बाजीराव” ही दोन नाटके गाजली. तेंडुलकरांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी मराठी रंगभूमीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले.मराठीत असे दुसऱ्या कोणत्याही नाटककाराला जमले नाही. (अलीकडे महेश एलकुंचवार ह्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे).  तेंडुलकरानी “ मराठी नाटक वयात आणलं “.” घाशीराम”ला जर्मनीला नेलं. दिल्लीच्या इंटूक समाजाला तेंडुलकरानी वेड लावलं. राष्ट्रीय रंगभूमीवर मराठी नाटकाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
आचार्य अत्रे ह्यांनी “ मी जिंकलो , मी हरलो “ हे तेंडुलकरांचे सुरुवातीचे नाटक बघितल्यावर असे म्हंटले होते की ,” माझ्या नंतरचा सर्वात मोठा नाटककार विजय तेंडूलकर “. ते शेवटी खरेच ठरले.
खरे म्हणजे नाटककार तेंडुलकरापेक्षा “कोवळी उन्हे “ आणि “रातराणी”  ही सदरे लिहिणारे तेंडूलकर मला जास्त आवडतात. मला पहिल्यांदा ते भेटले ते “ कोवळी उन्हे” ह्या सदरातून. डोंबिवली ते व्ही टी किंवा बोरीवली ते चर्चगेट हा प्रवास पोटापाण्यासाठी  करणाऱ्या मुंबईकरांना सूर्यकिरणे अशी दिसतच नाहीत.कोवळी उन्हे त्यांना माहीतच नसतात.  उकडून घामाने बेजार झालेल्या मुंबैकराला मुंबईत रातराणीचाही सुगंध येत नाही. लोकलमध्ये चवथी अर्धी सीट मिळाल्यावर वर्तमानपत्र उघडले की “ कोवळी उन्हे” हे सदर जेंव्हा दिसायचे तेंव्हा तो लोकलचा प्रवास थोडासा सुखकर व्हायचा.  तसेच सायंकाळी थकलेले शरीर घराकडे धावत जात असे तेंव्हा तेंडूलकरांच्या ‘माणूस’ मधील  “रातराणी” चा सुगंध मनात दरवळत होता.” सारा आकाश “ आणि “भुवन सोम “ ह्या चित्रपटावर त्यांनी जे समीक्षण लिहिले ते वाचून आधुनिक चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा हे मी तरी त्यावेळी शिकलो. काही लेखक प्रत्यक्ष ओळखीचे नसतात पण तरीही आपल्या ओळखीचे असतात. तसे तेंडूलकर माझ्या ओळखीचे होते. परिचयाचे होते.
आणि मग योगायोगाने ओळख झाली
खूप उशिरा आमची ओळख झाली. त्यावेळी नाटक लिहिणे त्यांनी जवळ जवळ सोडून दिले होते. माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख “ कावड”च्या प्रकाशनाच्या वेळी झाली. मी अनंत भालेराव ह्यांच्या “ कावड” ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासाठी त्यांना पहिल्यांदा भेटलो. त्यासाठी ते औरंगाबाद – परभणीला आले आणि आमची ओळख वाढत गेली. परभणीला झालेला तो प्रकाशन सोहळा अविस्मरणीय होता. परभणीला असताना एका मुलींच्या शाळेचे संचालक त्यांनी शाळेला भेट द्यावी म्हणून आमंत्रण देण्यास आले होते . ते लगेच तयार झाले. समोर बसलेल्या शाळेतील मुलीना संबोधून “चिमण्या- पाखरानो “ अशी त्यानी सुरुवात केली आणि जे भाषण केले ते आजही मला आठवते. मुला-मुलींशी संवाद कसा करावा हे त्यादिवशी माझ्या लक्षात आले. आईच्या ममतेने ते मुलींशी बोलत होते. संवाद साधत होते. गप्पा मारीत होते. तेंव्हा मला खालील कवितेच्या ओळी आठवल्या.
ज्यांची हृदये झाडांची असतात
त्यांनाच फक्त फुले येतात
तेच वाढतात , प्रकाश पितात
सारे ऋतू झेलून घेतात.
तेच फक्त गुच्छासारखा  -
पावसाळा हुंगून घेतात
असे हे विलोभनीय व्यक्तिमत्व मी त्या दिवशी त्या शाळेत पहिले.
तेंडूलकरानी “ कोवळी उन्हे “, “रातराणी” ही सदरे लिहिले. त्यावेळी मी वयाने तरुण होतो. मला ती सदरे आवडत होती. वय वाढत जाते. अनुभव गाठीशी येतो .जीवनातील टक्के टोणपे खाल्ल्यानंतर , जीवनाचा नवा दृष्टीकोन तयार होऊ लागतो. तेंडूलकर ही असेच बदलत गेले.. “कोवळी उन्हे” लिहिणारे तेंडूलकर “ रामप्रहर” लिहू लागले. सदर सुरु केल्यानंतर काही दिवसातच अयोध्याकांड झाले. आणि त्या  सदराला नवा अर्थ प्राप्त झाला. त्यातून नवा विचार, नवी दिशा, नवे राजकीय अर्थ जाणवू लागले. एका साहित्यिकाची पत्रकारिता म्हणजे “रामप्रहर .फारच थोड्या साहित्यिकांना असे लिहिणे जमते. असे माझे वैयक्तिक मत आहे. अल्पशब्द शैली हा तेंडूलकरांच्या लिखाणाचा विशेष. फारच थोडे साहित्यिक असे अल्प्शब्दात लिहितात. आपल्या अल्पशब्द शैलीतून खूप काही सांगणारा हा मनस्वी साहित्यिक . सामाजिक बांधिलकीचा विचार देणारा हा वेगळा साहित्यिक. तो तुमच्या – माझ्या मनातलं बोलणारा ,लिहिणारा मनस्वी लेखक. म्हणून ते मला लेखक म्हणून  आवडतात.
आणि तेंडुलकराची मैत्री झाली
“कावड “च्या प्रकाशनानंतर त्यांच्या भेटी होतच गेल्या. कधी कधी मालवीय रोड वर असलेल्या माझ्या कार्यालयात ते येत असत. त्या रस्त्यावरूनच ते घरी जात असत. आमच्या गप्पा होत. अनेक विषयावर आम्ही बोलत असुत. ते जास्त ऐकून घेत असत. मीच जास्त बोलत असे. ते जेंव्हा बोलत असत तेंव्हा त्यांचे विचार ठाम असत. त्यांचा मुद्दा मांडण्याची एक विशिष्ट पद्धत होती. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे असे. एखादेच वाक्य बोलत आणि जीवनाचा नवा अर्थ कळत असे.  कधी कधी त्यांचा फोन येत असे, बरेच दिवस झाले आहेत .आपली भेट भेट झाली नाही. येवून जा . आणि मी फोन करून त्यांना भेटावयास जात असे, खूप गप्पा होत. विविध विषयावर. खरे म्हणजे मी तसा वयाने आणि अनुभवाने लहानच. ते अगदी एखाद्या मित्रासारखे बोलत. लोकांनाही वाटे की माझ्याशी त्यांचे असे कसे जमते. मला तर ते मित्रासारखेच वाटत. एकदा असाच संवाद चालू असताना ते मला म्हणाले ,” गंगाखेडकर, तुम्ही अजून लहान आहात. अजून पुरेसे जग पाहिलेले नाही. लोक असेच असतात. ते असेच वागतात. कळेल तुम्हाला हळू हळू”. ते खरे होते. हे काही दिवसांनी माझ्या लक्षात आले.  
मी त्यांना एकदा सेलूला व्याख्यानासाठी घेऊन गेलो. माझा मित्र प्रा बालाजी भोसकर ह्याने नूतन महाविद्यालय ,सेलू  येथे त्यांची  दोन दिवसाची व्याख्याने ठेवली होती. दरवर्षी नामांकित मंडळी ह्या व्याख्यानमालेसाठी येत असतात. तेंडुलकरानी व्याख्यानास येण्यास होकार दिला.  आम्ही मुंबईहून बरोबरच प्रवास केला. एकाच सरकारी गेस्ट हाऊसवर आमची रहाण्याची व्यवस्था केली होती. सकाळी फिरावयास गेलो तेंव्हा आमच्या खूप गप्पा झाल्या. सेलूच्या महाविद्यालयातील पटांगणावर भाषणासाठी खूप गर्दी जमली होती. आजकाल मुंबई-पुण्यात अशा व्याख्यानमालांना फारशी गर्दी जमत नाही. पण सेलूला  आणि परभणीला खूप लोक आले होते. त्यांचे भाषण सुंदर झाले . सेलूकर फारच प्रभावित झाले होते. तो मराठवाडी पाहुणचार. ते तिखट जेवण . तक्रार न करता ते जेवले. कसलीही तक्रारही केली नाही. नाहीतर पुण्या – मुंबईची इतर मंडळी फार कुरकुर करतात असे ऐकले होते.. तेंडूलकर एकदम Down to Earth  माणूस. माणसात रमणारा हा माणूस. पात्रांना शोधणारा हा नाटककार.
आमचा औरंगाबादला मुक्काम होता. न्या. चपळगावकरांच्या घरी त्यांचे नाट्यवाचन आणि रात्रीचे भोजन ठरले होते. तेंडुलकराना नाटककार अजित दळवी ह्यांची आठवण झाली. त्यांनी आठवणीने त्यांना फोन करून बोलावून घेतले. नव्या लेखक – नाटककराबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. हे मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. नव्या पिढीचे अनेक लेखक –लेखिका ,नाटककार त्यांच्या संपर्कात असत. त्यांच्याकडे चर्चेसाठी ,मार्गदर्शनासाठी येत असत. अनेकाना त्यांनी लिहिते केले.
तेंडूलकर “ पेशा लेखकाचा” हे आठवडी सदर महाराष्ट्र टाइम्स मधून लिहीत असत. त्यांचे लिहून झाल्यावर अक्षर जुळवणसाठी ती प्रत ते आमच्या DTP सेंटरकडे पाठवीत असत. त्यामुळे छापून येण्यापुर्वीच मला तो लेख वाचायला मिळत असे. त्या अक्षर जुळवणीचे मुद्रित शोधन ते स्वतःच करीत असत. ती प्रत मग मटा कडे प्रसिद्धीसाठी जात असे. एक –दोन लेख आधीच लिहून तयार असत. पाठविण्याचा क्रम त्यांच्या हातात असे. मटा चे ते लेखन त्यांनी एकाएकी बंद केले. कारण त्यांचा एक लेख मटा च्या संपादकांनी छापला नाही.  संपादकांना तो काही कारणामुळे  छापवायाचा नसावा. संपादकाच्या काही अडचणी असतीलही. पण लेखक स्वतःच जबादारी घेत असेल तर छापणे आवश्यक आहे. किंवा सदर लिहिण्यास आमंत्रित केलेल्या लेखकास संपादकाने तसे कळविणे आवश्यक आहे.तसे त्यांनी कळविले नव्हते . त्यांचे इतर दोन-तीन लेख छापून आले .परंतु तो लेख प्रसिद्ध होत नव्हता. त्यामुळे तेंडुलकरानी "पेशा लेखकाचा" हे सदर लिहिणेच सोडून दिले. सर्व लेख माझ्याकडेच DTP वर मुद्रित होत असल्यामुळे मला ते पुस्तक लगेच काढता आले असते. प्रकाशक म्हणून माझा एक प्रकल्प असा बंद पडला.
