Monday, February 25, 2013

Growing Old ….. म्हातारे होणे ...




Growing Old …..  म्हातारे होणे ...
“I do not grow old. It is because,you ( my two daughters) are growing old and making me old”. असे मी माझ्या मुलीना नेहमीच म्हणत असतो .आपली मुले मोठी होऊ लागतात ,त्यामुळे आपण न कळत म्हातारे होऊ लागतो. मला माझ्या मुलीने जे उत्तर दिले ते फार महत्वाचे आहे. ती म्हणाली , “ GROWN UP “ आणि “ GROW OLD “ मध्ये थोडा फरक आहे हे लक्षात ठेवा”. हे खरोखरच फार महत्वाचे आहे. जेंव्हा आपले मित्र किंवा आपल्याबरोबरीचे एकेकजण किंवा आपले सहकारी हे जग सोडून  जाऊ लागतात तेंव्हां आपण खरे म्हातारे होऊ लागतो.
जेंव्हा मुले मोठी होऊ लागतात आणि आपल्याला त्यांच्याकडून शिकावे लागते तेंव्हा आपण obsolete  कालबाह्य होऊ लागतो. हे विशेष जाणवू लागते. असे म्हणतात की जेंव्हा नवे तंत्रज्ञान आपल्याला समजत नाही किंव्हा वापरता येत नाही तेंव्हा आपण खरे म्हातारे होऊ लागतो हे निश्चित. आपल्यापेक्षा आपली नातवंडे गणकयंत्रावर किंवा आधुनिक मोबाईल फोनवर पटापट काम करू शकतात व आपण त्यांची मदत मागतो तेंव्हा आपण खरे म्हातारे झालेले असतो .
आपली मुले जेंव्हा लहान असतात तेंव्हा आपण त्यांना किती सूचना देत असतो. सारखे समजावून सांगत असतो आणि काही काळानंतर हीच मुले आपल्याला अनेक सूचना देत असतात.
मी परदेश प्रवास खूप केला आहे आणि अजूनही करीत असतो. अनेक देश फिरलो. त्यामुळे माझ्यागाठी तसा बऱ्यापैकी अनुभव आहे. जेंव्हा माझी धाकटी मुलगी अमेरिकेला शिक्षणासाठी जाणार होती तेंव्हा मी तिला जाताना अनेक सूचना करीत होतो. पासपोर्ट कसा जपून ठेवायचा, इमिग्रेशन म्हणजे काय?, विमानतळावरील विविध सोपस्कार कसे पूर्ण करावयाचे ,प्रवासातील अडीअडचणीना कसे सामोरे जायचे, सावधगिरीने कसे रहायचे , वगैरे वगैरे.
मुलीचे शिक्षण झाले . त्या देशात ती स्थिर झाली. तिला नवे नवे अनुभव मिळाले. अलीकडेच तिला भेटण्यासाठी आम्ही निघालो तेंव्हा तिने आमच्यावर सूचनांचा इतका मारा केला की मला समजेना की आपण बहुधा पहिल्यांदाच परदेश प्रवास करीत आहोत. “असे करा , असे करू नका, हॉटेलमधून असा फोन करा, हे फोन कार्ड असे वापरा ,असे पैसे वाचवा , रेंट कार बोलविण्याकरिता कोणता फोन वापरायचा, एअरपोरट वर कसे जायचे ,हॉटेल मध्ये चेकइन कसे करावयाचे, जेवणासाठी कोणती हॉटेल्स चांगली, इमर्जन्सीत काय करावे, संपर्क कसा करावा,” वगैरे वगैरे.तिने मला स्वत:चा मोबाईलही दिला. महत्वाचे नंबर फोनमध्ये नोंदवून दिले.फोन कसा वापरायचा ,त्याचेही  ट्रेनींगही दिले. आम्ही मयामिला जाणार होतो. आमची सर्व व्यवस्था तिने आधीच केली होती.त्यासाठी तिने आम्हाला इतक्या सूचना देउन ठेवल्या की आम्हाला तिची खूपच गमत वाटली. ती लहान असताना मी ही इतक्या सूचना देत असे कि त्यापेक्षा अधिक सूचना तिने मला दिल्या. मी गुपचूप ऐकून घेतल्या. वय झाले की काही सुधरत नाही हे नक्की. ह्या वाढत्या म्हातारवयात काही लवकर लक्षात येत नसते,हे खरेंच आहे. जमाना बदललेला आहे . वय झाले आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या लहानपणी सारख्या सूचना करीत असतो , आता मोठी झालेली (Grown up) ही मुले तीच भूमिका घेउन आपली काळजी घेत असतात. मोठी गंमत आहे. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. आज आपल्याला हसू येते .नव्या पिढीची जाणच वेगळी.ह्यांना आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्याकडून सतत नवे शिकले पाहिजे. आपण जरी म्हातारे झालेलो असलो तरी पुन्हा Grow up व्हायला पाहिजे. बघा पटते का?
