दोन दिवसापूर्वी विलेपार्ले येथील रात्र शाळेत गेलो होतो. गरीब होतकरू विद्यार्थी /विद्यार्थिनी दिवसभर छोटी मोठी कामे करून रात्रीच्या शाळेत शिक्षणासाठी येतात. ९ वी / १० वी चे हे विद्यार्थी / विद्यार्थिनी. शिक्षणाची जिद्द असलेले. वर्ग संपला होता. एक ६५/७० वर्षाच्या बाई वर्गातून बाहेर पडल्या. आमच्याशी बोलू लागल्या. निवृत्त झाल्यानंतर शिक्षिकेचे काम चालू ठेऊन आपल्यापरीने विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या. उभे राहून शिकवता येत नाही म्हणून टेबलाभोवती ८/१० मुलामुलींना बसवून गणित - इंग्रजी शिकवणाऱ्या. मला ह्या बाईंचे खूप कौतुक वाटले. कोचिंग क्लासमध्ये पैसे भरणे जमत नाही त्या मुलांना असे खूप मोलाचे शिक्षण देणाऱ्या ह्या बाईना बघून खूप आनंद वाटला . अशी सामाजिक भान असणारी मंडळी किती पोटतिडकीने आणि मनापासून काम करतात .
मुंबईच्या व्ही जे टी आय मधील सिव्हिल इंजिनीअरिंगचे जेष्ठ प्राध्यापक प्रोफेसर जोशी ह्यांची काही वर्षापूर्वी ओळख झाली. विक्रमगढ , डेंगाची मेट , कल्याण , नवी मुंबई ह्या ठिकाणी शाळा चालवतात. आदिवासी पाड्यात असलेली डेंगाची मेट येथील शाळा बघण्यासारखी आहे. त्यांचेच एक सहकारी प्राध्यापक ह्यांनी ५ लाख रुपये देणगी देऊन शाळेची इमारत बांधून दिली. शाळेत येण्यासाठी मुलांना खूप अंतर चालून यावे लागते म्हणून सायकल ब्यांक योजना चालू केली. त्याचा खूप उपयोग झाला. असे प्राध्यापक ज्या पद्धतीने शाळा चालवतात आणि शिक्षणाचे काम करतात तेंव्हा खूप आशादायी व उत्साही वाटते.
विक्रमगढजवळच वालवंडे म्हणून एक गांव आहे. आदिवासी पाडे. गोळे गुरुजींनी एक शाळा सुरु केली. झोपडीवजा जागेत. पावसाळ्यात वर छपर नाही. आज शाळेला इमारत आहे. १० वीचा निकाल १००% लागला आहे. गेल्या १०/१२ वर्षापासून मी ह्या शाळेची प्रगती पाहतो आहे. दरवेळी मी ह्या शाळेत जातो तेंव्हा गोळे गुरुजींचा नवा उपक्रम पाहून येतो . अशी सेवाभाव असणारी शिक्षक मंडळी पाहीली म्हणजे जगण्याचे नवे अर्थ जाणवू लागतात . ही माणसे खूप मोठी कामे करीत असतात .
No comments:
Post a Comment