Follow by Email

Wednesday, December 10, 2014

प्राग : एक सुंदर जागतिक शहर

सकाळी आठ वाजतां साल्झबर्ग सोडले. पश्चिम ऑस्ट्रियाकडून पूर्व ऑस्ट्रियाकडे व नंतर उत्तरेकडे प्रवास सुरु झाला. पूर्व युरोपातील प्राग ह्या प्रसिद्ध शहराकडे जात होतो. युरोपातील रस्ते सुंदर आहेत. कारने प्रवास सुखकारक आहे. आल्प्सच्या रांगा दूर दूर जात होत्या. मैदानी प्रदेश सुरु झाला. परंतु सर्वत्र हिरवेगार.निसर्गाचे वरदान लाभलेला ऑस्ट्रिया सुंदर आहेच. प्रागकडे जातानां १४७.५ कि मी. अंतरावर सिस्की कृमलोव्ह ( Cisky Krumlov ) हे झेक शहर लागते. तेथे थोडे थांबून पुढे जायचे ठरले होते. एका देशातून दुसर्या देशात प्रवेश करतांना काय बदल होतात हे पहावयाचे होते. तसे ड्रायव्हरला सांगून ठेवले होते. फरक फारसा दिसून येत नव्हता. सर्व युरोप जवळपास सारखाच. भाषा मात्र बदलते. भारतात प्रांत बदलला की प्रादेशिक संस्कृती बदलते तसेच युरोपात भाषा बदलते आणि तेथील संस्कृतीतील छोटे छोटे बदल दिसू लागतात. सिस्की कृमलोव्ह हे बोहेमिअन संस्कृतीची छाप असलेल्या खेड्यांची वसाहत.  युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज लिस्ट मध्ये समाविष्ट केलेले जुने  शहर. युरोपिअन संस्कृती जपून ठेवण्यासाठी किती व्यवस्थित प्रयत्न केले जातात ह्याचे उत्तम उदाहरण. आपण हम्पीचे विजयनगरचे साम्राज्य एवढे चांगले जपून ठेवले नाही. ह्याची जाणीव झाली. निश्चित नियोजनाच्या अभावी आपण आपली प्राचीन स्थळे चांगली जपून ठेवली नाहीत ह्याचे वाईट वाटले. सिस्की कृमलोव्ह मध्ये शेकडो जुनी घरे जतन करून ठेवली आहेत ,हे वैशिष्ट्य.
येथील राष्ट्रीय राजप्रासाद ( National Castle )  हा प्राग  येथील राष्ट्रीय प्रासादानंतरचा मोठा प्रासाद आहे असे म्हणतात. लाखो पर्यटक तो पहाण्यासाठी येथे येतात. ह्या शहराला Pearl of Reniassance असे म्हणतात. १३ व्या शतकात Valtva नदीच्या काठावर हे शहर वसवण्यात आले. बोहेमिया साम्राज्याच्या खुणा आज ही  जशाच्या तशा दिसतात. १४ व्या ते १७व्या शतकात ह्या शहराची निर्मिती झाली. बरोक वास्तुकलेच्या ह्या इमारती देखण्या आहेत. नदीचा आकार घोड्याच्या  नालीसारखा आहे आणि शहर दोन्ही बाजूला वसलेले आहे. नदीच्या पलीकडे उंचावर प्रसिद्ध राजप्रासाद आहे. इतिहास खूपच मोठा आहे . डच कृमलोव्ह ह्या शहराचा मालक होता. जर्मन आणि झेक लोकांची वस्ती असलेला हा पूर्वीच्या झेकोस्लाव्हाकियाचा हा भाग. नाझी जर्मनीने ह्या शहराचा ताबा घेतला. नाझींचा पराभव झाल्यानंतर अमेरिकन सैन्याने ह्या शहराचा ताबा घेतला आणि जर्मन लोकांना हाकलून देण्यात आले. 
कम्युनिस्ट राजवटीत झेकोस्लाव्हाकीयाची वाताहत झाली. तेंव्हा ह्या शहराची दुर्दशाच झाली. १९८९ नंतच्या वेलवेट क्रांतीनंतर ह्या शहराकडे विशेष लक्ष देण्यात आले आणि पूर्वीचे सौंदर्य आणि वैभव मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.आज लाखो पर्यटक येथे येतात. हे पर्यटकांचेच गांव. २००२ मध्ये हे गांव नदीच्या पुरात वाहून गेले. चिकाटीने पुन्हा हे शहर जसेच्या तसेच उभारण्यात आले. हे वैशिष्ट वाखाणण्यासारखे. 
नदीच्या काठावरील उंचावर असलेला कृमलोव्हचा राजप्रसाद खूप भव्य आणि देखणा. सुंदर बागा. देखणे सभागृह. बरोक वास्तुकलेच्या भव्य  इमारती.  World Monument  Fund च्या मदतीने हे शहर पुन्हा जसेच्या तसे उभे केले आहे. १५ व्या शतकातील गथिक वास्तुकलेची चर्चची इमारत डोळे दिपवून टाकते. ह्या शहरात पायी पायीच फिरावे लागते. २ - ३ तास कमीच पडतात. 
येथून प्राग १४२ कि. मी . २ -३ तासाचा प्रवास. मध्ये पोट -पूजा. प्रागला जाण्यास उशीरच झाला.
प्राग म्हणजे City of  Unusual Beauty असे म्हंटले जाते. पूर्व युरोपातील सर्वात महत्वाचे ऐतिहासिक शहर . कम्युनिस्ट राजवटीत बरीच दुर्दशा झालेली ही झेकोस्लाव्हाकीयाची राजधानी. त्याला प्रहा असेही म्हणतात.
हे शहर पाहून कोणीही ह्या शहराच्या प्रेमात पडावे . त्याला पूर्व युरोपचे Paris असेही म्हणतात. खरं म्हणजे हे लंडन - Paris पेक्षा ही सुरेख आहे. Vltawa नदीच्या काठावर वसलेले हे २३ लाख लोकसंख्या असलेले शहर.प्रहा म्हणजे नदीच्या पाण्यावर येणाऱ्या उंच उंच लाटा( Rapids) किंवा नदीतील भोवरा. ल्याटीनमध्ये प्राग म्हणजे "Mother of cities".  युरोपची राजकीय , सामाजिक ,आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडण ह्या शहराने अगदी जवळून बघितली आहे. तसे हे युरोपच्या मध्यावर आहे. ११०० वर्षाचा इतिहास असलेले हे शहर. युरोपची मध्ययुगीन क्रांती ह्या शहराने पहिली आहे.अनेक चळवळीचे हे केंद्रस्थान. प्रागमध्ये दोन रोमन सम्राट वसतीला होते. ऑस्ट्रो - हंगेरीअन साम्राज्याने ह्या शहरावर ताबा मिळविला. पहिल्या महायुद्धानंतर हे राजधानीचे शहर झाले.
विशेष म्हणजे प्रोटेस्टंट धर्म पंथामध्ये अनेक सुधारणावाडी चळवळीयेथे झाल्या. अनेक सांस्कृतिक चळवळीचा जन्म ह्या शहरात झाला. अल्बर्ट आईन्स्टाईन प्राग विद्यापीठात प्राध्यापक होता .दोन महायुद्धे , सतत ३० वर्षे युद्ध परिस्थिती , त्या नंतरची कम्युनिस्ट राजवटीत झालेली वाताहत हे सर्व सोसूनही आजही हे शहर दिमाखात उभे आहे.युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून ह्या शहराला मान्यता दिलेली आहे. अतिशय चांगला भूतकाळ , गाथिक आणि बरोक वास्तुकलेच्या भव्य इमारती , देखणा राजप्रासाद , भव्य चर्चेस हे सर्व असलेले जुने प्राग खूप बघण्यासारखे आहे. दिवसभर पायीच फिरले की सर्व इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. बरोबर चांगला गाईड मात्र हवा. प्रसिद्ध प्राग क्यासल, चार्ल्स ब्रिज , शहरातील जुना भव्य चौक , ज्यू लोकांची वस्ती , दहा पेक्षा अधिक म्युझियम , अनेक नाट्यगृहे ,चार्ल्स युनिव्हार्सिटी इत्यादी. दरवर्षी ४१ लाख लोक ह्या शहराला भेट देत असतात त्यामुळे पर्यटकाचे आवडते शहर असा नावलौकिक झालेला आहे.आतां तर व्यापारामुळे जागतिक शहर झाले आहे. पूर्वीही हे युरोपचे व्यापारी केंद्र होते त्याचे कारण ज्यू व्यापारी येथे स्थाईक झाले. इ,स. ९६५ मध्ये ज्युनी येथे वसती केली. नदीच्या किनार्यावर उंचावर एक किल्ला आहे. ११७० मध्ये नदीवर पहिला ज्युडिथ पूल बांधला. १३४२ मध्ये हा पूल वाहून गेला. आजही ते अवशेष पहावयास मिळतात.त्याच नदीवर चार्ल्स ब्रिज बांधण्यात आला. त्या पुलावर उभे राहिले की एका बाजूला भव्य असा राजप्रसाद तर दुसर्या बाजूला सुंदर शहर दिसते. त्या पुलावर असंख्य पुतळे दिसतात. शिल्पकलेचा सुंदर मिलाप.
