रम्य अरुणाचल
रम्य ते पूर्वांचल ( असम ,मेघालय ,अरुणाचल, नागलंड,मिझोरम ,मणिपूर आणि
त्रिपुरा- ह्या सात बहिणी- Seven Sisters ) . त्यांच्या सोबत सिक्कीमही आहे. हा पूर्वांचल
पाहण्याची खूप दिवसाची इच्छा होती. तसे सिक्कीम मी पहिले होते. १७ नोव्हेंबर ते ४
डिसेंबर २०१२ ह्या काळात पूर्वांचलचा प्रवास घडून आला आणि एक आगळा वेगळा निसर्ग
सौंदर्याचा आनद अनुभवला. हिमालयाचा मी तर यात्रिक. म्हणून अरुणाचलला प्रथम
जाण्याचे ठरविले. अरुणाचल हे खूप मोठे राज्य आहे. ओढ होती ती तवांग ला जाण्याची.
त्या भागातील हिमालयाचे दर्शन घ्यायचे होते. ह्या भागातून प्रवास करणे कठीण आहे हे
माहितच होते. फारशा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवासी इकडे फिरकतच
नाहीत. येणार कसे. रस्ते चांगले नाहीत. प्रवास कठीण आणि धोक्याचा. आजूबाजूच्या
प्रदेशात अशांतता. प्रवासातून सुखरूप येतो की नाही अशी भीती. तरीही हिमालयाच्या
वेगळ्या असणार्या पर्वत रांगा, ब्रम्ह्पुत्रेचा आजूबाजूचा परिसर ,घनदाट जंगले
ह्या सर्व निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पाहायचाच होता. योग जुळून आला.
तवांगला जायचे तर गोहत्ती पासून सुरुवात करावयाचे ठरविले. मुंबई – गोहाटी हा
प्रवास मुद्दामच विमानाने केला. कारण पुढचा सर्व प्रवास चार चाकी वाहनानेच
करावयाचे होते. असम मधून गोहत्ती - तेजपूर
मार्गे बोमदिला – डीरंग करीत तवांगला स्कॉर्पियो ह्या जीपने १६ ते १८ तासांचा
प्रवास करावा लागेल अशी माहिती मिळाली. आम्ही एकूण ११ जण होतो. सरासरी वय ६० च्या वर.
सर्व कठीणच आहे असे वाटत होते. तवांग – गोहत्ती अंतर ५५० कि.मी.पेक्षा
अधिक.गोहत्ती ते बोमडिला हे अंतर ३३८ कि.मी. प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ १२ -१४ तास.
बोमदिला ते तवांग अंतर १८५ कि.मी. प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ ८ ते १० तास. ह्या
लागलेल्या प्रवास वेळेवरूनच प्रवास किती कठीण असेल ह्याची सहज कल्पना येऊ शकेल.
बोमडीलाला रात्री मुक्काम करण्याचे ठरले होते. गोहत्ती सोडले. तेजपुरच्या दिशेने
प्रवास सुरु झाला. सुरवातीला वाटले की रस्ते चांगले चौपदरी आहेत. चांगलेच असणार.
ब्रम्ह्पुत्त्रेवरील मोठ्या आणि लांबच लांब असणार्या पुलामुळे ब्रम्हपुत्रेच्या
अवाढव्य पात्राची कल्पना आली. तशी ब्रम्हपुत्रा कैलास- मानससरोवर यात्रेत पाहिली
होती. नव्हे तिच्या काठाकाठानेच कित्येक कि.मी. प्रवास केला होता. पण ही
ब्रम्हपुत्रा खूपच पसरलेली दिसले. एखाद्या समुद्रासारखी. पलीकडला जमिनीचा काठच
दिसत नव्हता. पूर आल्यावर किती हा:हा:कर करते हे सर्वांनाच माहीत आहे, आम्ही
भालुकपांगच्या जवळ आलो. हे असम आणि अरुणाचल ह्या दोन्ही राज्याची सीमा असलेले
गाव. अर्धे असममध्ये तर अर्धे अरुणाचलमध्ये. हे गाव दोन नद्यांच्या काठावर वसलेले
सुंदर असे गाव. तेजपूर पासून फक्त ५२ कि.मी.
