Tuesday, January 25, 2022

Indian Muslims

भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. समाजवादी आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत' हा विचार सोडून द्यावा. मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे. आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला आहे.
अखिलेश/मुलायम, मायावती, ममता, डावे-उजवे कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आहे  आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली आहे. त्यांच्या विकासासाठी काहीच केलेले  नाही. हे आजही भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा-बाबरीकांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या. त्या जखमा तशाच रहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहेत, हे ह्या देशाचे दुर्दैव. गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबाबदार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आहे आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची/धर्मवादाची पेरणी करून फूट पाडली आहे  व सत्तेचे राजकारण केले आहे. मायावती/ मुसलमानांना तिकिटे देतात तर अखिलेश/मुलायम सिंग ही तशीच खेळी  करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत. ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला.
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले आहे की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे, आम्हालाच निवडणून द्यावे,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले, ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली.
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग/अखिलेश ह्यांनी पोसला. दिल्लीचे जामा  मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये, हे आपल्या देशाचे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात. त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो? बाबरी-गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही. आता तर हा प्रश्न सुटला आहे आणि राम  मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. आता मशिदीची उभारणी लवकरच होत आहे व तेथे रुग्णालय आणि मोठे वाचनालय उभारण्याचे ठरत आहे. हे चांगलेच आहे पण त्यासाठी राजकारण चालूच असून नवे उचकवणे चालू ठेवले असून मोदी/योगीवर टीका केली जात आहे.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे, हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत.
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये. आता ३७० कलम रद्द झाले आहेच. लडाखला वेगळे केले आहे. ट्रिपल तलाक कायदा रद्द झाला आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची'ची भाषा बोलत असतात. त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात. पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र' जिनांच्यामुळे उदयास आले आहे. भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी, ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा 'मुस्लिम भारत' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे नेते 'हिंदू भारत' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत.
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.

Monday, January 24, 2022

दोन मित्र - भारत सासणे
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे होणारे अध्यक्ष भारत सासणे ह्यांची दिवाळी अंकात प्रसिद्ध होणाऱ्या कथामधून ओळख झाली होती. काही वर्षापुरी त्यांच्या काही कथा वाचल्याचे स्मरते. बहुधा मराठवाडा' दिवाळी अंकातून वाचल्या असतील. तसे ते मराठवाड्याचे आहेत. ह्यावेळी सर्व मराठी भाषिक साहित्य परिषदांनी त्यांची बिनविरोध निवड केली आहे, हे विशेष. 'दोन मित्र' ही २००४ साली लिहिलेली त्यांची कादंबरी वाचनालयात शोधतांना मिळाली. 