भारतातील ९९ टक्के मुलांना आय.आय.टी / आय.आय.एम
मध्ये प्रवेश मिळू शकत नाही. सर्वात हुशार मुलांनाही तेथे प्रवेश मिळू शकत नाही.
कारण प्रवेशाची चाचणी तशीच आहे. अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीची मुले-मुलीच ह्या
संस्थेत प्रवेश घेतात ह्यात वाद नाही. ज्या मुलांना भारतात अशा संस्थेत प्रवेश
मिळू शकत नाही ती मुले मात्र अमेरिकेतील अत्यंत नांवाजलेल्या विद्यापीठात अगदी सहज
प्रवेश घेताना दिसतात.त्याठिकाणी ती विलक्षण यशस्वी होतानाही दिसतात. एक वेळ आय.आय.टी
/ आय.आय.एम मध्ये प्रवेश मिळणे शक्य नाही पण हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळू
शकतो. ह्यावरून आपल्या शिक्षण पद्धतीविषयी प्रश्न निर्माण होतो. काहीजण इग्लंडमधील
नावाजलेल्या विद्यापीठातही प्रवेश घेताना दिसतात व यशस्वी होताना दिसतात. ह्याचा
अर्थ असा की ह्या ठिकाणी खूप बुद्धिमान शास्त्रज्ञ / तंत्रज्ञ निर्माण होतात असा
नाही तर अशा काही चांचणी पद्धतीमुळे अनेक चांगले विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास
अपात्र ठरतात. अर्थात ह्या चाळणीतून उत्तमातले उत्तम विद्यार्थी निवडले जातात आणि
तेच विद्यार्थी पुढे अमेरिकेची वाट धरतात आणि तेथे अधिक यशस्वी होताना दिसतात.
ह्या देशात फारसा वाव मिळत नसल्यामुळे ते तिकडे जातात ही वस्तुस्थिती आहे.
अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर Microsoft चे नवीन सीइओ झालेले
सत्या नडेला ह्यांचे. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे नारायण मूर्ती ह्यांचा मुलगा. अशी
अनेक उदाहरणे सहज देता येतील ह्या लोकांना भारत सोडल्यानंतर दैदीप्यमान यश कसे मिळवता येते ? अगदी जूनी उदाहरणेही
तपासून पाहता येतील. १९६८ मध्ये वैद्यक शास्त्रातील नोबेल मिळविणारे हरगोविंद
खुराणा, १९८३ मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रात नोबेल मिळविणारे सुब्रह्मण्यम चंद्रशेखर आणि २००९ मध्ये रसायन
शास्त्रात नोबेल मिळविणारे वेंकटरामन रामकृष्णन. ह्या सर्वांनी भारत सोडला आणि
जगात आपले नांव कमविले. हे कसे काय ? अलीकडेच आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
ह्यांनी सुद्धा हाच मुद्दा आपल्या भाषणातून व्यक्त केला.
सत्या नडेला हे भारतातील कोणत्याही आय.आय.टी / आय.आय.एम मध्ये प्रवेश
घेऊ शकले नाही. त्यावेळी फारसे प्रसिद्ध नसलेल्या मणिपालच्या संस्थेमधून शिक्षण
घेऊन ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले . त्यांच्या गुणांना तेथे वाव मिळाला आणि
मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य तो वापर केल्यामुळे ते आज सर्वोच पद मिळवू शकले.
आय.आय.टी / आय.आय.एम मधून बाहेर पडलेल्या बहुतेक मुलांना भारतात मोठ्या
पगाराच्या नोकऱ्या मिळतात हे खरे आहे. हेच ओळखून त्याच धर्तीवर अनेक शिक्षण संस्था
उभ्या राहिल्या आहेत. त्यांची संख्या वाढतेच आहे. शिक्षणाच्या ह्या बाजारात अनेकजण
शिक्षणसम्राट होऊन पैसा मिळवताना दिसत आहेत आणि असंख्य एम.बी.ए ह्या बी-स्कूल मधून
बाहेर पडताना दिसत आहेत.
