Follow by Email

Saturday, June 21, 2014

सुखाशी भांडतो आम्ही ....


“ एक धागा सुखाचा , शंभर धागे दु:खाचे”, हे गाणे आपण अनेक वेळा ऐकले आहे. जीवनाचे सार अगदी थोड्या शब्दात सांगितले आहे. सुखाच्या शोधात आपण जीवन प्रवास करीत असतो. हे जग दु:खाचे माहेरघर आहे असेच आपल्याला वाटत असते. आपल्या हे लक्षात येत नाही की आपली एक इच्छा पुरी झाली तर दहा अतृप्त असतात. इच्छा अनंत असते. पण परिपूर्ण इच्छापूर्ती मर्यादित असते. भिकाऱ्याला भीक घालावी तसा प्रकार असतो. आजची भिक्षा त्याला जिवंत ठेवते पण त्याबरोबरच उद्या अधिक दु:ख भोगायला जिवंत ठेवते. आपलेही तसेच आहे.
   जोपर्यंत आपण इच्छेचे गुलाम आहोत ,तोपर्यंत शास्वत सुख-शांती कोठली ? आणि इच्छापूर्तीने तृप्ती थोडीच मिळत असते. नव्या इछेचा जन्म झालेला असतो.

    माणसाला ध्येय असावे , “ ध्येयविना जीवन म्हणजे पंखविना पाखरूं”, असे म्हणतात. पण ध्येयाला ध्येयप्राप्तीइतके हानिकारक दुसरे काहीही नसतं, हे आपल्या लक्षात येत नाही. आपणास जितके अधिक यश मिळत जाते तितके आपले जीवन रसहीन व कंटाळवाणे होत जाते.एखादी भारी चिंता आपल्या छातीवरून दूर झाली तर दुसरी एखादी चिंता तेथे येऊन बसते. जागा रिकामी होताच ही चिंता तेथे घुसतेच.
   असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दु:खाचे माप प्रकृतीने एकदा निश्चित करून टाकलेले असते. तो पेला कधी रिकामा होणार नाही किंवा भरलेला आहे त्याहून अधिक भरला जाणार नाही . हे आपल्या लक्षात येतच नाही. दारिद्र्य ही बहुजन समाजाची जशी कायमची व्यथा आणि डोकेदुखी बनून राहते तशी जीवनाविषयीची नीरसता व कंटाळवाणेपणा उच्चभ्रू व विलासी जगाची व्यथा आणि डोकेदुखी होऊन बसते. मध्यमवर्गाच्या जीवनात ही नीरसता आठवडी सुट्टीच्या दिवशी व्यक्त होते व ते विरंगुळा शोधण्यासाठी घराबाहेर पडतात.
    हे जीवन दुरीतमय आहे , कारण दु:ख हेच जीवांचे मुलभूत यथार्थ स्वरूप आहे.म्हणूनच ज्ञानेश्वरांनी “ दुरितांचे तिमिर जावो” अशी प्रार्थना केली. दु:खातूनच प्रेरणा मिळते . Pain is basic stimulus and reality.  सुख म्हणजे दु:खाचे केवळ थांबणे असते. सुख अभावरुप असते. दु:खाचा अभाव म्हणजे सुख. आपण सुखाच्या शोधात नसतो तर चिंता आणि दु:ख यातून मुक्ती कशी मिळेल ते शोधत असतो. म्हणूनच आपण सुखासाठी भांडत असतो. बहिणाबाईनी अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे......
  
