विजय तेंडूलकर , गिरीश कर्नाड आणि बादल सरकार ह्यांनी भारतीय रंगभूमी गाजवली. त्याच ताकदीचा राष्ट्रीय पातळीवरचा दुसरा मराठी नाटककार म्हणजे महेश एलकुंचवार. खरा नागपूरकर म्हणजे वऱ्हाडी माणूस. काही वर्षापूर्वी त्यांचे ' वाडा चिरेबंदी' हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर एनसीपीए सभागृहात पाहिले होते. त्यात आईची भूमिका विजया मेहता ह्यांनी केली होती आणि नाटकाचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. तो एक आगळा वेगळा सुंदर प्रयोग होता. महेश एलकुंचवार ह्यांच्या नाट्यलेखनावर विजयाबाई खूष होत्या. त्यामुळेच त्यांनी हे नाटक हातात घेतले होते.
आज तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करीत आहेत प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. एका नव्या ढंगात आणि एका नव्या संचात . त्यांनी २० वर्षापूर्वी ' अविष्कार ' साठी हे नाटक रंगमंचावर आणले होते. तेही मी पाहीले होते. विजया मेहतांचा प्रयोग अजूनही स्मरणात आहे. तपशील आठवत नव्हते.
विजयाबाईनी त्यांच्या ' झिम्मा ' ह्या आत्मचरित्रात ह्या नाटकावर एक प्रकरण खूप विस्ताराने लिहिले आहे. ते पुन्हा वाचले आणि जुन्या प्रयोगाची आठवण जागी झाली.
एलकुंचवार ह्यांच्या लिखाणात आत्मशोध असतो. 'माणूस' शोध असतो. आंतरिक व्यथेची लय असते. वास्तव असते. त्यांची पात्रे आजूबाजूची जीवंत माणसे असतात. जणू काही आपल्या जीवनाचे प्रतिबिंबच. वैदर्भी असल्यामुळे वऱ्हाडी रंग असतो. जयवंत दळवी आणि श्री. ना. पेंडसे जसे कोकणी माणसे आपल्यापुढे उभी करतात तसेच एलकुंचवार वऱ्हाडी माणसे आपल्यासमोर उभी करतात. आमच्या मराठवाड्यात अशीच माणसे आहेत. त्यांच्यात खूप साम्य आहे. वऱ्हाडी आणि मराठवाडी बोली मराठी भाषेलाही वेगळा गोडवा आहे. पुणेकर कोब्रांची ती मराठी भाषा नाही. अनुभव विश्व पुण्या- मुंबईपेक्षा खूप वेगळे आहे.
एलकुंचवारांच्या ह्या नाटकात जी पात्रे आहेत, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध गुंतागुंतीचे आहेत. त्यांच्यात संघर्ष आहे. प्रत्येक संवादाला जीवंत स्पर्श आहे. रूप - गंध आहे. नाद आणि लय आहे. एक धगधगते सत्य आहे. ही आजूबाजूची आपली माणसे आहेत. आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे.
एलकुंचवार ह्यांचे हे नाटक म्हणजे उत्कट वास्तव . त्यातील पात्रे ही खरी माणसे. आजूबाजूला दिसणारी. विजय तेंडुलकरासारखी त्यांची नाटकावर पकड आहे, त्यांची नाटके अभिजात आहेत. दळवी - पेंडसे जसा कोकण उभा करतात तसाच एलकुंचवार वऱ्हाड उभा करतात. त्यांच्या लिखाणातील आत्मशोध हा आपलाच असतो म्हणून तो आपल्याला भावतो.
विदर्भातील एका ब्राम्हणी देशपांडे कुटुंबाची ही गोष्ट. एकेकाळी समृद्ध जीवन जगणारे हे चिरेबंदी वाड्यातील एकत्र कुटुंब. त्यांचे भरभराटीचे जीवन अनुभवलेला हा जुना वाडा. मोडकळीला आलेला . कुटुंबही विस्कटलेले. कुटुंब प्रमुख म्हणजे कर्ता माणूस देवाघरी जातो. त्याची आई , पत्नी , तीन मुले , सुना , नातवंडे आणि विवाह नं झालेली वयस्कर मुलगी. एक मुलगा मुंबईला बायको- मुलाबरोबर रमला आहे असे बाकीच्यांना वाटते तर शेतीमध्ये फारसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे मोठा मुलगा आणि त्याची पत्नी वैतागलेली असते. हुशार असूनही शिक्षण सोडावी लागणारी पण लग्न नं झालेली मुलगी एकंदर जीवनाला कंटाळलेली असते. चित्रपटाच्या प्रभावामुळे आपल्या वेगळ्या विश्वात रमलेली नात आणि दारूचे व्यसन लागलेला नातू ही पात्रेही कर्ता माणूस गेल्यानंतर क्रियाकर्म करण्यासाठी एकत्र आलेली असतात. त्या १५ दिवसात घडलेले हे नाट्य.त्या १५ दिवसातील ह्या कुटुंबातील ताण- तणाव म्हणजे हे नाटक.
