Friday, July 12, 2019

पांडुरंग पांडुरंग




अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे असे मला कधीच वाटले नाही . ते मी सहसा टाळतो. एकदा मला पांडुरंगाचे बोलावणे आले . माझा पुण्याचा मित्र मधुकर दंडारे आणि माझे व्याही रंगनाथ कुलकर्णी ह्यांनी पंढरीला जाऊ असे फर्मान काढले आणि आम्ही निघालो. मधुकरचा चुलत भाऊ तेथील बडव्यांपैकी एक . त्यामुळे सर्व व्यवस्था ठीकठाक. आम्ही संध्याकाळी पंढरपुरात पोहोचलो . त्यांच्या घरी गेलो . त्यांनी सांगितलं , ‘रात्रीचे जेवण करून घ्या . मग १०:३० / ११ वाजतां दर्शनाला घेऊन जाईन. गर्दी कमी असते’. आमचं जेवण ८ वाजतां झालं . मग आम्ही इंद्रायणीकाठी असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला गेलो. चांगल्या रूम मिळाल्या . थोडी विश्रांती घेत होतो . माझा मोबाईल वाजला. फ्लोरीडाहून माझी मुलगी ऋतू बोलत होती . फ्लोरिडा हरिकेनसाठी प्रसिद्ध . ह्यापूर्वी तिला थोडा अनुभव होता. सध्या ती एकटीच नोकरीसाठी वेस्ट पाम बीच ला रहात होती. हरिकेन त्यांच्या शहराजवळ आला होता. नंतर सर्व व्यवहार बंद होणार होता .वीज / फोन बंद होणार होते . त्यामुळे तिने फोनकरून आम्हाला कळविले . काळजी करू नका असे आम्हाला सांगितले आणि फोन बंद झाला. आम्ही मात्र काळजीत. मी मोबाईल इंटरनेटवर हरिकेनची माहिती मिळवणे चालू केले . कशातच लक्ष लागत नव्हते. ११ला सगळे तयार झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला निघालो खरे . पण कशातच लक्ष नव्हते . हरिकेन ! हरिकेन! त्याचा धुमाकूळ . त्याची वाचलेली वर्णने . कीवेस्ला त्याने केलेली हानी . मंदिरात प्रवेश केला . गर्दी फारशी नव्हती. नंबर लागला. यथासांग पूजा झाली. विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले . कोणत्याही देवळात असा देवाचा पदस्पर्श होत नाही. अनेक संतांची आठवण झाली. त्यांनी ह्या विठुरायाच्या पायावर भक्तिभावाने डोके ठेवले होते. आमचे छान दर्शन झाले. देवळातून निघालो. रूमवर आलो . १ वाजला. फ्लोरीडाला फोन लावला . फोन बंद. इंटरनेटवर हरिकेनने घातलेला धुमाकूळ आणि त्याची वर्णने. लक्ष कशातच नव्हते. रात्र जागण्यातच गेली . सकाळी सर्व आटोपून मुंबईकडे निघालो. मध्ये संपर्क होतच नव्हता. पुढे एका पेट्रोल पंपावर ऋतूच्या मित्राचा फोन आला. त्याने सांगितले हरिकेनने फार धुमाकूळ घातला आहे . ऋतू कपड्याच्या कपाटात बसून होती. दारे - खिडक्या फुटल्या होत्या . आता वादळ शांत झालंय. ती सुखरूप आहे. मुंबईला पोहोचलो. २ दिवसांनी ऋतूने फोन केला.तिने केलेले ते वर्णन ऐकून आम्ही घाबरलो . एक संकट टळले. जेंव्हा आमचे पांडुरंग दर्शन झाले तेंव्हाच हरिकेन तो भाग सोडून वेगाने पुढे गेला . आम्हाला आजही वाटते ती पांडुरंगाची कृपा . श्रद्धा असो का नसो . अशा विलक्षण शक्ती आपल्याला आशीर्वाद देत असाव्यात . 
त्यानंतर आम्ही एकदा पंढरपुला गेलो. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. त्याचा तो आशीर्वाद नवी ऊर्जा निर्माण करते . माऊलीच ती.

Thursday, July 4, 2019

हिंदुत्व .....

भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत 'हा विचार सोडून द्यावा .मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे . आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला.
मुलायम , मायावती , ममता , डावे- उजवे कम्युनिस्ट , समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली. त्यांच्या विकासासाठी काहीच केले नाही. हे भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा - बाबरी कांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या . त्या जखमा तशाच राहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केलेत हे ह्या देशाचे दुर्दैव .गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबादार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची पेरणी करून फूट पाडली व सत्तेचे राजकारण केले. मायावती मुसलमानांना १०० तिकिटे देतात तर मुलायम सिंग ही तशीच खेळी  करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत . ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला .
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे , आम्हालाच निवडणून द्यावे ,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले , ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली .
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग ह्यांनी पोसला . दिल्लीचे जामे मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये , हे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात . त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो ? बाबरी- गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत .
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये.
समान नागरी कायदा, मुस्लिम स्त्रियांना तलाख मुक्ती, काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे , राम मंदिराचा वाद  सामोपचाराने मिटवणे ह्यातच सर्वांचे हित आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची 'ची भाषा बोलत असतात त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात . पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र ' जिनांच्यामुळे उदयास आले आहे . भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी , ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा ' मुस्लिम भारत ' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे ' हिंदू भारत ' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत .
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.

भागवतांनी जी भाषणे दिली ती ३ - ४ वर्षांपूर्वी दिली असती तर अधिक उपयोगी ठरली असती . काही अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांच्याबरोबर आरएसएस  नाही  हे लोकांना कळले असते .
आज तर काँग्रेसनेच  राजकीय  खेळी म्हणून' सॉफ्ट हिंदुत्वाचा' पुरस्कार केला आहे .त्यांचे  नेते टेम्पल टूर - कैलास यात्रा  करण्यात मग्न आहेत .
काही भाजप नेते मात्र 'हार्ड हिंदुत्वाच्या ' गोष्टी करताना दिसतात . त्यामुळे भागवतांची भूमिका संयमी वाटते हे त्यांना समजेल तर बरे होईल . अर्थात अशी स्पष्ट भूमिका आधी न घेतल्यामुळे जे नुकसान झाले ते झाले . लोकांना हे किती पटेल हे वेगळे .

 गेल्या ४-५ वर्षापासून ह्यावर चर्चा होत आहे . ह्या काळात भागवतांनी अनेक भाषणे दिली . अशी शब्दरचना आणि मांडणी सर्व लोकाकरिता ह्यापूर्वी का केली नाही ? गोरक्षणाचा मुद्दा आणि त्यावर झालेले हिंसाचारी वर्तन ह्याचा निषेध आधीच करायला पाहिजे होता . जे अतिरेकी हिंदुत्ववादी आहेत त्यांना जसा संदेश दिला तसा तो आधीच देणे आवश्यक होते आणि आहे . ज्या हिंदुत्ववादी संघटना आर एस एसशी संबंधित नाहीत त्यांचा कधीच उल्लेख केला नाही . ते करणे आवश्यक होते आणि आहे .


गोहत्या बंदी ह्या विषयात मला फारसा रस नव्हता . हा विषय गेल्या ५ वर्षांपासून अधिक चर्चेला येतो आहे . उत्तरप्रदेशचे राजकारण त्याभोवतीच फिरते आहे . ह्या विषयाची माहिती खणून काढतांना मला खूप माहिती मिळत गेली . अकबराच्या काळात गोहत्या बंदी होती असेही वाचण्यात आले . महात्मा गांधी आणि विनोबा भावे ह्यांचे ह्यासंबंधीचे विचार ऐकून / वाचून माहित होते . स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर काँग्रेसने ह्यावर अनेकदा चर्चा केली आणि धोरणे ठरविली . हा प्रश्न केंद्र सरकारच्या कक्षेत नसून राज्य सरकारांनी  त्यावर निर्णय घ्यायचा हे ठरल्यामुळे बहुसंख्य राज्यात गोहत्या बंदीचा कायदा आहे . तरीही कायदा मोडून गोहत्या होत असते व तणावाचे वातावरण निर्माण झालेले दिसते .
गांधींचे सर्व अनुयायी गांधीजी ह्या प्रश्नावर काय बोलत असत ,लिहीत असत हे समजून कसे घेत नाहीत ?,हा मला पडलेला प्रश्न .
गांधीजी ह्या प्रश्नावर काय लिहीत होते / बोलत होते हे एकदा अवश्य वाचा . सोबत लिंक देत आहे . मला हे विचार फार महत्वाचे वाटतात .अशावेळी मात्र ह्या प्रश्नात सर्वाना सावरकर आठवतात. असे का ? सावरकरांची भूमिका बरोबरच आहे . पण गांधीजी / विनोबाजी ह्यांचे म्हणणे समाजमन ओळखणारे नाही का ? 
This is what Gandhiji said on COW :
https://www.mkgandhi.org/momgandhi/chap81.htm
Please read this and you will realize about this old issue discussed from 1921 .
हिंदुत्वाचा विचार करताना वरील मुद्दे लक्षात घ्यावे.