'बौद्धिक मनोरंजन' हा शब्द कादंबरी चाळतांना दिसला. छोटी छोटी वाक्ये लक्ष वेधून घेत होती. त्यांची साधी सोपी भाषाशैली आवडू लागली. आणि एका दमात ही कादंबरी वाचून संपवली. असं फार कमी वेळा होतं. मनोहर आणि कानिफनाथ ह्या दोन मित्रांची ही गोष्ट आहे असं वाटलं; आणि लक्षात आलं की ही गोष्ट आहे ती 'मकरंद आणि जयमंगला' ह्या प्रेमात पडलेल्या मनोहरचा मुलगा आणि कानिफनाथच्या मुलीची. भिन्न जातीत जन्मलेली ही दोघे. आपल्या समाजातील जातीच्या भिंतीमुळे ती दोघे लग्न का करू शकत नाहीत ह्यांची ही गोष्ट. त्या दोन मित्रांचा एक तिसरा मित्र असतो एक लेखक. त्याला ते 'रद्दीवाला' म्हणतात. आणि हाच रद्दीवाला आपल्याला ही कथा सांगत जातो. कादंबरीकार भारत सासणे आपल्याशी बोलत असतात ते ह्या पात्राच्या तोंडून. लेखकाला जे काही सांगायचं आहे, ते त्यांनी फार सुंदर शब्दात सांगितलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं 'बौद्धिक मनोरंजन' केलं आहे. हेच ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य. रद्दीवाला लेखक आपल्याशी संवाद साधताना अगदी सहजपणे बोलत असतो. त्यातील कांही वाक्ये येथे मुद्दाम देत आहे. तेच सांगितलं आहे कादंबरीकाराने. * माणसाकडे माणूस म्हणून बघणे अधिक अवघड झालंय, कारण तो माणूस असण्यापेक्षा काहीतरी असतो आधी - जसं आंबेडकरवादी. बहुजन समाजाचा किंवा ब्राम्हण, किंवा संघवाला किंवा हिंदुत्ववाला, किंवा मुसलमान, किंवा समाजवादी इत्यादी .... * माणूस तुकड्या-तुकड्यानी वाटला गेलाय आणि मुखवट्याआड दडलाय. * संस्कृती एकमेकांना छेदतात तेंव्हा काही देवाणघेवाण अटळ असते. * लोक फार लवकर इमोशनल होतात! त्यांना भडकवणं सोपं असतं. * बौद्धिक मनोरंजन! मनोजन्य मनोरंजन! * मुलांनी बुद्धिजीवी व्हायचं की बाह्या सारून गुंड व्हायचं ..... की राजकारण करायचं सांगा! * अरे, धर्म म्हणजे मनुष्य जातीचा प्रेमाचा मार्ग! * दंगलखोरांना धर्म नसतो! * इथं झिंगलेला बुद्धिवादी होता, आणि तो जास्त धोकादायक असतो, हे मला माहित आहे. एकूणच बुद्धिजीवींची शोकांतिका! * आयुष्यात लॉजिक असलं पाहिजे असा नियम नाही. बौद्धिक भाषणबाजी करणारी माणसं .... आपण पुरोगामी आहोत असं दाखवायला असं अधूनमधून वागावं लागतं. काका, शिकवाल मला आता पुरोगामी व्हायला! * ज्याचं त्याचं स्थान असतं. ते सोडलं की रोप मरतं. नियतीवाद. * संस्कार आधी धावतात ना पुढे बुद्धीच्या! * जगण्याचे प्रत्येकाचे संदर्भ वेगळे असतात. कोणाचे काय तर कोणाचे काय? * आज काय दिसतंय. तुम्ही ज्यालात्याला खिजवायचं काम करतां! .... आज सगळे जण जय श्री राम !, जय जय रघुवीर समर्थ !, जय ख्रिस्त!, अल्ला हो अकबर! असं म्हणून एकमेकाला खिजवत असतात? आपण माणुसकी कधी शिकवणार? * स्त्री - काडीकाडीने ती सर्व जमवते; म्हणून स्त्रीला विध्वंस सहन होत नाही. * बेकार तरुणांचे तांडे आहेत, वैफल्यग्रस्त. याना जीवितहेतू हवा आहे. यांना जगण्याचा बहाणा हवा आहे. ... नाहीतर ही पोकळी ह्यांना गिळून टाकील. 'बोअर होत आहेत', असा मंत्र ते जपतात. 'काय आणि कशासाठी?', हे त्यांना समजत नाही. कोण टिळा लावतंय, कोण भगव्याच्या सावलीत आहे, कोण 'जय भवानी' म्हणतंय, कोण रघुवीर सेनेत आहे, कोण अल्लाच्या नावाखाली खुनशी बनलंय, .......सगळ्यांना काहीतरी 'बिजनेस' पाहिजे आहे. नसता हे जणू स्वतःला कुरतडत खाऊन टाकतील. हे विफल, बेकार तरुणांचे तांडे. * कधी कधी ..... एकदम सकाळ झाल्यासारखं वाटलं. वाटलं अजून जगणं शिल्लक आहे. अजून आशा आहे असं म्हणतात ..... शेवटी रद्दीवाला लेखक लिहितो ......मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती चमकते, प्रकाशाने प्रज्वलित होते. ती सतत आणि अप्रतिहत वाहत असते. अखिल जातीजातीबद्दल प्रेम निर्माण करते. तोपर्यंत ह्यांची मैत्री टिकली पाहिजे. दोन मित्रांची. अशी आशावादी वृत्ती समोर ठेऊन लेखक कादंबरी संपवतो. हा लेखक आपल्याशी सतत बोलत असतो. ही कादंबरी रद्दीत टाकण्याची नसून बौद्धिक चिंतन करून मैत्री वाढविण्याचा संदेश देणारी आहे. बऱ्याच दिवसांनी एक सुंदर कादंबरी वाचताना आपल्या समाजाचा आरसा समोर दिसत होता.अशी ही कादंबरी का आवडली हे सांगण्यासाठी हा खटाटोप. भारत सासणे ह्यांना खूप शुभेच्छा आणि येत्या साहित्य संमेलनातील तुमच्या भाषणाची वाट पाहतोय.