अगदी अलीकडेच वर्तमानपत्रातून वाचलेली बातमी फार धक्कादायक आहे .” इंजिनीअरिंग
आणि व्यवस्थापकीय शिक्षण ( MBA ) देणाऱ्या संस्थाना पुरेसे विद्यार्थीच मिळत
नाहीत. बहुसंख्य जागा रिकाम्या आहेत. अनेक संस्थाना पहिल्याच फेरीत पुरेसे
विद्यार्थीच मिळू शकले नाहीत.”. ह्याचा अर्थ काय ? हे शिक्षण देणाऱ्या संस्थांची
संख्या खूप झाली आहे किंवा ह्या संस्थामधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर त्यांना
चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी तिकडे फिरकत नाहीत. अशी विलक्षण
अवस्था B-School ची झाली आहे, त्याची कारणे काय असावीत आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या
काय मर्यादा आहेत हे शोधण्याचा हा एक प्रयत्न.
मी पीएच.डी झाल्यानंतर मुंबईतील एका कंपनीत काहीं वर्षे संशोधन
विभागात काम करीत होतो. दरवर्षी आमच्या कंपनीत फार मोठ्या प्रमाणावर पी.एच.डी आणि
एम. बी. ए झालेल्या मुलांना नोकरीवर घेत असत. बहुतेक एम.बी.ए. कलकत्ता किंवा
अहमदाबादच्या प्रसिद्ध आय.आय.एम मधील असत. दरवर्षी किमान ८-१० एम.बी.ए, कंपनीत
घेण्यात येत असत. ही मुले बहुतेक आय.आय.टी/आय.आय.एम मधून शिक्षण घेतलेली होती. आज
त्यातील बहुतेक जण विविध कंपन्यामध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत हे खरे आहे.माझा
त्यांच्याबरोबर नेहमी संपर्क असे. पण त्यावेळी असा एक प्रश्न विचारला जात असे की
एवढे चांगले शिक्षण घेऊन ही मुले साबण, शाम्पू आणि इतर वस्तू विकण्याचा व्यवसाय
कशास करतात ? त्यांच्या मुलभूत शिक्षणाचा उपयोग काय ? ह्यातील १-२ व्यक्ती
सोडल्यास कोणीही मोठा उद्योजक झालेला नाही. उत्पादन तंत्र आणि विक्रीचा मंत्र
माहीत असूनही कोणीच स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा करू शकले नाही. ते व्यवस्थापक (Manager)
झाले पण एखाद्या उद्योगाचे मालक ( Owner ) होऊ शकले नाहीत . त्यांच्या B-School
मधील शिक्षणाचा उपयोग काय झाला? हीच ह्या शिक्षणाची मर्यादा दिसून येते. अलीकडे
आपले चांगले इंजिनिअर/ तंत्रज्ञ त्यांचा मूळ विषय विसरून जातात आणि आय.टी
क्षेत्रांत प्रणाली ( Programmimg ) लिहीत बसतात किंवा एम.बी.ए होण्याच्या मागे
लागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की जे ज्ञानासाठी अधिक भुकेले असतात तेच
पुढे काहीतरी नवीन करून दाखवू शकतात.
सत्या नडेलाचेच उदाहरण घ्या. ते प्रथम तंत्रज्ञ होते. ते “
INNOVATION” हाच मंत्र गाणारे तंत्रज्ञ आहेत. ते Technologist First and Manager Next आहेत .त्यांच्याजवळ
व्यवस्थापकीय पदवी सुद्धा आहे. Technology and Management अशा दोन्ही क्षेत्रात
त्यांनी प्राविण्य मिळविले आहे, हे वैशिष्ट्य.
एम.बी.ए ही पदवी फारशी उपयोगाची कां नाही? असा प्रश्न जेंव्हा निर्माण
होतो तेंव्हा B-School च्या काहीं मर्यादा दिसू लागतात. अनेक उद्योजक ह्यासंबंधी
प्रश्न उभे करताना दिसतात. कारण त्यांच्या अपेक्षांना ही मुले पूर्णपणे उतरत
नाहीत. त्यांच्या जवळ योग्य ते शिक्षण किंवा कौशल्य ( Skills ) दिसून येत नाही. त्यासाठी
खाली नमूद केलेल्या चार मुख्य गोष्टींची आवश्यकता असते.
१ पत्रव्यवहार कौशल्य / निवेदन कौशल्य ( Communication – Writing and
oral )
२ संयोजकता / संयोगक्षमता ( Adaptability )
३ सूक्ष्म दृष्टीने विचार करण्याची क्षमता / टीकाकुशल विचार करणारा ( Critical Thinking ) आणि
४ कल्पकता / कल्पक उद्योजकता ( Creativity )
ह्या चार गुणांचा जसा अभाव दिसून येतो. तसाच खालील महत्वाचे गुणही
दिसून येत नाहीत.