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

Sunday, February 24, 2013

माणूस नावाचे बेट


माणूस नावाचे बेट
आनंदाचे दिवस येतात आणि जातात. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतात.सुख-दुखा:ची देवाण- घेवाण होते. चेष्टामस्करी होते. आणि पुनः पोटापाण्यासाठी, व्यवसायासाठी,करिअरसाठी दूर जाणे आवशयक असते.हे दूर जाणे फार त्रासदायक असते. एक पोकळी निर्माण करते. एक शून्यता जाणवते.एक उदासीनता पसरते. त्याला इलाज नसतो.
प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. जगणे वेगळे असते. आपल्यालाही “ एकला चलो रे “ अशीच वाट शोधावी लागते.आपण सर्वांचे असतो ,तरीही एकटेच असतो. “ माणूस नावाचे बेट” असते. खरोखरच हे बेट वेगळेच असते. स्वतःचेच असते. त्या बेटावर आपण आपले राजे असतो. कधी कधी आपल्याला ह्या एकटेपणाचीच सवय होऊ लागते. गमंत आहे. आपल्याला आपलाच गोतावळा हवा असतो. पण कशातच अडकून पडावयाचे नसते. पुं ल नी एके ठिकाणी म्हंटले आहे , “ मी दरवर्षी कोकणात येतो आणि हे सर्व आप्तस्वकीय भेटल्यानंतर कोकणातून परत जाताना मी येथे का आलो ? असा प्रश्न मला पडतो.” खरे आहे.अगदी तसेच होते. We are not much involved in each other, but we are very much concerned about each other. We are having  detached attachment. आपण अलिप्त राहू शकत नाही. परंतु खूप गुंतूनही घेत नसतो.जर गुंतलो गेलो तर कधी कधी अधिकारवाणीने आपले विचार इतरावर लादीत असतो. प्रत्येकाचे जीवन हे स्वतंत्र असते.असावायास हवे. आशा-आकांक्षा भिन्न असतात .अपेक्षा ही खूप वेगळ्या असतात. मन गुंतते पण व्यावहारिक पातळीवर आले की आपण न कळत अलिप्त होत जातो . नात्यांची गंमत आहे.लहानपणी एकत्र असलेले भाऊ-बहिण जेंव्हा अनेक वर्षांनी स्वतःच्या स्वतंत्र संसारातून बाहेर येऊन जेंव्हा एकमेकाला भेटतात तेंव्हा किती वेगळे वागू लागतात. लहानपणीचे दिवस वेगळेच असतात.नंतर वाटा  बदललेल्या असतात. अनुभव वेगळे असतात.नात्यांची तीव्रता कमी झालेली असते.कधी-तरी भेटणारे थोडेसे दुरावलेलेच असतात. नाती पुसट झालेली दिसतात. रोजचे संबंध नसतात. वैयक्तिक माणूस समजणे फार अवघड आहे. माणूस हा तसा बदलणारा प्राणी आहे. नातीगोती सतत बदलत असतात .माणूस वेगळाच वागत असतो. आपले वागणे हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. परिस्थिती बदलत जाते. माणसांच्या अपेक्षाही बदलत जातात. छोट्या गावातून मोठ्या शहरात आल्यानंतर , मोठ्या शहरातून परदेशात गेल्यानंतर जगण्याचे नवे अर्थ समजू लागतात.नव्या जाणीवा होऊ लागतात. नव्या उणीवा सुन्न करू लागतात. जाणीवा-नेणीवाचा हा खेळ उन पावसासारखा असतो.त्यामुळे माणूस एक बेट होतो. स्वतःच्या कोशात जातो. एकटा पडू लागतो. त्यामुळे तो घुसमटतो.