काळे करडे स्ट्रोक्स - प्रणव सखदेव

साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाचे हे पुस्तक वाचनालयातून आणलं आणि एका दमात वाचून टाकलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पुस्तक विशेषच असणार ही एक अपेक्षा होती आणि वाचून मात्र माझी निराशा झाली. वाचताना कधीकधी पुस्तक आवडत होतं तर बऱ्याचदा मला जाम कंटाळा आला. माझी संमीश्र प्रतिक्रिया उमटत होती.
समीर हा एक अंगात वारा शिरलेला व मनांत उदास पोकळी असलेला कादंबरीचा नायक. बारावीचा रुईया कॉलेजचा विद्यार्थी. एस.वाय. पर्यंतचे त्याचे त्या महाविद्यालयातील आयुष्य. प्राचार्य त्याला कॉलेजमधून काढून टाकतात ते त्याच्या उद्योगामुळे. त्याच्या ह्या 'पेनड्राइव्ह आयुष्या'त सेक्स व्हायरसच्या इन्फेकशनमुळं येतं एक झपाटलेपन आणि मग त्याची होते वाताहत. सानिका आणि सलोनी ह्या त्याच्या मैत्रिणी. चैतन्य आणि अरुण हे त्यांचे मित्र. ह्या चार मित्र-मैत्रीणींची ही कथा. ही त्यांच्या रुईया कॉलेज मधील सोनेरी जीवनाला पोखरून टाकणारी एक शोकांतिका आहे. समीरच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारी कथा आपल्याला सांगितली आहे प्रणव सखदेव ह्यांनी. सेक्सचा इन्फेक्टड व्हायरस ह्या तरुणांचे आयुष्य कसे कुरतडून टाकतो त्याची ही गोष्ट आहे. समीर-सानिका आणि समीर- सलोनी ह्यांचे प्रेमी जीवन म्हणजे सेक्स जीवन रंगवण्यात लेखक रंगून जातो तसेच त्याचे मित्र चैतन्य, अरुण आणि दादू काका ह्यांच्या जीवनकहाण्या सांगण्यात तो रंगून जातो. रुईया कॉलेजच्या शुभ्र आठवणी न लाभलेले हे भरकटलेले मित्र. त्यांच्या जीवनातील हे काळे करडे स्ट्रोक्स! त्यांचे जीवन म्हणजे एक केऑस! भणंग आयुष्याकडे जाणारे हे तरुण! लेखक म्हणूनच ह्या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत लिहितो "प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला ...." . ही कादंबरी वाचताना श्री ना पेंडसे ह्यांच्या 'गारंबीचा बापू' किंवा 'लव्हाळी' ह्या कादंबऱ्यांची स्टाईल अधूनमधून आठवत राहते तर कधीकधी नेमाड्यांची 'कोसला' आठवते. पण अनेक वेळा आपण भाऊ पाध्ये ह्यांची 'वासूनाका' तर वाचत नाहीना!, असाही भास होत राहतो. प्रणव सखदेव हा नव्या पिढीचा नव्या दमाचा एक लेखक आहे. नव्या पिढीचे प्रश्नही नवेच आहेत. त्यांचे जगणेही भन्नाट आहे. सेक्सभोवती भरकटणाऱ्या तरुणांचे चित्रण करताना मध्यवर्गीय तरुणांमध्ये असे 'वासूनाके' दिसणारच. म्हणून ह्या कादंबरीतील घटना रुईया कॉलेज, दादर-माटुंगा, हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, फाईव्ह गार्डन, लालबाग-परळ, दादरची लहान मोठी हॉटेल्स ह्या परिसरातच घडतात. लेखकाने हा परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केलाय. हे खूप छान जमतंय. पण आपण पाहिलेल्या रुईया कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांचे किंवा हिंदू कॉलनी / पारशी कॉलनीत रहाणार्या मध्यमवर्गीय जीवनाचे हे चित्रण नाही. लालबाग-परळच्या वस्तीतील वासूनाका मात्र चांगला चित्रीत झाला आहे, तो समीरचा मित्र असलेल्या अरुणची कथा रंगविताना. आज लालबाग-परळ खूप बदलले आहे. मी तिकडे फारसे जात नाही. 