१ नवा बदल ( Innovation ) / नवे तंत्रज्ञान / नवे उत्पादन
२ व्यापारी निपुणता ( Business Accumen )/ व्यापारविषयक शहाणपण
३ उद्योजक योग्यता / सामर्थ्य ( Entrepreneurial Ability )
हेन्री फोर्ड हे प्रसिद्ध उद्योगपती म्हणाले होते, “ कोणत्याही शाळेत उद्योजक घडवता येत नाहीत.
एम.बी.ए. चे शिक्षण देणाऱ्या संस्था उद्योजक पुस्तकी ज्ञानाने निर्माण करू शकत
नाहीत. तसे असले असते तर आजपर्यंत शेकडो उद्योजक निर्माण झाले असते.”
हेन्री फोर्ड असेही म्हणाले होते , “ माझा मार्केट रिसर्चवर फारसा
विश्वास नाही. मी लोकांना कशा प्रकारचे वाहन हवे म्हणून विचारले असते तर लोकांनी
खूप वेगाने धावणारा घोडा हवा असे उत्तर दिले असते. पण मी जेंव्हा वेगवान धावणारी
कार दाखविली तेंव्हा त्यांनी तिचे स्वागत केले.”
स्टीव्ह जॉब्सने हेच लक्षात घेतले. त्यांनी नवीन नवीन उत्पादने
बाजारात आणली. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ते यशस्वी उद्योजक झाले.
ते तंत्रज्ञ होते पण व्यवस्थापकीय पदवीधर नव्हते. त्याच्याजवळ एम.बी.ए, ही पदवी
नव्हती.
धीरूभाई अंबानी , बिल गेट्स , स्टीव्ह जॉब्स ,किर्लोस्कर , गरवारे अशी
असंख्य उदाहरणे देता येतील. त्यांच्याजवळ एम.बी.ए.ची पदवी नव्हती. अगदी अलीकडीचे उदाहरण द्यायचे तर Infosys चे नारायण मूर्ती आणि
त्यांचे सहकारी. तसेच Wipro चे अझीझ
प्रेमजी. ह्यांच्याजवळ कोणतीही व्यवस्थापकीय पदवी नव्हती.
उद्योजक आणि व्यावसायिक ह्यांच्याजवळ नव्या कल्पना / संकल्पना ( Ideas
) असतात. त्यांच्याजवळ कल्पनांची प्रयोगशाळा ( Idea Laboratory ) असते. बिल गेट्स
आणि स्टीव्ह जॉब्स ह्यांनी नव्या कल्पनांचा ध्यास घेतला. त्यासाठी ज्ञान आणि नवे
तंत्रज्ञान ( Knowledge and Innovation) ह्यांची सांगड घालावी लागते. “ एक लाखात
कार “ ही रतन टाटांची कल्पना नव्हे तर स्वप्न होते. त्यामुळे Nano बाजारात आली आणि
संपूर्ण ऑटोइंडस्ट्रीच बदलून गेली.
ज्ञान , अनुभव आणि कार्यक्षमता ह्या तीन गोष्टीमुळे उद्योजक घडतो. तो
शाळेत शिकून तयार होत नाही. Thomas एडिसनने दिव्याचा शोध लावला पण त्यानंतर एक फार
मोठा वीजउद्योग निर्माण केला. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. स्टीव्ह जॉब्स आणि बिल
गेट्स हे दोघेही नवी नवी उत्पादने बाजारात आणल्यामुळे मोठे झाले. आजही स्वतःच्याच
कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर बिल गेट्स तांत्रीक सल्लागार म्हणून कामाला लागले
आहेत . Infosys ला त्यामुळेच नारायण मूर्तींची पुन्हा आवश्यकता वाटली.
सतत बदलणारे जग आणि आजूबाजूची परिस्थिती , नित्य नवे तंत्रज्ञान ह्यामुळे
परिस्थितीचे अचूक निदान करणे व योग्य तो निर्णय घेणे ह्यासाठी जे आवश्यक असलेले
नेतृत्व लागते ते ह्या व्यवस्थापकीय शिक्षणातून मिळत नाही हा एक मोठा आक्षेप आहे. त्यासाठी नुसते पुस्तकी ज्ञान
उपयोगी नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
ह्याचा अर्थ एम.बी.ए पदवीधर नको आहेत किंवा त्यांचा फारसा उपयोग आहे ,असे
म्हणणे नाही. त्यांची उद्योग /व्यवसायात आवश्यकता असते. एखादा यशस्वी ठरलेला
उद्योग पुढे कसा वाढविता येईल त्यासाठी व्यवस्थापक हवे असतात. व्यवस्थापकीय शिक्षणामुळे
प्राप्त झालेले ज्ञान व्यवस्थापक (Manager) होण्यासाठी पुरेसे असते. त्यामुळेच
ह्या शिक्षणाचे तसे महत्त्व आहे.” मीच माझा Boss “ असे ज्याला वाटते तोच उद्योजक
होण्यासाठी प्रयत्न करतो. नाहीतर तो साधा पगारी व्यवस्थापक होतो. चांगला
व्यवस्थापक होतोच असे नाही. कारण त्याने घेतलेल्या शिक्षणाला मर्यादा असतात.
यशस्वी उद्योजक किंवा व्यावसायिक व्हायचे असेल तर खालील गुणांची
आवश्यकता आहे.
·
दूर दृष्टी ( Vision ) * ज्ञान * अनुभव *
स्वामित्व ( Ownership ) * ऊर्जा * टिकाऊ शक्ती ( Staying Power ) * विश्लेषण
कौशल्य * जोखीम घेण्याची क्षमता * साधनांचा खुबीने वापर * कल्पकता * नवी उत्पादने * आरंभ करण्यासाठी पुढाकार/ स्वयंकर्तृत्व (
Initiative ) * स्वतःचा / सहकार्यांचा /कर्मचाऱ्यांचा विकास * बदल ( Change )
नियंत्रण * भावना ताब्यात ठेवणे * प्रामाणिकता/सचोटी
·
ह्या वर नमूद केलेल्या गोष्टी तर महत्वाच्या
आहेतच. त्या बरोबर उत्पादन (Product) – तंत्रज्ञ (Technology) – उत्पादन प्रक्रिया
(Process) आणि विक्रीनंतरची सेवा (Service after sales) ह्या चार सूत्रांचा विचार
आवश्यक आहे. व्यवस्थापकीय पदवीधर शेवटच्या दोन गोष्टीत विशेच ज्ञानी असतात तर
पहिल्या दोन गोष्टीत त्यांना कमी ज्ञान असते व ते कमी पडतात.
·
Idea Laboratory ( कल्पनांची प्रयोगशाळा ) फार
महत्वाची असते. शास्त्रज्ञ/ तंत्रज्ञ ह्यात तरबेज
असतात पण इतरांना हे जमतेच असे नाही. व्यवस्थापनातही Idea Laboratory ची फार
महत्वाची भूमिका असते.
·
कोणताही उद्योग मोठा होतो जेंव्हा त्याचे एकच
ध्येय असते.” Grow.. Grow and.. Grow”. त्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य
ह्या दोन्हींची आवश्यकता असते. एकच कौशल्य असून चालत नाही.
हार्वर्ड मध्ये व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला
आपण सीइओच होणार असे वाटत असते. प्रत्येकजण होतोच असे नाही. उद्योगामध्ये किंवा
स्वतंत्र व्यवसायामध्ये अनेक छोटी छोटी कामे करावी लागतात ह्याचे भान ह्या एम.बी.ए
पद्विधराना नसते. त्यामुळेच ते यशस्वी होऊ शकत नाहीत. ही ह्या शिक्षणातील प्रमुख
त्रुटी. ही मुले फक्त स्वतःचाच विचार
करतात. दर दोन-तीन वर्षांनी जॉब बदलतात. माझी कंपनी , माझा product , माझा कारखाना
, माझी माणसे हा विचार त्यांच्यात नसतो. जेथे आपण नोकरी करतो त्या कंपनीशी त्यांची
बांधिलकी नसते. ह्या त्यांच्या मनोवृतीमुळे ते टिकत नाहीत . त्यामुळे ठोस अशी
कर्तबगारी दिसून येत नाही. मुख्यता: ३० वर्षाखालील पदवीधर सारख्या नोकऱ्या बदलत
असल्यामुळे त्यांचे कौशल्य कमी होते व सर्वांगीण अनुभव कमी होतो. सत्या नडेला
ह्यांनी २२ वर्षे त्याच कंपनीत निरनिराळ्या विभागात काम केलेले असल्यामुळेच ते
सीइओ होऊ शकले. .हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सतत नवीन काहीतरी करून दाखवायचे ,
शिकत राहायचे , अनुभवातून संस्थेला मोठे करावयाचे . हे महत्वाचे असते. व्यवस्थापकीय
शिक्षण घेतलेली बहुसंख्य मुले मार्केटिंग किंवा सेल्स मध्येच असतात. काहीं
प्रमाणात ते यशस्वी होताना दिसतात. काहीजण
स्वतःलाच विकत असतात तेंव्हा ते चांगले सेल्समन होतात. एम, बी. ए. मुलामध्ये हा
गुण प्रामुख्याने दिसून येतो. शिक्षणामुळे त्यांच्यात थोडासा Smartness आलेला
असतो. एवढेच. मार्केटिंग हे काहीं परिपूर्ण विज्ञान किंवा शास्त्र नाही. हे
त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांचे नेहमीचे ठोकताळे चुकतात. त्यासाठी
अनुभवातून आलेले शहाणपण खूप उपयोगी पडते हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी
आय.आय.टी/ आय.आय.एम च्या पदव्या हव्यात कशाला ? Consumer Product विकण्यासाठी ही
मंडळी थोडीशी उपयुक्त असतात ह्यात वाद नाही. त्यासाठी नेतृत्व , ग्राहकांशी संबंध
आणि त्यांच्यात निर्माण झालेला उत्पादनाचा आणि कंपनीचा विश्वास हे फार महत्वाचे
असते. त्यासाठी Field Experience महत्वाचा असतो. पुस्तकी ज्ञान अपुरे पडते. सतत
शिकत राहणे हाच एक उपाय. त्यामुळे अनुभवातून शिकणे महत्वाचे असते.