१३४४ मध्ये बांधलेली Gothic Saint Whitas Cathedral ची अतिभव्य - प्रचंड इमारत आवाक करते. त्या चर्चच्या भोवती रोमन स्क़्वेअर आहे. त्याकाळी धर्मसत्ता किती प्रभावी होती हे सहज लक्षात येते. आपल्याकडील देवळे एवढी प्रचंड नाहीत. चर्च जवळची संपती अफाट असणार आणि आहे. १४०२ मध्ये चार्ल्स विद्यापीठ स्थापन झाले आणि धर्म शिक्षणाचे संशोधन केंद्र बनले. ह्याच विद्यापीठातील तत्ववेत्यानी चर्चच्या भ्रष्टाचारावर घणाघाती हल्ला केला आणि धर्म सुधारणेचे रणशिंग फुंकले. १९०६ मध्ये ज्युनी प्रसिद्ध धर्मस्थळ येथेच बांधले. झेक पार्लमेंट , राष्ट्राध्यक्ष निवासस्थान , पोप च्या करिता बांधलेले निवासस्थान आणि कार्यालय , अमेरिकन आणि जर्मन वाकाल्तीच्या सुंदर इमारती , गाथिक बांधणीची चर्च  हे सारे एकाच भागात आहेत.पार्लमेंटच्या बाहेरच्या चौकात THOMAS MASARRYK ह्या राष्ट्राध्यक्षाचा अति प्रचंड पुतळा म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे . तेथून प्राग शहर फार सुंदर दिसते .उंच असलेल्या प्रासादातून पायर्या उतरून आपण नदीकडे चालू लागतो आणि जुने शहर दिसू लागते .मध्यवर्ती चौकात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. आजूबाजूला असंख्य दुकाने , रेस्तोरंट,आणि ज्यू व्यापार्यांच्या इमारती. सर्वात आकर्षित करते ती The Astronomical Clock. एक वेगळे घड्याळ.तास आणि सेकंद तर मोजतेच परंतु ३६५ दिवसातील प्रत्येक दिवसाचे एक विशेष नांव दाखविते. त्या नावाला विशेष महत्व. मूल ज्या दिवशी जन्माला येते , त्या दिवशीचे नांव मुलाला देण्यात येते असे म्हणतात दर एक तासाने एक व्यक्ती वरच्या खिडकीतून बाहेर येते व बिगुल वाजवून निघून जाते. सर्व पर्यटक ते बघण्यासाठी खुप गर्दी करतात. मोठी गंमत असते. त्या इमारती समोरच आईन्स्टाइन तेथे ५ वर्षे रहात होता. आजही त्याच्या नावाची पाटी तेथे आहे.त्यानंतर नाझीच्या काळात  तो अमेरिकेला निघून गेला.
दुसर्या महायुद्धात हिटलरनी प्रागचा राजप्रासाद ताब्यात घेतला. ज्युची खूप संख्या येथे होती. त्यांना छळ छावण्यात पाठविले गेले. काही ज्यू पळून गेले. १९४२ मध्ये नाझी सैन्य प्रमुख Reinhard Heydrich  ह्याचा खून झाला. हिटलर संतापला. तुंबळ युद्ध झाले. त्याच वेळी अमेरिकन सैन्याने बॉम्ब हल्ले केले अनेक जण मृत्युमुखी पडले . सर्व जुन्या इमारती उध्वस्त झाल्या कारखाणे जळून गेले. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांनी ताबा घेतला. जर्मन आणि नाझी प्राग मधून पसार झाले. आज येथे जर्मन अत्यल्प आहेत.
१९४८ ते १९८९ ह्या काळात येथे लष्करी सत्ता होती. सोव्हियत युनिंअनच्या वर्चस्वाखाली  कम्युनिस्ट प्रणाली सत्तेवर होती. झेकोस्लाव्हाकीयातील बुद्धजीवी वर्ग जागा झाला . लेखक - नाटककार एकत्र आले. १९६७ साली आंतर राष्ट्रीय लेखकांची एक परिषद झाली. त्यांनी कम्युनिस्ट राजवटी विरुद्ध बुलंद आवाज उठविला. १९६८ मध्ये सोव्हियत युनिंयनने हल्ला केला. चळवळ करणाऱ्या लोकांची मुस्कटदाबी केली. १९८९ मध्ये वेलवेट क्रांती झाली आणि विद्यार्थ्यांनी बंद केले. प्राग मधील सर्व रस्त्यावर मोठ्या संखेने तरुण विद्यार्थी जमा झाले नवी हवा निर्माण झाली चळवळीने जोर धरला आणि १९९३ मध्ये झेक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश निर्माण झाले. झेकचा पहिला राष्ट्रपती Havel हा नाटककार होता. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. नव्या झेकचे स्वप्न पहाणारा हा राष्ट्रपती नाटककार होता. विजय तेंडुलकरानी " रामप्रहर " हे त्यांचे पुस्तक ह्या नाटककाराला अर्पित केले होते. मी त्या पुस्तकाचा प्रकाशक होतो त्यामुळे ती अर्पण पत्रिका मी प्रथम वाचली होती.त्यावेळेपासून माझ्या मनात झेक , प्राग आणि हा नाटककार अध्यक्ष ह्यांच्याविषयी औत्सुक्य होते . ते पुस्तक जेंव्हा प्रकाशित झाले होते त्याच्या काही दिवस आधी हा नाटककार राष्ट्राध्यक्ष दिल्लीत राष्ट्रापतिचे  पाहुणे म्हणून आले होते हे बातमीवरून नंतर समजले . झेक पार्लमेंटच्या जवळ फिरत असताना मी गाईड ला सहज प्रश्न केला आणि पहिल्या राष्ट्राध्यक्षाबद्दल सहज विचारले आणि तो तितक्याच सहजतेने मला म्हणाला , " तो एक भूतकाळ आहे . आतां भविष्याचा विचार करायचा ."
१९९० पासून प्राग पुन्हा युरोपचे प्रमुख आर्थिक चळवळीचे केंद्र बनले आहे. इ.स. २००० मध्ये जागतीकरणाच्या विरुद्ध १५००० निदर्शकांनी IMF आणि World Bank ह्यांच्या विरुद्ध निदर्शने केली व मोठा मोर्चा काढला. आज नव्या अर्थ व्यवस्थेत प्राग शहर महत्वाची भूमिका बजावत असून युरोपचे प्रमुख शहर झाले आहे. २००२ मध्ये मोठा पूर आला. खूप नुकसान झाले ,भूमिगत दळणवळणाची साधने बंद पडली. त्याही संकटातून प्राग पुन्हा उभे राहिले .
आमचा मार्गदर्शक टर्कीचा होता. सर्व रंजक इतिहास त्याला चांगलाच माहित होता. प्राग म्हणजे म्युझियमचे शहर. राष्ट्रीय म्युझियमची इमारत आकर्षक आहे. रात्रीच्या वेळी प्राग वेगळेच दिसते. मन वेधून घेणारे ते क्षण. रुडोलफिनम हा प्रागचा क्न्सरट हॉल अतिशय सुंदर आहे. सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र.त्यामुळेच प्रागला युरोपची सांस्कृतिक राजधानी असेही म्हणतात .थियेटरस, ऑपेराज, म्युझियम्स, ग्यालरीज,भव्य वाचनालये सर्व एकाच ठिकाणी. त्यामुळे प्राग हे बुद्धीमंताचे,कलावंताचे , चित्रकारांचे , शिल्पकारांचे , संगीतकरांचे , नाटकंकारांचे आणि शास्त्रज्ञाचे शहर आहे तसेच धर्ममार्तंड लोकांचेही गांव आहे. ह्या ठिकाणी संगीत ,कला , साहित्य , ह्यांच्या  आंतरराष्ट्रीय परिषदा सारख्या चालू असतात. दर वर्षी शेक्सपिअर च्या नाटकांचा महोत्सव होतो तसेच फ्याशन शो होतात. बाजूला वैद्यकीय परिषद चालू असते. संरक्षण( Defence) विषयक परिषद ही चालू होती. DRDO चे शास्त्रज्ञ भेटले . फिरतांना आम्हाला भारतीय डोकटर्स, आणि लष्करी अधिकारी परिषदेला आलेले दिसले. हॉलीवूड आणि बॉलीवूड चे लोक येथे हमखास येतात.प्रागचे टेलिव्हिजन Tower वरखुच उंच असून त्यावर रांगत रांगत काणारी दोन बाळे ( Crawling Babies ) लक्ष वेधून घेतात. प्रागचे ट्राम नेटवर्क मोठे असून ९०० ट्राम्स रोज ये -जा करतात. प्रागचा मुक्काम अवर्णनीय  आणि संस्मरणीय  होता. मला प्रागला पुन्हा जाण्यास आवडेल.
हा मुक्काम संपला आणि आम्ही निघालो पूर्वीच्या पूर्व बर्लिन मध्ये असलेल्या ड्रेस्डेनकडे. हे शहर दुसर्या महायुद्धात ८० टक्के नष्ट झाले होते.  