अशा बेटावरचा हा माणूस एकाकी भासतो. अशी असंख्य अनेक बेटे असणारा हा समाज त्यामुळे एकजीव होऊ शकत नाही हे खरे सत्य आहे.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

Friday, February 22, 2013

मी अण्णा हजारे नाही


मी अण्णा हजारे नाही
देशाची राजकीय परिस्थिती इतकी खालावलेली आहे की गढूळ झालेल्या ह्या राजकारणात चिखल फेकीशिवाय काहींच दिसत नाही, राजकारणाला समाजकारणाची आणि अर्थकारणाची जोड असणे आवश्यक असते. आजच्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात अर्थकारण हेच प्रबळ शस्त्र आहे. अर्थव्यवस्थाच सुबत्तेकडे नेऊ शकते हे खरे आहे. अर्थात सुबत्तेतून दुसरेही अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु दारिद्र्याच्या प्रश्नामुळे निर्माण होणार्या प्रश्नापेक्षा हे प्रश्न सर्वस्वी वेगळे आणि निराळे आहेत.
देशाची संपत्ती वाढविणे किंवा संपत्ती निर्माण करणे ( To create a wealth – National wealth ) हे एक प्रमुख ध्येय राष्ट्रनिर्मात्यांनी समोर ठेवले पाहिजे. आर्थिक प्रश्न फार महत्वाचे आहेत. अर्थव्यवस्थेतून समाजप्रश्नांची उकल होण्यास मदत होईल. समाजातील विषमता ही मूलतः अर्थ विभाजनावर अवलंबून आहे. आहे रे आणि नाही रे ह्या दोन गटामधूनच कम्युनिझमचा – साम्यवादाचा जन्म झाला. जेंव्हा आपल्याजवळ काहींच संपत्ती नसते व आपण आर्थिक दृष्ट्या दुबळे असतो तेंव्हा आपण सारेच जण साम्यवादी असतो. आपल्याला सर्व संपत्तीचे समान वाटप हवे असते. श्रीमंतांचा पैसा कर लावून गरिबासाठी वाटायचा असतो. राजकीय मंडळीना गरिबांना गरिबीतच  ठेवणे सोयीचे असते. नव्हे तो त्यांचा खरा धंदा असतो. ह्याउलट जेंव्हा आपण स्व-सामर्थ्यावर, जीवनाशी सतत झगडून कष्टाने पैसा कमावतो, व तो आपलाच असतो तेंव्हा कोणाही सुज्ञ माणसाला स्वतः कमावलेला पैसा वाटायचा नसतो. त्यावर कर भरावयाचा नसतो. त्याला त्या पैशाचा उपभोग घ्यावयाचा असतो. असे वाटणे मानवी स्वभावास धरूनच असते. त्यावरील कर जास्तीचा आहे , तो कमी असावा किंवा नसावाच असे वाटते.  मी , माझे कुटुंब , आणि मी कमावलेला माझा पैसा अशा तीन गटाभोवती फिरणारी व्यवस्थाच त्याला हवी असते. कोणीही व्यक्ती आपणहून सरकारी तिजोरीत पैसा भरण्यास तयार नसतो. हे मानवी स्वभावाचे लक्षण आहे. मध्यमवर्गीयांनी सामुहिक एकजुटीचा वापर करून ही यंत्रणाच खिळखिळी करून टाकली आहे. ही काही योगायोगाची गोष्ट नाही.  शेतकऱ्यांचा , शेत मजुरांचा , कामगारांचा कार्ल मार्क्स मध्यमवर्गीय  मंडळीनी आपलासा करून घेतला व स्वतःचा पुरेपूर फायदा करून घेतला हे खरे दुर्देव आहे. मध्यमवर्गीय तसे भित्रेच. श्रमाची प्रतिष्ठा त्यांना माहीतच नाही. बाबुगिरीच्या जोरावरच चिरीमिरीचे राजकारण खेळून थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणीप्रमाणे गडगंज संपत्ती उभी करण्याचे मार्ग ह्या मध्यमवर्गीय मंडळीनी शोधून काढले. कोणत्याही सरकारी कार्यालयात जा. साध्या सेवक शिपायापासून वरच्या अधिकार्यापर्यंत चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. त्यामुळेच माझ्यासारखा सामान्य माणूस  अन्ना हजारे होऊ शकत नाही हे खरे सत्य आहे. “ मी अन्ना हजारे “ अशी टोपी घालून गेलोतर काहीच काम होणार नाही. त्या पेक्षा माझे हात स्वच्छ ठेऊन कोणा एजंटच्या मदतीने काम करून घेणे हेच व्यवहाराला धरून आहे असेच सर्वाना वाटते हे खरे सत्य आहे.