बी-स्कूलमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना व्यवसायातील धाडसीपणा ( Courage
) शिकवला जात नाही. तो उपजत असावा लागतो. .त्यामुळे जोखीम (Risk) घेणे त्यांना जमत
नाही असे दिसते. जोखीम घेऊन निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तो यशस्वी होऊ शकतो.
पुस्तकी ज्ञान अपुरे पडते. त्यामुळेच नेता तयार होत नाही. तेच ते कामं करणारा
व्यवस्थापक मात्र मिळतो. तो चाकोरी बाहेर काहीही करू शकत नाही,
व्यवस्थापक हा पगारी असल्यामुळे तो उद्योजकासारखा विचार करू शकत नाही.
तो स्वतःचाच जास्त विचार करतो. अधिक प्याकेजचा विचार करतो. त्याची निष्ठा कंपनीशी
नसते. त्याची बांधिलकी तात्पुरती असते. उद्योजकासारखे मोठे स्वप्न ( Big Dream )
पाहणे त्याला माहीत नसते. त्यासाठी धीरूभाई किंवा स्टीव्ह जॉब्स होणे आवश्यक आहे. धीरूभाईसारखा
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून देणारा एक साधा माणूस जगातल्या सर्वात मोठ्या
पेट्रोलियम कंपनीचा मालक कसा होतो हे
समजून घेतले पाहिजे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तो स्वप्न पाहणारा व त्यासाठी
धडपडणारा माणूस आहे. कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना अनेक बुद्धीमान ( Ph.D आणि
M.B.A.) माणसे त्यांचे पगारी सल्लागार
होते. त्यासाठी स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास असावा लागतो. आपल्या हाताखाली
काम करणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींना प्रेरित
करावे लागते. त्यासाठी नेतृत्व गुण असणे आवश्यक आहे.हे सारे वर्गात कसे शिकवणार
?सुरुवात छोटीशी करावयाची असते पण स्वप्न मोठे पहावयाचे असते. प्रयत्नशील रहावयाचे
ज्याला जमते तोच यशस्वी होऊ शकतो. नाहीतर व्यवस्थापकीय पदवी फक्त साधा व्यवस्थापक
होण्यासाठी उपयोगी पडते.
Wall Mart चा संस्थापक Sam Walton म्हणाले होते , “ I am
more of Manager by walking and flying around. In a team , I have played to my
strength and relied on others to make-up for my weakness. “ .
धीरूभाई अंबानी ही असेच होते.
Ernest Shackelton हा एक प्रसिद्ध संशोधक. Antartic Expedition साठी
त्याला काही लोक / मदतनीस हवे होते. त्यासाठी त्याने एक जाहिरात दिली होती. ती अशी
...
“Men wanted for hazardous journey. Small wages, bitter
cold, long months of complete darkness, constant danger, safe return doubtful,
honour and recognition in case of success.”
आता तुम्हीच सांगा B-School चा कोणता पदवीधर ह्यात सहभागी होईल.
त्यामुळेच तो उद्योजक होतांना दिसत नाही. हीच ह्या बी-स्कूलच्या शिक्षणाची त्रुटी
आहे.
डॉ. नरेंद्र गंगाखेडकर,
No comments:
Post a Comment