Tuesday, January 25, 2022

Indian Muslims

भारतातील मुस्लिमांनी एकदा अंतर्मुख होऊन नव्याने विचार करावयास हवा. समाजवादी आझमखान किंवा ओवैसी ह्यांच्या मागे राहून जीनांचा 'मुस्लिम भारत' हा विचार सोडून द्यावा. मुस्लिमांनी एकदा झडझडून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला विरोध करण्याची आवश्यकता आहे. आरिफ मोहमद खान ह्यांनी हाच मुद्दा अनेकदा स्पष्टपणे मांडला आहे.
अखिलेश/मुलायम, मायावती, ममता, डावे-उजवे कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस ह्यांनी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम जनतेची कायम मनधरणी केली आहे  आणि त्यांच्यासाठी फक्त तोंडपाटीलकी केली आहे. त्यांच्या विकासासाठी काहीच केलेले  नाही. हे आजही भारतीय मुस्लिमांच्या लक्षात आले नाही.
नेहमी गोध्रा-बाबरीकांडचा उल्लेख होतो. दोन्ही बाजूच्या तरुणांच्या उकळत्या रक्तात आततायी विचार प्रकट झाल्यामुळे अशा घटना घडल्या. त्या जखमा तशाच रहाव्यात म्हणून राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहेत, हे ह्या देशाचे दुर्दैव. गांधीजींचे नाव उठताबसता घेणार्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न न करता बहुसंख्य हिंदूंना जबाबदार धरून अल्पसंख्य मुस्लिमांचा स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आहे आणि हिंदूंमध्ये जातीयवादाची/धर्मवादाची पेरणी करून फूट पाडली आहे  व सत्तेचे राजकारण केले आहे. मायावती/ मुसलमानांना तिकिटे देतात तर अखिलेश/मुलायम सिंग ही तशीच खेळी  करीत आले आहेत.
भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती काय आहे? भारतातले बहुतेक पक्ष मुसलमानांच्या अपेक्षांना अनुसरून एकजात कुचकामी आहेत. ह्या सर्वांनी निवडणुकीत मुसलमानांचा एक गठ्ठा मते मिळवण्यासाठीच उपयोग करून घेतला व हिंदूत जातीय विद्वेष निर्माण केला.
भारतातील मुसलमानांना सर्व पक्षांनी असे सतत बजावले आहे की बहुसंख्य असलेल्या हिंदूंचा धर्मवाद फार भयंकर असू शकतो. मुसलमानांना ह्या देशात चांगले दिवस बघावयाचे असतील तर त्यांनी हिंदू जातीयवादी शक्ती वाढणार नाहीत म्हणून आमच्याकडेच बघावे, आम्हालाच निवडणून द्यावे,  असे राजकारण ज्यांनी केले त्यामुळेच हिंदू एकजुटीचे प्रयत्न झाले, ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची पताका त्यामुळे फडकू लागली.
आझमखान ह्यांचा मुस्लिम धर्मवाद मुलायमसिंग/अखिलेश ह्यांनी पोसला. दिल्लीचे जामा  मशिदीचे इमाम बुखारी आणि एमआयएमचे ओवैसी ह्यांच्या 'मुस्लिम इंडिया' ला प्रत्युत्तर म्हणून 'हिंदू इंडिया' विचारधारा वाढते आहे. पडद्यामागे जातीयवाद पोसणारी ही मंडळी धोकादायक आहेत. हेच लक्षात येऊ नये, हे आपल्या देशाचे दुर्दैव.
भारतात मुसलमान मोकळेपणाने मागण्या तरी करू शकतात. त्यांचे प्रतिनिधित्व संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिसून येते.
काही लोकांना देशाच्या अखंडतेपेक्षा बाबरी मशिदीचा बचाव अधिक महत्वाचा का वाटतो? बाबरी-गोध्रा ही जखम त्यांना बरी व्हावी असे वाटत नाही. आता तर हा प्रश्न सुटला आहे आणि राम  मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. आता मशिदीची उभारणी लवकरच होत आहे व तेथे रुग्णालय आणि मोठे वाचनालय उभारण्याचे ठरत आहे. हे चांगलेच आहे पण त्यासाठी राजकारण चालूच असून नवे उचकवणे चालू ठेवले असून मोदी/योगीवर टीका केली जात आहे.
हा देश सर्वधर्मसमभाव  मानणारा देश आहे, हे येथील मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रभावाच्या मर्यादा ठरवून घेतल्या पाहिजेत.
धर्माचा आधार पोकळ आणि चुकीचा असेल तर काश्मीरला वेगळा दर्जा मागून चालणार नाही व समान नागरी कायदा अंमलात आणण्यास विरोध करता कामा नये. आता ३७० कलम रद्द झाले आहेच. लडाखला वेगळे केले आहे. ट्रिपल तलाक कायदा रद्द झाला आहे.
अल्पसंख्य मुस्लिम नकळत जीनांच्या 'मुस्लिम इंडियाची'ची भाषा बोलत असतात. त्यामुळेच 'हिंदु राष्ट्रा'च्या गोष्टी येथे बोलल्या जातात. पाकिस्तान हे 'मुस्लिम राष्ट्र' जिनांच्यामुळे उदयास आले आहे. भारत हे बहुसंख्य हिंदूंचे राष्ट्र असले तरी ते येथील 'भारतीय मुसलमानां'चेही राष्ट्र आहे. पाकिस्तानात 'हिंदू पाकिस्तान' कुठे आहे? हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.
आझमखान असो का ओवैसी, ह्यांच्यासारख्या मुसलमानात जिना सारखा 'मुस्लिम भारत' डोक्यात असतो. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून योगी आदित्यनाथ सारखे नेते 'हिंदू भारत' ह्या संकल्पनेसाठी प्रयत्नशील असतात.
स्वतःला सेक्युलर समजणारे समाजवादी मुस्लिम लोकांना ठणकावून सांगत असतात की बहुसंख्य हिंदूंचा धर्मवाद हा भयंकर आहे व तुम्हाला आम्हीच खरे संरक्षण देत असतो. हा गेम प्लॅन माहित असल्यामुळे हिंदुत्ववादी संपूर्ण हिंदू राष्ट्राचे स्वप्न पहात आहेत.
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तथाकथित पुरोगाम्यांनी फ़ारच सवंग करून टाकला आहे. मुस्लिम जातीयवाद नको तसा आक्रमक राष्ट्रवाद नको.

No comments:

Post a Comment