  अरे संसार संसार दोन जीवांचा विचार 
  देतो सुखाला नकार आणि दु:खाला होकार 

    गरज व दु:ख जावून माणसाला विसावा मिळतो न मिळतो तेव्हड्यात त्याच क्षणी निरुत्साह व कंटाळवाणेपणा येतो. आणि हा कंटाळाच त्रासदायक होऊन बसतो. मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो. आपण निराशवादी होतो. Frustation kills us. त्यासाठी आपण करमणूक पाहतो. टीव्ही , सिनेमा बघत बसतो. कसलातरी विरंगुळा शोधतो. त्यात मन रमले नाहीतर आपणास जीवन नीरस वाटू लागते. एकंदर जीवन दु:ख आणि कंटाळा ह्यांच्यामध्ये लंबकाप्रमाणे  मागे-पुढे हेलकावत असते.

  मनुष्याला जितके अधिक स्पष्ट व स्वच्छ ज्ञान  , तो तितका अधिक बुद्धिमान तितके त्याला दु:ख अधिक जाणवते. जो आपले ज्ञान वाढवितो, तो आपले दु:खही वाढवतो. आपल्या दु:खाचा बराचसा भाग काल्पनिक असतो. वैचारिक असतो. भूतकाळ आठवून आणि भविष्यकाळाचे पुर्वचिंतन करून आपण दु:खी होत असतो. प्रत्यक्ष मरणापेक्षा मरणाच्या कल्पनेने , विचाराने आपण दु:खी होत असतो. जीवन म्हणजे झगडा . एक लढाई आहे. झगडा , लढाई , स्पर्धा , जय , पराजय ह्यांनी आपले जीवन व्याप्त झालेले असते आणि तेच दु:खाचे कारण असते . "आशावाद म्हणजे माणसाच्या दु:खावर डागणी आहे , दु:खाची ही क्रूर चेष्टा आहे" असे शोपेन हॉवर ह्या तत्ववेत्त्याचे म्हणणे होते. हे काहीसे निराशवादी वाटते.

     कोणत्याही साहित्यात म्हणजे कथा –कादंबरी – नाटकात सुखासाठी धडपड करणाऱ्याचे चित्रण असते. अनेक अडचणी आणि आपत्तींना तोंड देऊन ध्येय गाठणाऱ्या नायकाचे चित्रण असते. आणि त्याला जेव्हा पाहिजे ते मिळाले त्याठिकाणी नाटक–कथा संपते. दुसरे काही करावयाचे नसते . आणि तो सुखांत आपल्याला भावतो.
    गमंत आहे. आपण लग्न करून दु:खी असतो तर काही जण लग्न नं केल्यामुळे दु:खी असतात. आपण एकटे असलो तरी रडतो व चारचौघात असलो तरी रडतो. आपले एकंदर जीवन पाहू तर ती तशी शोकांतिकाच असते. पण जीवनातील बारीक सारीक गोष्टी पाहू तर ती सुखात्मिका असते हे आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी आपण आनंदाचे झाड शोधायचे असते.  तरुणांना वाटते की प्रयत्न करणे , इच्छा करणे , बाळगणे , धडपडणे यात आनंद असतो. इच्छा कधी तृप्त होत नसतात. आपण “आणखी आणखी “च्या मागे लागत असतो. त्याला सीमा नसते. तृप्ती ही निरर्थक असते , हे आपल्या लक्षात येतच नाही. उत्साह , उन्माद आणि जोर आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. जीवन किती थोडे आहे ह्यासाठी आपण अधिक जगले पाहिजे असे वाटत राहते आणि आपण भावी संकटाच्या भीतीमुळे वाढत्या वयाबरोबर मालमत्ता जमवू लागतो. आपल्याला हाव सुटते. स्वार्थ वाढतो. आणि पुन्हा निराशा आपल्या  पदरी पडते. हे म्हातारपण कठीण असते. मनुष्य हा इच्छा व ज्ञान ह्याचे मिश्रण आहे. आणि इच्छा हेच दु:खाचे मूळ आहे. त्यासाठीच सिद्धार्थ हिमालयात गेला व ज्ञान प्राप्त करून इच्छामुक्त झाला. हे सगळ्यांनाच जमत नसते. ज्ञानाने इच्छाचे नियमन करणे त्याला जमले. तो स्वतःवर नियंत्रण करणारा अंतर्यामी होता. सर्वांनाच ते जमत नसते. म्हणून आपण सामान्य माणसे  सुखाशी भांडत असतो. आपण वासनामय जास्त व फार थोडे ज्ञानमय असतो. 

