Wednesday, June 4, 2014

माणूस नावाचे बेट

आयुष्य वाहत असते- नदीसारखे - अखंड न संपणारे . आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे वाटचाल करू लागतो. यश–अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि प्रचंड आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद –दु:ख , आशा –निराशा ह्यांच्या हिंदोळ्यावर कधी रमतो  तर कधी दमतो.
अनेक माणसं जवळ येतात आणि दुरावतातही . आपली सख्खी माणसं, रक्ताची माणसं जवळ येतात आणि दुरावतात. ओलावा कमी होतो. एकमेकात गुंतणे कमी कमी होत जाते. तर काही वेळा नवे नातेसंबंध अधिक बळकट होताना दिसतात. काही नाती फारशी फुलतच नाहीत. त्यात ओलेपणा जाणवत नाही.
नातीगोती आणि ऋणानुबंध वेगळे असतात. रक्ताच्या नात्यात नाळ तुटलेली नसते .आपण परिस्थितीनुरूप बदलत जातो. आपल्याला व्यवसायात तात्पुरते मित्र भेटतात. त्यात ओलेपणा कधीच नसतो. कधी कधी काही व्यक्ति खूप जवळ येतात , पण तात्पुरत्या . व्यवसायापुरत्या .

माणूस हा तसा मोठा गमतीदार प्राणी आहे. कधीच पूर्ण न कळणारा . अगम्य. कधी आपल्याला खूप समजला असे वाटते. पण खऱ्या अर्थाने कळलेलाच नसतो. माणूस हा कांद्याच्या एकानंतर एक असणाऱ्या थरासारखा असतो. काही माणसं बिनबियाच्या द्राक्षासारखी असतात. तर काही माणसं कलमी आंब्यासारखी असतात.
माणसं जाणून घेणं फार आवश्यक असतं . व्यवसायात माणसांचा अधिक संपर्क होतो. त्यांना वाचता आलं पाहिजे . सरळ माणसं , बेरकी माणसं ,समोर गोडगोड बोलणारी मिठास माणसं , दिखाऊ माणसं, स्मार्ट माणसं , पहिल्या भेटीतच न आवडणारी माणसं , प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं , नवा विचार, नवी दिशा देणारी माणसे , तापट माणसं , रागावणारी माणसं ,क्षणात बदलणारी माणसं ,खोटी माणसं , नुसताच व्यावसायिक विचार करणारी माणसं, धोरणी माणसं , हवीहवीशी वाटणारी हसणारी ,हसविणारी माणसं ,तक्रारखोर माणसं , रडणारी माणसं, दु:खी माणसं ,सहनशील माणसं,खरी प्रामाणिक माणसं , निर्मल मनाची साधी भोळी माणसं , मदत करणारी माणसं ,मदत मागणारी माणसं ,अर्थ व्यवहारात फसणारी आणि फसवणारी माणसं, अशी कितीतरी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. काहीवेळा आपण ही तसेच असतो. 