50 वर्षांपूर्वी मी ह्याच परिसरात 5-10 वर्षे काढली होती त्यामुळे मला हा परिसर खूप आवडलेला होता. त्यावेळी रुईया कॉलेज म्हणजे हुशार मुलांचे एक नावाजलेले कॉलेज. तेथेही विद्यार्थीकट्टे होते. सिगारेट, दारू, गांजा पिणारे विद्यार्थी त्यावेळीही असतील पण ह्या कादंबरीत दिसणारे समीर आणि त्यांचे मित्र त्यावेळी नव्हते. मी युडीसीटीत संशोधन करीत असताना माझे दोन सहकारी संशोधक विद्यार्थी होते ते रुईयाचे सर्वात हुशार विद्यार्थी. एक मित्र तर त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाला आणि तेथूनच रिटायर झाला. त्यांनी मला सांगितलेले रुईया कॉलेज प्रणव सखदेव ह्यांच्या कादंबरीत वर्णन केलेल्या कॉलेजसारखे नव्हते. आता सारेच बदलले असेल. नव्या पिढीचे नवे प्रश्न. नव्या समस्या. नवे जगणे. त्यामुळे फाईव्ह गार्डनचा प्रेमिकांच्या परिसर आता किती बदलला आहे, ह्याची कल्पना कादंबरी वाचताना येते. अर्थात कादंबरीत केलेले वर्णन म्हणजे त्या भागाचे खरं वर्णन नव्हे. कादंबरीत डोंबिवली संस्कृतीत वाढलेला समी. ती मध्यवर्गीय संस्कृती झुगारून देताना त्याचा मित्र असलेल्या अरुणच्या लालबागच्या वासूनाका संस्कृतीचा कसा शिकारी होतो, हे फार छान चित्रीत झाले असले तरी ही कादंबरी नकळत वासूनाका टाईप झाली आहे. लेखकावर झालेला जुन्या लेखकांचा हा प्रभाव आहे की हे ह्या नव्या लेखकाचे नवे तंत्र आहे. तरुणांचे भरकटलेले आयुष्य हा कादंबरीचा विषय आहे. हे मान्य केले तर कादंबरी छान जमली आहे. लेखकाला परिणामकारक चित्रण करणे छान येते, हेच ह्या कादंबरीचे वैशिष्टय. चांगल्या कादंबरीला उंचावर नेण्यासाठी लेखक कमी पडलाय कारण तो सेक्सचे वर्णन करण्यातच अडकलाय. त्याला तेच काळे कोरडे स्ट्रोक्स दिसत असावेत. ह्या कादंबरीत लक्ष वेधून घेते ती सानिका. समीरची मैत्रीण म्हणजे त्याच्या चिन्मय ह्या अंध मित्राची प्रेयसी. कवी मनाची. "पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखी". बालकवींच्या कवितेत रमणारी. ती एक गूढ स्त्री. समीरला ती स्त्री समजतच नाही पण तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याचवेळी तो अडकलेला असतो सलोनीत. तिलाही तो आवडत जातो पण तिच्या शरीरवेदना असतात एका रोगाने पछाडलेल्या. ती त्याच्यावर प्रेम करत असते पण आपले शरीर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यामुळे समीरला किंवा कोणालाही संसर्गरोग होऊ नये असे तिला मनापासून वाटत असते. बिचारा समीर. त्याच्या सेक्स केऑसमध्येच डुचमळलेला. अशीही रुईच्या क्राउडमधील मित्र-मैत्रिणींची कहाणी. एक फसलेली कादंबरी. मध्येमध्ये कंटाळा आणणारी. अधूनमधून मुंबईच्या परिसरातील आजच्या नवतरुणांची कहाणी सांगणारी. साहित्य अकादमी पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांना ही कादंबरी का आवडली असेल, हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कदाचित मलाच ह्या कादंबरीचे साहित्यमूल्य समजलं नसावं. ह्यापुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी ग्रेट साहित्य वाचायला मिळेल असे मला वाटत नाही. नव्या दमाच्या ह्या लेखकाला नवा हुरूप येईल आणि त्याच्या हातून नवे छान लिहून होईल, हे मात्र नक्की. प्रणव सखदेव ह्यांना