Tuesday, April 28, 2020

Hire ,Fire ,Moon ,Business and Politics

Hire , Fire and Resignation for better prospects

Once, I was traveling to USA with the Director of my company which is one of the leading companies of India. We were visiting a American technology company in which he had interest of collaboration or representation in India. During the conference meeting , he introduced me in a American way. He said," We have recently hired Dr Gangakhedkar for this project". I was young and surprised with the word "HIRE". I did not like the word as we generally use it for hiring taxi. Later on ,I realized that it is a common word used in USA.
After a few days , one of my co-worker left the company  and I was with the same boss and he reacted, " Doctor, I have fired him as he was not giving required results". I understood the meaning of "Hire and Fire" policy. After a few days, another co-worker left for the better prospects. The same boss gave me a reaction on my co-worker's leaving the company. He said," Dr. I do not care for anyone who leaves the company for better prospects .If some one gets the Moon, he should go. I will not stop him. I have no problem. I cannot offer him the Moon". I  understood the meaning of " Hire, Fire and Resignation for better prospects". That day , I decided that after gaining sufficient experience in industry , I will stop working for someone and will work for myself. I will be my Boss. There is nothing like working for yourself. It is a hard learning.

उद्योजक आणि सत्ताधारी

उद्योगपतींना कोणताही पक्ष नसतो .त्यांना सर्व पक्ष सारखेच असतात . ते सत्तेवर असलेल्या  सर्व पक्षांना मदत करीत  असतात .
प्रत्येक उद्योगपतीकडे दोन तीन माणसे असतात  ज्यांची निरनिराळ्या पक्षातील प्रमुख  व्यक्तींशी चांगली ओळख असते . ते सत्तेत असलेल्या पक्षाकडे संपर्क साधतात आणि आपली कामे करून घेतात .
कॉंग्रेस सत्तेवर असली की एक अधिकारी संपर्क साधतो . जनता पक्ष सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . भाजप सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . सगळी कामे अगदी सहज होतात . असेच  एक  उद्योगपती . केंद्रात सरकार  बदलले की त्यांचा सीइओ  बदलत  असे.  कॉंग्रेसचा अर्थमंत्री  आला की  एक अधिकारी.  जनता  राजवटीत  एक अधिकारी.  मी  ह्या  अधिकार्यांना भेटलो आहे . राजवट बदलली  की  त्यांची इतरत्र बदली होत असे किंवा  काहीच  काम  नसे . उद्योगपतींना असे करावेच लागते . नाहीतर उद्योग बंद पडतील . त्यांना जात नसते ,धर्म नसतो .पक्ष नसतो . ते सर्व पक्षांचे मित्र असतात . ते साम्यवादी आणि समाजवादी पक्षाचे सुद्धा जवळचे मित्र असतात .

उद्योग आणि कामगार

काल चेन्नईला व्यावसायिक कामासाठी गेलो होतो .एका  कारखान्याला भेट दिली .दुपारी लंच मीटिंगमध्ये काही अधिकाऱ्यांशी इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या . विषय कामगारासंबंधी निघाला . तामिळनाडूत तामिळ कामगार किंवा  स्थानिक कामगार मिळत नाहीत, अशी माहिती मिळाली . मला थोडे आश्चर्य वाटले .असे कसे ? कामगारांमध्ये ओरिसा आणि  प .बंगालच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे .लक्षणीय आहे.तामिळ कामगार मिळत नाहीत . ते आळसी झाले आहेत .त्यांना काम करायचे नाही . २ रु किलो तांदूळ मिळतो .१० रुपयात अम्मा किचनमध्ये इडली - वडा खायला मिळतो . केंद्र आणि  राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजना, मनरेगा वगैरे योजनात पैसे मिळतात . ते पुरतात . त्यांना कामगार म्हणून काम करायचेच नसते . नवीन शिकायचे नसते . यंत्र चालवायची नसतात . रात्रपाळी  करायची नसते . सरकारने दिलेल्या २ रु किलो तांदळावर त्यांचे भागते .असे हे स्थानिक कामगार . त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या ऐवजी गरिबीतच ठेवणाऱ्या  सरकारच्या सामाजिक कल्याण योजना .शेतकऱ्यांच्या ७० / ४० हजार कोटीच्या कर्जमाफी योजना अशाच गरिबाला गरिबीत ठेवणाऱ्या . लोकांना काम नको आणि फुकटचे स्वस्त धान्य हवे . जी राज्ये अविकसित आहेत त्या राज्यातील लोक मात्र दुसऱ्या राज्यात जाऊन काम मिळवताना दिसतात . ज्या राज्यात विकासाची कामे चालू असतात तेथील स्थानिक लोक मात्र आळसी .काम  मिळत असूनही  काम न करणारे . महाराष्ट्रातही वेगळे चित्र नाही . अम्माच्या कृपेने  येथे दहा रुपयात जेवण मात्र मिळत नाही .२ रु किलो तांदूळही मिळत नाही . असे राजकीय नेते .गरिबीचे राजकारण करून स्वतः ची सत्ता टिकविणारे . लोकांना भिकेला लावणारे .लाचार बनविणारे .गुंड बनविणारे व त्यांचा उपयोग करून घेणारे .

