Friday, April 17, 2020

नॉट विदाऊट माय डॉटर


बेट्टी महमुदी ह्या अमेरिकन लेखिकेचे हे पुस्तक लीना सोहोनी ह्यांनी अनुवादित केले असून मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यांनी प्रकाशित केले आहे .
तसे बऱ्याच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले हे पुस्तक वाचायचे राहून गेले होते. सहज गप्पा मारताना ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कोरोनामुळे रिकामपण होते. किंडलवर ते पुस्तक  उपलब्ध होते. त्यामुळे लोडकरून  लगेच वाचायला घेतले. पहिले प्रकरण वाचले आणि हे पुस्तक वाचून संपवले पाहिजे असे वाटले. इराणी लोक, इराणी कुटुंबे आणि इराणी इस्लामिक संस्कृती  ह्याबद्दल मलाही  एक कुतुहूल होतं. मी जगात अनेक देश बघितले आहे. इराणला मात्र अजून पर्यंत गेलो नाही. इराणी लोकांच्याबद्दल फारशी माहिती नाही. पूर्वी मुंबईत कोपऱ्यावर एखादे तरी इराणी हॉटेल असे. तेथे इराणी चहा पिला होता. काउंटरवरचा इराणी पाहिला होता. अमेरिका-इराण युद्धाच्या बातम्या आणि खोमेनीचा उदय ह्याबद्दल वर्तमानपत्री माहिती होती.  एका अमेरिकन स्त्रीने अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या एका इराणी डॉक्टर बरोबर लग्न केल्यानंतर तिला आलेले वैयक्तिक अनुभव म्हणजे हे तिचे आत्मवृत्त. त्यामुळे मी हे पुस्तक वाचायला घेतलं.
हे पुस्तक तसे खूपच गाजले होते. त्यावर एक चित्रपटही  निघाला होता. त्यामुळे बेट्टी महमुदी खूप प्रसिद्ध झाली होती. स्त्रीया आणि मुलांच्यासाठी वन वर्ल्ड: फॉर चिल्ड्रेन अशी एक सामाजिक संस्था त्या चालवीत असतात. ते ऐकले आहे.
बेट्टी महमुदी  ही अल्पेना, मिशिगनची. टिपिकल अमेरिकन. तिचे आई-वडील मिशिगनचे. १९८४-८६ चा काळ. ती एका इराणी मुलाच्या प्रेमात पडते. तिला एकदा अपघात होतो. हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. तिची केस ज्या डॉक्टरकडे असते तो इराणी नवशिका डॉक्टर असतो. त्याचे नाव असते सय्यद बोझॉर्ग महमुदी. तो तसा अमेरिकन संस्कृतीत रुळलेला दिसतो. तो तिच्यावर उपचार करताना त्या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू  लागते. त्यांची मैत्री वाढत जाते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि काही काळाने एकमेकांची बऱ्यापैकी ओळख झाल्यानंतर भिन्न संस्कृतीचे असूनही प्रेमामुळे लग्न करतात. त्यांना एक मुलगी होते. तिचे नाव असते मोहताब. ती चार वर्षाची होते.
सय्यद महमूदी चार वर्षात तेहरानला आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेला नसतो. त्याला आई-वडील नसतात. पण जवळची इतर नातेवाईक मंडळी असतात. मोठ्या बहिणीने आईसारखेच प्रेम दिलेले असते. लहानाचे मोठे केलेले असते. मोठे इस्लामी कुटुंब. बायकोला  आणि मुलीला घेऊन १५ दिवसासाठी इराणला जाण्यासाठी तो  तिला तयार करतो. आपण माझ्या नातेवाईकांना  भेटून १५ दिवसात परत येणार आहोत. तुला आमचं घर पहायला मिळेल, माझे नातेवाईक मंडळी, माझी माणसं भेटतील. तेहरान पहायला मिळेल. माझ्या नातेवाईकांना तुला आणि आपल्या मुलीला भेटावेसे वाटते आहे. ते खूप उत्सुक आहेत. अशी कारणे सांगून तो तीला इराणला जाण्यासाठी तयार करतो. ती अमेरिकन. त्यावेळी इराण - अमेरिका संबंध तणावपूर्ण असतात. तिच्या आई- वडिलांना  तिची इराणला जाण्याची भीती वाटत असते. तिला स्वतःला इराणी-इस्लामिक संस्कृतीबद्दल फारसे प्रेम नसते. तो आवडलेला असतो कारण तो  इराणचा असला तरी अमेरिकन झालेला असतो.
ते तेहरानला जातात. बेट्टी महमूदी  तेथे कशी अडकून पडते आणि तिला आपल्या मुलीला घेऊन  तेथून पळून जाण्यासाठी काय काय करावे लागते, ह्याची ही दर्दभरी कहाणी!
