Monday, November 24, 2014

भविष्यावर बोलू काही .....



लहानपणी वर्तमान पत्र वाचण्याची सवय लागली. आजही सकाळी चहा पिताना वर्तमान वाचण्याची सवय चालूच आहे. रोजचे भविष्य हा स्तंभ ठळक असतो. ' घरात तणावाचे वातावरण असेल ' , हे भविष्य मी मोठ्याने वाचून दाखवितो. म्हणजे दिवसभर बायकोबरोबर भांडण नको असा संदेश देत असतो. ' प्रवास टाळा ' असा भविष्यात इशारा दिलेला असतो ,त्यादिवशी ठाणे - डोंबिवली- नवी मुंबईत जाण्याचे टाळतो. उगाच कशाला अडकून पडा असा विचार डोक्यात येतो. ह्या वर्तमानपत्राच्या लोकांनी अगदी पंचाईत करून टाकली आहे. जे छापून येते ते सर्व खरेच असते असा माझा समज झाला आहे. कारण मोठे विद्वान संपादक हे वर्तमानपत्र संपादित करीत असतात. त्यांच्याकडे मोठे मोठे भविष्य सांगणारे असतात असा माझा समज आहे. लहानपणापासून माझ्यावर झालेला वर्तमानपत्रीय संस्कार आहे. मी नंतर विज्ञानाचा विद्यार्थी झालो तरी भविष्य वाचणे चालूच ठेवले. गंमत म्हणून वाचत असतोच. दिवाळी अंकात तर सर्व वर्षभराचे भविष्य असते. कथा - कवितेपेक्षा ते वाचण्यात अधिक गमंत वाटते. छान करमणूक होत असते. 
अलीकडे मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. डायनिंग हॉल मध्ये खूप करमणूक करणाऱ्या गोष्टी चालू होत्या. अनेक प्रकारचे खेळ होते. नाच गाण्याचे कार्यक्रम होते. आणि एक ज्योतीष्य्यी बसला होता. हे सर्व जेवणाच्या खर्चात होतं. मी भविष्य सांगणाऱ्या माणसाच्या समोर जाऊन बसलो आणि माझा हात पुढे केला आणि तो सांगू लागला. काय गमंत बघा . माझा भूतकाळ त्याने होता तसाच सांगितला. मला आश्चर्य वाटू लागले. मी अधिक लक्ष देऊन ऐकू लागलो . बघू यात . त्याचे वर्तवलेले भविष्य खरं ठरते कां ? 
ह्या वर्तमानपत्रातील , टीव्हीवरील आणि दिवाळी अंकातील भविष्यामुळे माझा भविष्यावर विश्वास बसू लागला आहे. त्यांनी मला सवय लावली आहे. मला ते खरं वाटू लागलय. 
त्या केंद्रीय शिक्षणमंत्री . काय चुकलं त्यांचे ? त्यानाही अशीच सवय लागली असेल. लहानपणापासून वाचत असतील भविष्य. पुढे काय होणार म्हणून उत्सुकता असणारच. राजकारणात पुढे काय होणार हे कुठे माहित असते. 
हे टीव्हीवाले , वर्तमानपत्रवाले स्वतःच अशी सवय लावतात आणि मग मोठे झाले आणि भविष्य बघायला गेलं की पुन्हा आरडाओरडा करतात. कमाल आहे ह्यांची. 
लोकही गमतीदार आहेत. दाखवला हात तर एवढे काय बोलायचे. ते कॉंग्रेसचे अनेक नेते तर ज्योतिष्य सांगणार्या माणसाला कायम पगारी नोकरी देत होते. उगाच भाजपच्या नेत्याला बदनाम करण्याचा डाव करतात. 

मला तर वाटते भविष्य समजून घ्यावं. म्हणजे पुढची पावले टाकताना सोपं जातं. 

No comments:

Post a Comment