“रामप्रहर” च्या काही आठवणी 
एकदा रामप्रहरच्या लेखांची कात्रणे त्यांनी मला वाचावयास दिली. मला ती खूप आवडली. मी पुस्तक काढण्याचे ठरविले . त्यांनी लगेच होकार दिला आणि मी “रामप्रहर “ चा प्रकाशक झालो. “ रामप्रहर” प्रकाशनासाठी तयार होते. प्रकाशन कोणाच्या हस्ते करावयाचे ह्याचा विचार करीत होतो. तेंडुलकरानी काही नावें सुचवली. मी काहींना फोन केलें . वेळा जमत नव्हत्या. आणि तेंडुलकरानीच स्वतःच नाव सुचवले ते विजयाताई लवाटे ह्यांचे. माझी ओळख नव्हती. मी त्यांना लगेच फोने केला आणि त्या “हो” म्हणाल्या. अर्थात हे तेंडुलकराच्या मुळेच.
विजयाताई विशेष परिचयाच्या नव्हत्या. मला त्यांच्याविषयी जे समजले ते “रामप्रहर” वाचूनच. तेंडुलकरानी लिहिलेला पहिलाच लेख त्यांच्यावर होता. त्यांची प्रकाशनाच्या दिवशी सकाळी त्या मुंबईत आल्या तेंव्हा भेट झाली. “स्वतःच्या पलीकडे पाहणारी , इतरांसाठी कष्ट्णारी , कशाचेही उपकार नं मानणारी आणि उलट अपेक्षा नं ठेवणारी माणसें कशी घडतात?  परंतू माणसे खरीच मोठी असतात कां ? की ती आपल्यासारखीच असतात? नव्हे ती वेगळी असतात. विजयाताई सारखी”. “आठवणीतल्या गोष्टी” ह्या पुस्तकासंबंधी लिहिताना तेंडुलकरानी विजयाताईचे केलेले हे वर्णन. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि सामान्य माणसातील असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख झाली. मोठी माणसे खरीच मोठी असतात का? ती तशी नसतात. ती छोटीही असतात हे मी जवळून पहिले आहे. पण विजयाताईसारखी अगदी तुमच्या –आमच्यासारखी साधी दिसणारी माणसे खूप मोठे काम करताना दिसतात. तेंव्हा आशेचा नवा किरण दिसू लागतो. समाज मन बदलण्यासाठी मनापासून लिहिणाऱ्या तेंडूलकरांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला विजयाताई सारख्या समाजसेविका मिळाव्या हा एक दुर्मिळ योग होता. आणि अशी माणसे शोधणार्या व त्यांच्यावर लिहिणाऱ्या तेंडुलकरांचे वेगळेपण त्यामुळेच लक्ष वेधून घेते.
विजयाताईनी तेंडूलकरांच्या पुस्तकावरच बोललेच पाहिजे असे नाही तर त्यांनी ह्या निमित्ताने आपल्याला भेटावे व आपले आगळे-वेगळे अनुभव सांगावेत ह्या उद्देशांनेच मी त्यांना आमंत्रित केले होते. नव्हे, तेंडुलकरानीही मला तसेच सूचित केले होते. त्या कार्यक्रमात विजयाताई जे बोलल्या ते मनाला स्पर्शुन गेले. तो एक वेगळा अनुभव होता.
न्या. नरेंद्र चपळगांवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते प्रा वा ल कुलकर्णी ह्यांचे शिष्य. ज्यांच्या पुस्तकांच्या कपाटात न्याय ,कायदा आणि साहित्य एकत्र नांदतात असे ते व्यक्तिमत्व. मराठवाडा साहित्य परिषदेसाठी सतत प्रयत्न करणारे व आपल्या वक्तृत्वाने मराठवाड्यात नावाजलेले न्या. चपळगावकर एक दर्जेदार समीक्षक,अभ्यासू आणि रसिक साहित्यिक. त्यांचे “उन सावली” हे लोकांना आवडलेले सदर. विविध विषयावर केलेले सुंदर लिखाण. ते आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी आले होते.  
मुख्य निवडणूक आयुक्त श्री शेषन ह्यांनी “Third class journalists asking fourth class questions “, अशी पत्रकारांची निर्भत्सना केली होती. श्री शेषन ह्यांना महाराष्ट्रातील पत्रकारांची विशेष माहिती नसावी. मी अरुण साधूना पत्रकार आणि लेखक म्हणून ह्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून आमंत्रित केले होते. “First class journalist with top class literary sense”, असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे ते अभ्यासू पत्रकार –लेखक आणि कादंबरीकार आहेत. मुंबई दिनांक – सिंहासन ह्यामुळे ते सर्वांनाच परिचित झाले आहेत. त्यांचे स्तंभ लेखनही बरेच लोकप्रिय झाले आहे. साहित्य वर्तुळात त्यांचे स्वतः चे असे वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. (नंतर ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले). त्यांनी तेंडूलकरांच्या पुस्तकावर बोलण्याचे मान्य केले. त्यांचे ते अभ्यासपूर्ण भाषण आज ही माझ्या लक्षात आहे.