सौदी  अरेबियातील भारतीय

हैद्राबादच्या हुसैन मध्ये दिसला जावेद अख्तर .
मी व्यवसायानिमित्त जगभर फिरलो . सर्वत्र तेथे स्थाईक झालेले किंवा पैसा मिळवण्यासाठी नोकरी करणारे भारतीय भेटले . २५- ३० वर्षापूर्वी गल्फ मधील देशाचे एव्हढे आकर्षण नव्हते . खनिज तेलामुळे समृद्धी आलेले हे इस्लामिक देश . ड्रायव्हर पासून कंपनी सी इ ओ पर्यंत माणसांची गरज . ज्यांना इंग्लंड - अमेरिका जमले नाही ते तेथे गेले . भरपूर पैसा कमवतात . अधून मधून भारतात कुटुंबाला भेटायला येतात . पैसा पाठवीत असतातच .गल्फ मध्ये फार उशिरा गेलो .
ह्या भारतीयामध्ये मुस्लिम तरुण खूप असतात . हैद्राबाद ,अलिगढ ,झारखंड ,केरळ ,तामिळनाडू ,प बंगाल आणि कश्मीर . सर्व प्रांताचे .
असाच एक तेथे १५ वर्षे वास्तव्य असणारा हैदराबादचा मुस्लिम भारतीय भेटला . त्याची बायको - मुले हैदराबादेत . मुलीला चांगले शिक्षण त्या देशात मिळणे शक्य नाही म्हणून बायको तेथे  त्याच्याबरोबर  राहू शकत नाही असा त्याचा प्रश्न . बोलता बोलता तो म्हणाला ,' सारे जहांसे अच्छा ,हिंदोस्ता हमारा .मी म्हातारपणी इथे राहणार नाही . थोडे दिवस नोकरी करून पैसे मिळवणार आहे . मला मरण भारतात हवे .माझी कबर भारतात हवी. त्या जमिनीत मला शांत  व्हायचंय  '.  मला त्याचे देशप्रेम त्याच्या शब्दात नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते . तो देशप्रेमी चेहरा मी कधीच विसरणार नाही .
इतरही तरुण मला भेटले . त्यांची घालमेल  दिसून आली . इतर देशात गेलं की आपण अधिकच देशप्रेमी होतो . मनात हैदराबादचा  ओवैसी आणि गल्फ मधला  हैद्रबाद्चाच हुसैन उभा राहतो तेव्हा मला हुसैन  मध्ये जावेद अख्तर दिसतो .
( १७ मार्च २०१६, माझे फेसबूक स्टेटस )

Monday, April 20, 2020

लज्जा







सध्यां वाचन हाच एक उद्योग. खूप दिवसापूर्वी तसलिमा नासरिन ह्यांचे ' लज्जा ' हे पुस्तक विकत घेतलं होतं. ह्या बंगलादेशी लेखिकेची आणि तिच्या पुस्तकाची खूप चर्चा झाली आहे. त्यावर खूप लिहून आलं आहे. त्या लेखिकेने खूप सोसले आहे . ह्यामुळे ते पु्स्तक नवीन काय सांगणार ?,असं वाटत असल्यामुळे वाचायचे राहून गेलं.
पुस्तक वाचायला घेतलं. पहिलं प्रकरण वाचलं . आणि लक्षांत आलं की हे पुस्तक पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
घराची  रंगरगोटी करतांना २-३ बंगलादेशी कामगारांची झालेली ओळख आणि त्यांची ऐकलेली जीवनकहाणी माहीत झाली होती. चेन्नई ला एका कारखान्यात गेलो तेंव्हा कळलं की तामिळ कामगार मिळतच नाहीत . मिळतात ते ओडिशा तून आलेले. बहुतेक बंगलादेशी . बंगलोरला सुध्दा हॉटेलमधील  कामगार बंगलादेशी निर्वासित आहेत ,हे लक्षांत आलं होतं. ते सांगतांना मात्र आपण प. बंगालचे आहोत असेच सांगतात.