ह्या नाटकात दिसणारी वऱ्हाडी माणसे आमच्या मराठवाड्यातही दिसून येतात. ह्या नाटकातील देशपांडे कुटुंब मी परभणीत अगदी जवळून पहिले आहे. विलक्षण साम्य मला आढळून आले आहे . अशी माणसे आणि असे कुटुंब माझ्या खूप ओळखीचे आहे. त्यांना मी खूप जवळून पाहिले आहेत. त्यामुळे हे नाटक वास्तववादी तर आहेच पण ह्यातील संवाद अस्सल आहेत. ते माझ्या कानावर अनेकदा पडले आहेत. मराठवाडी आणि वऱ्हाडी बोली भाषेतला रानवटपणा वेगळाच असतो. तो ह्या नाटकात वाक्यावाक्यात दिसून येतो .
चंद्रकांत कुलकर्णी मराठवाड्याचे आहेत. त्यांना हा परिसर आणि ही माणसे परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात वेगळेपण दिसून येते, जे विजया मेहता ह्यांच्या दिग्दर्शनात दिसून आले नव्हते. कारण विजया मेहतांना वऱ्हाडी माणसे माहित नव्हती आणि बोली भाषा तितकीशी ओळखीची नव्हती. ते वास्तव त्यांनी जवळून पाहिले किंवा अनुभवले नव्हते. म्हणूनच ह्या नाटकातील आईची भूमिका त्यांना तेवढी जमली नव्हती. त्यांनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात हे प्रांजळपणे कबूल केले आहे .
विजयाबाईनी त्यावेळी सादर केलेल्या नाट्यप्रयोगातील नेपथ्यही तेवढेसे जमले नव्हते. ' प्रयोग उत्तम पण नेपथ्य मात्र चुकीचे ' असा शेरा प्रसिद्ध नेपथ्यकार गोडसे ह्यांनी दिला होता हे त्यांनीच नमूद केले आहे. चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना ते अधिक चांगले जमले आहे , हे निश्चित. वऱ्हाडी लहेजा विजयाबाईना जमला नव्हता , हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले हा त्यांचा मोठेपणा. खरं म्हणजे, मला तेंव्हाही त्यांनी सादर केलेला प्रयोग आवडला होता. तो त्यावेळी एक वेगळा नाट्यप्रयोग होता.
हे नाटक त्यावेळी फारसे चाललं नाही. कारण मुंबई - पुण्यात लोकांना हे फारसं भावलं नाही. नटमंडळीनाही ते पेललं नसावं.
चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना ते अगदी सहज जमलं आणि त्यांनी सर्वांच्याकडून चांगली कामे करून घेतली ह्यात वाद नाही. त्याचे कारण नाटककार आणि दिग्दर्शक ह्यांचे जुळलेले नाते.दोघांची वेवलेन्थ जुळली असे म्हणणे अधिक बरोबर. जे विजयाबाईना सहज जमले नाही ते चंद्रकांत कुलकर्णी ह्यांना अगदी सहज जमले कारण त्यांनी हे वास्तव जवळून पाहिले आहे.
सर्व नट - नट्यांनी कामे सुरेख केली आहेत. एक देखणा प्रयोग. सुरुवातीला पहिले ८-१० मिनिटे नाटकावर पकड बसली नव्हती. नंतर व्यवस्थित जमले.
योगायोगाने माझी आणि नाटककार एलकुंचवार ह्यांची थोडीशी ओळख झाली होती.आम्ही चीन - जपानच्या सहलीवर होतो. आमच्या ग्रुप मध्ये एलकुंचवार होते. मी त्यांना ओळखले . स्वतःच ओळख करून घेतली. आणि नाटकावर गप्पा सुरु झाल्या . १५ दिवसात अनेकदा गप्पा झाल्या. मोठा मिस्किल माणूस . एकदा ओळख झाली की खूप बोलणारा . नकला करणारा . सहजपणे हसवणारा . तसा आपल्याच कोशात रमलेला . एरव्ही इतरात फारसा नं मिसळणारा . त्यांचा थोडासा सहवास लाभला . असा हा मोठा नाटककार योगायोगाने भेटला . त्या १५ दिवसात बराचसा जवळून पाहीला.
विजय तेंडुलकराना मी चांगलेच ओळखत होतो. त्यांचे ' रामप्रहर ' मी प्रकाशीत केले होते. एलकुंचवारही थोडे ओळखीचे झाले . मी त्यांना नाटककार म्हणून ओळखत होतोच. त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे म्हणून चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांचे अभिनंदन . महेश एलकुंचवार ह्यांना मनापासून शुभेच्छा. असेच लिहित रहा. आम्ही बघत राहू.
त्यांचे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे. काहीसे गंभीर वळणाचे असलं तरी ' माणूस' शोध घेणारे हे नाटक छान आहे. अवश्य बघा . आवडेल .
प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार योगायोगाने चीन- जपानच्या सहलीस गेलो होतो तेंव्हा भेटले होते. खूप गप्पा झाल्या. थोडीशी ओळख झाली . तेंव्हा त्यांच्याबरोबर काढलेला हा फोटो. |
No comments:
Post a Comment