देशाची राजकीय परिस्थिती
इतकी खालावलेली आहे की गढूळ झालेल्या ह्या राजकारणात चिखल फेकीशिवाय काहींच दिसत
नाही, राजकारणाला समाजकारणाची आणि अर्थकारणाची जोड असणे आवश्यक असते. आजच्या
जागतिकीकरणाच्या प्रवाहात अर्थकारण हेच प्रबळ शस्त्र आहे. अर्थव्यवस्थाच
सुबत्तेकडे नेऊ शकते हे खरे आहे. अर्थात सुबत्तेतून दुसरेही अनेक प्रश्न निर्माण
होतात. परंतु दारिद्र्याच्या प्रश्नामुळे निर्माण होणार्या प्रश्नापेक्षा हे
प्रश्न सर्वस्वी वेगळे आणि निराळे आहेत.
देशाची संपत्ती वाढविणे
किंवा संपत्ती निर्माण करणे ( To
create a wealth – National wealth ) हे एक प्रमुख ध्येय
राष्ट्रनिर्मात्यांनी समोर ठेवले पाहिजे. आर्थिक प्रश्न फार महत्वाचे आहेत.
अर्थव्यवस्थेतून समाजप्रश्नांची उकल होण्यास मदत होईल. समाजातील विषमता ही मूलतः
अर्थ विभाजनावर अवलंबून आहे. आहे रे आणि नाही रे ह्या दोन गटामधूनच कम्युनिझमचा –
साम्यवादाचा जन्म झाला. जेंव्हा आपल्याजवळ काहींच संपत्ती नसते व आपण आर्थिक
दृष्ट्या दुबळे असतो तेंव्हा आपण सारेच जण साम्यवादी असतो. आपल्याला सर्व
संपत्तीचे समान वाटप हवे असते. श्रीमंतांचा पैसा कर लावून गरिबासाठी वाटायचा असतो.
राजकीय मंडळीना गरिबांना गरिबीतच ठेवणे सोयीचे
असते. नव्हे तो त्यांचा खरा धंदा असतो. ह्याउलट जेंव्हा आपण स्व-सामर्थ्यावर,
जीवनाशी सतत झगडून कष्टाने पैसा कमावतो, व तो आपलाच असतो तेंव्हा कोणाही सुज्ञ
माणसाला स्वतः कमावलेला पैसा वाटायचा नसतो. त्यावर कर भरावयाचा नसतो. त्याला त्या
पैशाचा उपभोग घ्यावयाचा असतो. असे वाटणे मानवी स्वभावास धरूनच असते. त्यावरील कर
जास्तीचा आहे , तो कमी असावा किंवा नसावाच असे वाटते. मी , माझे कुटुंब , आणि मी कमावलेला माझा पैसा
अशा तीन गटाभोवती फिरणारी व्यवस्थाच त्याला हवी असते. कोणीही व्यक्ती आपणहून
सरकारी तिजोरीत पैसा भरण्यास तयार नसतो. हे मानवी स्वभावाचे लक्षण आहे. मध्यमवर्गीयांनी
सामुहिक एकजुटीचा वापर करून ही यंत्रणाच खिळखिळी करून टाकली आहे. ही काही
योगायोगाची गोष्ट नाही. शेतकऱ्यांचा , शेत
मजुरांचा , कामगारांचा कार्ल मार्क्स मध्यमवर्गीय
मंडळीनी आपलासा करून घेतला व स्वतःचा पुरेपूर फायदा करून घेतला हे खरे
दुर्देव आहे. मध्यमवर्गीय तसे भित्रेच. श्रमाची प्रतिष्ठा त्यांना माहीतच नाही.
