Monday, January 24, 2022

काळे करडे स्ट्रोक्स - प्रणव सखदेव

साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाचे हे पुस्तक वाचनालयातून आणलं आणि एका दमात वाचून टाकलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पुस्तक विशेषच असणार ही एक अपेक्षा होती आणि वाचून मात्र माझी निराशा झाली. वाचताना कधीकधी पुस्तक आवडत होतं तर बऱ्याचदा मला जाम कंटाळा आला. माझी संमीश्र प्रतिक्रिया उमटत होती.
समीर हा एक अंगात वारा शिरलेला व मनांत उदास पोकळी असलेला कादंबरीचा नायक. बारावीचा रुईया कॉलेजचा विद्यार्थी. एस.वाय. पर्यंतचे त्याचे त्या महाविद्यालयातील आयुष्य. प्राचार्य त्याला कॉलेजमधून काढून टाकतात ते त्याच्या उद्योगामुळे. त्याच्या ह्या 'पेनड्राइव्ह आयुष्या'त सेक्स व्हायरसच्या इन्फेकशनमुळं येतं एक झपाटलेपन आणि मग त्याची होते वाताहत. सानिका आणि सलोनी ह्या त्याच्या मैत्रिणी. चैतन्य आणि अरुण हे त्यांचे मित्र. ह्या चार मित्र-मैत्रीणींची ही कथा. ही त्यांच्या रुईया कॉलेज मधील सोनेरी जीवनाला पोखरून टाकणारी एक शोकांतिका आहे. समीरच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारी कथा आपल्याला सांगितली आहे प्रणव सखदेव ह्यांनी. सेक्सचा इन्फेक्टड व्हायरस ह्या तरुणांचे आयुष्य कसे कुरतडून टाकतो त्याची ही गोष्ट आहे. समीर-सानिका आणि समीर- सलोनी ह्यांचे प्रेमी जीवन म्हणजे सेक्स जीवन रंगवण्यात लेखक रंगून जातो तसेच त्याचे मित्र चैतन्य, अरुण आणि दादू काका ह्यांच्या जीवनकहाण्या सांगण्यात तो रंगून जातो. रुईया कॉलेजच्या शुभ्र आठवणी न लाभलेले हे भरकटलेले मित्र. त्यांच्या जीवनातील हे काळे करडे स्ट्रोक्स! त्यांचे जीवन म्हणजे एक केऑस! भणंग आयुष्याकडे जाणारे हे तरुण! लेखक म्हणूनच ह्या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत लिहितो "प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला ...." . ही कादंबरी वाचताना श्री ना पेंडसे ह्यांच्या 'गारंबीचा बापू' किंवा 'लव्हाळी' ह्या कादंबऱ्यांची स्टाईल अधूनमधून आठवत राहते तर कधीकधी नेमाड्यांची 'कोसला' आठवते. पण अनेक वेळा आपण भाऊ पाध्ये ह्यांची 'वासूनाका' तर वाचत नाहीना!, असाही भास होत राहतो. प्रणव सखदेव हा नव्या पिढीचा नव्या दमाचा एक लेखक आहे. नव्या पिढीचे प्रश्नही नवेच आहेत. त्यांचे जगणेही भन्नाट आहे. सेक्सभोवती भरकटणाऱ्या तरुणांचे चित्रण करताना मध्यवर्गीय तरुणांमध्ये असे 'वासूनाके' दिसणारच. म्हणून ह्या कादंबरीतील घटना रुईया कॉलेज, दादर-माटुंगा, हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, फाईव्ह गार्डन, लालबाग-परळ, दादरची लहान मोठी हॉटेल्स ह्या परिसरातच घडतात. लेखकाने हा परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केलाय. हे खूप छान जमतंय. पण आपण पाहिलेल्या रुईया कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांचे किंवा हिंदू कॉलनी / पारशी कॉलनीत रहाणार्या मध्यमवर्गीय जीवनाचे हे चित्रण नाही. लालबाग-परळच्या वस्तीतील वासूनाका मात्र चांगला चित्रीत झाला आहे, तो समीरचा मित्र असलेल्या अरुणची कथा रंगविताना. आज लालबाग-परळ खूप बदलले आहे. मी तिकडे फारसे जात नाही. 