सुरुवातीचे २-४ दिवस मजेत जातात. तिला दोन संस्कृतीचा फरक जाणवू लागतो. तिला सय्यदची बहीण आणि इतर नातेवाईक आवडत नाहीत. त्याचे राहणे-वागणे खटकत राहते. त्याची अस्वच्छता बघवत नाही. तिला एकंदर इराणी संस्कृती खटकत राहते. तिला त्या कुटुंबात राहणे असहायय होते. इस्लामिक कुटुंबातील कडवी धार्मिकता आवडत नाही. त्यांच्या जुनाट चालीरीती आवडत नाही. सय्यदची मोठी बहीण तिचा छळ करते. घालूनपाडून बोलते. सतत अपमानित करते. इतरही नातेवाईक दुट्टपी वागतात. सय्यदचें कुटुंब तिचा छळ करू लागतात. घालूनपाडून बोलतात. तीला हिणवतात. सय्यद आता अमेरिकेत असतांना जसा प्रेमिक असतो तसा  वागत नाही. तोही  तिचा छळ सुरु करतो. अमेरिकेतील आपला नवरा तो हाच का?, असा प्रश्न तिला पडतो. सय्यद मोहताबला खूप छळतो. तो इराणमध्ये गेल्यावर पार बदलून गेलेला कट्टर इस्लामी होतो. मारहाण करणे, बायकोला घराबाहेर  पडू नं  देणे. बुरख्यात राहणे. घरातील एका खोलीत कोंडून ठेवणे. घराला कुलूप लावून बाहेर जाणे. असे छळाचे अनेक प्रकार सुरु होतात. आई- मुलीची ताटातूट करणे. मुलीला दुखणे येईल इतके छळणे. रोज छळाचा एक नवा  प्रकार चालू होतो. बेटी महमुदीला नुसती मारहाण नव्हे तर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे. सतत धमक्या देणे चालू होते. तिने अमेरिकन स्त्रीसारखे मुक्तपणे नं जगता इराणमधील इस्लामिक स्त्रियांसारखेच राहणे ह्यासाठी  सय्यदचा हा सारा प्रयत्न असतो.  इस्लामी धर्माचे काटेकोरपणे पालन करणे आणि  चालीरीती काटेकोरपणे पाळणे ह्यासाठी तो आग्रही असतो. बेट्टी महमुदीला हे सारे असह्य  होते. ती तेथून सुटका करण्यासाठी ३ वेळा प्रयत्न करते . त्यासाठी तेथील अमेरिकन वकिलातीची मदत घेते. आपल्या आई -वडिलांना फोन करून आपली सुटका कशी करता येईल ह्यासाठी प्रयत्न करते. हे जेंव्हा सय्यदच्या लक्षात येते तेंव्हा तो तिचा अधिक छळ करू लागतो. तिच्यावर पाळत ठेवतो. नातेवाईकांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगून तिचा अनन्वित छळ सुरु होतो. तिचे घरातून बाहेर पाडण्याचे सर्व मार्ग बंद केले जातात. फोनचा वापर बंद होतो.
अशी ही  एका इराणी कुटुंबात अडकलेली   अमेरिकन स्त्री. तिचा तो कल्पनाही करता येणार नाही इतका छळ. बेट्टी  महमुदी आपल्या ४ वर्षाच्या मोहताबला घेऊन ५०० मैलाचा प्रवास करून तुर्कस्तानात  कशी पळून जाते ह्याची ही चित्तथरारक कहाणी. त्यासाठी तिने केलेले प्रयत्न, सोसलेल्या हालअपेष्टा वाचतांना अंगावर काटा  उभा राहतो. ह्या पळून जाण्यातही अडथळ्यांची माळ आहे. तुर्कस्तानात प्रवेश करण्यापूर्वी सीमेवरील  आदिवासी मंडळी तिला कशी माणुसकी दाखवितात  हे वाचताना मात्र आपले मन भरून येतं.
इराणी माणसाशी लग्न केलेल्या कोणत्याही अमेरिकन स्त्रीने इराणमधून पळून जाण्याचा असा प्रयत्न केलेला नाही. कारण तसे साहस  कोणातच  नव्हते. त्यामुळे ही  कथा वेगळी आहे त्यात साहस आहे . ह्या छळकथेत  मानवी अमानुषता आहे.
FIERCE, FRIGHTENING AND REAL Story  ह्याच योग्य शब्दात  ह्या कादंबरीचे वर्णन करता येईल. 
असं हे अस्वस्थ करणारं पुस्तक. अवश्य वाचा. ही एक वास्तव असलेली भीतीदायक कथा आहे. आक्रमक आणि उग्र असलेल्या इराणी शिक्षित डॉक्टरची गोष्ट आहे. एका अमेरिकन स्त्रीचा इस्लामिक इराणी कुटुंबात झालेला हा छळ बघून आपलाच  श्वास कोंडतो. सुटकेसाठी बेट्टीने  केलेले अथक प्रयत्न म्हणजे हेरगिरी तंत्र. ते  कसे वापरावे लागतात ह्याचे अनोखे चित्रण ह्या कथेत आहे . ही एका  स्त्रीच्या अवहेलना आणि दु:खाची दर्दभरी  कहाणी  आहे. धर्मामुळे माणसाला बसत असतो तो  CULTURAL  शॉक. त्यातून तशी सुटका ही  अवघड असते  माणूस कितीही शिकला, उच्चविद्याविभूषित झाला तरी धर्म आणि कौटुंबिक संसंस्कृतीचा  जो पगडा असतो त्यामुळे तो अमानवी होत जातो. क्रूर आणि बेभान  होतो. आणि ज्या स्त्रीवर तो प्रेम करतो तिचाच छळ करतो. त्याचीही ही  कहाणी आहे .