   आनंदाचा स्त्रोत आपल्या अंतरंगात आहे हे आपल्या लक्षातच येत नाही म्हणून आपण दु:खी असतो. आणि सुखासाठी भांडत असतो. त्यामुळे “एक धागा सुखाचा आणि शंभर धागे दु:खाचे” असे आपल्याला वाटत राहते व आपले सुखाशी भांडण चालूच राहते.

संदर्भ : पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी : सानेगुरुजी

(संपर्क : drnsg@rediffmail.com)  


  


Sunday, June 8, 2014

मुले होतात पालक , आपण होतो बालक

आपली मुले आपले पालक होतात तेंव्हा.........
मी एका आंतरराष्ट्रीय परिषदेला गेलो होतो. संध्याकाळची पार्टी होती. अशाच गप्पा चालल्या होत्या. हास्य-विनोद चालू होते. मी ज्या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधित्व करीत होतो , त्या कंपनीचे अध्यक्ष माझ्याशी गप्पा मारीत होते. मी वयाने मोठा होतो तरी लहानखोर भारतीय असल्यामुळे तरुण दिसत होतो. त्यांचे वय अधिक असावे. तसे ते तरुण दिसत होते. त्यांनी माझे वय विचारले. आणि त्यांना आश्चर्य वाटले. मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठाच होतो. मग ते म्हणाले , ´I am growing old. In fact, I am not growing old . As my daughter  is growing young , I feel that I am growing old.’  किती खरे आहे हे म्हणणे. आपली मुले मोठी होऊ लागतात त्यामुळेच आपण म्हातारे होऊ लागतो. जेव्हा आपले शाळा सोबती , वर्गमित्र किंवा आपल्या बरोबरचे एकेक जण हे जग सोडून जातात तेव्हा आपले म्हातारपण आपल्याला अधिक जाणवू लागते.
आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आयुष्याला कवेत घेत असतो. आपल्याला वाटतं की आपल्यात सगळी क्षमता आहे. आपण लग्न करतो. बायकोला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी झटत राहतो. आणि आपल्याला मुलं होतात. त्यांच्यासाठी आपण जगत राहतो. धडपडत असतो. ती मुलं मोठी होतात आणि पंख फुटलेल्या पाखरासारखी उडून जातात. त्यांना त्यांच्या आयुष्याच्या नव्या दिशा शोधायच्या असतात. 
     जेव्हा आपली मुले मोठी होऊ लागतात आणि आपणास त्यांच्याकडून शिकावे लागते तेव्हाच आपण बिनकामाचे (Obsolete) होऊ लागतो. हे आपल्याला प्रखरतेने जाणवू लागते.
मुले जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना आपण किती सूचना देत असतो. त्यांना सारखे समजावून सांगत असतो. आणि काही काळानंतर हीच मुलं आपल्याला अनेक सूचना देत असतात.
