Friday, January 10, 2014

आम आदमी

आपण साधी सामान्य माणसं

आपण साधी सामान्य माणसं कशी असतो ? आर.के.लक्ष्मण ह्यांच्या व्यंगचित्रातील सामान्य माणसासारखी (Common Man) किंवा व्यंगचित्रात दिसणाऱ्या सामान्य माणसाच्या बायकोसारखी.अगदी साधी भोळी.

कुणावर तरी जमलं तर प्रेम करतो. नव्या फ्याशन प्रमाणे कपडे घालतो. देशप्रेमाच्या गप्पा मारतो. गर्वाने राहतो, राजकारणावर चर्चा करतो. जीवनमान किती महागले ह्या विषयावर तासनतास  वादविवाद करतो. आपली केश रचना बदलतो. देव- देव करतो. नित्य नेमाने देवळात जातो. न कळत आपण आई –वडिलांना दु:खी कष्टी करतो. न कळत त्यांच्यापासून दुरावतो. परमेश्वराकडे क्षमा याचना करतो. मुलांना आपल्या पावलावर पाऊल टाकावयास सांगतो. नव्या जास्त पगाराच्या नोकऱ्या शोधतो. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून घेतोच असे नाही. बहुधा आपल्या शिक्षणाचा व नोकरीचा काहीं संबंध नसतोच.
.
आपण कधी कधी संगीतात रमतो. कधी कधी नाटक सिनेमा पहातो. रिमोटने टी. व्ही.चे प्रोग्राम बदलतो. फेसबुकवर पिचकारी टाकतो. What's App वर संदेश पाठवतो.विनोदांची देवाण घेवाण करतो.हसतो. हसवितो. फेसबुकवर फोटो टाकतो .फोटो पाहतो. स्टेटस टाकतो. Like करतो. Comment मारतो. खूप बडबड करतो, तेच आपल्या आयुष्याचे सार. हेच आपले आधुनिक जगणे. म्हणजे असं आपलं जगणं असतं.

आपल्या दु:खाची अनेक कारणे असतात. प्रेम आहे पण लग्न नाही. लग्न आहे पण प्रेम नाही. संसार आहे पण सुख नाही म्हणून जीवनात आनंद नाही. मुलं आहेत पण त्यांच्यापासून त्रास आहे. ते शिकत नाहीत म्हणून आपण दु:खी. ते बेकार आहेत म्हणून आपण चिंतेत.आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आपण त्यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवतो. ते तेथे चांगले यश मिळवतात आणि तेथेच स्थिरस्थावर होतात. सुरुवातीला आपण तेथे दोन चार वेळा जावून येतो.ते ही आपल्याला भेटण्यासाठी येऊन जातात. नंतर ते दुरावतात आणि आपण दु:खी होतो.ते तेथे रमतात पण त्यानाही भारताची ओढ असतेच. कधी कधी त्यांचीही अवस्था " सागरा प्राण तळमळला, ने मजसी ने मातृभूमीला " अशी होते. आपल्या देशात योग्य ती संधी मिळण्याची शक्यता नसते म्हणून ते तेथेच राहतात.आपले वय वाढत जाते आणि आपण त्यांच्या आठवणीने दु:खी होतो. त्यांना शिक्षणासाठी उगीच पाठविले असे आपण म्हणत राहतो.

आपल्या मुलांची लग्नं होत नाहीत किंवा म्हणावा तसा पैसा कमवीत नाहीत म्हणून आपण दु:खीकष्टी असतो.तर काहींना मुल नाही म्हणून एकटेपणा असतो. पैसा आहे पण आनंद नाही तर काहींना पैसा नाही म्हणून अनेक विवंचना. आपल्यापैकी काहींना घर असते पण घरपण नसते. लग्न होते पण दाम्पत्य सुख नसते. अशा ह्या अनेकजणांच्या अनेक चिंता.

काहीजण अजून अजूनच्या मागे लागतात आणि अतिव्यस्त झाल्यामुळे अधिक दु:खी कष्टी होतात.गत आयुष्यातील केलेल्या चुकांचा विचार करीत आपण बसतो. आणि पुन्हा दु:खी होतो.आपले Involve होणेच हे जास्त त्रासदायक असते हे आपल्याला समजत नाही.आपण संवेदनशील असणे आपल्याला त्रासदायक ठरते. आपण जास्त involve असू नये. फक्त concern तेवढे असावे.व जमल्यास मदत करावी किंवा उपयोगी पडावे.आपल्याला थोडे अलिप्त राहून जगतां आले पाहिजे हेच कळत नाही.
दिवस येतात नि जातात. सूर्य वेळच्या वेळी उगवतो. अंधार संपतो. उजेड होतो. महिनेही उलटतात.उन्हाळे-पावसाळे निघून जातात. न कळत वय वाढत जाते. तरुणाई संपते. संध्याछाया जाणवू लागते.जगण्याचे नवे प्रयोजन शोधण्यासाठी आपण जगू लागतो.मनाची उभारी नाहीशी जालेली असते.जीवनाची निरर्थकता जाणवू लागते. शरीर आणि मन एकमेकाला थकवू लागतं.
असे आपण मध्यमवर्गीय माणसे नेहमी हजार चिंतांनी आपले डोके खाजवीत असतो. संदीप खरेच्या कवितेत वर्णन केलेल्या माणसाप्रमाणे. नको त्या गोष्टीवर विनाकारण अवास्तव विचार करीत बसतो. ही चिंताच आपल्याला खात असते. निराश करते.त्रास देते. ह्या चिंतेपासून दूर होण्यासाठी आपण आपले मन रिझवले पाहिजे.