रम्य अरुणाचल
रम्य ते पूर्वांचल ( असम ,मेघालय ,अरुणाचल, नागलंड,मिझोरम ,मणिपूर आणि त्रिपुरा- ह्या सात बहिणी- Seven Sisters ) . त्यांच्या सोबत सिक्कीमही आहे. हा पूर्वांचल पाहण्याची खूप दिवसाची इच्छा होती. तसे सिक्कीम मी पहिले होते. १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१२ ह्या काळात पूर्वांचलचा प्रवास घडून आला आणि एक आगळा वेगळा निसर्ग सौंदर्याचा आनद अनुभवला. हिमालयाचा मी तर यात्रिक. म्हणून अरुणाचलला प्रथम जाण्याचे ठरविले. अरुणाचल हे खूप मोठे राज्य आहे. ओढ होती ती तवांग ला जाण्याची. त्या भागातील हिमालयाचे दर्शन घ्यायचे होते. ह्या भागातून प्रवास करणे कठीण आहे हे माहितच होते. फारशा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवासी इकडे फिरकतच नाहीत. येणार कसे. रस्ते चांगले नाहीत. प्रवास कठीण आणि धोक्याचा. आजूबाजूच्या प्रदेशात अशांतता. प्रवासातून सुखरूप येतो की नाही अशी भीती. तरीही हिमालयाच्या वेगळ्या असणार्या पर्वत रांगा, ब्रम्ह्पुत्रेचा आजूबाजूचा परिसर ,घनदाट जंगले ह्या सर्व निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पाहायचाच होता. योग जुळून आला.
तवांगला जायचे तर गोहत्ती पासून सुरुवात करावयाचे ठरविले. मुंबई – गोहाटी हा प्रवास मुद्दामच विमानाने केला. कारण पुढचा सर्व प्रवास चार चाकी वाहनानेच करावयाचे होते. असम मधून गोहत्ती  - तेजपूर मार्गे बोमदिला – डीरंग करीत तवांगला स्कॉर्पियो ह्या जीपने १६ ते १८ तासांचा प्रवास करावा लागेल अशी माहिती मिळाली. आम्ही एकूण ११ जण होतो. सरासरी वय ६० च्या वर. सर्व कठीणच आहे असे वाटत होते. तवांग – गोहत्ती अंतर ५५० कि.मी.पेक्षा अधिक.गोहत्ती ते बोमडिला हे अंतर ३३८ कि.मी. प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ १२ -१४ तास. बोमदिला ते तवांग अंतर १८५ कि.मी. प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ ८ ते १० तास. ह्या लागलेल्या प्रवास वेळेवरूनच प्रवास किती कठीण असेल ह्याची सहज कल्पना येऊ शकेल. बोमडीलाला रात्री मुक्काम करण्याचे ठरले होते. गोहत्ती सोडले. तेजपुरच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सुरवातीला वाटले की रस्ते चांगले चौपदरी आहेत. चांगलेच असणार. ब्रम्ह्पुत्त्रेवरील मोठ्या आणि लांबच लांब असणार्या पुलामुळे ब्रम्हपुत्रेच्या अवाढव्य पात्राची कल्पना आली. तशी ब्रम्हपुत्रा कैलास- मानससरोवर यात्रेत पाहिली होती. नव्हे तिच्या काठाकाठानेच कित्येक कि.मी. प्रवास केला होता. पण ही ब्रम्हपुत्रा खूपच पसरलेली दिसले. एखाद्या समुद्रासारखी. पलीकडला जमिनीचा काठच दिसत नव्हता. पूर आल्यावर किती हा:हा:कर करते हे सर्वांनाच माहीत आहे, आम्ही भालुकपांगच्या जवळ आलो. हे असम आणि अरुणाचल ह्या दोन्ही राज्याची सीमा असलेले गाव. अर्धे असममध्ये तर अर्धे अरुणाचलमध्ये. हे गाव दोन नद्यांच्या काठावर वसलेले सुंदर असे गाव. तेजपूर पासून फक्त ५२ कि.मी.  कामेंग नदीच्या काठावर वसलेले चित्रातल्या सारखे सुंदर गाव. हिमालयाच्या रांगा त्या नंतर सुरु होतात. चढण येथूनच सुरु होते, मैदानी प्रदेश संपतो. अरुणाचलमध्ये प्रवेश करण्यास परमीट लागते. तरच प्रवेश मिळतो. सर्व पेपर बरोबर होतेच. पण शासकीय यंत्रणा. वेळ लागलाच. अर्थात त्याला इलाज नसतो. तपासणी ही हवीच. असम सोडले नि अरुणाचलमध्ये प्रवेश केला. पोटोबासाठी रस्त्यावरचे हॉटेल गाठले. आतां सोई- सुविधा साधारणच. रेस्टरूमची व्यवस्था कुठे आहे, ह्याचा पहिला शोध. सोबत असलेल्या महिलांची मात्र कुचंबना. पुरुषांना मात्र मोकळी जागा म्हणजे सगळे वावर खुलेच . फक्त आडोसा शोधायचा. आता जे मिळेल तेच खायचे. पदार्थ निवड करण्याची संधीच नाही. भात मात्र मिळतो. त्याबरोबर बटाटा असतोच. भाज्या निवडकच. करण्याची त्यांची पद्धत निराळी. मसाले वेगळे. काहीही खाल्ले तरी त्रास नको व्हायला . पोट तर सांभाळणे आवश्यक. त्यामुळे सगळे खाणे भीतभीतच. आणि मग खरा कठीण असलेला प्रवास सुरु झाला. हिमालयाची चढण सुरु झाली. नागमोडी रस्ते. अरुंद रस्ते. कधी उंचावर घेऊन जाणारी चढण.तर लगेच खाली उतरणारे रस्ते. एका पर्वत रांगातून दुसऱ्या पर्वत रांगाकडे नेणारे रस्ते. डांबर निघून गेले रस्ते. मातीने आणि चिखलाने भरलेले रस्ते. दरडी कोसळलेले रस्ते. खाचंखळग्याचे रस्ते. ह्यांना रस्ते म्हणावयाचे का? असा प्रश्न कोणालाही पडेल. फक्त लष्कराच्या गाड्या वेगाने कशा धावतात हाच मनात येणारा प्रश्न.असा हा आनद देणारा रस्ता. ड्रायवर एक खड्डा चुकवायला जातो आणि दुसऱ्या खड्ड्यात अडकतो. जीप मध्ये मागे बसणारे वैतागलेले. खड्डा आला की त्यांचे डोके छतावर आपटतेच. दोन चार टेंगुळ आलीच समजा. मागे बसणाऱ्या माणसांची वाट लागते. मोठे कर्म कठीण . खड्डे नसतील तर रस्ता चिखलानी भरलेला. गाडीची चाके रुतून बसली की पंचाईत. थोडे पुढे जावे तर अरुंद वळण, एक इंच इकडे तिकडे झाले तर गाडी सरळ खोल दरीतच . प्रवासात जीवाची भीती बरोबरच असते. त्यामुळे आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मन ही स्थिर नसते. खड्डा नाही ना, हे बघितले की मग  निसर्गाकडे बघायला वेळ. स्वतःच्या हाडाचा हिशोब सारखा ठेवावा लागतो. गाडीतून उतरलो की पहिल्यांदा हाडाचा हिशोब करायचा. मान आणि कंबर ठीक आहे ना? हे तपासून पहावयाचे. मग एखादा धबधबा आला की मुद्दाम खाली उतरून निसर्ग सौंदर्याचा आनद लुटायचा. जागा बदलायच्या. मागे बसणारा पुढे बसायला मिळते म्हणून सुखावलेला तर पुढे बसणारा मागे जावे लागणार म्हणून कष्टी झालेला. पण इलाज नाही. मग तो ड्रायव्हरला विचारणार पुढचा रस्ता कसा आहे. तो सांगणार , सांगता येत नाही. मागच्या वेळी चांगला होता. पावसाने काय झाले असेल माहीत नाही. नाहीतर रस्ता दुरुस्तीची कामे चालूच असल्यामुळे रस्ता अजूनच खराब झालेला असतो, असा हा सगळा प्रवास रोलर कोस्टर मध्ये आहोत असा वाटणारा. मधेच गाडी बंद पडली तर विचारूच नका. तिकडे चीनने तवांगकडे येण्यासाठी चार पदरी रस्ते बांधले आहेत. गेल्या ६० वर्षात आपण रस्ते बांधलेच नाहीत. सर्वत्र काम चालू आहे असे दिसते. पण २-४ कि.