Monday, April 20, 2020

लज्जा







सध्यां वाचन हाच एक उद्योग. खूप दिवसापूर्वी तसलिमा नासरिन ह्यांचे ' लज्जा ' हे पुस्तक विकत घेतलं होतं. ह्या बंगलादेशी लेखिकेची आणि तिच्या पुस्तकाची खूप चर्चा झाली आहे. त्यावर खूप लिहून आलं आहे. त्या लेखिकेने खूप सोसले आहे . ह्यामुळे ते पु्स्तक नवीन काय सांगणार ?,असं वाटत असल्यामुळे वाचायचे राहून गेलं.
पुस्तक वाचायला घेतलं. पहिलं प्रकरण वाचलं . आणि लक्षांत आलं की हे पुस्तक पूर्ण वाचणे आवश्यक आहे.
घराची  रंगरगोटी करतांना २-३ बंगलादेशी कामगारांची झालेली ओळख आणि त्यांची ऐकलेली जीवनकहाणी माहीत झाली होती. चेन्नई ला एका कारखान्यात गेलो तेंव्हा कळलं की तामिळ कामगार मिळतच नाहीत . मिळतात ते ओडिशा तून आलेले. बहुतेक बंगलादेशी . बंगलोरला सुध्दा हॉटेलमधील  कामगार बंगलादेशी निर्वासित आहेत ,हे लक्षांत आलं होतं. ते सांगतांना मात्र आपण प. बंगालचे आहोत असेच सांगतात.