हे  पुस्तक  वाचायला घेतलं. बंगलादेशातील  मुस्लिम मूलतत्त्ववादी मंडळींनी अल्पसंख्याक हिंदू ना दिलेली अमानुष वागणूक पानापानावर दिसून आली आणि मन सून्न होत गेलं .
अलिकडेच  ( खूपच  उशिरा  ) हिंदू निर्वासितांच्यासाठी झालेला कायदा ,त्यावर झालेले वादळ ,शालिनबाग प्रकरण हे सारे डोळ्यासमोर होते.
ह्या कादंबरीतील एक हिंदू कुटुंब. सुधामयबाबू हे एक नास्तिक. देशप्रेमी. मायभूमी वर प्रेम असणारे. उदारमतवादी. त्यांची दोन मुलं. सुरंजन आणि माया.  त्यांना देश सोडून जायचं नसतं. मायावर येथील मुस्लिम तरुण बलात्कार करतात . तिचा भाऊ सुरंजन सून्न होतो . आणि इतर नातेवाईकांसारखा देश सोडून जाण्यासाठी  वडिलांना सांगतो. सुधामयबाबू  परिस्थिती भयानक असल्यामुळे नाइलाजाने तयार होतात. हे कुटूंब निर्वासित म्हणून भारतात येतं. त्यांच्या सारख्या अनेक निर्वासितांच्या जीवनाची ही  करुण कहाणी. ह्रदय पिळवटून टाकणारी.
अल्पसंख्य हिंदू च्या छळाची ही कहाणी वाचताना न कळत मनामध्ये संताप येतो. त्याचे प्रमुख कारण ते हिंदू आहेत म्हणून नव्हे तर ते उदारमतवादी, समाजवादी  / , मार्क्सवादी ,पुरोगामी , नास्तिक आणि सेक्युलर विचारसरणीचे बुध्दीजीवी होते पण  जन्माने  ते हिंदू होते. त्यांचे  प्रेम होतं ते जननी जन्मभूमीवर . त्यांनी लढा दिला होता तो पाकिस्तानच्या मुस्लिम हुकुमशाही विरोधात. त्यांनी लढा दिला होता तो बंगला भाषेसाठी. त्यांनी लढा दिला होता तो लोकशाही समाजवादी समाजरचनेसाठी.
ह्या कादंबरी चे नायक सुधामयबाबनास्तिक,देशप्रेमी,आदर्शवादी,मानवतावादी,समाजवादी होते. ते येथील पिढीजात जमीनदार तर होतेच पण ते होते  एक उच्चविद्याविभूषित स्वातंत्र्यसैनिक. काय झालं त्यांच्या कुटूंबाचे ! सर्व आप्तस्वकीय लुबाडले गेले. अनन्वित अत्याचार झाल्यामुळें आयाबहिणींना घेवून देशोधडीला लागले. निर्वासित होऊन नाईलाजाने भारतात आले.
आपली बंगला मायभूमी/जन्मभूमी  आपल्याकडे पाठ फिरवणार नाही. आपल्याशी प्रतारणा करणार नाही ,ह्या भोळ्याभाबड्या आशेवर जे विसंबून राहिले ते सुधामयबाबू सारखे लोक आणि त्यांचे कुटूंबीय शेवटी नाईलाजाने भारतात आले. त्यांच्या सारख्या बंगलादेशी हिंदू ची ही दर्दभरी कहाणी वाचताना तेथील अमानवी मुलतत्ववादी मुस्लिमांची चीड येते.
निमित्त होते बाबरी मशीद पाडण्याचे. बंगला देशी मुसलमानांचा राग निघतो तेथील सर्व हिंदू वर . हिंदू आयाबहिणीवर केले जातात बलात्कार. त्यांची घरे जाळली जातात. संपत्ती लुटली जाते. त्यांना हाकलून दिले जाते. हजारो मंदिरे पाडली जातात. तसं पाहिलं तर बाबरी मशीद बांधली ती मूलतत्त्ववादी मुस्लीम मोगलांनी. तेथील देऊळ पाडूनच. ह्या  मूलतत्ववाद्यांनी भारतात एकच देऊळ पाडले का ? नाही,हजारो देवळे पाडली. लाखो मुर्ती फोडल्या. आपण देशात  भग्ण अवशेष सर्वत्र बघत असतो .अजिंठा,वेरूळ,बेलूर,हाळेबिडू,खजुराहो....
 मुस्लिम समाजात जातीयवादी  भावना
निर्माण होण्याला जबाबदार कोण ? ज्यांनी राष्ट्राच्या धर्माची कल्पना मांडली ते  राजे. जर  तुम्ही कुठल्यातरी एका जमातीचा धर्म निवडून ,त्याला राष्ट्राचा धर्म बनवून टाकला तर राष्ट्रामधला खरा राष्ट्रवादच नष्ट होतो व तेथे धर्मसत्ताक राज्यपध्दती आलीच म्हणून समजा.बंगला देशामध्ये हेच झालं .नव्हे घडवून आणलं. बांगलादेशातले मुसलमान धार्मिक आहेत. त्यांच्याकरिता राष्ट्राचा धर्म घोषित करण्याची काही एक आवश्यकता नव्हती .
लज्जा  त्यातील हे एक परिच्छेद :
सुरंजन तातडीने विरुद्ध दिशेने निघाला .भिऊन नव्हे. शरमेपोटी.ही मुलं आपल्याला मारणार या कल्पनेनं त्याला लाज वाटली. दु:ख झालं.ही लज्जा ,ही शरम त्याला स्वतः बद्दल वाटत नव्हती तर त्याला मारायला उठलेल्या त्या लोकाबद्दल वाटत होती. जे लोक दूसर्याचा छळ करतात, त्यांनाच जास्त शरम वाटते . ज्यांचा छळ होतो त्यांना नव्हे !
भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यानं भारतातल्या मुसलमानांना लढा वगैरे देणं शक्य आहे. पण मुस्लिम देशात सत्ता मूलतत्ववाद्यांच्या हातात आहे .या देशात अल्पसंख्याक लोकांनी लढा वगैरे करण्याची सोयच नाही. येथे हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत. दुय्यम दर्जा च्या नागरिकाला लढण्याची ताकद कुठून येणार?
अशा अत्यंत प्रखर वास्तव वादावर आधारित असलेली ही कादंबरी  मुस्लिम मूलतत्ववाद्यांची रक्तपिपासू व्रती चित्रीत  करते  आणि अलीकडच्या काळातील हिंसाचाराचे प्रत्ययकारी चित्रण करते.
हे वाचत असताना कोणीही   हळूहळू असंच  प्रतीक्रियावादी  - जातीयवादी म्हणजे मूलतत्ववादी होईल की काय?, असं  वाटू लागतं. कारण हे वास्तव भयानक आहे. अमानवी आहे. हे मन सुन्न करणारे आहे
                                             
