Friday, July 12, 2019

पांडुरंग पांडुरंग




अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे असे मला कधीच वाटले नाही . ते मी सहसा टाळतो. एकदा मला पांडुरंगाचे बोलावणे आले . माझा पुण्याचा मित्र मधुकर दंडारे आणि माझे व्याही रंगनाथ कुलकर्णी ह्यांनी पंढरीला जाऊ असे फर्मान काढले आणि आम्ही निघालो. मधुकरचा चुलत भाऊ तेथील बडव्यांपैकी एक . त्यामुळे सर्व व्यवस्था ठीकठाक. आम्ही संध्याकाळी पंढरपुरात पोहोचलो . त्यांच्या घरी गेलो . त्यांनी सांगितलं , ‘रात्रीचे जेवण करून घ्या . मग १०:३० / ११ वाजतां दर्शनाला घेऊन जाईन. गर्दी कमी असते’. आमचं जेवण ८ वाजतां झालं . मग आम्ही इंद्रायणीकाठी असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला गेलो. चांगल्या रूम मिळाल्या . थोडी विश्रांती घेत होतो . माझा मोबाईल वाजला. फ्लोरीडाहून माझी मुलगी ऋतू बोलत होती . फ्लोरिडा हरिकेनसाठी प्रसिद्ध . ह्यापूर्वी तिला थोडा अनुभव होता. सध्या ती एकटीच नोकरीसाठी वेस्ट पाम बीच ला रहात होती. हरिकेन त्यांच्या शहराजवळ आला होता. नंतर सर्व व्यवहार बंद होणार होता .वीज / फोन बंद होणार होते . त्यामुळे तिने फोनकरून आम्हाला कळविले . काळजी करू नका असे आम्हाला सांगितले आणि फोन बंद झाला. आम्ही मात्र काळजीत. मी मोबाईल इंटरनेटवर हरिकेनची माहिती मिळवणे चालू केले . कशातच लक्ष लागत नव्हते. ११ला सगळे तयार झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला निघालो खरे . पण कशातच लक्ष नव्हते . हरिकेन ! हरिकेन! त्याचा धुमाकूळ . त्याची वाचलेली वर्णने . कीवेस्ला त्याने केलेली हानी . मंदिरात प्रवेश केला . गर्दी फारशी नव्हती. नंबर लागला. यथासांग पूजा झाली. विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले . कोणत्याही देवळात असा देवाचा पदस्पर्श होत नाही. अनेक संतांची आठवण झाली. त्यांनी ह्या विठुरायाच्या पायावर भक्तिभावाने डोके ठेवले होते. आमचे छान दर्शन झाले. देवळातून निघालो. रूमवर आलो . १ वाजला. फ्लोरीडाला फोन लावला . फोन बंद. इंटरनेटवर हरिकेनने घातलेला धुमाकूळ आणि त्याची वर्णने. लक्ष कशातच नव्हते. रात्र जागण्यातच गेली . सकाळी सर्व आटोपून मुंबईकडे निघालो. मध्ये संपर्क होतच नव्हता. पुढे एका पेट्रोल पंपावर ऋतूच्या मित्राचा फोन आला. त्याने सांगितले हरिकेनने फार धुमाकूळ घातला आहे . ऋतू कपड्याच्या कपाटात बसून होती. दारे - खिडक्या फुटल्या होत्या . आता वादळ शांत झालंय. ती सुखरूप आहे. मुंबईला पोहोचलो. २ दिवसांनी ऋतूने फोन केला.तिने केलेले ते वर्णन ऐकून आम्ही घाबरलो . एक संकट टळले. जेंव्हा आमचे पांडुरंग दर्शन झाले तेंव्हाच हरिकेन तो भाग सोडून वेगाने पुढे गेला . आम्हाला आजही वाटते ती पांडुरंगाची कृपा . श्रद्धा असो का नसो . अशा विलक्षण शक्ती आपल्याला आशीर्वाद देत असाव्यात . 
त्यानंतर आम्ही एकदा पंढरपुला गेलो. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. त्याचा तो आशीर्वाद नवी ऊर्जा निर्माण करते . माऊलीच ती.

No comments:

Post a Comment