महाराष्ट्रात जे चांगल्या दर्जाचे पत्रकार आहेत त्यात अरुण साधू आणि अरुण टिकेकर ह्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अरुण टिकेकर हे लोकसत्तेचे संपादक होते आणि त्यांनी विजय तेंडुलकराना “रामप्रहर” हे सदर लिहिण्यास आमंत्रित केले. ते चालू ठेवले. तेंडुलकराना अगदी थकवा येईल इतके त्यांच्याकडून लिहून घेतले. तेंडूलकर हा एक Difficult माणूस होता . असा एक समज होता.त्यांच्या विचारांशी सहमत नसताना आणि इतर दडपणे असताना त्यांनी लिहिलेले छापणे ,त्याची जबाबदारी घेणे व अशाही परिस्थितीत लिहिते ठेवणे हे फार मोठे कठीण काम अरुण टीकेकरानी केले होते ,असे माझे मत होते. अग्रलेखाइतकेच स्तंभ लेखनातून विचारवंत लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत ,एका आगळ्या वेगळ्या संवादातून वाचकापर्यंत कसा पोहोचू शकतो व खऱ्या अर्थाने कोणत्याही एका विशिष्ट राजकीय ,सामाजिक ,आर्थिक प्रणालीशी बांधिलकी न ठेवता सामाजिक बांधिलकीचा आपला विचार एक विचारवंत म्हणून स्तंभ लेखनातून व्यक्त करीत असतो. रामप्रहरचे यश जेवढे तेंडुलकरांचे होते तेवढेच ते लोकसत्तेचे संपादक अरुण टीकेकारांचे होते, असे मला वाटते.
ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ वसंत सरवटे ह्यांचे होते. त्यांची आणि तेंडुलकरांची घनिष्ठ मैत्री. तेंडुलकरामुळेच त्यांची ओळख झाली. एका चित्रकाराला जवळून बघितले. त्यांची साहित्य रसिकता समजली. एक वेगळा दृष्टीकोन समजला. वेगळा विचार करायला शिकलो.
रामप्रहरमुळेच दिनकर गांगल भेटले. वाचक चळवळीचे ते नेते. अगदी शांत स्वभावाचे , फार कमी पण मुद्देसूद बोलणारे गांगल म्हणजे एक अजब रसायन आहे. “ग्रंथाली” ही चळवळ ते चालवतात. साहित्य “रुची “ वाढविण्याचे काम ते करतात. त्यांचा हिशोब चोख असतो. त्यांच्या संस्थेशी मी जोडला गेलो आणि त्यांच्याकडून न कळत खूप काही शिकलो. त्यांनीच पुस्तके वितरणासाठी खूप मदत केली व सहकार्य दिले. त्यामुळे प्रकाशन व्यवसायातील अडचणी समजल्या. ग्रंथाली चळवळ चालवणे हे किती कठीण काम आहे हे अगदी जवळून बघितले. कितीतरी लोकांना लिहिते करणारा हा माणूस. एकदम वेगळा आहे.
तेंडूलकरानी “सरदार “ ची पटकथा लिहिली होती. ते पुस्तक रूपाने त्यांनी आधीच प्रकाशित केले. त्यावेळी त्यांनी P.C. विकत घेतला. लहान मुले जशी शिकतात तसे ते computer शिकत होते. माझा इंजिनिअर त्यांच्या घरी जाऊन त्यांना काही अडचणी आल्यातर समजावून सांगत असे. मला त्यांचे हे computer शिकणे खूप काही सांगून गेले. नंतर ते अमेरिकेला गेले तेंव्हा त्यांनी देवनागरी लेखनाचे प्याकेज आणले होते. ते शिकताना अडचण आली की माझा इंजिनिअर त्यांच्याकडे जात असे. असा हा खूप मेहनत घेऊन computer शिकणारा साहित्यिक मी फार जवळून पहिला आहे.
एकदा मी त्यांना विचारले की आजकाल तुम्ही नवे नाटक का लिहीत नाहीत. तेंव्हा ते म्हणाले होते" नाटक हे एकट्याचे मध्यम नसते. एकदा लिहून झाले की  ते दिग्दर्शक . निर्माता आणि नट ह्याचे होते. त्याचे पुढे काय होते. ते सांगता येत नाही. म्हणून आता नाटक लिहिणे नकोसे वाटते." आणि ते कादंबरी लिखाणाकडे वळले. मी त्यांची पहिली कादंबरी वाचली. पण ती फारशी आवडली नाही. त्या कादंबरीवर फारशी चर्चा ही झाली नाही .
त्यांनी मला दोन पुस्तके भेट दिली होती. “ सरदार” आणि “हे सर्व कुठून येते?” . “सरदार” च्या प्रकाशन समारंभाला मला आमंत्रण पत्रिका ही दिली होती. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला “ सरदार” खूप आवडले होते. चित्रपटासाठी कसे लेखन करतात हे त्या पुस्तकावरून शिकण्यासारखे आणि समजण्यासारखे आहे. त्यावर मी एक मोठा लेख ही लिहिला होता. आणि माझ्या रोटरी मित्रासाठी दोन-तीन रोटरी क्लबातून भाषणेही दिली होती. हा चित्रपट बराच उशिरा प्रदर्शित झाला. पण “गांधी” सारखाच तो महत्वाचा आणि चांगला चित्रपट आहे  हे लोकांच्या विशेष लक्षात आले नाही ह्याचे वाईट वाटते.
अशा आहेत माझ्या विजय तेंडूलकरांच्या आठवणी.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर 