कामेंग नदीच्या काठावर वसलेले चित्रातल्या सारखे सुंदर गाव. हिमालयाच्या
रांगा त्या नंतर सुरु होतात. चढण येथूनच सुरु होते, मैदानी प्रदेश संपतो. अरुणाचलमध्ये
प्रवेश करण्यास परमीट लागते. तरच प्रवेश मिळतो. सर्व पेपर बरोबर होतेच. पण शासकीय
यंत्रणा. वेळ लागलाच. अर्थात त्याला इलाज नसतो. तपासणी ही हवीच. असम सोडले नि
अरुणाचलमध्ये प्रवेश केला. पोटोबासाठी रस्त्यावरचे हॉटेल गाठले. आतां सोई- सुविधा
साधारणच. रेस्टरूमची व्यवस्था कुठे आहे, ह्याचा पहिला शोध. सोबत असलेल्या महिलांची
मात्र कुचंबना. पुरुषांना मात्र मोकळी जागा म्हणजे सगळे वावर खुलेच . फक्त आडोसा
शोधायचा. आता जे मिळेल तेच खायचे. पदार्थ निवड करण्याची संधीच नाही. भात मात्र
मिळतो. त्याबरोबर बटाटा असतोच. भाज्या निवडकच. करण्याची त्यांची पद्धत निराळी.
मसाले वेगळे. काहीही खाल्ले तरी त्रास नको व्हायला . पोट तर सांभाळणे आवश्यक.
त्यामुळे सगळे खाणे भीतभीतच. आणि मग खरा कठीण असलेला प्रवास सुरु झाला. हिमालयाची
चढण सुरु झाली. नागमोडी रस्ते. अरुंद रस्ते. कधी उंचावर घेऊन जाणारी चढण.तर लगेच
खाली उतरणारे रस्ते. एका पर्वत रांगातून दुसऱ्या पर्वत रांगाकडे नेणारे रस्ते.
डांबर निघून गेले रस्ते. मातीने आणि चिखलाने भरलेले रस्ते. दरडी कोसळलेले रस्ते.
खाचंखळग्याचे रस्ते. ह्यांना रस्ते म्हणावयाचे का? असा प्रश्न कोणालाही पडेल. फक्त
लष्कराच्या गाड्या वेगाने कशा धावतात हाच मनात येणारा प्रश्न.असा हा आनद देणारा
रस्ता. ड्रायवर एक खड्डा चुकवायला जातो आणि दुसऱ्या खड्ड्यात अडकतो. जीप मध्ये
मागे बसणारे वैतागलेले. खड्डा आला की त्यांचे डोके छतावर आपटतेच. दोन चार टेंगुळ
आलीच समजा. मागे बसणाऱ्या माणसांची वाट लागते. मोठे कर्म कठीण . खड्डे नसतील तर
रस्ता चिखलानी भरलेला. गाडीची चाके रुतून बसली की पंचाईत. थोडे पुढे जावे तर अरुंद
वळण, एक इंच इकडे तिकडे झाले तर गाडी सरळ खोल दरीतच . प्रवासात जीवाची भीती बरोबरच
असते. त्यामुळे आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मन ही स्थिर नसते. खड्डा
नाही ना, हे बघितले की मग निसर्गाकडे
बघायला वेळ. स्वतःच्या हाडाचा हिशोब सारखा ठेवावा लागतो. गाडीतून उतरलो की पहिल्यांदा
हाडाचा हिशोब करायचा. मान आणि कंबर ठीक आहे ना? हे तपासून पहावयाचे. मग एखादा
धबधबा आला की मुद्दाम खाली उतरून निसर्ग सौंदर्याचा आनद लुटायचा. जागा बदलायच्या.
मागे बसणारा पुढे बसायला मिळते म्हणून सुखावलेला तर पुढे बसणारा मागे जावे लागणार
म्हणून कष्टी झालेला. पण इलाज नाही. मग तो ड्रायव्हरला विचारणार पुढचा रस्ता कसा
आहे. तो सांगणार , सांगता येत नाही. मागच्या वेळी चांगला होता. पावसाने काय झाले
असेल माहीत नाही. नाहीतर रस्ता दुरुस्तीची कामे चालूच असल्यामुळे रस्ता अजूनच खराब
झालेला असतो, असा हा सगळा प्रवास रोलर कोस्टर मध्ये आहोत असा वाटणारा. मधेच गाडी
बंद पडली तर विचारूच नका. तिकडे चीनने तवांगकडे येण्यासाठी चार पदरी रस्ते बांधले
आहेत. गेल्या ६० वर्षात आपण रस्ते बांधलेच नाहीत. सर्वत्र काम चालू आहे असे दिसते.