ह्या सरकारी कार्यालयातील ह्या कर्मचार्यांचे संध्याकाळी घरी जाताना खिसे तपासा , ब्यागा तपासा , दिवसभरामध्ये जमा झालेला चंदा सहज बाहेर येईल. ह्या मंडळीना पंचताराकित होटेलमधले जेवण हवे असते, संध्याकाळची बीअर हवी असते, करमणुकीची अनेक साधने हवी असतात, बायकोला नवी साडी घेऊन जायची असते, मुलांच्या शिक्षणाकरिता डोनेशन द्यायचे असते. त्यांच्या पैशाला अनेक पाय फुटलेले असतात. वर पैसा पोहोचवायचा असतो , नाहीतर बदलीचे संकट उभे असते. त्याला अनैतिकता कशी म्हणणार. ती तर नवी रूढी झालेली आहे, अन्ना हजारे काय करणार?  आणखी आणखीच्या मागे लागणारा हा कर्मचारी वर्ग किती खाऊ ,कसा खाऊ ह्या साठीच धडपडत असतो व नवे नवे मार्ग शोधून काढीत असतो. ह्या खाण्याचे असंख्य प्रकार. कोणाला फुकटची दारू हवी, कोणाला घड्याळ , पंखा,अलीकडे एसी ,फ्रीज ,स्कूटर, फ्ल्याट, बंगला, नवी गाडी , परदेश प्रवास, परदेशातील सर्व खर्च, असे अनंत प्रकार .
“पोटापुरत्या पैशावरच मी जगणार आहे , तुझे पांग फेडणे जमणार नाही , मनात मांडे निर्माण होऊ देउ नको”, असे आपल्या आईला सांगणारे गोपाल गणेश आगरकर वरती असतील तर ह्या मंडळीकडे बघून ढसा ढसा रडत असतील. आपण आज ह्या अधोगतीला आलो आहोत हे पाहून अन्नाचे आंदोलन कधी तरी यशस्वी होईल असे वाटत नाही.समोरचा मार्ग धुक्याचाच आहे. पांढरे शुभ्र आणि निळे आकाश दिसणारच नाही. गांधीनी मार्ग दाखविला. त्यांच्याच पट्टशिष्याना गांधी हे नाव हवे आहे, त्यांनी नोटेवर ही गांधीचे चित्र छापले आहे. त्यामुळे गांधींच्या ह्या नोटा घेऊन त्यांना फिरता येते. अटेनबरोला ‘ गांधी’ हा चित्रपट काढावासा वाटला.तर आजच्या गुजरातमध्ये साबरमतीच्या आश्रमात त्यांना गांधींचे नाव निशाण नको आहे. केवढा हा दैवदुर्विलास. माझ्या बरोबर एका इंग्रजी मित्राला घेवून साबरमती आश्रमातील गांधींच्या खोलीत घेऊन गेलो तेंव्हा त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून मलाच वाटले आपण भारतीय गांधीजींना विसरलो पण अटेनबरोचा गांधी पाहून साबरमतीला  भेट देणारा हा इंग्रज खरा गांधी प्रेमी आहे.
आपण मात्र गांधीही नाहीत आणि  अण्णा हजारेही नाहीत. उगाच त्यांची नावे कशाला घ्यायची.
  

Wednesday, February 20, 2013

असे हे सुंदर जगणे ( डायरीतील पाने )


________________________________________
असे हे सुंदर जगणे
( डायरीतील पाने )
काल “वेटींग फॉर गोदो” हे स्याम्युअल बेकेट ह्या फ्रेंच नाटककाराचे अशोक शहाणे ह्यांनी अनुवादित केलेले नाटक रवींद्र नाट्यगृहाच्या छोट्या सभागृहात बघितले.काही नाटकवाली मंडळी आलेली होती.