.

Friday, April 17, 2020

नॉट विदाऊट माय डॉटर


बेट्टी महमुदी ह्या अमेरिकन लेखिकेचे हे पुस्तक लीना सोहोनी ह्यांनी अनुवादित केले असून मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यांनी प्रकाशित केले आहे .
तसे बऱ्याच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले हे पुस्तक वाचायचे राहून गेले होते. सहज गप्पा मारताना ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कोरोनामुळे रिकामपण होते. किंडलवर ते पुस्तक  उपलब्ध होते. त्यामुळे लोडकरून  लगेच वाचायला घेतले. पहिले प्रकरण वाचले आणि हे पुस्तक वाचून संपवले पाहिजे असे वाटले. इराणी लोक, इराणी कुटुंबे आणि इराणी इस्लामिक संस्कृती  ह्याबद्दल मलाही  एक कुतुहूल होतं. मी जगात अनेक देश बघितले आहे. इराणला मात्र अजून पर्यंत गेलो नाही. इराणी लोकांच्याबद्दल फारशी माहिती नाही. पूर्वी मुंबईत कोपऱ्यावर एखादे तरी इराणी हॉटेल असे. तेथे इराणी चहा पिला होता. काउंटरवरचा इराणी पाहिला होता. अमेरिका-इराण युद्धाच्या बातम्या आणि खोमेनीचा उदय ह्याबद्दल वर्तमानपत्री माहिती होती.  एका अमेरिकन स्त्रीने अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या एका इराणी डॉक्टर बरोबर लग्न केल्यानंतर तिला आलेले वैयक्तिक अनुभव म्हणजे हे तिचे आत्मवृत्त. त्यामुळे मी हे पुस्तक वाचायला घेतलं.
हे पुस्तक तसे खूपच गाजले होते. त्यावर एक चित्रपटही  निघाला होता. त्यामुळे बेट्टी महमुदी खूप प्रसिद्ध झाली होती. स्त्रीया आणि मुलांच्यासाठी वन वर्ल्ड: फॉर चिल्ड्रेन अशी एक सामाजिक संस्था त्या चालवीत असतात. ते ऐकले आहे.
बेट्टी महमुदी  ही अल्पेना, मिशिगनची. टिपिकल अमेरिकन. तिचे आई-वडील मिशिगनचे. १९८४-८६ चा काळ. ती एका इराणी मुलाच्या प्रेमात पडते. तिला एकदा अपघात होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. तिची केस ज्या डॉक्टरकडे असते तो इराणी नवशिका डॉक्टर असतो. त्याचे नाव असते सय्यद बोझॉर्ग महमुदी. तो तसा अमेरिकन संस्कृतीत रुळलेला दिसतो. तो तिच्यावर उपचार करताना त्या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू  लागते. त्यांची मैत्री वाढत जाते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि काही काळाने एकमेकांची बऱ्यापैकी ओळख झाल्यानंतर भिन्न संस्कृतीचे असूनही प्रेमामुळे लग्न करतात. त्यांना एक मुलगी होते. तिचे नाव असते मोहताब. ती चार वर्षाची होते.
सय्यद महमूदी चार वर्षात तेहरानला आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेला नसतो. त्याला आई-वडील नसतात. पण जवळची इतर नातेवाईक मंडळी असतात. मोठ्या बहिणीने आईसारखेच प्रेम दिलेले असते. लहानाचे मोठे केलेले असते. मोठे इस्लामी कुटुंब. बायकोला  आणि मुलीला घेऊन १५ दिवसासाठी इराणला जाण्यासाठी तो  तिला तयार करतो. आपण माझ्या नातेवाईकांना  भेटून १५ दिवसात परत येणार आहोत. तुला आमचं घर पहायला मिळेल, माझे नातेवाईक मंडळी, माझी माणसं भेटतील. तेहरान पहायला मिळेल. माझ्या नातेवाईकांना तुला आणि आपल्या मुलीला भेटावेसे वाटते आहे. ते खूप उत्सुक आहेत. अशी कारणे सांगून तो तीला इराणला जाण्यासाठी तयार करतो. ती अमेरिकन. त्यावेळी इराण - अमेरिका संबंध तणावपूर्ण असतात. तिच्या आई- वडिलांना  तिची इराणला जाण्याची भीती वाटत असते. तिला स्वतःला इराणी-इस्लामिक संस्कृतीबद्दल फारसे प्रेम नसते. तो आवडलेला असतो कारण तो  इराणचा असला तरी अमेरिकन झालेला असतो.
ते तेहरानला जातात. बेट्टी महमूदी  तेथे कशी अडकून पडते आणि तिला आपल्या मुलीला घेऊन  तेथून पळून जाण्यासाठी काय काय करावे लागते, ह्याची ही दर्दभरी कहाणी!