पण २-४ कि.मी. रस्ता चांगला आहे ,असे दिसत नाही. तसा हा सगळा प्रदेश दुर्गम. खूप
पाऊस. बर्फवृष्टी. दररडी कोसळणे. रस्ते वाहून जाणे. नद्या-नाल्यांना पूर येणे, हिमालय
तसा ठिसूळच. सारख्या दरडी कोसळतात. वाहतूक
बंद पडते. रस्ते वाहून जातात. येथे रस्ता नसावाच असे वाटते. लष्कराच्यासाठी
बांधलेले हे रस्ते. लष्कर कसे चालते ,कोणास ठाऊक. निसर्ग ही बेभरवशाचा. एका क्षणात
रस्ता होता की नव्हता असे करून टाकतो. ६० वर्षापूर्वी आपले लष्कर कोणत्या
परिस्थितीतून गेले असेल. कल्पनाच करता येत नाही. आजही चीन दबा धरून बसला आहे, आपण infrastructure उभे केले आहे असे वाटत
नाही. असा हा १२ तासांचा प्रवास करून रात्री १० वाजता आम्ही बोमडीलाला येऊन पोहोंचलो.
एक मात्र खरे की हिमालयाच्या ह्या रांगा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आहेत.
प्रत्येक २-३ कि.मी. नंतर तो वेगळा असतो. डोळ्यांचे पारणे फिटते. प्रवास खडतर
असतो. पण डोळ्यात न मावणारा हा हिमालय सतत बरोबर असतो. आपले वेगळे रूप दाखवीत
असतो. कधी शांत. कधी रौद्र. प्रचंड वेगाने पडणारे ते पाणी म्हणजे धबधबे मन
उल्हासित करतात. त्या नदीच्या काठावर शांत वाटते. अशी कित्येक ठिकाणे दिसतात की
तेथेच रहावेसे वाटते. अगदी चित्रात पाहतो असे वाटत राहते. आपण फोटो क्लिक करतो पण
जे प्रत्यक्ष पाहिले ते फोटोत येतच नाही. आपणच हिरमुसतो. पण फोटो पहिला की
आपल्याला ते सारे आठवत राहते. तो क्षण जागा होतो. त्यामुळे तरी क्लिक करीत फिरत
राहणे चालू असते. कोणताही फोटो डिलीट करावा असे वाटत नाही.
बोमडीलाला आमचा मुक्काम होता हॉटेल हायल्यांडर्स मध्ये. हॉटेल चांगले होते.
जीप मधून बाहेर पडलो आणि सारे शरीर गारठून गेले. मरणाची थंडी. रूमपर्यंत जाणे
कठीण.अजून बर्फ पडला नव्हता. बर्फ पडल्यावर काय हाल होत असतील. रूम मध्ये हिटर
होता म्हणून बरे. नाहीतर वाट लागली असती. जेवणाच्या हॉल पर्यंत जाणेही जीवावर येत
होते. त्या हॉटेल मधील काम करणारी मंडळी एकदम तत्पर. पिण्यासाठी गरम पाणी. गरम गरम
जेवण. त्यामुळे थोडी हुशारी आली. प्रवासाच शीण थोडा कमी झाला. अंथरुणावर पडल्यावर
कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळी उठलो. आणि लगेच निघालो तवांगला जाण्यास. १८५ कि.मी. चे अंतर. वेळ लागला
आठ तास. प्रवास अधिक कठीण होत गेला. आणि आम्ही पोहोंचलो सेला पासला. १३,७०० फुट
उंचावर. तवांग पासून अगदी थोड्याच अंतरावर. त्यापूर्वी एक सुंदर धबधबा पहावयास
मिळाला. बहुधा जंग धबधबा असावा. सेला पास नेहमीच बर्फाच्छादित असतो. आम्ही तवांगला
जाताना बर्फ नव्हता. परंतु दोन दिवसांनी परतताना मात्र संपूर्ण रस्ता बर्फाच्छादित
होता. सेला पास जवळ १४ कि.मी. अंतरावर आहे जसवंत गढ. १९६२ मध्ये चिन्याच्या बरोबर
ह्या ठिकाणी झाले तुंबळ युद्ध. नुरानंग ची लढाई असे म्हणतात. त्या ठिकाणी एक युद्ध
स्मारक आहे. भारतीय सैनिकालाच नव्हे तर सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा पराक्रम
ज्या जसवंत सिंग आणि इतर भारतीय सैनिकांनी केला ती ही जागा. पवित्र देऊळच. मी