अतिशय प्रभावी भाष्य असलेल्या ह्या नाटकात लकीची भूमिका टोम बटलर ह्या प्रसिद्ध नटाने केली होती. दुसऱ्या महायुध्दाच्या नंतर युरोपची जी अवस्था झाली होती व सगळ्याचे जीवन अस्ताव्यस्त झाले होते त्या काळाशी संबंधित हे नाटक मानवी जीवनाचे अनेक धागेदोरे गुंफित जाते. जीवन मरण्याच्या लाटेवर हेलकावणारे ते अस्थिर जीवन डोळ्यासमोर उभे करते. त्यातून नाटककाराची स्वतःची अशी तत्वज्ञानी वृत्ती दिसून येते. साध्या साध्या वाक्यातून नाटककार जणू आपल्याशी संवाद साधत असतो. व त्याला जे सांगावयाचे ते विलक्षण ताकदीने सांगतो. कधी हसतखेळत, तर कधी विलक्षण सुन्न करणारा अनुभव देत रहातो. जीवनाची गुंतागुंत सुटतच नाही.अर्थही समजत नाही. जगण्याचे प्रयोजनही सापडत नाही. रोजच्या कंटाळलेल्या जगण्यातही आपणही असेच काही बडबडत असतो, त्याचा पुनःप्रत्यय अनेक वेळा येतो. ते सारे आपल्या जगण्याचेच अनुभव असतात म्हणूनच आपण ह्या नाटकात गुंतत जातो, नाटक गंभीर आहे ह्यात वाद नाही. आजही आजूबाजूची परिस्थिती फारशी बदललेली नाहीं आणि माणसाच्या जगण्याच्या समस्याही तशाच आहेत.म्हणूनच हे नाटक आजचेच वाटते.प्रतीकात्मकता सोडली तर ते आजचेच नाटक आहे
२८ जुन २००९
गिरीश कर्नाड ह्यांचे मराठीमध्ये रुपांतरीत “साठवलेल्या आठवणी” हे नाटक बघितले. अविष्कार ने सादर केलेला हा प्रयोग चांगलाच असेल अशा अपेक्षेने गेलो होतो आणि खूपच निराशा झाली.बहुधा रुपांतर जमलेले नसावे.प्रयोग ही कच्चाच होता. बांधणीच जमली नाही.गिरीश कर्नाड ह्या नावाजलेल्या नाटककाराकडून अधिक चांगल्या अपेक्षा होत्या. नाटक फारशी पकडच घेत नाही.नाटककारला काय सांगावयचे आहे याचा नीट उलगडाच होत नाही.व्यक्तिरेखाच प्रभावी झाल्या नाहीत. विषय वेगळा होता. मांडणी व बांधणी जमलीच नाही.सत्यदेव दुबे दिग्दर्शक म्हणून नाटक चांगले असेल असेही वाटले होते. नाटक फारसे आवडले नाही.
काल सुरेश वाडकर आणि झाकीर हुसेन ह्यांचा स्वरसंगम असलेला संगीत सोहळा बघण्यासाठी ( नव्हे ऐकण्यासाठी ) षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमासाठी गेलो होतो. ताल ब्रम्ह ( झाकीर हुसेन ) आणि नाद ब्रम्ह ( सुरेशजी ) ह्यांचाहा कार्यक्रम म्हणजे एक आनंद सोहळाच होता. ब्रम्हानंदी टाळी लागली. ब्रम्ह म्हणजे देव . ब्रम्ह, अब्राहम, इब्राहिम ह्या तीनही मध्ये ब्रम्ह आहे.म्हणजे हिंदू ,ख्रिस्ती आणि इस्लाम संस्कृती मध्ये “ब्रम्ह” आहे. तीनही रस्ते देवाकडे घेउन जाणारे आहेत. म्हणून देव शोधण्याचे हे मार्ग एकच आहेत. नाद ब्रम्ह ( हिंदू असलेले सुरेशजी ) व ताल ब्रम्ह ( मुसलमान असलेले झाकीर हुसेन) ह्यांचा हा अवीट सूर सोहळा पंढरपूरच्या विठोबाला विनम्र अभिवादन करणारा होता. “तुज नमो” विठ्ठलासाठी गायलेले ते अवीट गोडीचे अभंग आणि झाकिर हुसेन ह्यांचे अप्रतिम तबलावादन ( ताल वंदन विठ्ठलासाठी ) एकदम साधे , विनयशील आणि मोहकच होते.