  मी व्यवसायानिमित्त परदेश प्रवास खूप केला आहे. अमेरिका – युरोपला अनेकदा जाऊन आलो आहे. माझी मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होती. तेव्हा मी तिला असंख्य सुचना करीत होतो. त्यावेळी तिने फारसे जग पाहिलेले नव्हते. एकटीने तर प्रवास कधीच केला नव्हता. मुंबईचे धकाधकीचे जीवन तेव्हढे माहीत होते. रिक्षा – लोकल – बस अशी वाहने करून ती मुंबईत सर्वत्र फिरत असे. आता तर ती निघाली परदेशी. माझ्या सूचना सुरु झाल्या. पासपोर्ट कसा जपून ठेवायचा , इमिग्रेशन म्हणजे काय ? , विमानतळावरील विविध सोपस्कार कसे पूर्ण करावयाचे , प्रवासातील अनेक अडचणीना तोंड कसे द्यावयाचे , सावधगिरीने कसे राहायचे , वेंधळेपणा कसा टाळावा, दक्षता कशी घ्यावी , वगैरे वगैरे .. सूचनांचा नुसता भडिमार. मुलगी वैतागली . साहजिकच आहे.
   मुलीचे शिक्षण पूर्ण झाले . तेथेच नोकरी करू लागली. तेथील जीवनात रुळली. तिला नवे नवे अनुभव येऊ लागले. नव्या जगात नवे अनुभव. आणि तिने आम्हाला भेटण्यासाठी बोलाविले. आम्ही निघालो. आता वेगळेच चित्र निर्माण झाले. आम्ही पाल्य आणि ती पालक. आमच्यावर हजार सूचनांचा भडिमार. असे करा , असे करू नका. हॉटेलमधून असा फोन करा. असे पैसे वाचवा. Taxi ला बोलावण्याकरिता हा नंबर वापरा. ह्या फोनकार्डाचा असा वापर करा. लोकल फोन असा करा. विमानतळावर असे जा. वगैरे वगैरे. मला मोठी गंमत वाटत होती. एकदा आम्ही दोघेच मयामीला जाणार होतो. ती आमच्याबरोबर येणार नव्हती. तिला टेन्शन आलं . खरे म्हणजे टूर संचालकाप्रमाणे तिने आमची सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती. सर्व प्रवासयोजना अगदी आखीव – रेखीव. सर्व माहिती लिहून दिली होती. त्यासाठी तिने इतक्या सूचना दिल्याकी  मला मनातून हसू येत होते. मी ती लहान होती तेव्हा जेवढ्या सूचना दिल्या नसतील तेवढ्या बारीकबारीक सूचना मला दिल्या. आम्हाला प्रवासात कुठेही त्रास होऊ नये म्हणून केलेल्या अनंत सूचना. Taxi कशी बोलवावी, हॉटेलमध्ये चेक-इन कसे करावे , जेवणासाठी कोणकोणती रेस्टोरंटस आहेत , अडचणीच्या वेळी कसा संपर्क करावा , इत्यादी सुचना दिल्या . स्वतःचा स्मार्टफोन दिला . कसा वापरायचा हे ही समजावून सांगितले. अशी सारी जयत्त तयारी करून घेतली. रंगीत तालीमही करून घेतली. मला आजही गंमत वाटते. जमाना बदलला आहे. आपण आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या लहानपणी जेवढ्या सूचना करीत असतो , तशाच सूचना जेव्हा आपल्याला केल्या जातात तेव्हा लक्षात येते की आता आपण त्यांच्याकडून शिकणे आवश्यक आहे. आपला रोल बदलला आहे. ते आपले पालक झाले आहेत. आपल्यापेक्षा ते अधिक शहाणे झाले आहेत. मोठी गंमत आहे. आपण त्यांच्याकडून शिकायला हवे. नव्या पिढीची जाणच वेगळी. त्यानाही समजून घेतले पाहिजे. ते आपली काळजीच घेत असतात. आपल्याला त्रास होऊ नये असेच त्यांना वाटत असते.
मला शोभा भागवत ह्यांची " ती माझी मुलगी " ही कविता आठवते .....