भारतीय आहे असा गर्व वाटतो ते हे ठिकाण. देशभक्ती जागी होते ते हे ठिकाण. एका
वीराचे हे स्मारक. ४ गढवाल रायफलचे रायफलमन जसवंत सिंग ,ज्यांना महावीर चक्र
मिळाले त्यांचे हे स्मारक. १९६२ मध्ये ७२ तास चिनी सैन्याबरोबर लढणारा व त्यांना
तेथेच थोपवून धरणारा हा भारतीय लष्कराचा जवान. ह्या ठिकाणी धारातीर्थी पडला. ३००
हून अधिक चिनी मारले गेले. जखमी अवस्थेत तो चिनी सैनिकांच्या हाती लागला. आणि त्याना त्याच ठिकाणी चिनी सैनिकांनी फासावर
लटकाविले. आणि त्याचे शीर घेऊन ते निघून गेले. चीन लोकांनी माघार घेतली ती ह्या
ठिकाणावरुनच. ते ठिकाण पाहिल्यानंतर आपले सैनिक त्या वेळी कसे लढले असतील ह्याची
थोडीशी कल्पना येते. त्यांच्या जवळ साधे वुलनचे कपडे नव्हते. रायफलीमध्ये पुरेसा
दारुगोळाही नव्हता. केवळ ५० राउंड गोळ्या. २४२० जवान शहीद झाले. जसवंत सिंगचा
छोटासा पुतळा असलेले हे स्मारक. त्या ठिकाणाहून सर्व सीमा दिसते. गस्त घालण्याची
ही महत्वाची जागा. आम्ही जेंव्हा ते स्मारक पाहत होतो तेंव्हा त्या ठिकाणी असणारा
शिपाई होता कोल्हापूरचा. आम्ही मराठीत बोलत होतो . त्यामुळे त्याने बोलण्यास
सुरुवात केली. तो त्या ठिकाणी ३ महिन्याकरिता आला होता. त्यांच्या तेथील
जीवनासंबधी आम्ही चौकशी केली आणि त्यांच्या खडतर आयुष्याची जाणीव झाली. आपण ह्या
सैनिकांच्या मुळेच सुरक्षित आहोत ह्याची जाणीव झाली. त्या ठिकाणी सैनिक एक क्यानटीन
चालवतात . त्यांनी आम्हाला चहा पाजला. मोफत. जणू काही ह्या मंदिराचा तो प्रसाद
होता. प्रत्येक भारतीय तरुणाने एकदा तरी ह्या ठिकाणास भेट द्यावी म्हणजे त्याच्या
लक्षात येईल की किती किरकोळ तक्रारी करित ते रडत असतात. अशी ही आपली उत्तर-पूर्व सीमा. १९६२ मध्ये झालेला
पराभव . आजही चीन दाबा धरून बसलेला आहेच. ह्या सीमेवर अनंत अडचणी आहेत. ६०
वर्षानंतरही आपण फारशी प्रगती केली आहे व सीमा मजबूत केल्या आहेत असे वाटत नाही.
सेलापास सोडले आणि थोड्या वेळाने तवांग शहरात पोहोचू असे वाटले. अंतर तसे कमी
होते .पण रस्ता अतिशय वाईटच होता. त्याला रस्ता न म्हणणेच योग्य. शेवटी गाक्यी
खान्ग झांग ह्या हॉटेलवर पोहोचण्यास संध्याकाळच झाली. अंधार पडला होता. हॉटेल छान
होते,स्वछ आणि सुंदर होते. रूम मध्ये गेलो आणि खिडकीतून तवांग शहराचे विलोभनीय
दर्शन झाले. छोटे , टुमदार असे हे शहर निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. दूरवर तवांग
monastrey दिसत होती.
१९१७ मध्ये इंग्रजांनी म्याक्मोहन रेषा काढली आणि सीमा रेषा निश्चित केल्या.
त्याला सिमला अकोर्ड म्हणतात. ब्रिटीशानी तवांगचा ताबा घेतला नव्हता. १९३८ मध्ये
ब्रिटीश सैन्य तवांग मध्ये होते. त्यावेळी तवांग हा भारताचाच भाग
आहे म्हणून मान्यता मिळाली. त्यापूर्वी तो तिबेटचा भाग होता. १९४१ मध्ये जपान
युद्धानंतर त्या वेळच्या असम सरकारने अनेक हालचाली केल्या आणि त्यावेळच्या North East
Frontier Agency ( NEFA) च्या माध्यमातून शासकीय कब्जा मिळवीला . आज NEFA ला अरुणाचल प्रदेश असे
म्हणतात. असम रायफल कडे रीतसर संरक्षणाची जबादारी होती. १२ फेब्रुवारी १९५१ साली भारतीय लष्करांनी तवांगचा ताबा घेतला.