ताल नाद आणि सूर नाद एकत्र आले म्हणजे जी संगीत दिवाळी साजरी होते ती वेगळीच. हरीप्रसाद चौरसियांचे बासरीवादन अप्रतिम असतेच.पण त्याचीच आठवण करून देणारे प्रसाद ओक ह्यांचे बासरीवादन सुरेख व दाद द्यावी असेच आहे. अशी ही संगीत मैफल एक आगळावेगळा आनंद देउन गेली.
८ जुलै,२००९
आठच दिवसापूर्वी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठुरायाची संगीतमय भेट घडवून आणली ती उपेंद्र भटांनी. भीमसेन जोशी ह्यांचा हा शिष्य. त्यांनी भीमसेन जोशी ह्यांच्याच गाण्याची आठवण करून दिली.हुबेहूब भीमसेनचा वारसा चालवणारा हा पट्ट शिष्य. त्यांचे सादरीकरण ,हाव-भाव ,भाव मुद्रा भीमसेन जोशीच्याच असतात.त्यांचे गानज्ञान आत्मसात केलेला हा गायक कार्यक्रम खूप उंचावर नेउन ठेवतो.
एकाच आठवड्यात दोन वेळा पंढरपूरला जावून आलो. इतका सुंदर योग कधीच आला नव्हता.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर


Saturday, February 16, 2013


भालचंद्र नेमाडे ह्यांच्या "हिंदू" ह्या कादंबरी संबधी  


सध्या  मी भालचंद्र  नेमाडे ह्यांची " हिंदू " ही  कादंबरी वाचतो आहे . ह्या कादंबरीला " हिंदू " हे नाव का दिले? हाच पहिला प्रश्न पडला. ही एक "देशी " कादंबरी आहे . कृषी जीवनावर आधारलेली कुणबी कुटुंबातील खानदेशीमाणसे ह्या कादंबरीतील प्रमुख पात्रे असून खंडेराव हा ह्या कादंबरिचा नायक आहे . आमच्या मराठवाड्यात अशी माणसे  मी खूप जवळून बघितली आहेत . 
कादंबरीचा परीघ  खूप मोठा करण्याचा प्रयत्न केला असला तरी कादंबरीखूप पाल्हाळ झाली आहेनेमाड्यांनी एवढा फापट पसारा कां वाढवला आहे हेच कळत  नाहीकादंबरीची पाने कमी करता आली असती  एक सुटसुटीतकादंबरी लिहिता आली असती . त्यामुळे  नेमाड्यांची ही कादंबरी तशी निराशाच करते . एक कंटाळा आणणारी कादंबरी असेच वर्णन करावे लागेलचांगल्या लेखकाला अगदी थोड्या शब्दात व्यक्त करता येते . नेमाड्यांना हे जमले नाही . माझी तर खूपच निराशा झाली आहे.
मराठीमध्ये ह्या कादंबरीच्या एवढ्या आवृत्या फारच थोड्या वेळात निघतात कश्या ? हा मला पडलेला प्रश्न प्रकाशक सोडवतील का ? प्रकाशनानंतर पंधरा दिवसातच दुसरी आव्रत्ती निघाली.म्हणजे बहुधा आधीच छापून झाली असावी व दिनांक बदललेला असावा.आजकाल बरेच प्रकाशक असे करू लागले आहेत. एवढी लोकप्रियता असलेली कादंबरी म्हणजे एक आश्चर्यआहे.अलिकडेच ह्या कादंबरीला कुसुमाग्रज जनस्थान पुरस्कारही मिळाला आहे . म्हणून वाचायला घेतलेली ही कादंबरी एकदम बोअर आहे.
भालचंद्र नेमाडे ह्या समृद्ध जीवन जगलेल्या मुंबई /औरंगाबादच्या ईंग्रजी प्राध्यापकाच्या  मनुस्मृतीतील (मनातील आठवणींची ) अडगळीच्या आठवणींची  कहाणी म्हणजे खंडेराव ह्या कादंबरीतील पात्राने सांगितलेली  स्वतः ची गोष्ट .एका खानदेशी कुणबी शेतकऱ्याच्या कुटुंबाची ही कहाणी . नेमाडे तुमची ही निर्मिती फारसा आनंद देणारी साहित्यकृती नाही.
खानदेशी माणासांची व्यक्तिचित्रे चांगली आहेत,ह्यात वाद नाही , मी अशी माणसे मराठवड्यात ही  खूप बघितलेली आहेत. श्री ना पेंडसे ह्याच्या कादंबरीतील कोकणी माणसे अधिक लक्षवेधी वाटतात . व्यंकटेश माडगुळकरांची  बनगरवाडीतील व्यकिचित्रेही अधिक प्रभावी वाटतात .
कादंबरीचा परीघ वाढवताना फापटपसारा विनाकारण वाढविला आहे . एखाद्या चांगल्या संपादकाने काटछाट करून ही कादंबरी संक्षिप्त करावयास हवी होती. स्वतः नेमाड्यानीच हा विचार का केला नाही? हेच समजत नाही.
ह्या कादंबरीची भाषा कधी कधी मराठी आहे . खानदेशी , अहिराणी ,ह्या बोली भाषेचा वापर करूनच लिखाण केले आहे.संवाद भाषा सारखी बदलत असते . ते ठीक आहे . वाचण्याचा सराव झालाकी काही वाटत नाही.प्रादेशीक कादंबरीत असेच होते.असावायास काहीच हरकत नाही.
ह्या कादंबरीतील खंडेराव ची सगळी नातेवाईक मंडळी खूप खरी म्हणजे वास्तववादी आहेत . त्याचे वडील ,आई, आजी ,आत्या ,भाऊ, बहिणी ,मेव्हणे , ही  सगळी पात्रे खूप खरी आहेत . कृषी संस्कृतीतील बारा बलुतेदार हे कुटुंबाचे घटकच असतात. ते ही  खरेच आहेत.हिंदूंची शेती संस्कृती  म्हणजेच हिंदू जीवन असा नेमाड्यांचा विचार असावा म्हणून त्यांनी “हिंदू” हे नाव कादंबरीला दिलेले असावे. नाहीतर त्या नावाशी कसलाच खऱ्या अर्थाने संबंध  येत नाही.किंवा एक सनसनाटी नाव असावे व लक्ष वेधून घ्यावें म्हणून उपयोग केलेला दिसतोय.
ग्रामीण जीवन खरे आहे.जीवंत चित्रण आहे ह्यात वाद नाही.एका कुणब्याच्या कुटुंबाची ही कथा देशी आहे. खंडेरावला ही ग्रामीण दुर्दशा नको आहे. तो मार्ग शोधतो आहे तरीही तो ह्या गावाकडील माणसामध्ये गुंतला आहे. त्याला मोरगावचे जगणे नको आहे .त्याला खूप शिकायचे, संशोधन करावयाचे आहे . संशोधनात त्याला खूप रस आहे. मिळालेल्या संधी त्याला सोडायच्या नाहीत.त्याची ही  घालमेल म्हणजे ह्या कादंबरीचा विषय.  
लेखक हा खंडेरावच्या  मुखातून आपले म्हणणे मांडत असतो तेव्हां खूपच खटकत जाते.नेमाड्यांची मुक्ताफळे न उमजणारी आहेत. खंडेराव एम ए साठी औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतो आणि त्या दोन वर्षाचा काळ लेखकाने चांगला चित्रित केला असला तरी अनेक गोष्टी खूप खटकतात . त्या वेळचे मराठवाडा विद्यापीठ , ब्राम्हण - मराठा वाद , मराठा-मराठेत्तर वाद , विद्यापीठ  नामांतर चळवळ,कुलगुरूच्या नेमणूकी , महाविद्यालयाचा कारभार, प्राध्यापकांच्या नेमणुकीचे  राजकारण ह्या सर्वाचे वर्णन बरेचसे खरे असले तरी काही उल्लेख आणि पात्रांची रचना खूप खटकते.अनंतराव हे नाव असलेला जर्नालिझमचा कोर्स करणारा खंडेरावचा  मित्र म्हणजे औरंगाबादचे पत्रकार अनंत भालेराव नव्हेत हे खरे पण मराठवाडा दैनिकाचा उल्लेख करून त्यांना अनंत भालेराव ह्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करावयाचा आहे, असेच दिसते. तसा उल्लेख करताना महाराष्ट्राचे सप्तर्षी पत्रकार असे अनेकदा लिहिले आहे. के बी देशपांडे , गोविंददादांचे कॉलेज वगैरे उल्लेख खूपच खटकतात.कारण ही प्रसिद्ध नावे आमच्या चांगलीच परिचयाची आहेत. माजी न्यायमूर्ती असलेले विद्यापीठाचे कुलगुरू एक बरे कुलगुरू होते पण ते पात्र वेगळेच रंगवले आहे. नेमाडे ह्यांनी बराच काळ मराठवाड्यात प्राध्यापकी केली आहे त्यामुळे त्यांना आणि आम्हा मराठवाडी मंडळीना तेथील परिसर , तेथील माणसे खूप माहितीची व परिचयाची आहेत. त्यांनी कोणत्या हेतूने पात्रासाठी ह्या नावांची योजना केली हेच समजत नाही.लेखकाला स्वातंत्र्य असते पण त्याचा उद्देश काय असावा हे ही समजणे महत्वाचे आहे . नेमाडे असे का करतात हे त्यांचे त्यांना माहित.गोविन्ददादा कॉलेज असा उल्लेख ते करतात, ते गोविंदभाई श्रॉफ ह्यांचे महाविद्यालय. त्या ठिकाणीच नेमाडे प्राध्यापक होते.कादंबरीतील कॉलेज तसे वेगळे आहे,पण हे उल्लेख खूप खटकतात.