सुरुवातीचे २-४ दिवस मजेत जातात. तिला दोन संस्कृतीचा फरक जाणवू लागतो. तिला सय्यदची बहीण आणि इतर नातेवाईक आवडत नाहीत. त्याचे राहणे-वागणे खटकत राहते. त्याची अस्वच्छता बघवत नाही. तिला एकंदर इराणी संस्कृती खटकत राहते. तिला त्या कुटुंबात राहणे असहायय होते. इस्लामिक कुटुंबातील कडवी धार्मिकता आवडत नाही. त्यांच्या जुनाट चालीरीती आवडत नाही. सय्यदची मोठी बहीण तिचा छळ करते. घालूनपाडून बोलते. सतत अपमानित करते. इतरही नातेवाईक दुट्टपी वागतात. सय्यदचें कुटुंब तिचा छळ करू लागतात. घालूनपाडून बोलतात. तीला हिणवतात. सय्यद आता अमेरिकेत असतांना जसा प्रेमिक असतो तसा  वागत नाही. तोही  तिचा छळ सुरु करतो. अमेरिकेतील आपला नवरा तो हाच का?, असा प्रश्न तिला पडतो. सय्यद मोहताबला खूप छळतो. तो इराणमध्ये गेल्यावर पार बदलून गेलेला कट्टर इस्लामी होतो. मारहाण करणे, बायकोला घराबाहेर  पडू नं  देणे. बुरख्यात राहणे. घरातील एका खोलीत कोंडून ठेवणे. घराला कुलूप लावून बाहेर जाणे. असे छळाचे अनेक प्रकार सुरु होतात. आई- मुलीची ताटातूट करणे. मुलीला दुखणे येईल इतके छळणे. रोज छळाचा एक नवा  प्रकार चालू होतो. बेटी महमुदीला नुसती मारहाण नव्हे तर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे. सतत धमक्या देणे चालू होते. तिने अमेरिकन स्त्रीसारखे मुक्तपणे नं जगता इराणमधील इस्लामिक स्त्रियांसारखेच राहणे ह्यासाठी  सय्यदचा हा सारा प्रयत्न असतो.  इस्लामी धर्माचे काटेकोरपणे पालन करणे आणि  चालीरीती काटेकोरपणे पाळणे ह्यासाठी तो आग्रही असतो. बेट्टी महमुदीला हे सारे असह्य  होते. ती तेथून सुटका करण्यासाठी ३ वेळा प्रयत्न करते . त्यासाठी तेथील अमेरिकन वकिलातीची मदत घेते. आपल्या आई -वडिलांना फोन करून आपली सुटका कशी करता येईल ह्यासाठी प्रयत्न करते. हे जेंव्हा सय्यदच्या लक्षात येते तेंव्हा तो तिचा अधिक छळ करू लागतो. तिच्यावर पाळत ठेवतो. नातेवाईकांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगून तिचा अनन्वित छळ सुरु होतो. तिचे घरातून बाहेर पाडण्याचे सर्व मार्ग बंद केले जातात. फोनचा वापर बंद होतो.
अशी ही  एका इराणी कुटुंबात अडकलेली   अमेरिकन स्त्री. तिचा तो कल्पनाही करता येणार नाही इतका छळ. बेट्टी  महमुदी आपल्या ४ वर्षाच्या मोहताबला घेऊन ५०० मैलाचा प्रवास करून तुर्कस्तानात  कशी पळून जाते ह्याची ही चित्तथरारक कहाणी. त्यासाठी तिने केलेले प्रयत्न, सोसलेल्या हालअपेष्टा वाचतांना अंगावर काटा  उभा राहतो. ह्या पळून जाण्यातही अडथळ्यांची माळ आहे. तुर्कस्तानात प्रवेश करण्यापूर्वी सीमेवरील  आदिवासी मंडळी तिला कशी माणुसकी दाखवितात  हे वाचताना मात्र आपले मन भरून येतं.
इराणी माणसाशी लग्न केलेल्या कोणत्याही अमेरिकन स्त्रीने इराणमधून पळून जाण्याचा असा प्रयत्न केलेला नाही. कारण तसे साहस  कोणातच  नव्हते. त्यामुळे ही  कथा वेगळी आहे त्यात साहस आहे . ह्या छळकथेत  मानवी अमानुषता आहे.
FIERCE, FRIGHTENING AND REAL Story  ह्याच योग्य शब्दात  ह्या कादंबरीचे वर्णन करता येईल. 
असं हे अस्वस्थ करणारं पुस्तक. अवश्य वाचा. ही एक वास्तव असलेली भीतीदायक कथा आहे. आक्रमक आणि उग्र असलेल्या इराणी शिक्षित डॉक्टरची गोष्ट आहे. एका अमेरिकन स्त्रीचा इस्लामिक इराणी कुटुंबात झालेला हा छळ बघून आपलाच  श्वास कोंडतो. सुटकेसाठी बेट्टीने  केलेले अथक प्रयत्न म्हणजे हेरगिरी तंत्र. ते  कसे वापरावे लागतात ह्याचे अनोखे चित्रण ह्या कथेत आहे . ही एका  स्त्रीच्या अवहेलना आणि दु:खाची दर्दभरी  कहाणी  आहे. धर्मामुळे माणसाला बसत असतो तो  CULTURAL  शॉक. त्यातून तशी सुटका ही  अवघड असते  माणूस कितीही शिकला, उच्चविद्याविभूषित झाला तरी धर्म आणि कौटुंबिक संसंस्कृतीचा  जो पगडा असतो त्यामुळे तो अमानवी होत जातो. क्रूर आणि बेभान  होतो. आणि ज्या स्त्रीवर तो प्रेम करतो तिचाच छळ करतो. त्याचीही ही  कहाणी आहे .