शुभेच्छा! काळे करडे स्ट्रोक्स साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाचे हे पुस्तक वाचनालयातून आणलं आणि एका दमात वाचून टाकलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पुस्तक विशेषच असणार ही एक अपेक्षा होती आणि वाचून मात्र माझी निराशा झाली. वाचताना कधीकधी पुस्तक आवडत होतं तर बऱ्याचदा मला जाम कंटाळा आला. माझी संमीश्र प्रतिक्रिया उमटत होती. समीर हा एक अंगात वारा शिरलेला व मनांत उदास पोकळी असलेला कादंबरीचा नायक. बारावीचा रुईया कॉलेजचा विद्यार्थी. एस.वाय. पर्यंतचे त्याचे त्या महाविद्यालयातील आयुष्य. प्राचार्य त्याला कॉलेजमधून काढून टाकतात ते त्याच्या उद्योगामुळे. त्याच्या ह्या 'पेनड्राइव्ह आयुष्या'त सेक्स व्हायरसच्या इन्फेकशनमुळं येतं एक झपाटलेपन आणि मग त्याची होते वाताहत. सानिका आणि सलोनी ह्या त्याच्या मैत्रिणी. चैतन्य आणि अरुण हे त्यांचे मित्र. ह्या चार मित्र-मैत्रीणींची ही कथा. ही त्यांच्या रुईया कॉलेज मधील सोनेरी जीवनाला पोखरून टाकणारी एक शोकांतिका आहे. समीरच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारी कथा आपल्याला सांगितली आहे प्रणव सखदेव ह्यांनी. सेक्सचा इन्फेक्टड व्हायरस ह्या तरुणांचे आयुष्य कसे कुरतडून टाकतो त्याची ही गोष्ट आहे. समीर-सानिका आणि समीर- सलोनी ह्यांचे प्रेमी जीवन म्हणजे सेक्स जीवन रंगवण्यात लेखक रंगून जातो तसेच त्याचे मित्र चैतन्य, अरुण आणि दादू काका ह्यांच्या जीवनकहाण्या सांगण्यात तो रंगून जातो. रुईया कॉलेजच्या शुभ्र आठवणी न लाभलेले हे भरकटलेले मित्र. त्यांच्या जीवनातील हे काळे करडे स्ट्रोक्स! त्यांचे जीवन म्हणजे एक केऑस! भणंग आयुष्याकडे जाणारे हे तरुण! लेखक म्हणूनच ह्या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत लिहितो "प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला ...." . ही कादंबरी वाचताना श्री ना पेंडसे ह्यांच्या 'गारंबीचा बापू' किंवा 'लव्हाळी' ह्या कादंबऱ्यांची स्टाईल अधूनमधून आठवत राहते तर कधीकधी नेमाड्यांची 'कोसला' आठवते. पण अनेक वेळा आपण भाऊ पाध्ये ह्यांची 'वासूनाका' तर वाचत नाहीना!, असाही भास होत राहतो. प्रणव सखदेव हा नव्या पिढीचा नव्या दमाचा एक लेखक आहे. नव्या पिढीचे प्रश्नही नवेच आहेत. त्यांचे जगणेही भन्नाट आहे. सेक्सभोवती भरकटणाऱ्या तरुणांचे चित्रण करताना मध्यवर्गीय तरुणांमध्ये असे 'वासूनाके' दिसणारच. म्हणून ह्या कादंबरीतील घटना रुईया कॉलेज, दादर-माटुंगा, हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, फाईव्ह गार्डन, लालबाग-परळ, दादरची लहान मोठी हॉटेल्स ह्या परिसरातच घडतात. लेखकाने हा परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केलाय. हे खूप छान जमतंय. पण आपण पाहिलेल्या रुईया कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांचे किंवा हिंदू कॉलनी / पारशी कॉलनीत रहाणार्या मध्यमवर्गीय जीवनाचे हे चित्रण नाही. लालबाग-परळच्या वस्तीतील वासूनाका मात्र चांगला चित्रीत झाला आहे, तो समीरचा मित्र असलेल्या अरुणची कथा रंगविताना. आज लालबाग-परळ खूप बदलले आहे. मी तिकडे फारसे जात नाही. 