Sunday, February 24, 2013

माणूस नावाचे बेट


माणूस नावाचे बेट
आनंदाचे दिवस येतात आणि जातात. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतात.सुख-दुखा:ची देवाण- घेवाण होते. चेष्टामस्करी होते. आणि पुनः पोटापाण्यासाठी, व्यवसायासाठी,करिअरसाठी दूर जाणे आवशयक असते.हे दूर जाणे फार त्रासदायक असते. एक पोकळी निर्माण करते. एक शून्यता जाणवते.एक उदासीनता पसरते. त्याला इलाज नसतो.
प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. जगणे वेगळे असते. आपल्यालाही “ एकला चलो रे “ अशीच वाट शोधावी लागते.आपण सर्वांचे असतो ,तरीही एकटेच असतो. “ माणूस नावाचे बेट” असते. खरोखरच हे बेट वेगळेच असते. स्वतःचेच असते. त्या बेटावर आपण आपले राजे असतो. कधी कधी आपल्याला ह्या एकटेपणाचीच सवय होऊ लागते. गमंत आहे. आपल्याला आपलाच गोतावळा हवा असतो. पण कशातच अडकून पडावयाचे नसते. पुं ल नी एके ठिकाणी म्हंटले आहे , “ मी दरवर्षी कोकणात येतो आणि हे सर्व आप्तस्वकीय भेटल्यानंतर कोकणातून परत जाताना मी येथे का आलो ? असा प्रश्न मला पडतो.” खरे आहे.अगदी तसेच होते. We are not much involved in each other, but we are very much concerned about each other. We are having  detached attachment. आपण अलिप्त राहू शकत नाही. परंतु खूप गुंतूनही घेत नसतो.जर गुंतलो गेलो तर कधी कधी अधिकारवाणीने आपले विचार इतरावर लादीत असतो. प्रत्येकाचे जीवन हे स्वतंत्र असते.असावायास हवे. आशा-आकांक्षा भिन्न असतात .अपेक्षा ही खूप वेगळ्या असतात. मन गुंतते पण व्यावहारिक पातळीवर आले की आपण न कळत अलिप्त होत जातो . नात्यांची गंमत आहे.लहानपणी एकत्र असलेले भाऊ-बहिण जेंव्हा अनेक वर्षांनी स्वतःच्या स्वतंत्र संसारातून बाहेर येऊन जेंव्हा एकमेकाला भेटतात तेंव्हा किती वेगळे वागू लागतात. लहानपणीचे दिवस वेगळेच असतात.नंतर वाटा  बदललेल्या असतात. अनुभव वेगळे असतात.नात्यांची तीव्रता कमी झालेली असते.कधी-तरी भेटणारे थोडेसे दुरावलेलेच असतात. नाती पुसट झालेली दिसतात. रोजचे संबंध नसतात. वैयक्तिक माणूस समजणे फार अवघड आहे. माणूस हा तसा बदलणारा प्राणी आहे. नातीगोती सतत बदलत असतात .माणूस वेगळाच वागत असतो. आपले वागणे हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. परिस्थिती बदलत जाते. माणसांच्या अपेक्षाही बदलत जातात. छोट्या गावातून मोठ्या शहरात आल्यानंतर , मोठ्या शहरातून परदेशात गेल्यानंतर जगण्याचे नवे अर्थ समजू लागतात.नव्या जाणीवा होऊ लागतात. नव्या उणीवा सुन्न करू लागतात. जाणीवा-नेणीवाचा हा खेळ उन पावसासारखा असतो.त्यामुळे माणूस एक बेट होतो. स्वतःच्या कोशात जातो. एकटा पडू लागतो. त्यामुळे तो घुसमटतो.
अशा बेटावरचा हा माणूस एकाकी भासतो. अशी असंख्य अनेक बेटे असणारा हा समाज त्यामुळे एकजीव होऊ शकत नाही हे खरे सत्य आहे.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

No comments:

Post a Comment