Sunday, June 8, 2014

मुले होतात पालक , आपण होतो बालक

आपली मुले आपले पालक होतात तेंव्हा.........
मी एका आंतरराष्ट्रीय परिषदेला गेलो होतो. संध्याकाळची पार्टी होती. अशाच गप्पा चालल्या होत्या. हास्य-विनोद चालू होते. मी ज्या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधित्व करीत होतो , त्या कंपनीचे अध्यक्ष माझ्याशी गप्पा मारीत होते. मी वयाने मोठा होतो तरी लहानखोर भारतीय असल्यामुळे तरुण दिसत होतो. त्यांचे वय अधिक असावे. तसे ते तरुण दिसत होते. त्यांनी माझे वय विचारले. आणि त्यांना आश्चर्य वाटले. मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठाच होतो. मग ते म्हणाले , ´I am growing old. In fact, I am not growing old . As my daughter  is growing young , I feel that I am growing old.’  किती खरे आहे हे म्हणणे. आपली मुले मोठी होऊ लागतात त्यामुळेच आपण म्हातारे होऊ लागतो. जेव्हा आपले शाळा सोबती , वर्गमित्र किंवा आपल्या बरोबरचे एकेक जण हे जग सोडून जातात तेव्हा आपले म्हातारपण आपल्याला अधिक जाणवू लागते.
आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आयुष्याला कवेत घेत असतो. आपल्याला वाटतं की आपल्यात सगळी क्षमता आहे. आपण लग्न करतो. बायकोला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी झटत राहतो. आणि आपल्याला मुलं होतात. त्यांच्यासाठी आपण जगत राहतो. धडपडत असतो. ती मुलं मोठी होतात आणि पंख फुटलेल्या पाखरासारखी उडून जातात. त्यांना त्यांच्या आयुष्याच्या नव्या दिशा शोधायच्या असतात. 
     जेव्हा आपली मुले मोठी होऊ लागतात आणि आपणास त्यांच्याकडून शिकावे लागते तेव्हाच आपण बिनकामाचे (Obsolete) होऊ लागतो. हे आपल्याला प्रखरतेने जाणवू लागते.
मुले जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना आपण किती सूचना देत असतो. त्यांना सारखे समजावून सांगत असतो. आणि काही काळानंतर हीच मुलं आपल्याला अनेक सूचना देत असतात.
  मी व्यवसायानिमित्त परदेश प्रवास खूप केला आहे. अमेरिका – युरोपला अनेकदा जाऊन आलो आहे. माझी मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होती. तेव्हा मी तिला असंख्य सुचना करीत होतो. त्यावेळी तिने फारसे जग पाहिलेले नव्हते. एकटीने तर प्रवास कधीच केला नव्हता. मुंबईचे धकाधकीचे जीवन तेव्हढे माहीत होते. रिक्षा – लोकल – बस अशी वाहने करून ती मुंबईत सर्वत्र फिरत असे. आता तर ती निघाली परदेशी. माझ्या सूचना सुरु झाल्या. पासपोर्ट कसा जपून ठेवायचा , इमिग्रेशन म्हणजे काय ? , विमानतळावरील विविध सोपस्कार कसे पूर्ण करावयाचे , प्रवासातील अनेक अडचणीना तोंड कसे द्यावयाचे , सावधगिरीने कसे राहायचे , वेंधळेपणा कसा टाळावा, दक्षता कशी घ्यावी , वगैरे वगैरे .. सूचनांचा नुसता भडिमार. मुलगी वैतागली . साहजिकच आहे.
   मुलीचे शिक्षण पूर्ण झाले . तेथेच नोकरी करू लागली. तेथील जीवनात रुळली. तिला नवे नवे अनुभव येऊ लागले. नव्या जगात नवे अनुभव. आणि तिने आम्हाला भेटण्यासाठी बोलाविले. आम्ही निघालो. आता वेगळेच चित्र निर्माण झाले. आम्ही पाल्य आणि ती पालक. आमच्यावर हजार सूचनांचा भडिमार. असे करा , असे करू नका. हॉटेलमधून असा फोन करा. असे पैसे वाचवा. Taxi ला बोलावण्याकरिता हा नंबर वापरा. ह्या फोनकार्डाचा असा वापर करा. लोकल फोन असा करा. विमानतळावर असे जा. वगैरे वगैरे. मला मोठी गंमत वाटत होती. एकदा आम्ही दोघेच मयामीला जाणार होतो. ती आमच्याबरोबर येणार नव्हती. तिला टेन्शन आलं . खरे म्हणजे टूर संचालकाप्रमाणे तिने आमची सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती. सर्व प्रवासयोजना अगदी आखीव – रेखीव. सर्व माहिती लिहून दिली होती. त्यासाठी तिने इतक्या सूचना दिल्याकी  मला मनातून हसू येत होते. मी ती लहान होती तेव्हा जेवढ्या सूचना दिल्या नसतील तेवढ्या बारीकबारीक सूचना मला दिल्या. आम्हाला प्रवासात कुठेही त्रास होऊ नये म्हणून केलेल्या अनंत सूचना. Taxi कशी बोलवावी, हॉटेलमध्ये चेक-इन कसे करावे , जेवणासाठी कोणकोणती रेस्टोरंटस आहेत , अडचणीच्या वेळी कसा संपर्क करावा , इत्यादी सुचना दिल्या . स्वतःचा स्मार्टफोन दिला . कसा वापरायचा हे ही समजावून सांगितले. अशी सारी जयत्त तयारी करून घेतली. रंगीत तालीमही करून घेतली. मला आजही गंमत वाटते. जमाना बदलला आहे. आपण आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या लहानपणी जेवढ्या सूचना करीत असतो , तशाच सूचना जेव्हा आपल्याला केल्या जातात तेव्हा लक्षात येते की आता आपण त्यांच्याकडून शिकणे आवश्यक आहे. आपला रोल बदलला आहे. ते आपले पालक झाले आहेत. आपल्यापेक्षा ते अधिक शहाणे झाले आहेत. मोठी गंमत आहे. आपण त्यांच्याकडून शिकायला हवे. नव्या पिढीची जाणच वेगळी. त्यानाही समजून घेतले पाहिजे. ते आपली काळजीच घेत असतात. आपल्याला त्रास होऊ नये असेच त्यांना वाटत असते.
मला शोभा भागवत ह्यांची " ती माझी मुलगी " ही कविता आठवते .....