कोणती कादंबरी चांगली असे मला विचारले तर मी असे  म्हणेन की जी कादंबरी वाचतांना खाली ठेऊ नये असे वाटते , ती कादंबरी अधिक सुंदर. ह्या एकाच निकषावर मला "हिंदू" कादंबरी आवडली नाही .
६०० पानाचे पुस्तक वाचायला मला तसा वेळ नसतो . मुंबई सारख्या महानगरीतील धकाधकीचे आयुष्य जगत असल्यामुळे व व्यवसायामुळे फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे कादंबरी वाचन खूप कमी केले आहे. .मनाला आनंद देणारे, अंतर्मुख करणारे पुस्तक वाचावे म्हणून मी विकत घेउन पुस्तक वाचतो. महाविद्यालयात असतांना नेमाड्यांची "कोसला " वाचायला घेतली होती.काही पाने वाचल्यावर वाचणे  सोडून दिले. मराठी साहित्य विश्वात नेमाडे ह्यांनी स्वतः चे स्थान निर्माण केले असे बोलले जाते."हिंदू" चा बराच गवगवा झाला नि होतो आहे म्हणून मी त्यांची ही दोन्ही पुस्तके वाचावयास घेतली आहेत. “हिंदू” वाचून झाली आहे.त्यावर खूप काही लिहण्यासारखे आहे. लिहिणार आहे. मी सध्या अमेरिकेत सुट्टीवर आहे. खूप फावला वेळ आहे. अतिशय प्रयत्नपूर्वक ,नेटाने हे पुस्तक वाचले आणि खूप निराशा झाली.मी अनेक चांगल्या मराठी आणि इंग्रजी कादंबर्याशी ह्या कादंबरीची तुलना करतो तेंव्हा ही  कादंबरी फारशी आवडली नाही. मराठी समीक्षक एखाद्या लेखकाला एवढे मोठे का करतात, हेच कळत नाही.एक पाल्हाळ निवेदन असलेली ,फसलेली कादंबरी असाच उल्लेख करावा अशी ही साहित्यकृती. नेमाडे तुम्ही इतर मराठी साहित्यिकांना फार तुच्छ समजतात , घणाघाती टीका करता , स्वतःचा नेमाडपंथी गट करुन आपण फार वेगळे आहोत असे भासवतात. त्यामुळे खूप अपेक्षा समोर ठेवून मी ही कादंबरी वाचायला घेतली आणि बराच वेळ वाया घालविला असेच वाटले. कादंबरीचा अवकाश मोठा आहे असे समीक्षक सांगतात. बहुधा मराठी समीक्षकांना वैश्विक कादंबरी कशी असते, हे ठावूक नसावे. ही एक प्रादेशिक, खानदेशी बोलीभाषेत सांगितलेली शेतकरी लोकांची कहाणी आहे. नेमाड्यांनी बघितलेली, अनुभवलेली ही माणसे मात्र खरी आहेत. हे समाजचित्रण फार प्रभावी आहे. परंतु कादंबरी मात्र फसली आहे. 
डॉ .नरेन्द्र गंगाखेडकर 
मुक्काम पोस्ट : फ्लोरिडा, U S A