मी. रस्ता चांगला आहे ,असे दिसत नाही. तसा हा सगळा प्रदेश दुर्गम. खूप पाऊस. बर्फवृष्टी. दररडी कोसळणे. रस्ते वाहून जाणे. नद्या-नाल्यांना पूर येणे, हिमालय तसा ठिसूळच. सारख्या दरडी  कोसळतात. वाहतूक बंद पडते. रस्ते वाहून जातात. येथे रस्ता नसावाच असे वाटते. लष्कराच्यासाठी बांधलेले हे रस्ते. लष्कर कसे चालते ,कोणास ठाऊक. निसर्ग ही बेभरवशाचा. एका क्षणात रस्ता होता की नव्हता असे करून टाकतो. ६० वर्षापूर्वी आपले लष्कर कोणत्या परिस्थितीतून गेले असेल. कल्पनाच करता येत नाही. आजही चीन दबा धरून बसला आहे, आपण infrastructure उभे केले आहे असे वाटत नाही. असा हा १२ तासांचा प्रवास करून रात्री १० वाजता आम्ही बोमडीलाला येऊन पोहोंचलो. एक मात्र खरे की हिमालयाच्या ह्या रांगा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आहेत. प्रत्येक २-३ कि.मी. नंतर तो वेगळा असतो. डोळ्यांचे पारणे फिटते. प्रवास खडतर असतो. पण डोळ्यात न मावणारा हा हिमालय सतत बरोबर असतो. आपले वेगळे रूप दाखवीत असतो. कधी शांत. कधी रौद्र. प्रचंड वेगाने पडणारे ते पाणी म्हणजे धबधबे मन उल्हासित करतात. त्या नदीच्या काठावर शांत वाटते. अशी कित्येक ठिकाणे दिसतात की तेथेच रहावेसे वाटते. अगदी चित्रात पाहतो असे वाटत राहते. आपण फोटो क्लिक करतो पण जे प्रत्यक्ष पाहिले ते फोटोत येतच नाही. आपणच हिरमुसतो. पण फोटो पहिला की आपल्याला ते सारे आठवत राहते. तो क्षण जागा होतो. त्यामुळे तरी क्लिक करीत फिरत राहणे चालू असते. कोणताही फोटो डिलीट करावा असे वाटत नाही.
बोमडीलाला आमचा मुक्काम होता हॉटेल हायल्यांडर्स मध्ये. हॉटेल चांगले होते. जीप मधून बाहेर पडलो आणि सारे शरीर गारठून गेले. मरणाची थंडी. रूमपर्यंत जाणे कठीण.अजून बर्फ पडला नव्हता. बर्फ पडल्यावर काय हाल होत असतील. रूम मध्ये हिटर होता म्हणून बरे. नाहीतर वाट लागली असती. जेवणाच्या हॉल पर्यंत जाणेही जीवावर येत होते. त्या हॉटेल मधील काम करणारी मंडळी एकदम तत्पर. पिण्यासाठी गरम पाणी. गरम गरम जेवण. त्यामुळे थोडी हुशारी आली. प्रवासाच शीण थोडा कमी झाला. अंथरुणावर पडल्यावर कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळी उठलो. आणि लगेच निघालो तवांगला जाण्यास. १८५ कि.मी. चे अंतर. वेळ लागला आठ तास. प्रवास अधिक कठीण होत गेला. आणि आम्ही पोहोंचलो सेला पासला. १३,७०० फुट उंचावर. तवांग पासून अगदी थोड्याच अंतरावर. त्यापूर्वी एक सुंदर धबधबा पहावयास मिळाला. बहुधा जंग धबधबा असावा. सेला पास नेहमीच बर्फाच्छादित असतो. आम्ही तवांगला जाताना बर्फ नव्हता. परंतु दोन दिवसांनी परतताना मात्र संपूर्ण रस्ता बर्फाच्छादित होता. सेला पास जवळ १४ कि.मी. अंतरावर आहे जसवंत गढ. १९६२ मध्ये चिन्याच्या बरोबर ह्या ठिकाणी झाले तुंबळ युद्ध. नुरानंग ची लढाई असे म्हणतात. त्या ठिकाणी एक युद्ध स्मारक आहे. भारतीय सैनिकालाच नव्हे तर सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा पराक्रम ज्या जसवंत सिंग आणि इतर भारतीय सैनिकांनी केला ती ही जागा. पवित्र देऊळच. मी भारतीय आहे असा गर्व वाटतो ते हे ठिकाण. देशभक्ती जागी होते ते हे ठिकाण. एका वीराचे हे स्मारक. ४ गढवाल रायफलचे रायफलमन जसवंत सिंग ,ज्यांना महावीर चक्र मिळाले त्यांचे हे स्मारक. १९६२ मध्ये ७२ तास चिनी सैन्याबरोबर लढणारा व त्यांना तेथेच थोपवून धरणारा हा भारतीय लष्कराचा जवान. ह्या ठिकाणी धारातीर्थी पडला. ३०० हून अधिक चिनी मारले गेले. जखमी अवस्थेत तो चिनी सैनिकांच्या हाती लागला. आणि  त्याना त्याच ठिकाणी चिनी सैनिकांनी फासावर लटकाविले. आणि त्याचे शीर घेऊन ते निघून गेले. चीन लोकांनी माघार घेतली ती ह्या ठिकाणावरुनच. ते ठिकाण पाहिल्यानंतर आपले सैनिक त्या वेळी कसे लढले असतील ह्याची थोडीशी कल्पना येते. त्यांच्या जवळ साधे वुलनचे कपडे नव्हते. रायफलीमध्ये पुरेसा दारुगोळाही नव्हता. केवळ ५० राउंड गोळ्या. २४२० जवान शहीद झाले. जसवंत सिंगचा छोटासा पुतळा असलेले हे स्मारक. त्या ठिकाणाहून सर्व सीमा दिसते. गस्त घालण्याची ही महत्वाची जागा. आम्ही जेंव्हा ते स्मारक पाहत होतो तेंव्हा त्या ठिकाणी असणारा शिपाई होता कोल्हापूरचा. आम्ही मराठीत बोलत होतो . त्यामुळे त्याने बोलण्यास सुरुवात केली. तो त्या ठिकाणी ३ महिन्याकरिता आला होता. त्यांच्या तेथील जीवनासंबधी आम्ही चौकशी केली आणि त्यांच्या खडतर आयुष्याची जाणीव झाली. आपण ह्या सैनिकांच्या मुळेच सुरक्षित आहोत ह्याची जाणीव झाली. त्या ठिकाणी सैनिक एक क्यानटीन चालवतात . त्यांनी आम्हाला चहा पाजला. मोफत. जणू काही ह्या मंदिराचा तो प्रसाद होता. प्रत्येक भारतीय तरुणाने एकदा तरी ह्या ठिकाणास भेट द्यावी म्हणजे त्याच्या लक्षात येईल की किती किरकोळ तक्रारी करित ते रडत असतात. अशी ही आपली उत्तर-पूर्व सीमा. १९६२ मध्ये झालेला पराभव . आजही चीन दाबा धरून बसलेला आहेच. ह्या सीमेवर अनंत अडचणी आहेत. ६० वर्षानंतरही आपण फारशी प्रगती केली आहे व सीमा मजबूत केल्या आहेत असे वाटत नाही.
सेलापास सोडले आणि थोड्या वेळाने तवांग शहरात पोहोचू असे वाटले. अंतर तसे कमी होते .पण रस्ता अतिशय वाईटच होता. त्याला रस्ता न म्हणणेच योग्य. शेवटी गाक्यी खान्ग झांग ह्या हॉटेलवर पोहोचण्यास संध्याकाळच झाली. अंधार पडला होता. हॉटेल छान होते,स्वछ आणि सुंदर होते. रूम मध्ये गेलो आणि खिडकीतून तवांग शहराचे विलोभनीय दर्शन झाले. छोटे , टुमदार असे हे शहर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. दूरवर तवांग monastrey दिसत होती.