WHERE THERE IS WILL, THERE IS A WAY, हे खरेच. बेट्टी महमुदीची दर्दम्य लढण्याची शक्ती व स्वतःला मुक्त करण्याची इच्छा - हेच ह्या पुस्तकात दिसून  येते. When I was reading this book, I was getting shocks after shock. इराण मधील स्त्रियांचे जगणे कसे असेल?, असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता.
एक महत्वाचा मुद्दा. सर्वच इराणी माणसे किंवा इराणी कुटुंबे अशीच असतात असे नाही. बेट्टी महमुदीला तेथील वास्तव्यात  अनेक चांगले इराणी भेटले. त्यांची व्यक्तिचित्रे तीने ठळकपणे उभी केली आहेत.   अमाल  हा इराणी माणूस बेट्टीला इराणमधून पळून जाण्यासाठी ज्या प्रकारची मदत करतो ते पाहिलं म्हणजे त्या देशातही तेथील व्यवस्थेला कंटाळलेले  माणसे मानवता जपणारी आहेत. ती मोठ्या मनाची माणसे आहेत. ह्या पुस्तकात ३-४ अशा अमेरिकन स्त्रिया आहेत ज्यांनी इराणी माणसाशी प्रेम करून लग्न केलं पण त्यांच्या संसाराचे मात्र मातेरे झाले आहे. त्या अभागी आहेत,  दुर्दैवी आहेत.
बेट्टी महमुदीने आपली सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करताना कुराणाचा ही बारकाईने अभ्यास केला. तिचा जीव अडकला होता तो तिच्या मुलीत. तिला एकटीला सुटका नको होती. तिला मुलींचीही सुटका करावयाची होती. कुराणातील नियमाप्रमाणे तिला घटस्फोट मिळाला असता. पण तेथील नियमाप्रमाणे मुलीचा हक्क मात्र  नवऱ्याला मिळाला असता.
आपली मुलगी मोहताब ही कोणत्याही परिस्थितीत आपला इराणी नवरा सय्यद महमूद ह्याच्या हातात पडू द्यायची नाही. ह्यासाठीच पळून जाताना जो मार्ग निवडला तो अधिक कठीण  होता.  तरी तसे करणे आवश्यक होते. तसे तिला एकटीला पळून जाणे  थोडे सोपे होते पण  मुलीला घेऊन पळून जाणे हा  मार्ग  धोक्याचा होता. त्यामुळेच ह्या पुस्तकाचे नाव आहे ...
NOT WITHOUT DAUGHTER  हे अतिशय  समर्पक  असे नांव आहे  . एक   माता आपल्या मुलीला सोडून कशी जाऊ देईल.  


