________________________________________
असे हे सुंदर जगणे
( डायरीतील पाने )
काल “वेटींग फॉर गोदो” हे स्याम्युअल
बेकेट ह्या फ्रेंच नाटककाराचे अशोक शहाणे ह्यांनी अनुवादित केलेले नाटक रवींद्र
नाट्यगृहाच्या छोट्या सभागृहात बघितले.काही नाटकवाली मंडळी आलेली होती.
अतिशय प्रभावी भाष्य
असलेल्या ह्या नाटकात लकीची भूमिका टोम बटलर ह्या प्रसिद्ध नटाने केली होती.
दुसऱ्या महायुध्दाच्या नंतर युरोपची जी अवस्था झाली होती व सगळ्याचे जीवन
अस्ताव्यस्त झाले होते त्या काळाशी संबंधित हे नाटक मानवी जीवनाचे अनेक धागेदोरे
गुंफित जाते. जीवन मरण्याच्या लाटेवर हेलकावणारे ते अस्थिर जीवन डोळ्यासमोर उभे
करते. त्यातून नाटककाराची स्वतःची अशी तत्वज्ञानी वृत्ती दिसून येते. साध्या
साध्या वाक्यातून नाटककार जणू आपल्याशी संवाद साधत असतो. व त्याला जे सांगावयाचे
ते विलक्षण ताकदीने सांगतो. कधी हसतखेळत, तर कधी विलक्षण सुन्न करणारा अनुभव देत
रहातो. जीवनाची गुंतागुंत सुटतच नाही.अर्थही समजत नाही. जगण्याचे प्रयोजनही सापडत
नाही. रोजच्या कंटाळलेल्या जगण्यातही आपणही असेच काही बडबडत असतो, त्याचा
पुनःप्रत्यय अनेक वेळा येतो. ते सारे आपल्या जगण्याचेच अनुभव असतात म्हणूनच आपण
ह्या नाटकात गुंतत जातो, नाटक गंभीर आहे ह्यात वाद नाही. आजही आजूबाजूची परिस्थिती
फारशी बदललेली नाहीं आणि माणसाच्या जगण्याच्या समस्याही तशाच आहेत.म्हणूनच हे नाटक
आजचेच वाटते.प्रतीकात्मकता सोडली तर ते आजचेच नाटक आहे
२८ जुन २००९
गिरीश कर्नाड
ह्यांचे मराठीमध्ये रुपांतरीत “साठवलेल्या आठवणी” हे नाटक बघितले. अविष्कार ने
सादर केलेला हा प्रयोग चांगलाच असेल अशा अपेक्षेने गेलो होतो आणि खूपच निराशा
झाली.बहुधा रुपांतर जमलेले नसावे.प्रयोग ही कच्चाच होता. बांधणीच जमली नाही.गिरीश
कर्नाड ह्या नावाजलेल्या नाटककाराकडून अधिक चांगल्या अपेक्षा होत्या. नाटक फारशी पकडच
घेत नाही.नाटककारला काय सांगावयचे आहे याचा नीट उलगडाच होत नाही.व्यक्तिरेखाच
प्रभावी झाल्या नाहीत. विषय वेगळा होता. मांडणी व बांधणी जमलीच नाही.सत्यदेव दुबे
दिग्दर्शक म्हणून नाटक चांगले असेल असेही वाटले होते. नाटक फारसे आवडले नाही.
काल सुरेश वाडकर आणि झाकीर
हुसेन ह्यांचा स्वरसंगम असलेला संगीत सोहळा बघण्यासाठी ( नव्हे ऐकण्यासाठी ) षण्मुखानंद
सभागृहातील कार्यक्रमासाठी गेलो होतो. ताल ब्रम्ह ( झाकीर हुसेन ) आणि नाद ब्रम्ह
( सुरेशजी ) ह्यांचाहा कार्यक्रम म्हणजे एक आनंद सोहळाच होता. ब्रम्हानंदी टाळी
लागली. ब्रम्ह म्हणजे देव . ब्रम्ह, अब्राहम, इब्राहिम ह्या तीनही मध्ये ब्रम्ह
आहे.म्हणजे हिंदू ,ख्रिस्ती आणि इस्लाम संस्कृती मध्ये “ब्रम्ह” आहे. तीनही रस्ते
देवाकडे घेउन जाणारे आहेत. म्हणून देव शोधण्याचे हे मार्ग एकच आहेत. नाद ब्रम्ह (
हिंदू असलेले सुरेशजी ) व ताल ब्रम्ह ( मुसलमान असलेले झाकीर हुसेन) ह्यांचा हा अवीट
सूर सोहळा पंढरपूरच्या विठोबाला विनम्र अभिवादन करणारा होता. “तुज नमो”
विठ्ठलासाठी गायलेले ते अवीट गोडीचे अभंग आणि झाकिर हुसेन ह्यांचे अप्रतिम
तबलावादन ( ताल वंदन विठ्ठलासाठी ) एकदम साधे , विनयशील आणि मोहकच होते.
ताल नाद आणि सूर नाद
एकत्र आले म्हणजे जी संगीत दिवाळी साजरी होते ती वेगळीच. हरीप्रसाद चौरसियांचे बासरीवादन
अप्रतिम असतेच.पण त्याचीच आठवण करून देणारे प्रसाद ओक ह्यांचे बासरीवादन सुरेख व
दाद द्यावी असेच आहे. अशी ही संगीत मैफल एक आगळावेगळा आनंद देउन गेली.
८ जुलै,२००९
आठच दिवसापूर्वी आषाढी
एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठुरायाची संगीतमय भेट घडवून आणली ती उपेंद्र
भटांनी. भीमसेन जोशी ह्यांचा हा शिष्य. त्यांनी भीमसेन जोशी ह्यांच्याच गाण्याची
आठवण करून दिली.हुबेहूब भीमसेनचा वारसा चालवणारा हा पट्ट शिष्य. त्यांचे सादरीकरण
,हाव-भाव ,भाव मुद्रा भीमसेन जोशीच्याच असतात.त्यांचे गानज्ञान आत्मसात केलेला हा
गायक कार्यक्रम खूप उंचावर नेउन ठेवतो.
एकाच आठवड्यात दोन वेळा
पंढरपूरला जावून आलो. इतका सुंदर योग कधीच आला नव्हता.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
No comments:
Post a Comment