१९१७ मध्ये इंग्रजांनी म्याक्मोहन रेषा काढली आणि सीमा रेषा निश्चित केल्या. त्याला सिमला अकोर्ड म्हणतात. ब्रिटीशानी तवांगचा ताबा घेतला नव्हता. १९३८ मध्ये ब्रिटीश सैन्य तवांग मध्ये होते. त्यावेळी तवांग हा भारताचाच भाग आहे म्हणून मान्यता मिळाली. त्यापूर्वी तो तिबेटचा भाग होता. १९४१ मध्ये जपान युद्धानंतर त्या वेळच्या असम सरकारने अनेक हालचाली केल्या आणि त्यावेळच्या North East Frontier Agency ( NEFA) च्या माध्यमातून शासकीय कब्जा मिळवीला . आज NEFA ला अरुणाचल प्रदेश असे म्हणतात. असम रायफल कडे रीतसर संरक्षणाची जबादारी होती. १२ फेब्रुवारी  १९५१ साली भारतीय लष्करांनी तवांगचा ताबा घेतला. त्यावेळी त्या भागात काही ठिकाणी चिनी लोकांच्या वसाहती होत्या. त्यामुळे आजही चिनी त्यावर आपला हक्क सांगतो . आज चीनने तिबेटवरच ताबा मिळविलेला असल्यामुळे ते हा भाग त्यांचाच समजतात. १९६२ मध्ये फार थोड्या काळाकरिता तवांग चीनच्या ताब्यात होते. त्यानंतर चीनी सैनिक माघारी गेले. परंतु आजही चीन हा भाग आपलाच आहे असा दावा करते. २००३ मध्ये दलाई लामांनी अरुणाचल हा तिबेटचा भाग आहे असे वादग्रस्त विधान केले होते. परंतु २००८ मध्ये त्यांनी म्याकमोहन रेषा मान्य केली आणि तवांग भारताचाच भाग आहे हे मान्य केले. ८ नोव्हेंबर २००९ मध्ये दलाई लामांनी तवांगला भेट दिली. ३०००० हून अधिक बुद्ध धर्मीय शिष्य समुदाय त्यांच्या भेटीच्या वेळी तवांग मध्ये उपस्थित होता. त्यावेळी चीनने दलाई लामांच्या भेटीला आक्षेप घेतला होता.
तवांग ची तवांग Monastery हेच प्रमुख आकर्षण. ५ व्या दलाई लामाच्या इच्छेनुसार मेरा लामा गोरडे ग्यासतो ह्यांनी ही मोन्यास्ट्री स्थापन केली.  येथे गेलुगपा ही बुद्ध जमात प्रमुख आहे. ल्हासा नंतर स्थापन झालेली ही दुसरी मोन्यास्ट्री. सहाव्या दलाई लामांचे हे जन्मस्थान म्हणून तिबेटी लोकांचे हे पवित्र स्थळ. १४ वे दलाई लामा तिबेटमधून पळाले आणि भारताकडे येण्यास निघाले तेंव्हा ३० मार्च १९५९ ला तवांगच्या ह्या मोन्यास्ट्रीट ते राहिले होते. त्यानंतर ते तेजपूर मार्गे भारतात पोहोचले. असा हा तवांगचा इतिहास. ही मोन्यास्ट्री खरोखरच बघण्यासारखी आहे.
दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे तवांग युद्ध स्मारक. संध्याकाळी हे ठिकाण बघण्यास गेलो. शेजारी लष्कराची छावणी आहे.हे युद्ध स्मारक दिमाखाने उभे आहे. ३१ दिवस चिनी लोकांशी युद्ध करताना जे सैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे स्तुपासारखे दिसणारे स्मारक. १९९७ साली दलाई लामांनी ह्या ठिकाणाला भेट दिली. आणि स्तुपाचा आकार असलेले हे स्मारक उभे करण्याचे ठरले. १९९९ साली शेकडो बुद्ध संन्यासानी हे स्मारक उभे करण्यासाठी प्रत्यक्ष काम केले. स्थानिक लोकांनी, शासनाने व लष्कराने सहकार्य केले. भगवान बुद्धाची मूर्ती दलाई लामांनी स्मारकासाठी दिली. बर्फाच्छादित हिमालयात साध्या सुती कापडी वेशात शुन्य डिग्री पेक्षा कमी तापमान असताना आपले सैनिक कसे लढले असतील ह्याचा अंदाजा येथे आल्यावरच कळतो. त्यांच्याजवळ पुरेसा दारुगोळा ही नव्हता. २४२० जवान शहीद झाले. बंदुकीत दारू गोळाच पुरेसा नव्हता म्हणून ते धारातिर्थी पडले. त्यांचे हे स्मारक.तेथील एका शिला लेखावर लिहिले आहे,
“How can man die better than facing fearful odds, for the ashes of his father and the temples of his Gods”.
ह्याच ठिकाणी रात्री  Light and Sound show  दाखवितात. आम्ही तो आवर्जून पहिला. फार सुंदर. मन हेलावून टाकणारा. त्या कार्यक्रमात लता मंगेशकरांनी गायलेले “ ए मेरे वतन के लोगो “ हे गीत गात असताना शहीद जवानांचे फोटो दाखवतात तेंव्हा डोळ्यात पाणी येते. त्या शहीदांची आठवण करून देणारा हा कार्यक्रम सर्वानीच बघयला पाहिजे. नं कळत I am proud of India असे तर वाटतेच पण आपल्यातील देशभक्तीचे स्फुलिंग जागे होते. ६० वर्षानंतर का होईना आपण ह्या भागास भेट दिली ह्यामुळे एक प्रकारचे समाधान वाटले.  आधीच यावयास हवे होते असेही  वाटत राहते.
दिल्लीला इंडिया गेटवर भारतीय जवानांचे स्मारक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धात शहीद झालेले हे भारतीय जवान. त्यावेळी ते इंग्रजांच्या बाजूने लढत होते. त्याच परिसरात १९६२ च्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक व्हावे म्हणून आपले लष्कर प्रयत्न करीत आहे. ६० वर्षे झाली तरी अजून त्यांच्या स्मारकासाठी जागा मिळत नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या जागेसाठी विरोध करतात हे ऐकून संताप होतो. असे कसे आपले राज्यकर्ते? इतर राजकीय नेत्यांची स्मारके लगीच होतात. पण १९६२ च्या ह्या शहीद सैनिकांना हे विसरून कसे जातात?  दुर्दैव आपले.
दोन दिवसाच्या मुक्कामानंतर तवांग सोडले. गाड्या सेला पासकडे वळल्या. आणि एक वेगळा अनुभव आला. धुकेच धुके. दोन फुटावरचे काहीही दिसत नव्हते. रात्री बर्फ वृष्टी झाली होती.   सर्व रस्ता बर्फाच्छादित होता. गाडी चालविणे अश्यक्य होते . गाड्या सारख्या घसरत होत्या. अरुंद रस्ते. समोर खोल दरी. अवघड वळणे. गाडी घसरली तर दरीतच जाणार. ह्या भागातील  जे ड्रायव्हर असतात तेच चांगली गाडी चालवू शकतात. त्यांनी चाकांना साखळ्या बांधल्या . त्यामुळे गाडी घसरत नव्हती . सर्व वाहने अडकलेली. पुढे जाणेच अशक्य. कमालीची थंडी. वारा ही सुटलेला. गाडीतच बसून राहावे लागले. थोडा वेळ जम्मत वाटली.  आता किती तास अडकून पडणार? ह्या विचारांनी डोके दुखले. थांबणे हाच उपाय. हिमालयात हवामान सारखे बदलत असते. आम्ही तर अडकून पडलो . शेवटी लष्कराच्या गाड्या आल्या. त्यांनी रस्त्यावरील बर्फ काढला. रस्ता थोडासा मोकळा केला. त्याला बराच वेळ लागला. आणि हळू हळू गाड्या पुढे  सरकू लागल्या. मुंगीच्या गतीने . दोन तासांनी थोडे खाली उतरलो. जमीन दिसू लागली आणि पुढचा प्रवास सुरु झाला. लष्कर मदतीला नसते तर तेथेच रात्रभर अडकून पडलो असतो. जय जवान.
पुढचा १६ तासांचा प्रवास . ह्यावेळी बोमडीलाला न थांबता थेट भालुकपांगला चाललो होतो. पोहोचलो तेंव्हा रात्रीचे ११ वाजले. भुकेल्या पोटी तसेच झोपलो. सकाळी उठलो तेंव्हा आमचे प्रशांती हॉटेल पाहिले. रात्री काहीच दिसले नव्हते. एक सुंदर ठिकाण. कामेंग नदीच्या काठावरचे हे सुंदर हॉटेल. थोडा फेरफटका मारला. आणि नाश्ता करून निघालो ते काझीरंगाला जाण्यासाठी.
अरुणाचलचा अगदी छोटासा भाग आम्ही पहिला. अरुणाचल तसा खूप मोठा आहे .असा हा रम्य अरुणाचल नं विसरण्यासारखा सुंदर आहे. आपले जवान तेथे आहेत म्हणूनच आपण येथे सुरक्षित आहोत. आपल्या किरकोळ तक्रारीपेक्षा त्यांचे प्रश्न बिकट आहेत. त्याही परिस्थितीत ते आपले संरक्षण करतात. जय जवान .   
    