त्यावेळी त्या भागात काही ठिकाणी चिनी लोकांच्या वसाहती होत्या. त्यामुळे आजही चिनी
त्यावर आपला हक्क सांगतो . आज चीनने तिबेटवरच ताबा मिळविलेला असल्यामुळे ते हा भाग
त्यांचाच समजतात. १९६२ मध्ये फार थोड्या काळाकरिता तवांग चीनच्या ताब्यात होते.
त्यानंतर चीनी सैनिक माघारी गेले. परंतु आजही चीन हा भाग आपलाच आहे असा दावा करते.
२००३ मध्ये दलाई लामांनी अरुणाचल हा तिबेटचा भाग आहे असे वादग्रस्त विधान केले
होते. परंतु २००८ मध्ये त्यांनी म्याकमोहन रेषा मान्य केली आणि तवांग भारताचाच भाग
आहे हे मान्य केले. ८ नोव्हेंबर २००९ मध्ये दलाई लामांनी तवांगला भेट दिली. ३००००
हून अधिक बुद्ध धर्मीय शिष्य समुदाय त्यांच्या भेटीच्या वेळी तवांग मध्ये उपस्थित
होता. त्यावेळी चीनने दलाई लामांच्या भेटीला आक्षेप घेतला होता.
तवांग ची तवांग Monastery हेच प्रमुख आकर्षण. ५ व्या दलाई लामाच्या इच्छेनुसार मेरा
लामा गोरडे ग्यासतो ह्यांनी ही मोन्यास्ट्री स्थापन केली. येथे गेलुगपा ही बुद्ध जमात प्रमुख आहे. ल्हासा
नंतर स्थापन झालेली ही दुसरी मोन्यास्ट्री. सहाव्या दलाई लामांचे हे जन्मस्थान
म्हणून तिबेटी लोकांचे हे पवित्र स्थळ. १४ वे दलाई लामा तिबेटमधून पळाले आणि
भारताकडे येण्यास निघाले तेंव्हा ३० मार्च १९५९ ला तवांगच्या ह्या मोन्यास्ट्रीट ते
राहिले होते. त्यानंतर ते तेजपूर मार्गे भारतात पोहोचले. असा हा तवांगचा इतिहास.
ही मोन्यास्ट्री खरोखरच बघण्यासारखी आहे.
दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे तवांग युद्ध स्मारक. संध्याकाळी हे ठिकाण बघण्यास
गेलो. शेजारी लष्कराची छावणी आहे.हे युद्ध स्मारक दिमाखाने उभे आहे. ३१ दिवस चिनी
लोकांशी युद्ध करताना जे सैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे
स्तुपासारखे दिसणारे स्मारक. १९९७ साली दलाई लामांनी ह्या ठिकाणाला भेट दिली. आणि
स्तुपाचा आकार असलेले हे स्मारक उभे करण्याचे ठरले. १९९९ साली शेकडो बुद्ध
संन्यासानी हे स्मारक उभे करण्यासाठी प्रत्यक्ष काम केले. स्थानिक लोकांनी,
शासनाने व लष्कराने सहकार्य केले. भगवान बुद्धाची मूर्ती दलाई लामांनी स्मारकासाठी
दिली. बर्फाच्छादित हिमालयात साध्या सुती कापडी वेशात शुन्य डिग्री पेक्षा कमी
तापमान असताना आपले सैनिक कसे लढले असतील ह्याचा अंदाजा येथे आल्यावरच कळतो.
त्यांच्याजवळ पुरेसा दारुगोळा ही नव्हता. २४२० जवान शहीद झाले. बंदुकीत दारू गोळाच
पुरेसा नव्हता म्हणून ते धारातिर्थी पडले. त्यांचे हे स्मारक.तेथील एका शिला लेखावर
लिहिले आहे,
“How can man die better than facing fearful odds, for the
ashes of his father and the temples of his Gods”.
ह्याच ठिकाणी रात्री Light and Sound
show दाखवितात. आम्ही तो आवर्जून पहिला. फार सुंदर.