     माणसे मुळात चांगलीच असतात. असे म्हणतात की प्रेमात आणि राजकारणात स्वतःला संपूर्णपणे देऊ नये. आपण द्यावे ,परंतु सारे कधीही देऊ नये. कृतज्ञता ही अपेक्षेवर पोसली जात असते. स्वभाव हा माणसाचा एक अविभाज्य भाग असतो. मन म्हणजेच माणूस . माणसाला काही सवयी असतात. आणि सवय म्हणजेच माणसांचा दुसरा स्वभाव असतो.
     माणूस वाचणे म्हणजे काय ? त्याचा स्वभाव , इच्छा ,मते ,चालीरीती , त्याचे मित्र ,सहकारी, त्याचे शत्रू ,त्याचे प्रतिस्पर्धी , त्याचे अवलंबून असणे , त्याचे दोष, थोडक्यात त्याचे अंतरंग आणि बाह्यरंग जाणून घेणे.  
     संसारिक जरुरीच्या वस्तू जवळ नसल्या तर दारिद्रयामुळे माणूस कद्रू व स्वार्थी बनत असतो. त्यामुळे आपले आप्तस्वकीय असे असतील तर आपल्याला त्रास होतो.
     माणूस एकमेकांचा द्वेष कां करतो ? एखाद्याचा द्वेष करणे म्हणजे स्वतःची भीती व स्वतःची लायकी कबूल करण्यासारखे आहे. ज्या व्यक्तीवर आपण सहज मात करू शकतो किंवा जिंकू शकतो , त्या व्यक्तीचा आपण द्वेष करीत नसतो. अपकराची परतफेड  जेंव्हा आपण द्वेषाने करतो तेंव्हा आपण दु:खी होतो.
     सुखाला ज्या काही बाह्य गोष्टीची मदत होते त्या सर्वात मैत्री महत्वाची असते.मित्र म्हणजे दोन शरीरात एक आत्मा. ज्याला पुष्कळ मित्र असतात त्याला कोणीच खरा मित्र नसतो. मैत्री म्हणजे क्षणिक उत्कटता नव्हे . मैत्री म्हणजे स्थिर भाव. मैत्रीला समानता हवी. कृतज्ञता हा मैत्रीचा भक्कम व स्थिर पाया. मैत्रीत बोजा वाटता कामा नये. माणसाचा सर्वोत्तम मित्र हा तो स्वतःच .
     आपला मित्र हा पुढेमागे आपला शत्रू होईल हे लक्षात ठेऊन मित्र प्रेम जपले पाहजे. तसेच आपला शत्रू पुढेमागे आपला मित्र होईल हे लक्षात ठेऊन वागले पाहिजे. त्यासाठी स्वतःचे हेतू, स्वतःचे विचार आपल्या मित्राजवळ संपूर्णपणे उघड न करणे आवश्यक आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
   काही माणसांशी आपले वेगळेच ऋणानुबंध जुळतात. काहीं व्यक्तींशी आपण संपर्क तोडतो. काहीजण खरेच मित्र असतात. त्यांच्याशी सुखदु:खाच्या गोष्टी करता येतात. काही माणसे खूप मोठी असतात . त्यांना समाजात खूप प्रतिष्ठा असते. त्यांचा नावलौकिक असतो. पण आपल्याला आलेल्या अनुभवामुळे आपणास ती माणसे छोटी वाटतात. त्यांच्या प्रतिभा आणि प्रतिमेवर आपण सारेजण खुष असतो. पण त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत आपल्याला ती माणसे फार खुजी वाटतात. काही मोठी नसलेली छोटी माणसं आपल्याला अधिक भावतात.
     माणसामाणसांचे संबंध वेगवेगळ्या पातळीवरचे असतात. ते वेगवेगळे वागतात. हे वागणं देवाणघेवाणीशी संबंधित असते. आपल्याला त्यांच्याकडून काहीच अपेक्षित नसतं ती माणसं सहसा चांगली वागतात. तात्पुरती . काही काळ. काही जण ओळख असूनही ओळख दाखवित नाहीत. माणूस विविध मनोप्रवृत्तीचा असतो.  त्यात आपणही असतोच. आपणही रोज बदलत असतो. रोज वेगळे वागत असतो.
बाप-मुलगा , आई –मुलगी , भाऊ-बहीण ह्याच्याशी वागताना आपण बदलत असतो. वय वाढत जातं तसंतसं आपलं त्यांच्याशी बोलणे कमी कमी होत जातं. बोलण्यातील मोकळेपणा कमी होतो. तणाव वाढत जातात. "हे आपलेच आप्त-स्वकीय कां?" असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण आपल्यात कुटुंबामुळे संकुचित वृत्ती नकळत जोपासली जाते. आपल्याला “मी , माझी बायको , माझी मुले”  ह्या व्यतिरिक्त विश्व जाणवत नाही.
    आपल्यातील बदलासाठी लोभीपणा व विलासलोलुपता ही दोन कारणे असतात . आपल्याला हे मिळावे , ते मिळावे असे वाटते. आपल्या महत्वाकांक्षा वाढलेल्या  असतात. स्पर्धा , द्वेषमत्सर वाढलेला असतो. जे आपल्यापाशी असते त्याचा आपल्याला वीट येतो. जे जवळ नसते त्याच्यासाठी आपण हपापलेले असतो. त्याच्यासाठी आपण झुरतो .दुसर्याचे काही पाहिले की आपल्यालाही  ते हवे हवेसे वाटते.जो पर्यंत दुसर्याजवळ नसते तो पर्यंत आपल्याला इच्छा होत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे.
माणसातलं हे दळणवळण नं समजणारे असते. कथा कादंबर्यातून , टीव्ही सिरीयलमधून, नाटकातून , चित्रपटातून आपण ह्यातील काही माणसं शोधू लागतो. त्यांच्यातील साधर्म्य शोधतो.
    माणूस असे कां वागतो ? त्याचा स्वभाव असा कां होतो ? त्याची तीन प्रमुख कारणे इच्छा , भावना व ज्ञान. ह्या सहजप्रेरणा आहेत. इच्छा म्हणजे उफाळती उत्साहशक्ती. भावनेचे स्थान हृदयत असते. ज्ञान म्हणजे इच्छेचा डोळा. आपल्या सगळ्यात एक सुप्त पशु असतो. प्रत्येक व्यक्ति म्हणजे वासना , भावना व विचार ह्यांचे विश्व आहे .

    आपला माणसांचा हा शोध चालूच असतो. जीवन ही निसर्गाची देणगी आहे.परंतु सुंदर रीतीने जगणं ही प्रज्ञेची देणगी आहे, हे विसरू नये. स्वतःचे स्वतःच स्वामी होणे म्हणजे मोठे होणे असते.

   

3 comments:

  1. आपण काहीतरी शोधत असतो. शोधताना अचानक एखादे गाठोडे मिळाव तशी अवस्था झाली हे वाचुन. भिंगाचा आरसा मिळाला.
    खुप छान. धन्यवाद

    ReplyDelete