  .   
    

बी- स्कूलच्या शिक्षणाच्या मर्यादा

भारतातील ९९ टक्के मुलांना आय.आय.टी / आय.आय.एम मध्ये प्रवेश मिळू शकत नाही. सर्वात हुशार मुलांनाही तेथे प्रवेश मिळू शकत नाही. कारण प्रवेशाची चाचणी तशीच आहे. अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीची मुले-मुलीच ह्या संस्थेत प्रवेश घेतात ह्यात वाद नाही. ज्या मुलांना भारतात अशा संस्थेत प्रवेश मिळू शकत नाही ती मुले मात्र अमेरिकेतील अत्यंत नांवाजलेल्या विद्यापीठात अगदी सहज प्रवेश घेताना दिसतात.त्याठिकाणी ती विलक्षण यशस्वी होतानाही दिसतात. एक वेळ आय.आय.टी / आय.आय.एम मध्ये प्रवेश मिळणे शक्य नाही पण हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळू शकतो. ह्यावरून आपल्या शिक्षण पद्धतीविषयी प्रश्न निर्माण होतो. काहीजण इग्लंडमधील नावाजलेल्या विद्यापीठातही प्रवेश घेताना दिसतात व यशस्वी होताना दिसतात. ह्याचा अर्थ असा की ह्या ठिकाणी खूप बुद्धिमान शास्त्रज्ञ / तंत्रज्ञ निर्माण होतात असा नाही तर अशा काही चांचणी पद्धतीमुळे अनेक चांगले विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अर्थात ह्या चाळणीतून उत्तमातले उत्तम विद्यार्थी निवडले जातात आणि तेच विद्यार्थी पुढे अमेरिकेची वाट धरतात आणि तेथे अधिक यशस्वी होताना दिसतात. ह्या देशात फारसा वाव मिळत नसल्यामुळे ते तिकडे जातात ही वस्तुस्थिती आहे. 
अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर Microsoft चे नवीन सीइओ झालेले सत्या नडेला ह्यांचे. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे नारायण मूर्ती ह्यांचा मुलगा. अशी अनेक उदाहरणे सहज देता येतील ह्या लोकांना भारत सोडल्यानंतर दैदीप्यमान  यश कसे मिळवता येते ? अगदी जूनी उदाहरणेही तपासून पाहता येतील. १९६८ मध्ये वैद्यक शास्त्रातील नोबेल मिळविणारे हरगोविंद खुराणा, १९८३ मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रात नोबेल मिळविणारे    सुब्रह्मण्यम चंद्रशेखर आणि २००९ मध्ये रसायन शास्त्रात नोबेल मिळविणारे वेंकटरामन रामकृष्णन. ह्या सर्वांनी भारत सोडला आणि जगात आपले नांव कमविले. हे कसे काय ? अलीकडेच आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांनी सुद्धा हाच मुद्दा आपल्या भाषणातून व्यक्त केला.
सत्या नडेला हे भारतातील कोणत्याही आय.आय.टी / आय.आय.एम मध्ये प्रवेश घेऊ शकले नाही. त्यावेळी फारसे प्रसिद्ध नसलेल्या मणिपालच्या संस्थेमधून शिक्षण घेऊन ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले . त्यांच्या गुणांना तेथे वाव मिळाला आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य तो वापर केल्यामुळे ते आज सर्वोच पद मिळवू शकले.
आय.आय.टी / आय.आय.एम मधून बाहेर पडलेल्या बहुतेक मुलांना भारतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात हे खरे आहे. हेच ओळखून त्याच धर्तीवर अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यांची संख्या वाढतेच आहे. शिक्षणाच्या ह्या बाजारात अनेकजण शिक्षणसम्राट होऊन पैसा मिळवताना दिसत आहेत आणि असंख्य एम.बी.ए ह्या बी-स्कूल मधून बाहेर पडताना दिसत आहेत.
अगदी अलीकडेच वर्तमानपत्रातून वाचलेली बातमी फार धक्कादायक आहे .” इंजिनीअरिंग आणि व्यवस्थापकीय शिक्षण ( MBA ) देणाऱ्या संस्थाना पुरेसे विद्यार्थीच मिळत नाहीत. बहुसंख्य जागा रिकाम्या आहेत. अनेक संस्थाना पहिल्याच फेरीत पुरेसे विद्यार्थीच मिळू शकले नाहीत.”. ह्याचा अर्थ काय ? हे शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या खूप झाली आहे किंवा ह्या संस्थामधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी तिकडे फिरकत नाहीत. अशी विलक्षण अवस्था B-School ची झाली आहे, त्याची कारणे काय असावीत आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या काय मर्यादा आहेत हे शोधण्याचा हा एक प्रयत्न.
मी पीएच.डी झाल्यानंतर मुंबईतील एका कंपनीत काहीं वर्षे संशोधन विभागात काम करीत होतो. दरवर्षी आमच्या कंपनीत फार मोठ्या प्रमाणावर पी.एच.डी आणि एम. बी. ए झालेल्या मुलांना नोकरीवर घेत असत. बहुतेक एम.बी.ए. कलकत्ता किंवा अहमदाबादच्या प्रसिद्ध आय.आय.एम मधील असत. दरवर्षी किमान ८-१० एम.बी.ए, कंपनीत घेण्यात येत असत. ही मुले बहुतेक आय.आय.टी/आय.आय.एम मधून शिक्षण घेतलेली होती. आज त्यातील बहुतेक जण विविध कंपन्यामध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत हे खरे आहे.माझा त्यांच्याबरोबर नेहमी संपर्क असे. पण त्यावेळी असा एक प्रश्न विचारला जात असे की एवढे चांगले शिक्षण घेऊन ही मुले साबण, शाम्पू आणि इतर वस्तू विकण्याचा व्यवसाय कशास करतात ? त्यांच्या मुलभूत शिक्षणाचा उपयोग काय ? ह्यातील १-२ व्यक्ती सोडल्यास कोणीही मोठा उद्योजक झालेला नाही. उत्पादन तंत्र आणि विक्रीचा मंत्र माहीत असूनही कोणीच स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा करू शकले नाही. ते व्यवस्थापक (Manager) झाले पण एखाद्या उद्योगाचे मालक ( Owner ) होऊ शकले नाहीत . त्यांच्या B-School मधील शिक्षणाचा उपयोग काय झाला? हीच ह्या शिक्षणाची मर्यादा दिसून येते. अलीकडे आपले चांगले इंजिनिअर/ तंत्रज्ञ त्यांचा मूळ विषय विसरून जातात आणि आय.टी क्षेत्रांत प्रणाली ( Programmimg ) लिहीत बसतात किंवा एम.बी.ए होण्याच्या मागे लागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की जे ज्ञानासाठी अधिक भुकेले असतात तेच पुढे काहीतरी नवीन करून दाखवू शकतात.
सत्या नडेलाचेच उदाहरण घ्या. ते प्रथम तंत्रज्ञ होते. ते “ INNOVATION” हाच मंत्र गाणारे तंत्रज्ञ आहेत.  ते Technologist First and Manager Next आहेत .त्यांच्याजवळ व्यवस्थापकीय पदवी सुद्धा आहे. Technology and Management अशा दोन्ही क्षेत्रात त्यांनी प्राविण्य मिळविले आहे, हे वैशिष्ट्य.
एम.बी.ए ही पदवी फारशी उपयोगाची कां नाही? असा प्रश्न जेंव्हा निर्माण होतो तेंव्हा B-School च्या काहीं मर्यादा दिसू लागतात. अनेक उद्योजक ह्यासंबंधी प्रश्न उभे करताना दिसतात. कारण त्यांच्या अपेक्षांना ही मुले पूर्णपणे उतरत नाहीत. त्यांच्या जवळ योग्य ते शिक्षण किंवा कौशल्य ( Skills ) दिसून येत नाही. त्यासाठी खाली नमूद केलेल्या चार मुख्य गोष्टींची आवश्यकता असते.
१ पत्रव्यवहार कौशल्य / निवेदन कौशल्य ( Communication – Writing and oral )
२ संयोजकता / संयोगक्षमता ( Adaptability )  
३ सूक्ष्म दृष्टीने विचार करण्याची क्षमता / टीकाकुशल विचार करणारा  ( Critical Thinking ) आणि
४ कल्पकता / कल्पक उद्योजकता ( Creativity )
ह्या चार गुणांचा जसा अभाव दिसून येतो. तसाच खालील महत्वाचे गुणही दिसून येत नाहीत.
१ नवा बदल ( Innovation ) / नवे तंत्रज्ञान / नवे उत्पादन
२ व्यापारी निपुणता ( Business Accumen )/ व्यापारविषयक शहाणपण
३ उद्योजक योग्यता / सामर्थ्य ( Entrepreneurial Ability )
हेन्री फोर्ड हे प्रसिद्ध उद्योगपती म्हणाले होते,  “ कोणत्याही शाळेत उद्योजक घडवता येत नाहीत. एम.बी.ए. चे शिक्षण देणाऱ्या संस्था उद्योजक पुस्तकी ज्ञानाने निर्माण करू शकत नाहीत. तसे असले असते तर आजपर्यंत शेकडो  उद्योजक निर्माण झाले असते.”
हेन्री फोर्ड असेही म्हणाले होते , “ माझा मार्केट रिसर्चवर फारसा विश्वास नाही. मी लोकांना कशा प्रकारचे वाहन हवे म्हणून विचारले असते तर लोकांनी खूप वेगाने धावणारा घोडा हवा असे उत्तर दिले असते. पण मी जेंव्हा वेगवान धावणारी कार दाखविली तेंव्हा त्यांनी तिचे स्वागत केले.”
स्टीव्ह जॉब्सने हेच लक्षात घेतले. त्यांनी नवीन नवीन उत्पादने बाजारात आणली. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ते यशस्वी उद्योजक झाले. ते तंत्रज्ञ होते पण व्यवस्थापकीय पदवीधर नव्हते. त्याच्याजवळ एम.बी.ए, ही पदवी नव्हती.
धीरूभाई अंबानी , बिल गेट्स , स्टीव्ह जॉब्स ,किर्लोस्कर , गरवारे अशी असंख्य उदाहरणे देता येतील. त्यांच्याजवळ एम.बी.ए.ची पदवी नव्हती. अगदी अलीकडीचे  उदाहरण द्यायचे तर Infosys चे नारायण मूर्ती आणि त्यांचे सहकारी. तसेच Wipro चे  अझीझ प्रेमजी. ह्यांच्याजवळ कोणतीही व्यवस्थापकीय पदवी नव्हती.