“वेळ पाहून खेळ मांडणे” प्रवृत्तीची माणसे अनेक गोष्टी सहज साध्य करू शकतात, स्वभावातील ही लवचिकता काही जणांत असते, हा गुण की दुर्गुण. Non-compromising attitude असलेली माणसे जगतांना खूप काहीं त्रास सहन करतात. शासकीय नोकरीत आणि राजकारणात अशी माणसे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. अशा स्वभावामुळेच अनेक गोष्टी आपल्याला जमू शकत नाहीत हेच आपल्या लक्षात येत नाही.

Deviating Personality असलेली माणसे वेगळी असतात. मी म्हणतो तीच पूर्व दिशा म्हणणारी माणसे हट्टी असतात.  "मीच ठरविणार दिशा वाहत्या पाण्याची” अशी त्यांची वृत्ती असते. स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास चांगला आहे पण दुसऱ्या कोणाचे मत जाणून न घेणे म्हणजे हेकेखोरपणा आहे. असा माणूस एकटा असतो. व त्याला एकटेच लढावे लागते. ह्यामुळे आपलेच नुकसान होते हे उशिरा लक्षात येते. वेळ निघून गेलेली असते. एकदा घेतलेला निर्णय. मग त्यासाठी वादळातून चालणारी बोट सोडून देता येत नाही. किनारा गाठणेच महत्वाचे असते.लढणे हाच एक उपाय असतो.

डोंगर चढून जाताना आपण उंचीचाच विचार करतो पण एकदा उंचावर गेले की आपल्याला खोलीच दिसून येते. संपूर्ण उंची गाठता आली नाही तरी मर्यादित उंचीवर भक्कम पावले रोवित जाणेच योग्य.हे महत्वाचे असते.यशाचे असेच असते. ते टप्प्या टप्प्यानेच मिळविले पाहिजे. त्यातून समाधान मिळते. आणि जेंव्हा वैफल्याची अवस्था असते तेव्हा आपल्याला जाम कंटाळा आलेला असतो. काहींच करू नये असे वाटते आणि आपण निष्क्रिय होतो. हा कंटाळाच आपल्याला मारक (Killing) असतो. आपण आपल्यातील नैराश्य (Frustration) थांबवले पाहिजे.

उत्साहासाठी आनंदी असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जगण्यातील आनंद शोधावयास हवा. मन दुसऱ्या कशात तरी रमाविले पाहिजे. त्यासाठी जगण्याची त्रिज्या वाढविली पाहिजे. इतर अनेक गोष्टीत रस घेतला पाहिजे. बहुविध विषयात रस निर्माण केला पाहिजे व व्यक्तिमत्व बहुविध विद्यापारंगत असले पाहिजे.

पंढरपूरला हरीभक्त वारकरी चालत जातात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. कितीतरी चिंतांचे गाठोडे त्यांच्या डोक्यावर असते पण सारे विसरून ते कसे विठ्ठलाच्या ओढीने चालत असतात. चंद्रभागेचे दर्शन होताच आणि मंदिराचा कळस दिसताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. अगदी निरागस बालकाचा आनंद असतो तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो
गाणे ऐकणे , सिनेमा बघणे , बाहेर फिरावयास जाणे, पक्षी निरीक्षण करणे , बागकाम करणे , लहान मुलामध्ये रमणे, गप्पा मारणे ,जवळच्या माणसाशी मन मोकळे करून बोलणे,  ह्यात आपण आनंद शोधायचा असतो . आपण त्यासाठी मोर व्हायला पाहिजे. आनंदाने नाचावयास शिकले पाहिजे.

हळवे मन सुंदर असते. शहाणे असते.आपण सौंदर्याचा पुजारी असावयास हवे. निसर्ग सौंदर्यात रमले पाहिजे. कवी नसलो तरी कवी व्हायला पाहिजे. रम्य क्षण जगले पाहिजेत. जखम झाली तरी फुंकर घालता आली पाहिजे. आपल्याला आपले जगण्याचे क्षण इतरांच्या बरोबर share करता आले पाहिजेत. वय जसे वाढत जाते तसे तसे जगण्याचे नवे नवे प्रयोजन शोधले पाहिजे.

रिमझिम पावसात भिजलो की आपल्याला त्रास वाटत नाही. अजून भिजावेसे वाटते. त्याचा त्रास होत नाही. आपल्यासमोर जगतांना अनेक प्रश्न  येतातच. त्यांची उत्तरे शोधावी लागतातच. आपण जरी चुकलो तरी त्यातून आपल्यापुढे उभा राहिलेला प्रश्न नीट समजतो व आपण अनुभवाच्या जोरावर योग्य ते उत्तर शोधू शकतो. त्यामुळेच आपले जगणे हे एक सुंदर गाणे होते. आपल्या जगण्याची कविता होते. त्यासाठी आपण कवी असण्याची गरज नसते.