बाबुगिरीच्या जोरावरच चिरीमिरीचे राजकारण खेळून थेंबे थेंबे तळे साचे ह्या
म्हणीप्रमाणे गडगंज संपत्ती उभी करण्याचे मार्ग ह्या मध्यमवर्गीय मंडळीनी शोधून
काढले. कोणत्याही सरकारी कार्यालयात जा. साध्या सेवक शिपायापासून वरच्या
अधिकार्यापर्यंत चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. त्यामुळेच
माझ्यासारखा सामान्य माणूस अन्ना हजारे
होऊ शकत नाही हे खरे सत्य आहे. “ मी अन्ना हजारे “ अशी टोपी घालून गेलोतर काहीच
काम होणार नाही. त्या पेक्षा माझे हात स्वच्छ ठेऊन कोणा एजंटच्या मदतीने काम करून
घेणे हेच व्यवहाराला धरून आहे असेच सर्वाना वाटते हे खरे सत्य आहे.
ह्या सरकारी कार्यालयातील
ह्या कर्मचार्यांचे संध्याकाळी घरी जाताना खिसे तपासा , ब्यागा तपासा ,
दिवसभरामध्ये जमा झालेला चंदा सहज बाहेर येईल. ह्या मंडळीना पंचताराकित होटेलमधले
जेवण हवे असते, संध्याकाळची बीअर हवी असते, करमणुकीची अनेक साधने हवी असतात,
बायकोला नवी साडी घेऊन जायची असते, मुलांच्या शिक्षणाकरिता डोनेशन द्यायचे असते.
त्यांच्या पैशाला अनेक पाय फुटलेले असतात. वर पैसा पोहोचवायचा असतो , नाहीतर
बदलीचे संकट उभे असते. त्याला अनैतिकता कशी म्हणणार. ती तर नवी रूढी झालेली आहे,
अन्ना हजारे काय करणार? आणखी आणखीच्या
मागे लागणारा हा कर्मचारी वर्ग किती खाऊ ,कसा खाऊ ह्या साठीच धडपडत असतो व नवे नवे
मार्ग शोधून काढीत असतो. ह्या खाण्याचे असंख्य प्रकार. कोणाला फुकटची दारू हवी,
कोणाला घड्याळ , पंखा,अलीकडे एसी ,फ्रीज ,स्कूटर, फ्ल्याट, बंगला, नवी गाडी ,
परदेश प्रवास, परदेशातील सर्व खर्च, असे अनंत प्रकार .
“पोटापुरत्या पैशावरच मी
जगणार आहे , तुझे पांग फेडणे जमणार नाही , मनात मांडे निर्माण होऊ देउ नको”, असे
आपल्या आईला सांगणारे गोपाल गणेश आगरकर वरती असतील तर ह्या मंडळीकडे बघून ढसा ढसा
रडत असतील. आपण आज ह्या अधोगतीला आलो आहोत हे पाहून अन्नाचे आंदोलन कधी तरी यशस्वी
होईल असे वाटत नाही.समोरचा मार्ग धुक्याचाच आहे. पांढरे शुभ्र आणि निळे आकाश
दिसणारच नाही. गांधीनी मार्ग दाखविला. त्यांच्याच पट्टशिष्याना गांधी हे नाव हवे
आहे, त्यांनी नोटेवर ही गांधीचे चित्र छापले आहे. त्यामुळे गांधींच्या ह्या नोटा
घेऊन त्यांना फिरता येते. अटेनबरोला ‘ गांधी’ हा चित्रपट काढावासा वाटला.तर आजच्या
गुजरातमध्ये साबरमतीच्या आश्रमात त्यांना गांधींचे नाव निशाण नको आहे. केवढा हा
दैवदुर्विलास. माझ्या बरोबर एका इंग्रजी मित्राला घेवून साबरमती आश्रमातील
गांधींच्या खोलीत घेऊन गेलो तेंव्हा त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून मलाच वाटले
आपण भारतीय गांधीजींना विसरलो पण अटेनबरोचा गांधी पाहून साबरमतीला भेट देणारा हा इंग्रज खरा गांधी प्रेमी आहे.
आपण मात्र गांधीही नाहीत
आणि अण्णा हजारेही नाहीत. उगाच त्यांची नावे कशाला घ्यायची.
No comments:
Post a Comment