Wednesday, March 20, 2013

तुझा पैसा , माझा पैसा.


 काल “हिंदू” वर्तमान पत्रातYour Money , My Money “ हा एक लेख वाचला. आणि विचारांचे अनेक तरंग मनात उमटले. आजकाल नव्या पिढीत दोघे पती-पत्नि अर्थाजन करीत असतात. बायको शिकलेली असावी, कमावती असावी, अर्थार्जन करणारी असावी, असे बहुतेक सर्वांनाच वाटू लागले आहे. त्यात चूक अशी काहीच नाही. ३० -४० वर्षापूर्वी मलाही असेच वाटत असे. मी तर असा निर्णय घेतला होता की पत्नी ही अर्थार्जन करणारीच असावी. ती शिक्षीतच असावी. स्त्रीने अर्थार्जनाच्या बाबतीत स्वावलंबी असावे ,असे माझे त्यावेळपासूनचे मत होते आणि आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात उत्पन्नाची साधने म्हणजे मिळणारा पगार. त्यात मौजमजा कशी होणार? आपल्याला जगणे सुखकर असावे असे वाटते तर कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे आवश्यकच आहे. छोट्या one room kitchen च्या ऐवजी दोन किंवा तीन बेड रूम चा फ्ल्याट असावा,छोटी कार असावी, आठवड्यात एकदा सिनेमा-नाटक बघावे, बाहेर जेवायला जावे, मुलांना नवे नवे खेळ आणून द्यावेत, वर्षातून एकदा भारतात कुठेतरी प्रवास करावा आणि सुट्टी मजेत घालवावी. एकदा तरी परदेशवारी करावी . चांगले कपडे – महागड्या साड्या घ्याव्यात. एक ना अनेक. स्त्रियांना तर सोनेचांदी आणि हिर्यांचे वेड . ते ही हवे असतात. ही अगदी छोटी छोटी स्वप्ने. जीवनमान महागले आहे. सर्वच किमती वाढतच असतात. मुलांच्या शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे. अशावेळी स्त्रियांनी नोकरी करून घराला हातभार लावला तर बिघडले कुठे? त्यांनी नोकरी केली तर  ही छोटी छोटी स्वप्ने लवकर पूर्ण होतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा वाढतच असतात. त्या गरजा नसून आवश्यक वस्तू वाटू लागतात. मग बाजारात आलेला नवा फोन हवा असतो. आय प्याड हवा असतो. हाय स्पीड इंटरनेट हवा असतो . चांगला क्यामेरा हवा असतो. आय म्याकस मध्ये थ्री डी सिनेमा पहायचा असतो. हे सारे आवश्यक आहे असे वाटू लागते. मिळणारा पगार ( त्यातून वजा होणारे हप्ते , कर, सर्व प्रकारच्या बचतीचे हप्ते, इंशुरन्सचे हप्ते, वगैरे वगैरे ) म्हणजे टेक होम स्यालरी फारच तुटपंजी आहे असे वाटू लागते. आणि म्हणूनच आपली पत्नी कमावती हवी असे वाटणे काहींच चूक नाही. ती असावीच. तिच्याही इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात. आणि आर्थिक कारणावरून होणारी घरातील चिडचिड कमी होते. पण .... इथेच नवा तणाव सुरु होतो. “तुझा पैसा आणि माझा पैसा”.
मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने अर्थार्जन करतात . त्यांना परुषापेक्षा कमी मजुरी मिळते. परंतु दिवसभराचे काम संपल्यावर मिळालेल्या पैशाचे रेशन घेऊन स्वयंपाक करून त्या आपल्या मुलांना भरवतात तर त्यांचे नवरे देशी दारू ढोसून निपचित पडतात. धुणी-भांडी करणारी किंवा स्वयंपाक करून अर्थार्जन करणारी स्त्री घराला हातभार लावतच असते. कनिष्ठ मध्यमवर्गातील स्त्रीला पुरुषापेक्षा कमी पैश्याची नोकरी असते. त्यामुळे तिला थोडासा न्यूनगंड असतो. आणि पुरुषाला वाटते की आपला पगार जास्त आहे. तिच्या पगारात काय होणार?