हे  पुस्तक  वाचायला घेतलं. बंगलादेशातील  मुस्लिम मूलतत्त्ववादी मंडळींनी अल्पसंख्याक हिंदू ना दिलेली अमानुष वागणूक पानापानावर दिसून आली आणि मन सून्न होत गेलं .
अलिकडेच  ( खूपच  उशिरा  ) हिंदू निर्वासितांच्यासाठी झालेला कायदा ,त्यावर झालेले वादळ ,शालिनबाग प्रकरण हे सारे डोळ्यासमोर होते.
ह्या कादंबरीतील एक हिंदू कुटुंब. सुधामयबाबू हे एक नास्तिक. देशप्रेमी. मायभूमी वर प्रेम असणारे. उदारमतवादी. त्यांची दोन मुलं. सुरंजन आणि माया.  त्यांना देश सोडून जायचं नसतं. मायावर येथील मुस्लिम तरुण बलात्कार करतात . तिचा भाऊ सुरंजन सून्न होतो . आणि इतर नातेवाईकांसारखा देश सोडून जाण्यासाठी  वडिलांना सांगतो. सुधामयबाबू  परिस्थिती भयानक असल्यामुळे नाइलाजाने तयार होतात. हे कुटूंब निर्वासित म्हणून भारतात येतं. त्यांच्या सारख्या अनेक निर्वासितांच्या जीवनाची ही  करुण कहाणी. ह्रदय पिळवटून टाकणारी.
अल्पसंख्य हिंदू च्या छळाची ही कहाणी वाचताना न कळत मनामध्ये संताप येतो. त्याचे प्रमुख कारण ते हिंदू आहेत म्हणून नव्हे तर ते उदारमतवादी, समाजवादी  / , मार्क्सवादी ,पुरोगामी , नास्तिक आणि सेक्युलर विचारसरणीचे बुध्दीजीवी होते पण  जन्माने  ते हिंदू होते. त्यांचे  प्रेम होतं ते जननी जन्मभूमीवर . त्यांनी लढा दिला होता तो पाकिस्तानच्या मुस्लिम हुकुमशाही विरोधात. त्यांनी लढा दिला होता तो बंगला भाषेसाठी. त्यांनी लढा दिला होता तो लोकशाही समाजवादी समाजरचनेसाठी.
ह्या कादंबरी चे नायक सुधामयबाबनास्तिक,देशप्रेमी,आदर्शवादी,मानवतावादी,समाजवादी होते. ते येथील पिढीजात जमीनदार तर होतेच पण ते होते  एक उच्चविद्याविभूषित स्वातंत्र्यसैनिक. काय झालं त्यांच्या कुटूंबाचे ! सर्व आप्तस्वकीय लुबाडले गेले. अनन्वित अत्याचार झाल्यामुळें आयाबहिणींना घेवून देशोधडीला लागले. निर्वासित होऊन नाईलाजाने भारतात आले.
आपली बंगला मायभूमी/जन्मभूमी  आपल्याकडे पाठ फिरवणार नाही. आपल्याशी प्रतारणा करणार नाही ,ह्या भोळ्याभाबड्या आशेवर जे विसंबून राहिले ते सुधामयबाबू सारखे लोक आणि त्यांचे कुटूंबीय शेवटी नाईलाजाने भारतात आले. त्यांच्या सारख्या बंगलादेशी हिंदू ची ही दर्दभरी कहाणी वाचताना तेथील अमानवी मुलतत्ववादी मुस्लिमांची चीड येते.
निमित्त होते बाबरी मशीद पाडण्याचे. बंगला देशी मुसलमानांचा राग निघतो तेथील सर्व हिंदू वर . हिंदू आयाबहिणीवर केले जातात बलात्कार. त्यांची घरे जाळली जातात. संपत्ती लुटली जाते. त्यांना हाकलून दिले जाते. हजारो मंदिरे पाडली जातात. तसं पाहिलं तर बाबरी मशीद बांधली ती मूलतत्त्ववादी मुस्लीम मोगलांनी. तेथील देऊळ पाडूनच. ह्या  मूलतत्ववाद्यांनी भारतात एकच देऊळ पाडले का ? नाही,हजारो देवळे पाडली. लाखो मुर्ती फोडल्या. आपण देशात  भग्ण अवशेष सर्वत्र बघत असतो .अजिंठा,वेरूळ,बेलूर,हाळेबिडू,खजुराहो....
 मुस्लिम समाजात जातीयवादी  भावना
निर्माण होण्याला जबाबदार कोण ? ज्यांनी राष्ट्राच्या धर्माची कल्पना मांडली ते  राजे. जर  तुम्ही कुठल्यातरी एका जमातीचा धर्म निवडून ,त्याला राष्ट्राचा धर्म बनवून टाकला तर राष्ट्रामधला खरा राष्ट्रवादच नष्ट होतो व तेथे धर्मसत्ताक राज्यपध्दती आलीच म्हणून समजा.बंगला देशामध्ये हेच झालं .नव्हे घडवून आणलं. बांगलादेशातले मुसलमान धार्मिक आहेत. त्यांच्याकरिता राष्ट्राचा धर्म घोषित करण्याची काही एक आवश्यकता नव्हती .
लज्जा  त्यातील हे एक परिच्छेद :
सुरंजन तातडीने विरुद्ध दिशेने निघाला .भिऊन नव्हे. शरमेपोटी.ही मुलं आपल्याला मारणार या कल्पनेनं त्याला लाज वाटली. दु:ख झालं.ही लज्जा ,ही शरम त्याला स्वतः बद्दल वाटत नव्हती तर त्याला मारायला उठलेल्या त्या लोकाबद्दल वाटत होती. जे लोक दूसर्याचा छळ करतात, त्यांनाच जास्त शरम वाटते . ज्यांचा छळ होतो त्यांना नव्हे !
भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यानं भारतातल्या मुसलमानांना लढा वगैरे देणं शक्य आहे. पण मुस्लिम देशात सत्ता मूलतत्ववाद्यांच्या हातात आहे .या देशात अल्पसंख्याक लोकांनी लढा वगैरे करण्याची सोयच नाही. येथे हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत. दुय्यम दर्जा च्या नागरिकाला लढण्याची ताकद कुठून येणार?
अशा अत्यंत प्रखर वास्तव वादावर आधारित असलेली ही कादंबरी  मुस्लिम मूलतत्ववाद्यांची रक्तपिपासू व्रती चित्रीत  करते  आणि अलीकडच्या काळातील हिंसाचाराचे प्रत्ययकारी चित्रण करते.
हे वाचत असताना कोणीही   हळूहळू असंच  प्रतीक्रियावादी  - जातीयवादी म्हणजे मूलतत्ववादी होईल की काय?, असं  वाटू लागतं. कारण हे वास्तव भयानक आहे. अमानवी आहे. हे मन सुन्न करणारे आहे
                                             
.

No comments:

Post a Comment