ती ... माझी ....
बावीस वर्ष मुलगी आपल्याला किती कायकाय देते 
वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमाने शिकवत राहते 
माया देते, धीर देते, आपल्यासाठी तीच कळवळते 
ओझं कसलं ,फुलपाखरू ते याची जाण झाली ... ती ..माझी ...मुलगी 

मुलांच्या आणि आपल्या धाग्याचे एक नाते विणलं जातं. त्यांचे आणि आपले वेगळे रंग असतात. नवं नातं विणण्यात ते गुंतलेले असतात आणि एक दिवस आपल्याला जेव्हा नातवंडे होतात तेव्हा आपण खरे म्हातारे होतो. नातवंड जेव्हा थोडीशी मोठे म्हणजे १०-१२ वर्षाची झालेले असतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे असते. 
   त्यांना नव्या जगाची ओळख असते. स्मार्टफोन , इन्टरनेट वगैरे त्यांना चांगले माहीत असते. अनेकदा ही नातवंडे आपला त्रिफळाच उडवीत असतात. एकदा मी मुलीला काहीतरी माहिती विचारत होतो. तिलाही नक्की माहीत नव्हते. माझा नातू ऐकत होता. मला पटकन म्हणाला, “गुगल करा”. लगेच मिळेल. स्मार्टफोन कसा वापरायचा , प्रोग्राम कसा लोड करायचा , कोणतं Application कुठे आहे. त्याला सारे माहीत असते . 
तो मला आणि आजीला सारखा शिकवीत असतो. नव्हे मी अडकून बसलो की त्यालाच विचारतो. “ काय आजोबा , एव्हढे सोप्पं आहे.” असे म्हणून तो मला गप्प करतो. मग मी त्याला म्हणतो , " तू तर माझा आय.टी. म्यानेजर ". तो जाम खुष होतो. अलीकडे मी त्याला तशीच हाक मारतो. 
तेव्हा ह्या म्हातारपणात आपण असेच शिकत राहायचे. आपण बालक व्हायचे. आपल्यात जो नैसर्गिक उत्साहाचा स्त्रोत असतो तो आपण जपला पाहिजे. 
मुलांच्याकडून असं शिकणे मला आवडतं. त्यामुळे मी नकळत तरुण होत जातो. हेच माझं आनंदाचे झाड असतं. 
                            ******
     Wednesday, June 4, 2014

माणूस नावाचे बेट

आयुष्य वाहत असते- नदीसारखे - अखंड न संपणारे . आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे वाटचाल करू लागतो. यश–अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि प्रचंड आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद –दु:ख , आशा –निराशा ह्यांच्या हिंदोळ्यावर कधी रमतो  तर कधी दमतो.
अनेक माणसं जवळ येतात आणि दुरावतातही . आपली सख्खी माणसं, रक्ताची माणसं जवळ येतात आणि दुरावतात. ओलावा कमी होतो. एकमेकात गुंतणे कमी कमी होत जाते. तर काही वेळा नवे नातेसंबंध अधिक बळकट होताना दिसतात. काही नाती फारशी फुलतच नाहीत. त्यात ओलेपणा जाणवत नाही.
नातीगोती आणि ऋणानुबंध वेगळे असतात. रक्ताच्या नात्यात नाळ तुटलेली नसते .आपण परिस्थितीनुरूप बदलत जातो. आपल्याला व्यवसायात तात्पुरते मित्र भेटतात. त्यात ओलेपणा कधीच नसतो. कधी कधी काही व्यक्ति खूप जवळ येतात , पण तात्पुरत्या . व्यवसायापुरत्या .