उद्योजक आणि व्यावसायिक ह्यांच्याजवळ नव्या कल्पना / संकल्पना ( Ideas ) असतात. त्यांच्याजवळ कल्पनांची प्रयोगशाळा ( Idea Laboratory ) असते. बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स ह्यांनी नव्या कल्पनांचा ध्यास घेतला. त्यासाठी ज्ञान आणि नवे तंत्रज्ञान ( Knowledge and Innovation) ह्यांची सांगड घालावी लागते. “ एक लाखात कार “ ही रतन टाटांची कल्पना नव्हे तर स्वप्न होते. त्यामुळे Nano बाजारात आली आणि संपूर्ण ऑटोइंडस्ट्रीच बदलून गेली.
ज्ञान , अनुभव आणि कार्यक्षमता ह्या तीन गोष्टीमुळे उद्योजक घडतो. तो शाळेत शिकून तयार होत नाही. Thomas एडिसनने दिव्याचा शोध लावला पण त्यानंतर एक फार मोठा वीजउद्योग निर्माण केला. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स हे दोघेही नवी नवी उत्पादने बाजारात आणल्यामुळे मोठे झाले. आजही स्वतःच्याच कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर बिल गेट्स तांत्रीक सल्लागार म्हणून कामाला लागले आहेत . Infosys ला त्यामुळेच नारायण मूर्तींची पुन्हा आवश्यकता वाटली.
सतत बदलणारे जग आणि आजूबाजूची परिस्थिती , नित्य नवे तंत्रज्ञान ह्यामुळे परिस्थितीचे अचूक निदान करणे व योग्य तो निर्णय घेणे ह्यासाठी जे आवश्यक असलेले नेतृत्व लागते ते ह्या व्यवस्थापकीय शिक्षणातून मिळत नाही हा एक मोठा  आक्षेप आहे. त्यासाठी नुसते पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
ह्याचा अर्थ एम.बी.ए पदवीधर नको आहेत किंवा त्यांचा फारसा उपयोग आहे ,असे म्हणणे नाही. त्यांची उद्योग /व्यवसायात आवश्यकता असते. एखादा यशस्वी ठरलेला उद्योग पुढे कसा वाढविता येईल त्यासाठी व्यवस्थापक हवे असतात. व्यवस्थापकीय शिक्षणामुळे प्राप्त झालेले ज्ञान व्यवस्थापक (Manager) होण्यासाठी पुरेसे असते. त्यामुळेच ह्या शिक्षणाचे तसे महत्त्व आहे.” मीच माझा Boss “ असे ज्याला वाटते तोच उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करतो. नाहीतर तो साधा पगारी व्यवस्थापक होतो. चांगला व्यवस्थापक होतोच असे नाही. कारण त्याने घेतलेल्या शिक्षणाला मर्यादा असतात.
यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक व्हायचे असेल तर खालील गुणांची आवश्यकता आहे.
·         दूर दृष्टी ( Vision ) * ज्ञान * अनुभव * स्वामित्व ( Ownership ) * ऊर्जा * टिकाऊ शक्ती ( Staying Power ) * विश्लेषण कौशल्य * जोखीम घेण्याची क्षमता * साधनांचा खुबीने वापर * कल्पकता * नवी उत्पादने  * आरंभ करण्यासाठी पुढाकार/ स्वयंकर्तृत्व ( Initiative ) * स्वतःचा / सहकार्यांचा /कर्मचाऱ्यांचा विकास * बदल ( Change ) नियंत्रण * भावना ताब्यात ठेवणे * प्रामाणिकता/सचोटी  
·         ह्या वर नमूद केलेल्या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच. त्या बरोबर उत्पादन (Product) – तंत्रज्ञ (Technology) – उत्पादन प्रक्रिया (Process) आणि विक्रीनंतरची सेवा (Service after sales) ह्या चार सूत्रांचा विचार आवश्यक आहे. व्यवस्थापकीय पदवीधर शेवटच्या दोन गोष्टीत विशेच ज्ञानी असतात तर पहिल्या दोन गोष्टीत त्यांना कमी ज्ञान असते व ते कमी पडतात.
·         Idea Laboratory ( कल्पनांची प्रयोगशाळा ) फार महत्वाची असते. शास्त्रज्ञ/ तंत्रज्ञ ह्यात तरबेज  असतात पण इतरांना हे जमतेच असे नाही. व्यवस्थापनातही Idea Laboratory ची फार महत्वाची भूमिका असते.
·         कोणताही उद्योग मोठा होतो जेंव्हा त्याचे एकच ध्येय असते.” Grow.. Grow and.. Grow”. त्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य ह्या दोन्हींची आवश्यकता असते. एकच कौशल्य असून चालत नाही. 
हार्वर्ड मध्ये व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सीइओच होणार असे वाटत असते. प्रत्येकजण होतोच असे नाही. उद्योगामध्ये किंवा स्वतंत्र व्यवसायामध्ये अनेक छोटी छोटी कामे करावी लागतात ह्याचे भान ह्या एम.बी.ए पद्विधराना नसते. त्यामुळेच ते यशस्वी होऊ शकत नाहीत. ही ह्या शिक्षणातील प्रमुख त्रुटी.  ही मुले फक्त स्वतःचाच विचार करतात. दर दोन-तीन वर्षांनी जॉब बदलतात. माझी कंपनी , माझा product , माझा कारखाना , माझी माणसे हा विचार त्यांच्यात नसतो. जेथे आपण नोकरी करतो त्या कंपनीशी त्यांची बांधिलकी नसते. ह्या त्यांच्या मनोवृतीमुळे ते टिकत नाहीत . त्यामुळे ठोस अशी कर्तबगारी दिसून येत नाही. मुख्यता: ३० वर्षाखालील पदवीधर सारख्या नोकऱ्या बदलत असल्यामुळे त्यांचे कौशल्य कमी होते व सर्वांगीण अनुभव कमी होतो. सत्या नडेला ह्यांनी २२ वर्षे त्याच कंपनीत निरनिराळ्या विभागात काम केलेले असल्यामुळेच ते सीइओ होऊ शकले. .हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सतत नवीन काहीतरी करून दाखवायचे , शिकत राहायचे , अनुभवातून संस्थेला मोठे करावयाचे . हे महत्वाचे असते. व्यवस्थापकीय शिक्षण घेतलेली बहुसंख्य मुले मार्केटिंग किंवा सेल्स मध्येच असतात. काहीं प्रमाणात ते यशस्वी होताना दिसतात.  काहीजण स्वतःलाच विकत असतात तेंव्हा ते चांगले सेल्समन होतात. एम, बी. ए. मुलामध्ये हा गुण प्रामुख्याने दिसून येतो. शिक्षणामुळे त्यांच्यात थोडासा Smartness आलेला असतो. एवढेच. मार्केटिंग हे काहीं परिपूर्ण विज्ञान किंवा शास्त्र नाही. हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांचे नेहमीचे ठोकताळे चुकतात. त्यासाठी अनुभवातून आलेले शहाणपण खूप उपयोगी पडते हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी आय.आय.टी/ आय.आय.एम च्या पदव्या हव्यात कशाला ? Consumer Product विकण्यासाठी ही मंडळी थोडीशी उपयुक्त असतात ह्यात वाद नाही. त्यासाठी नेतृत्व , ग्राहकांशी संबंध आणि त्यांच्यात निर्माण झालेला उत्पादनाचा आणि कंपनीचा विश्वास हे फार महत्वाचे असते. त्यासाठी Field Experience महत्वाचा असतो. पुस्तकी ज्ञान अपुरे पडते. सतत शिकत राहणे हाच एक उपाय. त्यामुळे अनुभवातून शिकणे महत्वाचे असते.
बी-स्कूलमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना व्यवसायातील धाडसीपणा ( Courage ) शिकवला जात नाही. तो उपजत असावा लागतो. .त्यामुळे जोखीम (Risk) घेणे त्यांना जमत नाही असे दिसते. जोखीम घेऊन निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तो यशस्वी होऊ शकतो. पुस्तकी ज्ञान अपुरे पडते. त्यामुळेच नेता तयार होत नाही. तेच ते कामं करणारा व्यवस्थापक मात्र मिळतो. तो चाकोरी बाहेर काहीही करू शकत नाही,
व्यवस्थापक हा पगारी असल्यामुळे तो उद्योजकासारखा विचार करू शकत नाही. तो स्वतःचाच जास्त विचार करतो. अधिक प्याकेजचा विचार करतो. त्याची निष्ठा कंपनीशी नसते. त्याची बांधिलकी तात्पुरती असते. उद्योजकासारखे मोठे स्वप्न ( Big Dream ) पाहणे त्याला माहीत नसते. त्यासाठी धीरूभाई किंवा स्टीव्ह जॉब्स होणे आवश्यक आहे. धीरूभाईसारखा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून देणारा एक साधा माणूस जगातल्या सर्वात मोठ्या पेट्रोलियम  कंपनीचा मालक कसा होतो हे समजून घेतले पाहिजे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तो स्वप्न पाहणारा व त्यासाठी धडपडणारा माणूस आहे. कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना अनेक बुद्धीमान ( Ph.D आणि M.B.A.) माणसे त्यांचे  पगारी सल्लागार होते. त्यासाठी स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास असावा लागतो. आपल्या हाताखाली काम  करणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींना प्रेरित करावे लागते. त्यासाठी नेतृत्व गुण असणे आवश्यक आहे.हे सारे वर्गात कसे शिकवणार ?सुरुवात छोटीशी करावयाची असते पण स्वप्न मोठे पहावयाचे असते. प्रयत्नशील रहावयाचे ज्याला जमते तोच यशस्वी होऊ शकतो. नाहीतर व्यवस्थापकीय पदवी फक्त साधा व्यवस्थापक होण्यासाठी उपयोगी पडते.
Wall Mart चा संस्थापक Sam Walton म्हणाले होते , “ I am more of Manager by walking and flying around. In a team , I have played to my strength and relied on others to make-up for my weakness. “ .
धीरूभाई अंबानी ही असेच होते.
Ernest Shackelton हा एक प्रसिद्ध संशोधक. Antartic Expedition साठी त्याला काही लोक / मदतनीस हवे होते. त्यासाठी त्याने एक जाहिरात दिली होती. ती अशी ...
“Men wanted for hazardous journey. Small wages, bitter cold, long months of complete darkness, constant danger, safe return doubtful, honour and recognition in case of success.”
आता तुम्हीच सांगा B-School चा कोणता पदवीधर ह्यात सहभागी होईल. त्यामुळेच तो उद्योजक होतांना दिसत नाही. हीच ह्या बी-स्कूलच्या शिक्षणाची त्रुटी आहे.