मन हेलावून टाकणारा. त्या कार्यक्रमात लता मंगेशकरांनी गायलेले “ ए मेरे वतन के
लोगो “ हे गीत गात असताना शहीद जवानांचे फोटो दाखवतात तेंव्हा डोळ्यात पाणी येते. त्या
शहीदांची आठवण करून देणारा हा कार्यक्रम सर्वानीच बघयला पाहिजे. नं कळत I am proud of
India असे तर वाटतेच पण आपल्यातील
देशभक्तीचे स्फुलिंग जागे होते. ६० वर्षानंतर का होईना आपण ह्या भागास भेट दिली
ह्यामुळे एक प्रकारचे समाधान वाटले. आधीच
यावयास हवे होते असेही वाटत राहते.
दिल्लीला इंडिया गेटवर भारतीय जवानांचे स्मारक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या
जागतिक महायुद्धात शहीद झालेले हे भारतीय जवान. त्यावेळी ते इंग्रजांच्या बाजूने
लढत होते. त्याच परिसरात १९६२ च्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक
व्हावे म्हणून आपले लष्कर प्रयत्न करीत आहे. ६० वर्षे झाली तरी अजून त्यांच्या स्मारकासाठी
जागा मिळत नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या जागेसाठी विरोध करतात हे ऐकून
संताप होतो. असे कसे आपले राज्यकर्ते? इतर राजकीय नेत्यांची स्मारके लगीच होतात.
पण १९६२ च्या ह्या शहीद सैनिकांना हे विसरून कसे जातात? दुर्दैव आपले.
दोन दिवसाच्या मुक्कामानंतर तवांग सोडले. गाड्या सेला पासकडे वळल्या. आणि एक
वेगळा अनुभव आला. धुकेच धुके. दोन फुटावरचे काहीही दिसत नव्हते. रात्री बर्फ
वृष्टी झाली होती. सर्व रस्ता बर्फाच्छादित होता. गाडी चालविणे
अश्यक्य होते . गाड्या सारख्या घसरत होत्या. अरुंद रस्ते. समोर खोल दरी. अवघड
वळणे. गाडी घसरली तर दरीतच जाणार. ह्या भागातील
जे ड्रायव्हर असतात तेच चांगली गाडी चालवू शकतात. त्यांनी चाकांना साखळ्या
बांधल्या . त्यामुळे गाडी घसरत नव्हती . सर्व वाहने अडकलेली. पुढे जाणेच अशक्य.
कमालीची थंडी. वारा ही सुटलेला. गाडीतच बसून राहावे लागले. थोडा वेळ जम्मत वाटली. आता किती तास अडकून पडणार? ह्या विचारांनी डोके
दुखले. थांबणे हाच उपाय. हिमालयात हवामान सारखे बदलत असते. आम्ही तर अडकून पडलो .
शेवटी लष्कराच्या गाड्या आल्या. त्यांनी रस्त्यावरील बर्फ काढला. रस्ता थोडासा
मोकळा केला. त्याला बराच वेळ लागला. आणि हळू हळू गाड्या पुढे सरकू लागल्या. मुंगीच्या गतीने . दोन तासांनी
थोडे खाली उतरलो. जमीन दिसू लागली आणि पुढचा प्रवास सुरु झाला. लष्कर मदतीला नसते
तर तेथेच रात्रभर अडकून पडलो असतो. जय जवान.
पुढचा १६ तासांचा प्रवास . ह्यावेळी बोमडीलाला न थांबता थेट भालुकपांगला चाललो
होतो. पोहोचलो तेंव्हा रात्रीचे ११ वाजले. भुकेल्या पोटी तसेच झोपलो. सकाळी उठलो
तेंव्हा आमचे प्रशांती हॉटेल पाहिले. रात्री काहीच दिसले नव्हते. एक सुंदर ठिकाण.
कामेंग नदीच्या काठावरचे हे सुंदर हॉटेल. थोडा फेरफटका मारला. आणि नाश्ता करून
निघालो ते काझीरंगाला जाण्यासाठी.
अरुणाचलचा अगदी छोटासा भाग आम्ही पहिला. अरुणाचल तसा खूप मोठा आहे .असा हा
रम्य अरुणाचल नं विसरण्यासारखा सुंदर आहे. आपले जवान तेथे आहेत म्हणूनच आपण येथे
सुरक्षित आहोत. आपल्या किरकोळ तक्रारीपेक्षा त्यांचे प्रश्न बिकट आहेत. त्याही
परिस्थितीत ते आपले संरक्षण करतात. जय जवान .
.
No comments:
Post a Comment