ती ... माझी ....
बावीस वर्ष मुलगी आपल्याला किती कायकाय देते 
वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमाने शिकवत राहते 
माया देते, धीर देते, आपल्यासाठी तीच कळवळते 
ओझं कसलं ,फुलपाखरू ते याची जाण झाली ... ती ..माझी ...मुलगी 

मुलांच्या आणि आपल्या धाग्याचे एक नाते विणलं जातं. त्यांचे आणि आपले वेगळे रंग असतात. नवं नातं विणण्यात ते गुंतलेले असतात आणि एक दिवस आपल्याला जेव्हा नातवंडे होतात तेव्हा आपण खरे म्हातारे होतो. नातवंड जेव्हा थोडीशी मोठे म्हणजे १०-१२ वर्षाची झालेले असतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे असते. 
   त्यांना नव्या जगाची ओळख असते. स्मार्टफोन , इन्टरनेट वगैरे त्यांना चांगले माहीत असते. अनेकदा ही नातवंडे आपला त्रिफळाच उडवीत असतात. एकदा मी मुलीला काहीतरी माहिती विचारत होतो. तिलाही नक्की माहीत नव्हते. माझा नातू ऐकत होता. मला पटकन म्हणाला, “गुगल करा”. लगेच मिळेल. स्मार्टफोन कसा वापरायचा , प्रोग्राम कसा लोड करायचा , कोणतं Application कुठे आहे. त्याला सारे माहीत असते . 
तो मला आणि आजीला सारखा शिकवीत असतो. नव्हे मी अडकून बसलो की त्यालाच विचारतो. “ काय आजोबा , एव्हढे सोप्पं आहे.” असे म्हणून तो मला गप्प करतो. मग मी त्याला म्हणतो , " तू तर माझा आय.टी. म्यानेजर ". तो जाम खुष होतो. अलीकडे मी त्याला तशीच हाक मारतो. 
तेव्हा ह्या म्हातारपणात आपण असेच शिकत राहायचे. आपण बालक व्हायचे. आपल्यात जो नैसर्गिक उत्साहाचा स्त्रोत असतो तो आपण जपला पाहिजे. 
मुलांच्याकडून असं शिकणे मला आवडतं. त्यामुळे मी नकळत तरुण होत जातो. हेच माझं आनंदाचे झाड असतं. 
                            ******
     



3 comments: