मी आजोबा झालो त्या वेळपासून माझ्यातले लहान मूल जागे झाले. माझे लहानपण मला
फारसे आठवत नाही . तसा मी फारसा लहान मुलात रमणारा माणूस नाही ,असा माझ्या
आजूबाजूंच्या लोकांचा गैरसमज आहे .
मला दोन मुली आणि ३ नातवंडे आहेत. दोन नातू आणि एक नात. मोठी मुलगी क्षितिजा ही
डॉक्टर आहे. ती डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस ह्या पदावर आहे.. तिचा मुलगा पार्थ हा १८वर्षाचा असून १२ वीच्या परीक्षेत बंगलोरमध्ये २ रा आला आहे . सध्या तो दिल्लीच्या एस आर सी सी मध्ये शिकतो आहे.
धाकटी मुलगी ऋतुगंधा जिओटेक्निकल इंजिनिअर असून फ्लोरिडात एका कंपनीत मॅनेजर आहे.तिला एक मुलगाआणि एक मुलगी. जुळी . वय वर्ष ६ . त्यांची नांवे आहेत प्रणेत आणि मैत्रेयी . आमचे दोन्ही जावई आयटी / मॅनॅजमेण्टमध्ये कार्यरत आहेत.
पार्थ आणि मैत्रेयी -प्रणेत |
आम्ही दोघे मुंबईत वास्तव्य करतो . माझी पत्नी पदार्थविज्ञान शास्त्राची प्राध्यापक होती .
माझा स्वतःचा संगणक व्यवसाय होता. आम्ही दोघे निवृत्त होऊन १० / १२ वर्षे झाली.
जगभर फिरणे हाच आमचा एक छंद.
पार्थ लहान असतांना वर्षातून दोन वेळा आम्ही बंगलोरला जात असू. नंतर तेथेच मुलगी राहते त्या वसाहतीतच आम्ही आमचे सेकंड होम घेतले . त्यामुळे आम्ही जेंव्हा तेथे असतो तेंव्हा शनिवार-रविवार पार्थचा मुक्काम आमच्याकडेच असतो. बंगलोर हे तसे आमचे सेकंड होम आहे . त्याचे कारण म्हातारपणी घरचा डॉक्टर असलेली मुलगी जवळ असावी म्हणून हे सेकंड होम .
मी आणि नीलिमा - पार्थ , प्रणेत आणि मैत्रेयी |
२ वर्षातून एकदा १-२ महिन्याकरिता आमचा मुक्काम फ्लोरिडात असतो . त्यामुळे आम्हाला प्रणेत - मैत्रेयी ह्यांचा सहवास लाभतो . कधीकधी नातवंडे मुंबईला आजोळी येतात तेंव्हा नुसती धमाल असते. प्रणेत - मैत्रेयी आठवड्यातून एकदा फेसटाईमवर आमच्याशी गप्पा मारीत असतात. त्यांना आठवड्याभराचे सगळं सांगायचे असते . इंटरनेटमुळे आपलं जग असं छोटं झालंय. दूर असून जवळ. पार्थ सध्या दिल्लीला असतो . आठवड्यातून एकदा तो तासभर गप्पा मारतो. एस आर सी सी म्हणजे एक वेगळं महाविद्यालय .सर्व क्षेत्रातील तज्ञ मंडळी तेथे व्याख्यान देण्यासाठी येत असतात. त्यामुळे आठवड्याचा सर्व वृतांत मला मिळत असतो . दिल्लीतील राजकीय , सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळी दिल्ली विदयापीठ संकुलातील महाविद्यालयात होत असतात. आमचा रिपोर्टर आहे तेथे असल्यामुळे ते सर्व माहित होते.
आम्हाला नातवंडाचा लळा त्यांच्या लहानपणापासूनच लागलाय . त्यांच्याशी आमचे मेतकूट
चांगलं जमलंय. माझ्या मुली मला म्हणतात , ‘ बाबा, आम्हाला किती धाक होता तुमचा. तुम्ही आमच्याशी इतके कधी खेळल्याचे / बोलल्याचे आठवत नाही .तुम्ही इतके लहान मुलांत रमू शकतात ,हे एक आश्चर्यच !’ . मी मनांत म्हणतो ही तर आमची ‘दुधावरची साय’.
४ वर्षाच्या प्रणेतला शाळेत शिक्षिकेने विचारले , ‘ तू मोठेपणी कोण होणार? ‘. तो पटकन
म्हणाला , ‘ मी आजोबा होणार!’ . तेथे जमलेले सर्वजण खळाळून हसले. मी काहीही काम नं करता घरी बसतो. आराम करतो . पुस्तक वाचत बसतो . टीव्ही बघतो आणि तरीही पैसे कसे मिळवतो? , हा त्याला पडलेला प्रश्न असावा . मैत्रेयी तशी शांतआहे पण फार खोड्या करते.माझा घरचा ड्रेस ( पांढरी विजार आणि ढगळ असलेला नेहरु शर्ट) पाहून ती म्हणते " आजोबा, You look silly " .त्यामुळे मी माझा नाईटड्रेस बदलला असून थोडा स्मार्ट ड्रेस घेतला आहे. मोठा नातू पार्थ हा एक चांगला लेखक आहे . त्याचे इंग्रजी वाचन अफाट आहे. १०/ १२ वर्षाचा असतांनाच त्याने एक रहस्यमय कादंबरी लिहिली होती. त्याच्याबरोबर अर्थशास्त्र /राजकारण ह्या विषयावर आमच्या तासनतास गप्पा होत असतात . त्याने शाळेत मॉडेल पार्लमेंट / मॉडेल युनोत भाग घेतला होता. तो एक उत्तम वक्ता आहे. अटलजींच्या कविता त्यांच्याच शैलीत तो सादर करतो. बंगलोरला आम्ही जेंव्हा जातो तेंव्हा तो आमच्या घरीच असतो. आजीने केलेला कोणताही पदार्थ त्याला स्वादिष्ट आणि रुचकर वाटतो . त्यामुळे आजी त्याच्यासाठी रोज काहीतरी नवे करीत असते आणि त्यामुळे मलाही वेगळे खायला मिळत असते . नाहीतर आपले नेहमीचेच वजन कमी करणारे जेवण ,तेल -तूप नसलेले ,साधे वरण-भात पोळीचे जेवण.
आम्ही फ्लोरीडाला जेंव्हा जातो तेंव्हा नात आणि नातू दिवसभर शाळा आणि डे केअरमध्ये
असतात. मग संध्याकाळी आमचा तेथील वसाहतीत फोटोवॉक सुरु असतो. छोट्या डिजिटल कॅमेराने ती दोघे फोटो काढीत असतात . त्यांची फिरतांना अखंड बडबड चालू असते .मी मराठीत बोलतो. ते त्यांना चांगलं समजतं . ते मात्र इंग्रजीत उत्तरे देत असतात.शनिवारी - रविवारी आमचा नुसता दंगा असतो. त्या दंग्यात मीही सामील होतो. मग मुलगी आमच्यावर म्हणजे माझ्यावर ओरडते . "काय हे बाबा !तुम्हीसुद्धा !"
असं हे माझे आजोबा होणे !
मी प्रणेत - मैत्रेयी बरोबर |
घरातील नातवंडं ....
म्हणजे असते एक किलबिल
त्यांचा तो आवाज , त्यांचं ते बोलणं
त्यांचा तो खेळ , त्यांचे ते फोटो काढणे
त्यांची ती चित्रकला , त्यांचं ते हसणं
ते मला करत असतात ‘ स्टॅचू’
त्यांचं असतं माझ्यावर राज्य
मी असतो त्यांचा गुलाम
मी मान्य करतो त्यांची हुकमत ..
ते चित्र काढतात
आणि रंगही भरतात
आमच्या आयुष्यातही !
ते गोष्ट सांगतात,
आम्ही मन लावून ऐकतो
आम्ही त्यांना खोडकरपणे चिडवतो
आणि ते रुसतात !
रुसवा काढतांना
आमची होते त्रेधातिरपीट!
ती मात्र निरागसपणे बागडतात
फुलपाखरासारखी !
आणि विणतात मैत्रीचं नातं
रंगीत धाग्यांनी !
ते जरासे नजरेआड झाले की ,
आम्ही होतो कावरेबावरे !
ते हळूच येवून देतात गळामिठी
आम्ही होतो तृप्त
त्या आनंदलहरीने....
ते त्यांचं निरागस जगणं ....
हवं असतं आम्हाला ....
तो असतो आमचा मुंगी-साखरेचा रवा ....
त्यामुळे आम्ही म्हणतो...
लहानपण देगा देवा...
असं आहे आमचं आजी -आजोबा होणं .... मला माझ्या आजीचे वाक्य नेहमी आठवतं ... "नातवंड म्हणजे दुधाची साय".
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
मुंबई 400099
drnsg@rediffmail.com
No comments:
Post a Comment