आपणच तर घर चालवतो. ह्या उलट ज्यास्त शिकलेल्या आणि पुरुषाइतकेच किंवा त्यांच्यापेक्षा अधिक पैसा कमावणार्या स्त्रीयांचे प्रश्न मोठ्या शहरात दिसून येतात. म्हणूनच “ तुझा पैसा , माझा पैसा “ हा वाद अनेक कुटुंबात दिसून येतो आहे. आयटी इंडस्ट्रीमुळे पुणे,मुंबई,दिल्ली,बंगलोर ह्या शहरात ही वस्तुस्थिती आहे.” हा आपला पैसा आहे . दोघांचा आहे. आपल्यासाठीच आहे” ही जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. पण पुरुषी अहंकार मध्ये अडवा येतो. माझेच उदाहरण देतो. माझी पत्नी महाविद्यालयात प्राध्यापक होती. स्थिरस्थावर असल्यामुळे दरमहा उत्पन्नाचे साधन होते. त्यामुळेच मी व्यवसाय करावयाचे ठरविले. व्यवसायात स्थिर होण्यास आणि यश मिळण्यास काही कालावधी जावा लागला. पण घरचे रेशन अडले नाही. घर व्यवस्थित चालू राहिले. त्यानंतर माझे आर्थिक उत्पन्न खूपच वाढले परंतु तिचा आर्थिक सहभाग नसता तर मी व्यवसाय करूच शकलो नसतो. म्हणजे माझे आजचे आर्थिक यश हे आम्हा-दोघांचेच आहे. हा तुझा पैसा आणि हा माझा पैसा असे मला वाटत नव्हते . तिचा पगार ब्यांकेत सरकार खजिन्यातून जमा होत असल्यामुळे तिने पगार कधीच माझ्या हातात दिला नाही तेंव्हा मी गंमतीने म्हणत असे की “ मी तर तुझा पगार पाहिलाच नाही. मला कुठे हातात दिलास? “ माझे हे बोलणे तिला अनेकदा लागले हे माझ्या फार उशिरा लक्षात आले. तेंव्हा “ तुझा पैसा, माझा पैसा” असे म्हणणे योग्य नव्हे. हे खरे.
अशा पैशाच्या गोष्टी फक्त छोटे मोठे व्यावसायिकच करीत असत. आता ह्या गोष्टी सर्व सुशिक्षित व नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा घरात होत असतात व एक तणावाचे वातावरण निर्माण करतात हे सत्य आहे. डबल आर्थिक इंजिन असणारी ही कुटुंबे. हा सर्व कमावलेला पैसा जातो कुठे ? असा प्रश्न जेंव्हा ते एकमेकाला विचारतात तेंव्हाच भांडणाला सुरुवात होते. आपण बचत का करीत नाहीत? असे प्रश्न दोघे एकमेकाला विचारत सुटतात. पैश्यावरुन कुरबुरी सुरु होतात. लग्न व्यवस्थेला तडा जातो की काय अशीही अवस्था काही कुटुंबात दिसून येते. मुख्यतः पुरुषाला अर्थ व्यवहार स्वतःकडेच हवे असतात. “माझा पैसा हा माझा पैसा आणि तुझा पैसा हा आपला पैसा. माझे उत्पन्न तुझ्यापेक्षा अधिक त्यामुळे पैसे कसे खर्च करावयाचे हे मीच ठरवणार” अशी बहुतेक सर्व पुरुषांची भूमिका असते. त्यामुळेच खरा तणाव निर्माण होतो,हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्याकरिता दोघामध्ये अधिक सुसंवाद हवा. एकमेकांच्या गरजा लक्षात घ्यावयास हव्यात. हे तणाव वरचेवर वाढतच जाणार. कुटुंब व्यवस्थेला हे हानिकारक आहे. पाश्चिमात्य देशात हा प्रश्न भेडसावत होता. आता तो आपल्याकडे ही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे.त्यामुळे तुझा – माझा न करता सामोपचाराने , दोघांनी एकत्रित विचार करून आर्थिक निर्णय घेण्याची वेळ आली आहे.