50 वर्षांपूर्वी मी ह्याच परिसरात 5-10 वर्षे काढली होती त्यामुळे मला हा परिसर खूप आवडलेला होता. त्यावेळी रुईया कॉलेज म्हणजे हुशार मुलांचे एक नावाजलेले कॉलेज. तेथेही विद्यार्थीकट्टे होते. सिगारेट, दारू, गांजा पिणारे विद्यार्थी त्यावेळीही असतील पण ह्या कादंबरीत दिसणारे समीर आणि त्यांचे मित्र त्यावेळी नव्हते. मी युडीसीटीत संशोधन करीत असताना माझे दोन सहकारी संशोधक विद्यार्थी होते ते रुईयाचे सर्वात हुशार विद्यार्थी. एक मित्र तर त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाला आणि तेथूनच रिटायर झाला. त्यांनी मला सांगितलेले रुईया कॉलेज प्रणव सखदेव ह्यांच्या कादंबरीत वर्णन केलेल्या कॉलेजसारखे नव्हते. आता सारेच बदलले असेल. नव्या पिढीचे नवे प्रश्न. नव्या समस्या. नवे जगणे. त्यामुळे फाईव्ह गार्डनचा प्रेमिकांच्या परिसर आता किती बदलला आहे, ह्याची कल्पना कादंबरी वाचताना येते. अर्थात कादंबरीत केलेले वर्णन म्हणजे त्या भागाचे खरं वर्णन नव्हे. कादंबरीत डोंबिवली संस्कृतीत वाढलेला समी. ती मध्यवर्गीय संस्कृती झुगारून देताना त्याचा मित्र असलेल्या अरुणच्या लालबागच्या वासूनाका संस्कृतीचा कसा शिकारी होतो, हे फार छान चित्रीत झाले असले तरी ही कादंबरी नकळत वासूनाका टाईप झाली आहे. लेखकावर झालेला जुन्या लेखकांचा हा प्रभाव आहे की हे ह्या नव्या लेखकाचे नवे तंत्र आहे. तरुणांचे भरकटलेले आयुष्य हा कादंबरीचा विषय आहे. हे मान्य केले तर कादंबरी छान जमली आहे. लेखकाला परिणामकारक चित्रण करणे छान येते, हेच ह्या कादंबरीचे वैशिष्टय. चांगल्या कादंबरीला उंचावर नेण्यासाठी लेखक कमी पडलाय कारण तो सेक्सचे वर्णन करण्यातच अडकलाय. त्याला तेच काळे कोरडे स्ट्रोक्स दिसत असावेत. ह्या कादंबरीत लक्ष वेधून घेते ती सानिका. समीरची मैत्रीण म्हणजे त्याच्या चिन्मय ह्या अंध मित्राची प्रेयसी. कवी मनाची. "पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखी". बालकवींच्या कवितेत रमणारी. ती एक गूढ स्त्री. समीरला ती स्त्री समजतच नाही पण तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याचवेळी तो अडकलेला असतो सलोनीत. तिलाही तो आवडत जातो पण तिच्या शरीरवेदना असतात एका रोगाने पछाडलेल्या. ती त्याच्यावर प्रेम करत असते पण आपले शरीर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यामुळे समीरला किंवा कोणालाही संसर्गरोग होऊ नये असे तिला मनापासून वाटत असते. बिचारा समीर. त्याच्या सेक्स केऑसमध्येच डुचमळलेला. अशीही रुईच्या क्राउडमधील मित्र-मैत्रिणींची कहाणी. एक फसलेली कादंबरी. मध्येमध्ये कंटाळा आणणारी. अधूनमधून मुंबईच्या परिसरातील आजच्या नवतरुणांची कहाणी सांगणारी. साहित्य अकादमी पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांना ही कादंबरी का आवडली असेल, हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कदाचित मलाच ह्या कादंबरीचे साहित्यमूल्य समजलं नसावं. ह्यापुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी ग्रेट साहित्य वाचायला मिळेल असे मला वाटत नाही. नव्या दमाच्या ह्या लेखकाला नवा हुरूप येईल आणि त्याच्या हातून नवे छान लिहून होईल, हे मात्र नक्की. प्रणव