WHERE THERE IS WILL, THERE IS A WAY, हे खरेच. बेट्टी महमुदीची दर्दम्य लढण्याची शक्ती व स्वतःला मुक्त करण्याची इच्छा - हेच ह्या पुस्तकात दिसून  येते. When I was reading this book, I was getting shocks after shock. इराण मधील स्त्रियांचे जगणे कसे असेल?, असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता.
एक महत्वाचा मुद्दा. सर्वच इराणी माणसे किंवा इराणी कुटुंबे अशीच असतात असे नाही. बेट्टी महमुदीला तेथील वास्तव्यात  अनेक चांगले इराणी भेटले. त्यांची व्यक्तिचित्रे तीने ठळकपणे उभी केली आहेत.   अमाल  हा इराणी माणूस बेट्टीला इराणमधून पळून जाण्यासाठी ज्या प्रकारची मदत करतो ते पाहिलं म्हणजे त्या देशातही तेथील व्यवस्थेला कंटाळलेले  माणसे मानवता जपणारी आहेत. ती मोठ्या मनाची माणसे आहेत. ह्या पुस्तकात ३-४ अशा अमेरिकन स्त्रिया आहेत ज्यांनी इराणी माणसाशी प्रेम करून लग्न केलं पण त्यांच्या संसाराचे मात्र मातेरे झाले आहे. त्या अभागी आहेत,  दुर्दैवी आहेत.
बेट्टी महमुदीने आपली सुटका व्हावी म्हणून प्रयत्न करताना कुराणाचा ही बारकाईने अभ्यास केला. तिचा जीव अडकला होता तो तिच्या मुलीत. तिला एकटीला सुटका नको होती. तिला मुलींचीही सुटका करावयाची होती. कुराणातील नियमाप्रमाणे तिला घटस्फोट मिळाला असता. पण तेथील नियमाप्रमाणे मुलीचा हक्क मात्र  नवऱ्याला मिळाला असता.
आपली मुलगी मोहताब ही कोणत्याही परिस्थितीत आपला इराणी नवरा सय्यद महमूद ह्याच्या हातात पडू द्यायची नाही. ह्यासाठीच पळून जाताना जो मार्ग निवडला तो अधिक कठीण  होता.  तरी तसे करणे आवश्यक होते. तसे तिला एकटीला पळून जाणे  थोडे सोपे होते पण  मुलीला घेऊन पळून जाणे हा  मार्ग  धोक्याचा होता. त्यामुळेच ह्या पुस्तकाचे नाव आहे ...
NOT WITHOUT DAUGHTER  हे अतिशय  समर्पक  असे नांव आहे  . एक   माता आपल्या मुलीला सोडून कशी जाऊ देईल.  


2 comments:

  1. मीदेखील हे पुस्तक वाचले आहे. आपला लेख वाचताना सर्व संदर्भ आठवत होते. मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. या पुस्तकात एका स्त्रीला, एका मातेला दिली जात असणारी अमानुष वागणूक नुसती वाचताना आपल्याला जे धक्के बसतात, त्यामुळे विचार येतो की तिने किती आणि कसं सहन केलं असेल. दुष्टांची ताकद कितीही मोठी असली तरी मातृत्वाच्या शक्तीपुढे कस्पटासमान आहे, हेच या पुस्तकात प्रत्ययास येते.

    ReplyDelete
  2. मीदेखील हे पुस्तक वाचले आहे. आपला लेख वाचताना सर्व संदर्भ आठवत होते. मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे. या पुस्तकात एका स्त्रीला, एका मातेला दिली जात असणारी अमानुष वागणूक नुसती वाचताना आपल्याला जे धक्के बसतात, त्यामुळे विचार येतो की तिने किती आणि कसं सहन केलं असेल. दुष्टांची ताकद कितीही मोठी असली तरी मातृत्वाच्या शक्तीपुढे कस्पटासमान आहे, हेच या पुस्तकात प्रत्ययास येते.

    ReplyDelete