मी तर हिमालयाचा प्रेमी

कैलास

आयुष्य फार सुंदर आहे. आपण ते अधिक सुंदर करावयाचे असते. त्या करिता निसर्गाकडे बघावे लागते. हिमालयात गेलात तर आयुष्याचे नवे नवे अर्थ जाणवू लागतात. त्यासाठी हिमालयाचे यात्रिक व्हावे लागते. मी तो अनुभव घेतला आहे. मी तर हिमालयाच्या प्रेमातच पडलो आहे. स्विस मध्ये आल्प्स पर्वताच्या रांगा बघितल्या.ऑस्ट्रियामधून झेककडे जाताना आणि क्रोएशिआतून स्लोवेनियामार्गे ऑस्ट्रिया कडे येताना आल्प्सची विविध रूपे पाहिली. निसर्ग सोन्दार्याने नटलेला हा परिसर नितांत सुंदर आहे ह्यात वाद नाहीच.तसेच डेनवर च्या परिसरातील अमेरिकन पर्वतांच्या रांगाही विलोभनीय आहेत. ग्र्यांड क्यनिअनचे सौंदर्य तर विलक्षण आहे. थक्क करणारे आहे. तरीही हिमालयाचे सौंदर्य वेगळेच आहे. हिमालय म्हणजे  या सम नसे कोणी" असाच आहे. दर ३ ते ५ किलोमीटर नंतर, तो आपले रूप बदलत असतो. २००० किलोमीटर पेक्षा जास्त  लांबीचा हा हिमालय बघणे तसे अवघडच आहे. परंतु त्याची विविध रूपे बघणे विलोभनीय आहे. हिमालय सुंदर आहे. विलोभनीय आहे. रौद्र आहे. Charming आहे. दु:खं देणारा आहे. त्रास देणारा आहे. प्रवासात आनंदाचे वेगळे रूप दाखवणारा आहे. प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा आहे. नवीन काही शिकवणारा आहे. अजिंक्य आहे. तुम्हाला तुमचे खुजेपण दाखविणारा आहे. तो तुम्हाला सांगतो की  तुम्ही त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्याला जिंकू शकत नाहीत. तुम्ही निसर्गावर मात करू शकत नाहीत. तो तुम्हाला एकाकी करतो. त्याच्याकडे बघितले की तुम्हाला वेगळेच वाटू लागते. कधी कधी तो एक निसर्ग कविता असतो. त्याचे गाणेच आपण गात असतो. तो त्याची उंची सांगत असतो. आपण त्या उंचीवर गेलो की आपल्याला खोली जाणवू लागते. एकाबाजूला अधिक उंचीची नवी शिखरे दिसतात तर दुसर्या बाजूला खोली बघून जीव घाबरा होतो. तो आपल्याला सारखा आमंत्रित करीत असतो. आपण १०,००० फुटावर गेलो की १४००० फुटावर जाण्याचे आमंत्रण मिळते. पुनः १७,००० फुटावर पोहोचलो की अधिक वर जावे असे वाटते. पण ते फक्त गिर्यारोहकच करू शकतात. त्या बर्फाछादित शिखरांचे रंग सारखे बदलतात. सकाळी आणि संध्याकाळी दिसणारी ती सोनेरी शिखरे मनात तशीच जपून ठेवलेली असतात. ती कधीच विसरू शकत नाहीत. त्या थंड वातावरणातही ती कोवळी सोनेरी किरणे उबदार असतात.
मी हिमालय बराचसा पालथा घातलाय. पहलगाम, सोनमर्ग ,गुलमर्ग तर सुंदर आहेतच. परंतु मनालीचे सौंदर्य न्यारेच आहे. एकदा रोहतांग पास ओलांडला आणि लेह कडे जाणारा रस्ता पकडला की ४५० किलोमीटर लांबीचा हा हिमालय पाहिला की डोळे भरून जातात. जगातील कोणतीही पर्वतराजी अशी नसेल. प्रत्येक ५ किलोमीटर नंतर ह्याचे रूप बदलत असते. हा एक अवर्णनीय प्रवास आहे. पण हा प्रवास सतत बदलत असतो. लेह मार्गावर  भागीरथी नदीचा प्रवाह सोबत असतो. लेहला गेल्यावर लडाखची विविध रूपे दिसू लागतात. खारदुंगला पास ओलांडला की नुब्रा कडे जाताना मन थक्कच होते. हिंदकुश पर्वतराजी ही समोर दिसू लागते. लडाख मधील पोगांग लेक डोळ्याचे पारणे फेडते. सिंधू नदीच्या काठाने पण  उंचावरून जाताना नदीचे रूप डोळ्यात मावत नाही. जेंव्हा सिंधू आणि झंकार ह्या दोन नद्या मिळतात त्या ठिकाणच्या हिमालयाच्या पर्वत रांगा डोळे विस्फारित करतात. त्यांच्या बरोबर काराकोरम पर्वताच्या रांगाही सोबत करीत असतात. चंद्रावर जशी जागा आहे तशीच हिमालयात आहे. त्याला Moon  land म्हणतात. आपण जणू काही पृथ्वीवरील चंद्रावरच आहोत असे भासते. अति पूर्वेकडील सिक्कीम दार्जीलिंग ,भूतान ,तवांग ह्या परिसरातील हिमालयाच्या रांगा अगदीच वेगळ्या आहेत. उत्तराखंड मधील प्रवास अधिक कठीण आहे. 
असा हा हिमालय. वेगळा हिमालय. हिरवा हिमालय.( झ्याग्मू जवळचा ), शुभ्र हिमालय. सुंदर हिमालय. देखणा हिमालय. रौद्र हिमालय ( कैलास-मानस सरोवाराकडे जाताना). फुलांचा हिमालय (Valley of Flowers) . वेलींचा हिमालय. तरू-लतांचा हिमालय ( भूतानमध्ये). नद्यांचा हिमालय (उत्तराखंडमध्ये ). धबधब्यांचा हिमालय ( तवांगकडे जाताना). खळाळनार्या पाण्याचा हिमालय. अल्लड धावणाऱ्या नद्यांचा हिमालय ( मनाली ते लेह ). फेसाळणारया पाण्याचा - नद्यांचा हिमालय (गोविंद घाट ते घांगरीया) , घोंगावनारे आवाज , त्या पाण्याची वाटणारी विचित्र  भिती ( सिंधू नदीच्या काठाने उंचावरून पाहताना), तर कधी त्याच पाण्याची वाटणारी गंमत ( अलकनंदा नदीच्या काठाने जातांना) ,आजूबाजूचे निसर्ग वैभव (भूतान), ती दाट झाडी . ती हिरवाई . सारेच काही अप्रतिम ,अवर्णनीय ,जीव घेणे सौंदर्य (हेमकुंड) ) , कासावीस करणारे सौंदर्य( नुब्राला जाताना) , कधी खूप शांत (देवप्रयाग)  तर  कधी खूप रौद्र (बद्रिनाथजवळ) , कधी उल्हासित करणारे (मानस सरोवर), तर कधी उदास करणारे (मधेच पाउस पडला आणि अडकलो तर) अवघड रस्ते .