Thursday, April 2, 2020

लहानपण देगा देवा...



मी आजोबा झालो त्या वेळपासून माझ्यातले लहान मूल जागे झाले. माझे लहानपण मला
फारसे आठवत नाही . तसा मी फारसा लहान मुलात रमणारा माणूस नाही ,असा माझ्या
आजूबाजूंच्या लोकांचा गैरसमज आहे  .
मला दोन मुली आणि ३ नातवंडे आहेत. दोन नातू आणि एक नात. मोठी मुलगी क्षितिजा ही
डॉक्टर आहे. ती  डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस  ह्या पदावर आहे..  तिचा मुलगा पार्थ हा १८वर्षाचा असून १२ वीच्या परीक्षेत बंगलोरमध्ये २ रा आला आहे . सध्या तो दिल्लीच्या एस आर सी सी मध्ये शिकतो आहे.
धाकटी मुलगी ऋतुगंधा जिओटेक्निकल इंजिनिअर असून फ्लोरिडात एका कंपनीत मॅनेजर आहे.तिला एक मुलगाआणि एक मुलगी. जुळी . वय वर्ष ६ . त्यांची नांवे आहेत प्रणेत आणि मैत्रेयी . आमचे दोन्ही जावई आयटी / मॅनॅजमेण्टमध्ये कार्यरत आहेत.

पार्थ आणि मैत्रेयी -प्रणेत 

आम्ही दोघे मुंबईत वास्तव्य करतो . माझी पत्नी पदार्थविज्ञान शास्त्राची प्राध्यापक होती .
माझा स्वतःचा संगणक व्यवसाय होता. आम्ही दोघे निवृत्त होऊन १० / १२ वर्षे झाली.
जगभर फिरणे हाच  आमचा एक छंद.

पार्थ लहान असतांना वर्षातून दोन वेळा आम्ही बंगलोरला जात असू. नंतर तेथेच मुलगी राहते त्या वसाहतीतच आम्ही  आमचे सेकंड होम घेतले . त्यामुळे आम्ही जेंव्हा  तेथे असतो तेंव्हा  शनिवार-रविवार पार्थचा मुक्काम आमच्याकडेच असतो. बंगलोर हे तसे आमचे सेकंड होम आहे . त्याचे कारण म्हातारपणी  घरचा डॉक्टर असलेली मुलगी जवळ असावी म्हणून हे सेकंड होम .