सखदेव ह्यांना शुभेच्छा! काळे करडे स्ट्रोक्स साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाचे हे पुस्तक वाचनालयातून आणलं आणि एका दमात वाचून टाकलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे पुस्तक विशेषच असणार ही एक अपेक्षा होती आणि वाचून मात्र माझी निराशा झाली. वाचताना कधीकधी पुस्तक आवडत होतं तर बऱ्याचदा मला जाम कंटाळा आला. माझी संमीश्र प्रतिक्रिया उमटत होती. समीर हा एक अंगात वारा शिरलेला व मनांत उदास पोकळी असलेला कादंबरीचा नायक. बारावीचा रुईया कॉलेजचा विद्यार्थी. एस.वाय. पर्यंतचे त्याचे त्या महाविद्यालयातील आयुष्य. प्राचार्य त्याला कॉलेजमधून काढून टाकतात ते त्याच्या उद्योगामुळे. त्याच्या ह्या 'पेनड्राइव्ह आयुष्या'त सेक्स व्हायरसच्या इन्फेकशनमुळं येतं एक झपाटलेपन आणि मग त्याची होते वाताहत. सानिका आणि सलोनी ह्या त्याच्या मैत्रिणी. चैतन्य आणि अरुण हे त्यांचे मित्र. ह्या चार मित्र-मैत्रीणींची ही कथा. ही त्यांच्या रुईया कॉलेज मधील सोनेरी जीवनाला पोखरून टाकणारी एक शोकांतिका आहे. समीरच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करणारी कथा आपल्याला सांगितली आहे प्रणव सखदेव ह्यांनी. सेक्सचा इन्फेक्टड व्हायरस ह्या तरुणांचे आयुष्य कसे कुरतडून टाकतो त्याची ही गोष्ट आहे. समीर-सानिका आणि समीर- सलोनी ह्यांचे प्रेमी जीवन म्हणजे सेक्स जीवन रंगवण्यात लेखक रंगून जातो तसेच त्याचे मित्र चैतन्य, अरुण आणि दादू काका ह्यांच्या जीवनकहाण्या सांगण्यात तो रंगून जातो. रुईया कॉलेजच्या शुभ्र आठवणी न लाभलेले हे भरकटलेले मित्र. त्यांच्या जीवनातील हे काळे करडे स्ट्रोक्स! त्यांचे जीवन म्हणजे एक केऑस! भणंग आयुष्याकडे जाणारे हे तरुण! लेखक म्हणूनच ह्या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत लिहितो "प्रत्येकाच्या आत डुचमळणाऱ्या एका केऑसला ...." . ही कादंबरी वाचताना श्री ना पेंडसे ह्यांच्या 'गारंबीचा बापू' किंवा 'लव्हाळी' ह्या कादंबऱ्यांची स्टाईल अधूनमधून आठवत राहते तर कधीकधी नेमाड्यांची 'कोसला' आठवते. पण अनेक वेळा आपण भाऊ पाध्ये ह्यांची 'वासूनाका' तर वाचत नाहीना!, असाही भास होत राहतो. प्रणव सखदेव हा नव्या पिढीचा नव्या दमाचा एक लेखक आहे. नव्या पिढीचे प्रश्नही नवेच आहेत. त्यांचे जगणेही भन्नाट आहे. सेक्सभोवती भरकटणाऱ्या तरुणांचे चित्रण करताना मध्यवर्गीय तरुणांमध्ये असे 'वासूनाके' दिसणारच. म्हणून ह्या कादंबरीतील घटना रुईया कॉलेज, दादर-माटुंगा, हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, फाईव्ह गार्डन, लालबाग-परळ, दादरची लहान मोठी हॉटेल्स ह्या परिसरातच घडतात. लेखकाने हा परिसर जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा केलाय. हे खूप छान जमतंय. पण आपण पाहिलेल्या रुईया कॉलेजच्या हुशार विद्यार्थ्यांचे किंवा हिंदू कॉलनी / पारशी कॉलनीत रहाणार्या मध्यमवर्गीय जीवनाचे हे चित्रण नाही. लालबाग-परळच्या वस्तीतील वासूनाका मात्र चांगला चित्रीत झाला आहे, तो समीरचा मित्र असलेल्या अरुणची कथा रंगविताना. आज लालबाग-परळ खूप बदलले आहे. मी तिकडे फारसे जात नाही. 