Friday, August 2, 2019

A SHORT WALK IN HINDUKUSH


गिर्यारोहक मंडळी भन्नाट जीवन जगत असतात . त्यांच्या  जगण्यात  एक थ्रिल असतं . किती विविधता अनुभवतात ! निसर्गाशी नातं जुळलेलं असतंच . निसर्ग साथ देतो असं नाहीच . किती तयारी करावी लागते ? प्रवास , व्हिसा , प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम , इतर देशातील वकिलातीतील  माणसं , वाटाडे , कुक , बांधून घ्यायचं सामान , होणारी चिडचिड , बरोबर घ्यावी लागणारी औषधं , सहप्रवासी असलेल्या लोकांचे स्वभाव , निराश होणारं मन , अत्युच्च आनंदाचे क्षण , निसर्गाची विविध रूपं . एक ना अनेक .
एरीक न्युबीचं हिंदुकुश पर्वतावरील शिखरं गाठण्याचं प्रवास वर्णन वाचत असताना मीच त्या गिर्यारोहणाचा अनुभव घेत होतो .
विशेष म्हणजे भौगोलिक परिसराचे वर्णन करताना जुना  इतिहासही तितकाच महत्वाचा . ग्रेट अलेक्सझांडर ह्याने हिंदुकुश पर्वताच्या बाजूने प्रवास करीत हिंदुस्थान कसा गाठला ?न्यूरिस्तान / काफिरीस्तान ओलांडून बाबर भारतात कसा आला ? लॉर्ड कर्झन ह्यांनी ह्या भागाला भेट कशी दिली ? युरोपियन लोकांनी अनेकदा स्वाऱ्या करून ह्या भागातील सुंदर स्त्रियांशी संग साधून युरोपियन रंगाची संतती कशी निर्माण झाली ? अशी आणि विविध माहिती ह्या पुस्तकातून मिळते . बाबरनामा इंग्रजीतून अनुवादित झाला आहे . इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून हा भाग पादांक्रत केला आहे . तो जणू रोड मॅप टू इंडिया .

इतिहास आणि भूगोल एकत्रच वाचले पाहिजेत . हा ऐतिहासिक भाग वाचायचा नसेल तर सरळ पुढच्या प्रकरणाकडे जा , अशी नोट दिली आहे .
ह्या भागातून निघालेल्या नद्या पुढे सिंधू नदीला कशा मिळतात ह्या संबंधीचे वर्णन सुंदर आहे . आपण लेहला सिंधू नदी पहातो . त्यानंतर ती पाकिस्तानात जाते . नुब्रा व्हॅलीला आपण काराकोरम पर्वतांच्या रांगा पहातो . सियाचेनचा पुढील भाग लष्करी परवानगीशिवाय आपण पाहू शकत नाही . हिंदुकुश पर्वतांच्या रांगा विलोभनीय आहेत . हे लक्षात येते . बाबर किंवा अलेक्झांडर त्या मार्गाने भारतात कसे आले असतील  ?, आणि इंग्रजांनी हा भाग कसा पालथा घातला असेल, ह्याचे चित्र ह्या पुस्तकातून समोर उभे राहते . हे नुसते गिर्यारोहणाचे प्रवास वर्णन नाही . ह्यातून ह्या भागाचा इतिहास - भूगोल डोळ्यासमोर उभा राहतो . एक अप्रतिम प्रवासवर्णन .


No comments:

Post a Comment