मी आणि नीलिमा - पार्थ , प्रणेत आणि मैत्रेयी 

२ वर्षातून एकदा  १-२ महिन्याकरिता आमचा मुक्काम  फ्लोरिडात  असतो . त्यामुळे आम्हाला प्रणेत - मैत्रेयी ह्यांचा  सहवास लाभतो . कधीकधी नातवंडे मुंबईला आजोळी येतात तेंव्हा नुसती धमाल असते. प्रणेत - मैत्रेयी आठवड्यातून एकदा फेसटाईमवर आमच्याशी गप्पा मारीत असतात. त्यांना आठवड्याभराचे सगळं सांगायचे असते . इंटरनेटमुळे आपलं जग असं छोटं झालंय. दूर असून जवळ. पार्थ सध्या दिल्लीला असतो . आठवड्यातून एकदा तो तासभर गप्पा मारतो. एस आर सी सी म्हणजे एक वेगळं महाविद्यालय .सर्व क्षेत्रातील तज्ञ मंडळी तेथे व्याख्यान देण्यासाठी  येत असतात. त्यामुळे आठवड्याचा  सर्व  वृतांत मला  मिळत असतो . दिल्लीतील  राजकीय , सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळी दिल्ली विदयापीठ संकुलातील महाविद्यालयात  होत असतात. आमचा रिपोर्टर आहे तेथे असल्यामुळे ते सर्व माहित होते.
आम्हाला नातवंडाचा लळा त्यांच्या लहानपणापासूनच लागलाय . त्यांच्याशी आमचे मेतकूट
चांगलं जमलंय. माझ्या मुली मला म्हणतात , ‘ बाबा, आम्हाला किती धाक होता तुमचा. तुम्ही आमच्याशी इतके कधी खेळल्याचे / बोलल्याचे आठवत नाही .तुम्ही इतके लहान मुलांत रमू  शकतात ,हे एक आश्चर्यच !’ . मी मनांत म्हणतो ही तर आमची  ‘दुधावरची साय’.
४ वर्षाच्या प्रणेतला शाळेत शिक्षिकेने विचारले , ‘ तू मोठेपणी कोण होणार? ‘. तो पटकन
म्हणाला , ‘ मी आजोबा होणार!’ . तेथे जमलेले सर्वजण खळाळून हसले. मी काहीही काम नं करता घरी बसतो. आराम करतो . पुस्तक वाचत बसतो . टीव्ही बघतो आणि तरीही पैसे कसे मिळवतो? , हा त्याला पडलेला प्रश्न असावा .  मैत्रेयी तशी शांतआहे पण फार खोड्या करते.माझा घरचा ड्रेस (  पांढरी विजार आणि ढगळ असलेला नेहरु शर्ट) पाहून  ती म्हणते " आजोबा, You look silly " .त्यामुळे मी माझा नाईटड्रेस बदलला असून थोडा स्मार्ट ड्रेस घेतला आहे. मोठा नातू  पार्थ हा एक चांगला लेखक आहे . त्याचे इंग्रजी वाचन अफाट आहे. १०/ १२ वर्षाचा असतांनाच त्याने एक रहस्यमय कादंबरी लिहिली होती. त्याच्याबरोबर अर्थशास्त्र /राजकारण ह्या विषयावर आमच्या तासनतास  गप्पा होत असतात . त्याने शाळेत मॉडेल पार्लमेंट / मॉडेल युनोत भाग घेतला होता. तो एक उत्तम वक्ता आहे. अटलजींच्या कविता त्यांच्याच शैलीत तो सादर करतो. बंगलोरला आम्ही जेंव्हा जातो तेंव्हा तो आमच्या घरीच असतो. आजीने केलेला कोणताही पदार्थ त्याला स्वादिष्ट आणि रुचकर वाटतो . त्यामुळे आजी त्याच्यासाठी रोज काहीतरी नवे करीत असते आणि त्यामुळे मलाही वेगळे खायला मिळत असते . नाहीतर आपले नेहमीचेच वजन कमी करणारे जेवण ,तेल -तूप नसलेले ,साधे वरण-भात पोळीचे  जेवण.
आम्ही फ्लोरीडाला जेंव्हा जातो तेंव्हा नात आणि नातू दिवसभर शाळा आणि डे केअरमध्ये
असतात. मग संध्याकाळी आमचा तेथील वसाहतीत फोटोवॉक  सुरु असतो. छोट्या डिजिटल कॅमेराने ती दोघे फोटो काढीत असतात . त्यांची फिरतांना अखंड बडबड चालू असते .मी मराठीत बोलतो. ते त्यांना चांगलं  समजतं . ते मात्र इंग्रजीत उत्तरे देत असतात.शनिवारी - रविवारी आमचा नुसता  दंगा असतो. त्या दंग्यात मीही सामील होतो. मग मुलगी आमच्यावर म्हणजे माझ्यावर  ओरडते . "काय हे बाबा !तुम्हीसुद्धा !"
असं हे माझे आजोबा होणे !
मी   प्रणेत - मैत्रेयी बरोबर  


घरातील नातवंडं ....
म्हणजे असते  एक किलबिल
त्यांचा तो आवाज , त्यांचं  ते बोलणं
त्यांचा तो खेळ , त्यांचे  ते फोटो काढणे
त्यांची ती चित्रकला , त्यांचं ते हसणं
ते मला  करत असतात ‘ स्टॅचू’
त्यांचं असतं माझ्यावर राज्य
मी  असतो त्यांचा  गुलाम
मी  मान्य करतो त्यांची हुकमत ..
ते चित्र काढतात
आणि रंगही भरतात
आमच्या  आयुष्यातही !
ते गोष्ट सांगतात,
आम्ही मन  लावून ऐकतो
आम्ही त्यांना  खोडकरपणे चिडवतो
आणि ते रुसतात !
रुसवा काढतांना
आमची होते त्रेधातिरपीट!
ती मात्र निरागसपणे बागडतात
फुलपाखरासारखी !
आणि विणतात मैत्रीचं नातं
रंगीत धाग्यांनी !
ते जरासे नजरेआड झाले की  ,
आम्ही  होतो कावरेबावरे !

ते हळूच येवून देतात गळामिठी
आम्ही होतो तृप्त
त्या आनंदलहरीने....
ते त्यांचं निरागस जगणं ....
हवं असतं आम्हाला ....
तो असतो आमचा  मुंगी-साखरेचा रवा ....
त्यामुळे  आम्ही म्हणतो...
लहानपण देगा देवा...

असं आहे आमचं आजी -आजोबा होणं .... मला माझ्या आजीचे वाक्य नेहमी आठवतं ... "नातवंड म्हणजे दुधाची साय".

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
मुंबई 400099
drnsg@rediffmail.com