डॉ. नरेंद्र गंगाखेडकर
( email: drnsg@rediffmail.com / narendra.gangakhedkar@gmail.com )

Monday, December 8, 2014

अनेक वर्षांनी पुन्हा पाहिला ' वाडा चिरेबंदी '


विजय तेंडूलकर , गिरीश कर्नाड आणि बादल सरकार ह्यांनी भारतीय रंगभूमी गाजवली. त्याच ताकदीचा राष्ट्रीय पातळीवरचा दुसरा मराठी नाटककार म्हणजे महेश एलकुंचवार. खरा नागपूरकर म्हणजे वऱ्हाडी माणूस. काही वर्षापूर्वी त्यांचे ' वाडा चिरेबंदी' हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर एनसीपीए सभागृहात पाहिले होते. त्यात आईची भूमिका विजया मेहता ह्यांनी केली होती आणि नाटकाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. तो एक आगळा वेगळा सुंदर प्रयोग होता. महेश एलकुंचवार ह्यांच्या नाट्यलेखनावर विजयाबाई खूष होत्या. त्यामुळेच त्यांनी हे नाटक हातात घेतले होते.

आज तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करीत आहेत प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. एका नव्या ढंगात आणि एका नव्या संचात . त्यांनी २० वर्षापूर्वी ' अविष्कार ' साठी हे नाटक रंगमंचावर आणले होते. तेही मी पाहीले होते. विजया मेहतांचा प्रयोग अजूनही स्मरणात आहे. तपशील आठवत नव्हते.

विजयाबाईनी त्यांच्या ' झिम्मा ' ह्या आत्मचरित्रात ह्या नाटकावर एक प्रकरण खूप विस्ताराने लिहिले आहे. ते पुन्हा वाचले आणि जुन्या प्रयोगाची आठवण जागी झाली.

एलकुंचवार ह्यांच्या लिखाणात  आत्मशोध असतो. 'माणूस' शोध असतो. आंतरिक व्यथेची लय असते. वास्तव असते. त्यांची पात्रे आजूबाजूची जीवंत माणसे असतात. जणू काही आपल्या जीवनाचे प्रतिबिंबच.  वैदर्भी असल्यामुळे वऱ्हाडी रंग असतो. जयवंत दळवी आणि श्री. ना. पेंडसे जसे कोकणी माणसे आपल्यापुढे उभी करतात तसेच एलकुंचवार वऱ्हाडी माणसे आपल्यासमोर उभी करतात. आमच्या मराठवाड्यात अशीच माणसे आहेत. त्यांच्यात  खूप साम्य आहे. वऱ्हाडी आणि मराठवाडी बोली मराठी भाषेलाही वेगळा गोडवा आहे. पुणेकर कोब्रांची ती मराठी भाषा नाही. अनुभव विश्व पुण्या- मुंबईपेक्षा खूप वेगळे आहे.

एलकुंचवारांच्या ह्या नाटकात जी पात्रे आहेत, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध गुंतागुंतीचे आहेत. त्यांच्यात संघर्ष आहे. प्रत्येक संवादाला जीवंत स्पर्श आहे. रूप - गंध आहे. नाद आणि लय आहे. एक धगधगते सत्य आहे. ही आजूबाजूची आपली माणसे आहेत. आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे.
एलकुंचवार ह्यांचे हे नाटक म्हणजे उत्कट वास्तव . त्यातील पात्रे ही खरी माणसे. आजूबाजूला दिसणारी. विजय तेंडुलकरासारखी त्यांची नाटकावर पकड आहे, त्यांची नाटके अभिजात आहेत. दळवी - पेंडसे जसा कोकण उभा करतात तसाच एलकुंचवार वऱ्हाड उभा करतात. त्यांच्या लिखाणातील आत्मशोध हा आपलाच असतो म्हणून तो आपल्याला भावतो.

विदर्भातील एका ब्राम्हणी देशपांडे कुटुंबाची ही गोष्ट. एकेकाळी समृद्ध जीवन जगणारे हे चिरेबंदी वाड्यातील एकत्र कुटुंब. त्यांचे भरभराटीचे जीवन अनुभवलेला हा जुना वाडा. मोडकळीला आलेला . कुटुंबही विस्कटलेले. कुटुंब प्रमुख म्हणजे कर्ता माणूस देवाघरी जातो. त्याची आई , पत्नी , तीन मुले , सुना , नातवंडे आणि विवाह नं झालेली वयस्कर मुलगी. एक मुलगा मुंबईला बायको- मुलाबरोबर रमला आहे असे बाकीच्यांना वाटते तर शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे मोठा मुलगा आणि त्याची पत्नी वैतागलेली असते. हुशार असूनही शिक्षण सोडावी लागणारी पण लग्न नं झालेली मुलगी एकंदर जीवनाला कंटाळलेली असते. चित्रपटाच्या प्रभावामुळे आपल्या वेगळ्या विश्वात रमलेली नात आणि दारूचे व्यसन लागलेला नातू ही पात्रेही कर्ता माणूस गेल्यानंतर क्रियाकर्म करण्यासाठी  एकत्र आलेली असतात. त्या १५ दिवसात घडलेले हे नाट्य.त्या १५ दिवसातील ह्या कुटुंबातील ताण- तणाव म्हणजे हे नाटक.

ह्या नाटकात दिसणारी वऱ्हाडी माणसे आमच्या मराठवाड्यातही दिसून येतात. ह्या नाटकातील देशपांडे कुटुंब मी परभणीत अगदी जवळून पहिले आहे. विलक्षण साम्य मला आढळून आले आहे . अशी माणसे आणि असे कुटुंब माझ्या खूप ओळखीचे आहे. त्यांना मी खूप जवळून पाहिले आहेत. त्यामुळे हे नाटक वास्तववादी तर आहेच पण ह्यातील संवाद अस्सल आहेत. ते माझ्या कानावर अनेकदा पडले आहेत. मराठवाडी आणि वऱ्हाडी बोली भाषेतला रानवटपणा वेगळाच असतो. तो ह्या नाटकात वाक्यावाक्यात दिसून येतो .
चंद्रकांत कुलकर्णी मराठवाड्याचे आहेत. त्यांना हा परिसर आणि ही माणसे परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात वेगळेपण दिसून येते, जे विजया मेहता ह्यांच्या दिग्दर्शनात दिसून आले नव्हते. कारण विजया मेहतांना वऱ्हाडी माणसे माहित नव्हती आणि बोली भाषा तितकीशी ओळखीची  नव्हती. ते वास्तव त्यांनी जवळून पाहिले किंवा अनुभवले नव्हते. म्हणूनच ह्या नाटकातील आईची भूमिका त्यांना तेवढी जमली नव्हती. त्यांनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात हे प्रांजळपणे कबूल केले आहे .

विजयाबाईनी त्यावेळी सादर केलेल्या नाट्यप्रयोगातील नेपथ्यही  तेवढेसे जमले नव्हते. ' प्रयोग उत्तम पण नेपथ्य मात्र चुकीचे ' असा शेरा प्रसिद्ध नेपथ्यकार गोडसे ह्यांनी दिला होता हे त्यांनीच नमूद केले आहे. चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना ते अधिक चांगले जमले आहे , हे निश्चित. वऱ्हाडी लहेजा विजयाबाईना जमला नव्हता , हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले हा त्यांचा मोठेपणा. खरं म्हणजे, मला तेंव्हाही त्यांनी सादर केलेला प्रयोग आवडला होता. तो त्यावेळी एक वेगळा नाट्यप्रयोग होता.

हे नाटक त्यावेळी फारसे चाललं नाही. कारण मुंबई - पुण्यात लोकांना हे फारसं भावलं नाही. नटमंडळीनाही  ते पेललं नसावं.
चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना ते अगदी सहज जमलं आणि त्यांनी सर्वांच्याकडून चांगली कामे करून घेतली ह्यात वाद नाही. त्याचे कारण नाटककार आणि दिग्दर्शक ह्यांचे जुळलेले नाते.दोघांची  वेवलेन्थ जुळली असे म्हणणे अधिक बरोबर. जे विजयाबाईना सहज जमले नाही ते चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना अगदी सहज जमले कारण त्यांनी हे वास्तव जवळून पाहिले आहे.
सर्व नट - नट्यांनी कामे सुरेख केली आहेत. एक देखणा प्रयोग. सुरुवातीला पहिले ८-१० मिनिटे नाटकावर पकड बसली नव्हती. नंतर व्यवस्थित जमले.
योगायोगाने माझी आणि नाटककार एलकुंचवार ह्यांची थोडीशी ओळख झाली होती.आम्ही चीन - जपानच्या सहलीवर होतो. आमच्या ग्रुप मध्ये एलकुंचवार होते. मी त्यांना ओळखले . स्वतःच ओळख करून घेतली. आणि नाटकावर गप्पा सुरु झाल्या . १५ दिवसात अनेकदा गप्पा झाल्या. मोठा मिस्किल माणूस . एकदा ओळख झाली की खूप बोलणारा . नकला करणारा . सहजपणे हसवणारा . तसा आपल्याच कोशात रमलेला . एरव्ही इतरात फारसा नं मिसळणारा . त्यांचा थोडासा सहवास लाभला . असा हा मोठा नाटककार योगायोगाने भेटला . त्या १५ दिवसात बराचसा जवळून पाहीला.
विजय तेंडुलकराना मी चांगलेच ओळखत होतो. त्यांचे ' रामप्रहर ' मी प्रकाशीत केले होते. एलकुंचवारही थोडे ओळखीचे झाले . मी त्यांना नाटककार म्हणून ओळखत होतोच. त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे म्हणून चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांचे अभिनंदन . महेश एलकुंचवार ह्यांना मनापासून शुभेच्छा. असेच लिहित रहा. आम्ही बघत राहू.
त्यांचे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे. काहीसे गंभीर  वळणाचे असलं तरी ' माणूस' शोध घेणारे हे नाटक छान आहे. अवश्य बघा . आवडेल .
प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार योगायोगाने चीन- जपानच्या सहलीस गेलो होतो तेंव्हा भेटले होते. खूप गप्पा झाल्या. थोडीशी ओळख झाली . तेंव्हा त्यांच्याबरोबर काढलेला हा फोटो.