हिमालय डोळ्यात मावत नाही. कसा मावणार . प्रचंड लांबी रुंदीचा. लांबी रुंदी तशीच खोली किंवा उंची. लांबी – रुंदी पाहिली . लेह-लडाख , मनाली-लेह (४५० कि.मी. ) ,लेह- नुब्रा व्ह्याली , काठमांडू ते मानसरोवर (९५० कि.मी.) , खारदुंगला पास ( १७५०० फुट) , भूतान ( पूर्व-पश्चिम भाग), हेमकुंड ( १४००० फुट ),सिक्कीम  दार्जीलिंग रस्त्यावर तिस्ता नदीच्या काठाने जाताना,  अतिपूर्वेकडे तवांगला  असममधून जाताना  दिसणारा हिमालय तर फारच कठीण आहे. हा प्रवास सर्वात कठीण आहे. नुसत्या खडकाळ रस्त्यांचा. रस्ते नाहीतच.
हिमालय तसा ठिसूळ आहे. आपला सह्याद्री तसा टणक आणि कणखर. हिमालय सारखा ढासळत असतो. पाणी आणि बर्फ त्याला नाजूक करतात. त्याच्या चिरा चिरा करतात. नद्यांचे प्रवाह बदलून टाकतात ( ब्रम्हपुत्रा सारखी बदलत असते.). तवांगला जाताना तो किती ठिसूळ आहे ,कसा सारखा ढासळत असतो ते लक्षात येते.
बद्रीनाथला भीम पुलाजवळ सरस्वती नदी ज्या बोगद्यातून भरधाव वेगाने बाहेर पडते, तो प्रचंड वेग बघण्यासारखा आहे. कोठून निघते ही सरस्वती कळत नाही. त्या पर्वतापलीकडे तिबेट आहे. तिचा उगम त्या बाजूला. पर्वत फोडून ती भरधाव बाहेर येते. डोंगर फोडून ती आली कशी? अगम्य. आणि काही किलोमीटर अंतरावर ती अलकनंदास मिळते. अलकनंदाच खरी मोठी नदी. मंदाकिनी, नंदाकिनी,भागीरथी ,सरस्वती ह्या नद्या तिलाच मिळतात. देवप्रयाग-रुद्रप्रयाग नंतर तिला गंगा म्हणतात.गंगोत्रीहून निघालेली भागीरथी-गंगा शेवटी अलकनंदास मिळतात. यमुना ही नंतर गंगेला येऊन मिळते. अलकनंदेच्या काठाने केलेला प्रवास खरोखरच अविस्मरणीय आहे. कोणीही हिमालयाच्या प्रेमात पडणारच. मी तर आहे हिमालयाचा प्रेमी आणि यात्रिक.


 हिमालयाची झलक दाखविणारी आमच्या  प्रवासातील काहीं क्षणचित्रे


लडाख

सिंधू नदीचा काठ  - लेह

हिमालयातील चंद्र प्रदेश 

चांगला १७,८०० फुट

पोन्गंग लेक - ३ किलोमीटर अंतरावरून 

पोन्गांग लेक , पलीकडे चीनची सीमा

पुष्पावती नदी  - अवखळ -अल्लड -प्रचंड वेगात धावणारी

VALLEY OF FLOWERS

VOF

गोविन्द्घाट ते घांगरीया

गंगा

सरस्वती - डोंगर फोडून बाहेर येते - पलीकडे तिबेट 

भूतान 

हिमालय - भूतान- पलीकडे तिबेट 

हिमालयाच्या रांगा

अलकनंदा

भूतान - ही फुले हृदयरोग बारा करतात

भूतान मधील हिमालयाच्या पर्वतराशी

खारदुंगला - पलीकडे नुब्रा व्हाली - सियाचीनला जाणारा रस्ता

नुब्रा कडे जाताना

खारदुंगला  - नुब्राहून परतताना 

SAND  DUNES - नुब्रा 

अलकनंदा  रुद्रप्रयाग जवळ

रुद्रप्रयाग - अलकनंदा आणि मंदाकिनी संगम

अलकनंदा च्या काठाने प्रवास

पुष्पावती - VOF ला जाताना

VOF

VOF

सरस्वती

पुष्पावती - VOF कडे जातांना

हिमालयातील नद्यांच्या काठाने चाललेले प्रवास

तवांगला जाताना - ० डिग्री

तवांगला जाताना

धबधबा - तवांगला जाताना असे अनेक धबधबे

तवांगला बर्फाने गाठले

तवंग - चीन सीमा फक्त ६० किलोमीटरवर

बर्फात अडकलो - तवांग कडून परतताना

उन्हाळ्यात एवढा बर्फ - तवांगला जाताना

सूर्योदय - हिमालयातला 

पुष्पावती

गंगा