माणूस हा तसा मोठा गमतीदार प्राणी आहे. कधीच पूर्ण न कळणारा . अगम्य. कधी आपल्याला खूप समजला असे वाटते. पण खऱ्या अर्थाने कळलेलाच नसतो. माणूस हा कांद्याच्या एकानंतर एक असणाऱ्या थरासारखा असतो. काही माणसं बिनबियाच्या द्राक्षासारखी असतात. तर काही माणसं कलमी आंब्यासारखी असतात.
माणसं जाणून घेणं फार आवश्यक असतं . व्यवसायात माणसांचा अधिक संपर्क होतो. त्यांना वाचता आलं पाहिजे . सरळ माणसं , बेरकी माणसं ,समोर गोडगोड बोलणारी मिठास माणसं , दिखाऊ माणसं, स्मार्ट माणसं , पहिल्या भेटीतच न आवडणारी माणसं , प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं , नवा विचार, नवी दिशा देणारी माणसे , तापट माणसं , रागावणारी माणसं ,क्षणात बदलणारी माणसं ,खोटी माणसं , नुसताच व्यावसायिक विचार करणारी माणसं, धोरणी माणसं , हवीहवीशी वाटणारी हसणारी ,हसविणारी माणसं ,तक्रारखोर माणसं , रडणारी माणसं, दु:खी माणसं ,सहनशील माणसं,खरी प्रामाणिक माणसं , निर्मल मनाची साधी भोळी माणसं , मदत करणारी माणसं ,मदत मागणारी माणसं ,अर्थ व्यवहारात फसणारी आणि फसवणारी माणसं, अशी कितीतरी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. काहीवेळा आपण ही तसेच असतो. 

     माणसे मुळात चांगलीच असतात. असे म्हणतात की प्रेमात आणि राजकारणात स्वतःला संपूर्णपणे देऊ नये. आपण द्यावे ,परंतु सारे कधीही देऊ नये. कृतज्ञता ही अपेक्षेवर पोसली जात असते. स्वभाव हा माणसाचा एक अविभाज्य भाग असतो. मन म्हणजेच माणूस . माणसाला काही सवयी असतात. आणि सवय म्हणजेच माणसांचा दुसरा स्वभाव असतो.
     माणूस वाचणे म्हणजे काय ? त्याचा स्वभाव , इच्छा ,मते ,चालीरीती , त्याचे मित्र ,सहकारी, त्याचे शत्रू ,त्याचे प्रतिस्पर्धी , त्याचे अवलंबून असणे , त्याचे दोष, थोडक्यात त्याचे अंतरंग आणि बाह्यरंग जाणून घेणे.  
     संसारिक जरुरीच्या वस्तू जवळ नसल्या तर दारिद्रयामुळे माणूस कद्रू व स्वार्थी बनत असतो. त्यामुळे आपले आप्तस्वकीय असे असतील तर आपल्याला त्रास होतो.
     माणूस एकमेकांचा द्वेष कां करतो ? एखाद्याचा द्वेष करणे म्हणजे स्वतःची भीती व स्वतःची लायकी कबूल करण्यासारखे आहे. ज्या व्यक्तीवर आपण सहज मात करू शकतो किंवा जिंकू शकतो , त्या व्यक्तीचा आपण द्वेष करीत नसतो. अपकराची परतफेड  जेंव्हा आपण द्वेषाने करतो तेंव्हा आपण दु:खी होतो.
     सुखाला ज्या काही बाह्य गोष्टीची मदत होते त्या सर्वात मैत्री महत्वाची असते.मित्र म्हणजे दोन शरीरात एक आत्मा. ज्याला पुष्कळ मित्र असतात त्याला कोणीच खरा मित्र नसतो. मैत्री म्हणजे क्षणिक उत्कटता नव्हे . मैत्री म्हणजे स्थिर भाव. मैत्रीला समानता हवी. कृतज्ञता हा मैत्रीचा भक्कम व स्थिर पाया. मैत्रीत बोजा वाटता कामा नये. माणसाचा सर्वोत्तम मित्र हा तो स्वतःच .
     आपला मित्र हा पुढेमागे आपला शत्रू होईल हे लक्षात ठेऊन मित्र प्रेम जपले पाहजे. तसेच आपला शत्रू पुढेमागे आपला मित्र होईल हे लक्षात ठेऊन वागले पाहिजे. त्यासाठी स्वतःचे हेतू, स्वतःचे विचार आपल्या मित्राजवळ संपूर्णपणे उघड न करणे आवश्यक आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
   काही माणसांशी आपले वेगळेच ऋणानुबंध जुळतात. काहीं व्यक्तींशी आपण संपर्क तोडतो. काहीजण खरेच मित्र असतात. त्यांच्याशी सुखदु:खाच्या गोष्टी करता येतात. काही माणसे खूप मोठी असतात . त्यांना समाजात खूप प्रतिष्ठा असते. त्यांचा नावलौकिक असतो. पण आपल्याला आलेल्या अनुभवामुळे आपणास ती माणसे छोटी वाटतात. त्यांच्या प्रतिभा आणि प्रतिमेवर आपण सारेजण खुष असतो. पण त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत आपल्याला ती माणसे फार खुजी वाटतात. काही मोठी नसलेली छोटी माणसं आपल्याला अधिक भावतात.
     माणसामाणसांचे संबंध वेगवेगळ्या पातळीवरचे असतात. ते वेगवेगळे वागतात. हे वागणं देवाणघेवाणीशी संबंधित असते. आपल्याला त्यांच्याकडून काहीच अपेक्षित नसतं ती माणसं सहसा चांगली वागतात. तात्पुरती . काही काळ. काही जण ओळख असूनही ओळख दाखवित नाहीत. माणूस विविध मनोप्रवृत्तीचा असतो.  त्यात आपणही असतोच. आपणही रोज बदलत असतो. रोज वेगळे वागत असतो.
बाप-मुलगा , आई –मुलगी , भाऊ-बहीण ह्याच्याशी वागताना आपण बदलत असतो. वय वाढत जातं तसंतसं आपलं त्यांच्याशी बोलणे कमी कमी होत जातं. बोलण्यातील मोकळेपणा कमी होतो. तणाव वाढत जातात. "हे आपलेच आप्त-स्वकीय कां?" असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण आपल्यात कुटुंबामुळे संकुचित वृत्ती नकळत जोपासली जाते. आपल्याला “मी , माझी बायको , माझी मुले”  ह्या व्यतिरिक्त विश्व जाणवत नाही.
    आपल्यातील बदलासाठी लोभीपणा व विलासलोलुपता ही दोन कारणे असतात . आपल्याला हे मिळावे , ते मिळावे असे वाटते. आपल्या महत्वाकांक्षा वाढलेल्या  असतात. स्पर्धा , द्वेषमत्सर वाढलेला असतो. जे आपल्यापाशी असते त्याचा आपल्याला वीट येतो. जे जवळ नसते त्याच्यासाठी आपण हपापलेले असतो. त्याच्यासाठी आपण झुरतो .दुसर्याचे काही पाहिले की आपल्यालाही  ते हवे हवेसे वाटते.जो पर्यंत दुसर्याजवळ नसते तो पर्यंत आपल्याला इच्छा होत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे.
माणसातलं हे दळणवळण नं समजणारे असते. कथा कादंबर्यातून , टीव्ही सिरीयलमधून, नाटकातून , चित्रपटातून आपण ह्यातील काही माणसं शोधू लागतो. त्यांच्यातील साधर्म्य शोधतो.
    माणूस असे कां वागतो ? त्याचा स्वभाव असा कां होतो ? त्याची तीन प्रमुख कारणे इच्छा , भावना व ज्ञान. ह्या सहजप्रेरणा आहेत. इच्छा म्हणजे उफाळती उत्साहशक्ती. भावनेचे स्थान हृदयत असते. ज्ञान म्हणजे इच्छेचा डोळा. आपल्या सगळ्यात एक सुप्त पशु असतो. प्रत्येक व्यक्ति म्हणजे वासना , भावना व विचार ह्यांचे विश्व आहे .

    आपला माणसांचा हा शोध चालूच असतो. जीवन ही निसर्गाची देणगी आहे.परंतु सुंदर रीतीने जगणं ही प्रज्ञेची देणगी आहे, हे विसरू नये. स्वतःचे स्वतःच स्वामी होणे म्हणजे मोठे होणे असते.