50 वर्षांपूर्वी मी ह्याच परिसरात 5-10 वर्षे काढली होती त्यामुळे मला हा परिसर खूप आवडलेला होता. त्यावेळी रुईया कॉलेज म्हणजे हुशार मुलांचे एक नावाजलेले कॉलेज. तेथेही विद्यार्थीकट्टे होते. सिगारेट, दारू, गांजा पिणारे विद्यार्थी त्यावेळीही असतील पण ह्या कादंबरीत दिसणारे समीर आणि त्यांचे मित्र त्यावेळी नव्हते. मी युडीसीटीत संशोधन करीत असताना माझे दोन सहकारी संशोधक विद्यार्थी होते ते रुईयाचे सर्वात हुशार विद्यार्थी. एक मित्र तर त्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाला आणि तेथूनच रिटायर झाला. त्यांनी मला सांगितलेले रुईया कॉलेज प्रणव सखदेव ह्यांच्या कादंबरीत वर्णन केलेल्या कॉलेजसारखे नव्हते. आता सारेच बदलले असेल. नव्या पिढीचे नवे प्रश्न. नव्या समस्या. नवे जगणे. त्यामुळे फाईव्ह गार्डनचा प्रेमिकांच्या परिसर आता किती बदलला आहे, ह्याची कल्पना कादंबरी वाचताना येते. अर्थात कादंबरीत केलेले वर्णन म्हणजे त्या भागाचे खरं वर्णन नव्हे. कादंबरीत डोंबिवली संस्कृतीत वाढलेला समी. ती मध्यवर्गीय संस्कृती झुगारून देताना त्याचा मित्र असलेल्या अरुणच्या लालबागच्या वासूनाका संस्कृतीचा कसा शिकारी होतो, हे फार छान चित्रीत झाले असले तरी ही कादंबरी नकळत वासूनाका टाईप झाली आहे. लेखकावर झालेला जुन्या लेखकांचा हा प्रभाव आहे की हे ह्या नव्या लेखकाचे नवे तंत्र आहे. तरुणांचे भरकटलेले आयुष्य हा कादंबरीचा विषय आहे. हे मान्य केले तर कादंबरी छान जमली आहे. लेखकाला परिणामकारक चित्रण करणे छान येते, हेच ह्या कादंबरीचे वैशिष्टय. चांगल्या कादंबरीला उंचावर नेण्यासाठी लेखक कमी पडलाय कारण तो सेक्सचे वर्णन करण्यातच अडकलाय. त्याला तेच काळे कोरडे स्ट्रोक्स दिसत असावेत. ह्या कादंबरीत लक्ष वेधून घेते ती सानिका. समीरची मैत्रीण म्हणजे त्याच्या चिन्मय ह्या अंध मित्राची प्रेयसी. कवी मनाची. "पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखी". बालकवींच्या कवितेत रमणारी. ती एक गूढ स्त्री. समीरला ती स्त्री समजतच नाही पण तो तिच्याकडे आकर्षित होतो. त्याचवेळी तो अडकलेला असतो सलोनीत. तिलाही तो आवडत जातो पण तिच्या शरीरवेदना असतात एका रोगाने पछाडलेल्या. ती त्याच्यावर प्रेम करत असते पण आपले शरीर त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यामुळे समीरला किंवा कोणालाही संसर्गरोग होऊ नये असे तिला मनापासून वाटत असते. बिचारा समीर. त्याच्या सेक्स केऑसमध्येच डुचमळलेला. अशीही रुईच्या क्राउडमधील मित्र-मैत्रिणींची कहाणी. एक फसलेली कादंबरी. मध्येमध्ये कंटाळा आणणारी. अधूनमधून मुंबईच्या परिसरातील आजच्या नवतरुणांची कहाणी सांगणारी. साहित्य अकादमी पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांना ही कादंबरी का आवडली असेल, हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कदाचित मलाच ह्या कादंबरीचे साहित्यमूल्य समजलं नसावं. ह्यापुढे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणजे काहीतरी ग्रेट साहित्य वाचायला मिळेल असे मला वाटत नाही. नव्या दमाच्या ह्या लेखकाला नवा हुरूप येईल आणि त्याच्या हातून नवे छान लिहून होईल, हे मात्र नक्की. प्रणव सखदेव ह्यांना शुभेच्छा!

No comments:

Post a Comment