50 वर्षांपूर्वी मी ह्याच परिसरात 5-10 वर्षे काढली होती त्यामुळे मला हा परिसर खूप आवडलेला होता. त्यावेळी रुईया कॉलेज म्हणजे हुशार मुलांचे एक नावाजलेले कॉलेज. तेथेही विद्यार्थीकट्टे होते. सिगारेट, दारू, गांजा पिणारे विद्यार्थी त्यावेळीही असतील पण ह्या कादंबरीत दिसणारे समीर आणि त्यांचे मित्र त्यावेळी नव्हते. मी युडीसीटीत संशोधन करीत असताना माझे दोन सहकारी संशोधक विद्यार्थी होते ते रुईयाचे सर्वात हुशार विद्यार्थी. एक मित्र तर त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाला आणि तेथूनच रिटायर झाला. त्यांनी मला सांगितलेले रुईया कॉलेज प्रणव सखदेव ह्यांच्या कादंबरीत वर्णन केलेल्या कॉलेजसारखे नव्हते. आता सारेच बदलले असेल. नव्या पिढीचे नवे प्रश्न. नव्या समस्या. नवे जगणे. त्यामुळे फाईव्ह गार्डनचा प्रेमिकांच्या परिसर आता किती बदलला आहे, ह्याची कल्पना कादंबरी वाचताना येते. अर्थात कादंबरीत केलेले वर्णन म्हणजे त्या भागाचे खरं वर्णन नव्हे. कादंबरीत डोंबिवली संस्कृतीत वाढलेला समी. ती मध्यवर्गीय संस्कृती झुगारून देताना त्याचा मित्र असलेल्या अरुणच्या लालबागच्या वासूनाका संस्कृतीचा कसा शिकारी होतो, हे फार छान चित्रीत झाले असले तरी ही कादंबरी नकळत वासूनाका टाईप झाली आहे. लेखकावर झालेला जुन्या लेखकांचा हा प्रभाव आहे की हे ह्या नव्या लेखकाचे नवे तंत्र आहे. तरुणांचे भरकटलेले आयुष्य हा कादंबरीचा विषय आहे. हे मान्य केले तर कादंबरी छान जमली आहे. लेखकाला परिणामकारक चित्रण करणे छान येते, हेच ह्या कादंबरीचे वैशिष्टय. चांगल्या कादंबरीला उंचावर नेण्यासाठी लेखक कमी पडलाय कारण तो सेक्सचे वर्णन करण्यातच अडकलाय. त्याला तेच काळे कोरडे स्ट्रोक्स दिसत असावेत. ह्या कादंबरीत लक्ष वेधून घेते ती सानिका. समीरची मैत्रीण म्हणजे त्याच्या चिन्मय ह्या अंध मित्राची प्रेयसी. कवी मनाची. "पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखी". बालकवींच्या कवितेत रमणारी. ती एक गूढ स्त्री. समीरला ती स्त्री समजतच नाही पण तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याचवेळी तो अडकलेला असतो सलोनीत. तिलाही तो आवडत जातो पण तिच्या शरीरवेदना असतात एका रोगाने पछाडलेल्या. ती त्याच्यावर प्रेम करत असते पण आपले शरीर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यामुळे समीरला किंवा कोणालाही संसर्गरोग होऊ नये असे तिला मनापासून वाटत असते. बिचारा समीर. त्याच्या सेक्स केऑसमध्येच डुचमळलेला. अशीही रुईच्या क्राउडमधील मित्र-मैत्रिणींची कहाणी. एक फसलेली कादंबरी. मध्येमध्ये कंटाळा आणणारी. अधूनमधून मुंबईच्या परिसरातील आजच्या नवतरुणांची कहाणी सांगणारी. साहित्य अकादमी पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांना ही कादंबरी का आवडली असेल, हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कदाचित मलाच ह्या कादंबरीचे साहित्यमूल्य समजलं नसावं. ह्यापुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी ग्रेट साहित्य वाचायला मिळेल असे मला वाटत नाही. नव्या दमाच्या ह्या लेखकाला नवा हुरूप येईल आणि त्याच्या हातून नवे छान लिहून होईल, हे मात्र नक्की. प्रणव सखदेव ह्यांना शुभेच्छा!