Monday, January 24, 2022
दोन मित्र - भारत सासणे
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे होणारे अध्यक्ष भारत सासणे ह्यांची दिवाळी अंकात प्रसिद्ध होणाऱ्या कथामधून ओळख झाली होती. काही वर्षापुरी त्यांच्या काही कथा वाचल्याचे स्मरते. बहुधा मराठवाडा' दिवाळी अंकातून वाचल्या असतील. तसे ते मराठवाड्याचे आहेत. ह्यावेळी सर्व मराठी भाषिक साहित्य परिषदांनी त्यांची बिनविरोध निवड केली आहे, हे विशेष.
'दोन मित्र' ही २००४ साली लिहिलेली त्यांची कादंबरी वाचनालयात शोधतांना मिळाली. 'बौद्धिक मनोरंजन' हा शब्द कादंबरी चाळतांना दिसला. छोटी छोटी वाक्ये लक्ष वेधून घेत होती. त्यांची साधी सोपी भाषाशैली आवडू लागली. आणि एका दमात ही कादंबरी वाचून संपवली. असं फार कमी वेळा होतं.
मनोहर आणि कानिफनाथ ह्या दोन मित्रांची ही गोष्ट आहे असं वाटलं; आणि लक्षात आलं की ही गोष्ट आहे ती 'मकरंद आणि जयमंगला' ह्या प्रेमात पडलेल्या मनोहरचा मुलगा आणि कानिफनाथच्या मुलीची. भिन्न जातीत जन्मलेली ही दोघे. आपल्या समाजातील जातीच्या भिंतीमुळे ती दोघे लग्न का करू शकत नाहीत ह्यांची ही गोष्ट. त्या दोन मित्रांचा एक तिसरा मित्र असतो एक लेखक. त्याला ते 'रद्दीवाला' म्हणतात. आणि हाच रद्दीवाला आपल्याला ही कथा सांगत जातो. कादंबरीकार भारत सासणे आपल्याशी बोलत असतात ते ह्या पात्राच्या तोंडून. लेखकाला जे काही सांगायचं आहे, ते त्यांनी फार सुंदर शब्दात सांगितलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं 'बौद्धिक मनोरंजन' केलं आहे. हेच ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य.
रद्दीवाला लेखक आपल्याशी संवाद साधताना अगदी सहजपणे बोलत असतो. त्यातील कांही वाक्ये येथे मुद्दाम देत आहे. तेच सांगितलं आहे कादंबरीकाराने.
* माणसाकडे माणूस म्हणून बघणे अधिक अवघड झालंय, कारण तो माणूस असण्यापेक्षा काहीतरी असतो आधी - जसं आंबेडकरवादी. बहुजन समाजाचा किंवा ब्राम्हण, किंवा संघवाला किंवा हिंदुत्ववाला, किंवा मुसलमान, किंवा समाजवादी इत्यादी ....
* माणूस तुकड्या-तुकड्यानी वाटला गेलाय आणि मुखवट्याआड दडलाय.
* संस्कृती एकमेकांना छेदतात तेंव्हा काही देवाणघेवाण अटळ असते.
* लोक फार लवकर इमोशनल होतात! त्यांना भडकवणं सोपं असतं.
* बौद्धिक मनोरंजन! मनोजन्य मनोरंजन!
* मुलांनी बुद्धिजीवी व्हायचं की बाह्या सारून गुंड व्हायचं ..... की राजकारण करायचं सांगा!
* अरे, धर्म म्हणजे मनुष्य जातीचा प्रेमाचा मार्ग!
* दंगलखोरांना धर्म नसतो!
* इथं झिंगलेला बुद्धिवादी होता, आणि तो जास्त धोकादायक असतो, हे मला माहित आहे. एकूणच बुद्धिजीवींची शोकांतिका!
* आयुष्यात लॉजिक असलं पाहिजे असा नियम नाही. बौद्धिक भाषणबाजी करणारी माणसं .... आपण पुरोगामी आहोत असं दाखवायला असं अधूनमधून वागावं लागतं. काका, शिकवाल मला आता पुरोगामी व्हायला!
* ज्याचं त्याचं स्थान असतं. ते सोडलं की रोप मरतं. नियतीवाद.
* संस्कार आधी धावतात ना पुढे बुद्धीच्या!
* जगण्याचे प्रत्येकाचे संदर्भ वेगळे असतात. कोणाचे काय तर कोणाचे काय?
* आज काय दिसतंय. तुम्ही ज्यालात्याला खिजवायचं काम करतां! .... आज सगळे जण जय श्री राम !, जय जय रघुवीर समर्थ !, जय ख्रिस्त!, अल्ला हो अकबर! असं म्हणून एकमेकाला खिजवत असतात? आपण माणुसकी कधी शिकवणार?
* स्त्री - काडीकाडीने ती सर्व जमवते; म्हणून स्त्रीला विध्वंस सहन होत नाही.
* बेकार तरुणांचे तांडे आहेत, वैफल्यग्रस्त. याना जीवितहेतू हवा आहे. यांना जगण्याचा बहाणा हवा आहे. ... नाहीतर ही पोकळी ह्यांना गिळून टाकील. 'बोअर होत आहेत', असा मंत्र ते जपतात. 'काय आणि कशासाठी?', हे त्यांना समजत नाही. कोण टिळा लावतंय, कोण भगव्याच्या सावलीत आहे, कोण 'जय भवानी' म्हणतंय, कोण रघुवीर सेनेत आहे, कोण अल्लाच्या नावाखाली खुनशी बनलंय, .......सगळ्यांना काहीतरी 'बिजनेस' पाहिजे आहे. नसता हे जणू स्वतःला कुरतडत खाऊन टाकतील. हे विफल, बेकार तरुणांचे तांडे.
* कधी कधी ..... एकदम सकाळ झाल्यासारखं वाटलं. वाटलं अजून जगणं शिल्लक आहे. अजून आशा आहे असं म्हणतात .....
शेवटी रद्दीवाला लेखक लिहितो ......मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती चमकते, प्रकाशाने प्रज्वलित होते. ती सतत आणि अप्रतिहत वाहत असते. अखिल जातीजातीबद्दल प्रेम निर्माण करते. तोपर्यंत ह्यांची मैत्री टिकली पाहिजे. दोन मित्रांची.
अशी आशावादी वृत्ती समोर ठेऊन लेखक कादंबरी संपवतो.
हा लेखक आपल्याशी सतत बोलत असतो. ही कादंबरी रद्दीत टाकण्याची नसून बौद्धिक चिंतन करून मैत्री वाढविण्याचा संदेश देणारी आहे.
बऱ्याच दिवसांनी एक सुंदर कादंबरी वाचताना आपल्या समाजाचा आरसा समोर दिसत होता.अशी ही कादंबरी का आवडली हे सांगण्यासाठी हा खटाटोप.
भारत सासणे ह्यांना खूप शुभेच्छा आणि येत्या साहित्य संमेलनातील तुमच्या भाषणाची वाट पाहतोय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment