Tuesday, November 30, 2021

गंगा मय्या

 

गंगा मय्या

ALAKNANDA

अलीकडेच रस्कीन बॉन्ड ह्या प्रसिद्ध लेखकाचे The Very Best Of Ruskin Bond – The Writer on the Hill" हे अतिशय सुंदर पुस्तक हाती  पडले. त्या पुस्तकाबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे. त्या पुस्तकातील “Ganga Descends” हा सुंदर लेख मला खूप आवडला. मी फुलांची घाटी म्हणजे “Valley of Flowers” ला गेलो होतो. तेंव्हा अलकनंदा नदीच्या काठाने प्रवास केला होता. तिच्या काठावर राहिलो होतो. तिचे रौद्र रूप बघितले होते. तिचा खळाळणारा प्रवाह माझ्या मनाला मोहित करीत होता. रस्कीन बॉन्ड त्यांच्या लेखाची सुरुवात करीत असताना लिहितात, “खरी गंगा ही अलकनंदा की भागीरथी?" भागीरथी आणि अलकनंदा ह्या एकमेकाला भेटतात त्या देवप्रयागला. मी देवप्रयागला त्यांचा सुंदर संगम  पाहिला आहे. अलकनंदा आणि भागीरथी  दोन्ही नद्या ह्या गंगाच आहेत. मग हा प्रश्न मनांत कां उभा राहतो? भौगोलिक दृष्टीने विचार केला तर अलकनंदा हीच गंगा नदी आहे. तरीही काही लोक गंगा म्हणजे भागीरथी नदीच आहे,असेच मानतात. त्याचे कारण आपल्या  पौराणिक कथा आणि  जुना वेदकालीन इतिहास. हाच प्रश्न रस्कीन बॉन्ड ह्यांनी प्रसिद्ध तज्ञ डॉ सुधाकर मिश्रा ह्यांना विचारला आणि त्यांनी फार सुंदर शब्दात उत्तर दिले. ते म्हणतात, अलकनंदा म्हणजे गंगा पण भागीरथी म्हणजे गंगा-जी” . किती समर्पक उत्तर! अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन नद्यांचा संगम झाल्यानंतर गंगा नदी सुरू होते.


अलकनंदा - पंचप्रयाग  आणि भागीरथी (गंगा) / यमुना 

अलकनंदाचा उगम होतो तो सातोपनाथ आणि भगीरथ खरक ह्या दोन ग्लेसियर पासून. अलकनंदेला विष्णुप्रयागला धाउलीगंगा , नंदप्रयागला नंदाकिनी, कर्णप्रयागला पिंडार आणि रुद्रप्रयागला  मंदाकिनी ह्या नद्या येऊन मिळतात.  190 किलोमीटर प्रवास केल्यानंतर अलकनंदा देवप्रयागला भागीरथीला मिळते आणि तेथून गंगेचा प्रवास सुरू होतो. पंचप्रयाग ही पांच महत्वाची तीर्थस्थाने अलकनंदेच्या काठावर वसली आहेत अलकनंदा बद्रीनाथ, विष्णुप्रसाद, जोशीमठ, चामोली, नन्द्प्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर, आणि देवप्रयाग ह्या तीर्थस्थानाजवळून  वहात देवप्रयागला भागीरथीला मिळते. भागीरथीपेक्षा  अलकनंदा अधिक मोठी असली तरीही भागीरथीलाच 'गंगा' म्हणतात. पाण्याचा अधिक साठा हा अल्कनंदाच पुरविते. ह्याच अलकनंदेला तिबेटमधून वहात  येणारी सरस्वती नदी माना येथे भेटते आणि नंतर लुप्त पावते. अलकनंदा ही भागीरथी नदीपेक्षा अधिक प्रक्षुब्ध, अनावर आणि वेगांत वाहणारी नदी आहे. तर भागीरथी ही खूप शांत, स्वच्छ आणि निळसर पाण्याची नदी आहे. 

Alaknanda – Rafting


VALLEY OF FLOWERSला जाताना पुष्पावती नदीच्या काठाने आपण प्रवास करतो. ही पुष्पावती नदी नंतर अलकनंदेला जाऊन मिळते.


भागीरथी ही एक सुंदर आणि स्वच्छ नदी आहे. लोकांनी तिच्यावर खूप प्रेम केले आहे.  भगवान श्री शिवशंकराच्या जटेमधून तिचा उगम झाला आहे,  अशी पौराणिक कथा आपल्याला माहीत आहे. तो आपल्या  श्रद्धेचा प्रश्न आहे.  गंगा ही  पृथ्वीवर अवतरली ती भगीरथाच्या प्रयत्नामुळेच,  


भागीरथी 

भागीरथीबद्दल असे म्हंटले  जाते की ....

He held the river on his head,

And kept her wandering where,

Dense as Himalaya’s woods were spread,

the tangles of his hair.

गंगोत्री ग्लेसिअर 

भागीरथी ही नदी, हिंदूंची एक प्रसिद्ध देवता मानली जाते. जे कोणी तिच्या जवळ येतात ते तिच्यावर लुब्ध होऊन नुसते प्रेमच करीत नाहीत तर ती त्यांची देवता असते. तिचा उगम होतो तो  हिमालयातील गंगोत्रीला. बॉन्ड ह्यांच्या पुस्तकात, बेले फ्रेजर ह्या भटक्या  इंग्रजाचा उल्लेख केलेला आढळतो. इ.स. १८२० मध्ये  तो गंगोत्रीला भेट देण्यासाठी हिमालयात प्रवास करीत होता. तेंव्हा त्याने त्या प्रवासाचे जे वर्णन केले आहे ते असे.


GANGOTRI GLACIER – BHAGIRATHI

"मी हिमालयाच्या अगदी मध्यभागी पोहोचलो आणि भागीरथी नदीच्या उगमस्थानाचे ते विहंगम दर्शन पाहिले. गढवाल खोर्‍यातून चार नदया उगम पावतात, त्यातील भागीरथी म्हणजेच गंगा ही सर्वात सुंदर नदी आहे. ते विहंगम दृश्य वर्णन करणे अतिशय कठीण आहे. तेथे गेल्यावर आपल्या डोळ्याचे पारणे फिटते. हिमालयाचे आणि गंगेच्या उगमस्थानाचे ते निसर्ग सौंदर्य मला शब्दात व्यक्त करता येत नाही," 


भागीरथी - गंगोत्रीच्या काठाने प्रवास करताना 

मी स्वत: गंगोत्रीपर्यन्त गेलो नाही. तसा योगच जुळून आला नाही. अलकनंदेच्या  काठाने  मात्र मी प्रवास केला आहे. देवप्रयागला भागीरथी आणि अलकनंदेचा संगम मी  पाहिला आहे. भागीरथीच्या काठाने थोडा दाट जंगलातून प्रवास केला आहे. दूरवरच्या हिमालयाच्या रांगा आम्हाला आकर्षित करीत होत्या आणि लांबच लांब पसरलेल्या त्या ग्लेसीयर्स दिसत होत्या. माझे काही मित्र गंगोत्री पर्यन्त गेले होते. त्यांनी त्या देवभूमीला स्पर्श केला होता. रस्कीन बॉन्ड तेथपर्यंत गेले होते आणि त्यांनी ते वर्णन फार सुरेख केले आहे.

काहीजण टेहरी आणि भटवारी पर्यन्त जाऊन आले होते. बॉन्ड ह्यांनी ५००० फूट उंचीवरील नचिकेत तळे आणि ९००० फुटावरील दोडी तळ्यापर्यंतचा प्रवास  केला होता. ओक आणि चेसनट (शाहबलुत) ह्यांच्या जंगलातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असे त्यांनी लिहिले आहे. 

GANGOTRI – DEODAR JUNGLE

गंगाणी ते गंगोत्री ह्या मधील प्रवास आहे देवदारच्या दाट जंगलातून. मध्ये लागते ते सुकणीचे दाट देवदार जंगल. जदगंगा ह्या भागातील देवदार जंगल तर खूप प्रसिद्ध आहे. इंग्रज हे तसे फार साहसी. हिमालयातील जंगलात  ते सर्वत्र फिरले. १८५० मध्ये फेडरीक  विल्सन “पहाडी  हा इंग्रज ह्या भागांत खूप  फिरला आणि देवदारचे जंगल पाहून त्याने टेहरीच्या राजाकडून पाच वर्षाच्या लीजवर हे जंगल ताब्यात घेतले. आणि त्याने देवदारच्या  व्यापारावर भक्कम कमाई केली. त्या भागांत त्याने अनेक गेस्ट हाऊस बांधले. इंग्रज अधिकार्‍यांना नेहमी खुशीत ठेवले. तो  इंग्लंड सोडून इथेच स्थायिक झाला. त्याने मुखबा ह्या खेड्यातील गुलाबी ह्या खेडूत मुलीशी लग्न केले. तो नुसता देवदारचा व्यापार करीत नव्हता तर त्याने विल्सन सफरचंदाची लागवड केली. मोठ्या आकाराची, लाल रंगाची आणि अतिशय गोड आणि रसाळ सफरचंद म्हणजे विल्सन सफरचंदे ! देवदार जंगलाचा हा मालक तर होताच.  त्याने  सफरचंदाची  शेती हा जोडधंदा केला. हे करताना त्याने नदयावर झुलते पूल बांधले. जतगंगा नदीवर ३५० फूट लांबीचा तर भागीरथी नदीवर १२०० फूट लांबीचा पूल बांधणारा हा विल्सन घोड्यावरून सर्वत्र रपेट मारीत असे. लोकांना आजही पोर्णिमेच्या रात्री  ह्या पूलावरून जातांना विल्सनच्या घोड्याच्या टापा ऐकू येतात म्हणे. त्या परिसरातील लोक आजही ही आख्यायिका सांगत असतात. 

UTTARKASHI – ALAKNANDA

भागीरथी - गंगोत्री गोमुख  आणि नंतर 


गंगोत्रीचा हा प्रवास एक कठीण प्रवास आहे. हिमालयातील  ढासळणारे उंचउंच कडे, वळणे घेणार्‍या अवघड वाटा, खोल दर्या,  आपण उत्तरकाशी पर्यन्त प्रवास करतो आणि आपली दमछाक होते. गंगोत्री आहे १०,३०० फूटावर. तेथे  होते गंगोत्री हे छोटेसे देऊळ. एकोणीसाव्या शतकांत अमरसिंग थापर ह्या नेपाळी सेनाधिकारी असलेल्या माणसाने ते देऊळ बांधले होते

GANGOTRI TEMPLE

हिमालयातून गंगा आणली आहे ती भगीरथ ह्या एका शिळेतून.  ही शीळा कोरली आहे. तेथील दगड घासून चकचकीत केलाआहे. गंगोत्रीला हिमालयातील ग्लेसीयर मधून ऊगम पावणारी ही गंगा गोमुखातून बाहेर पडते  आणि पुढे १५०० मैल प्रवास करून मिळते ती बंगालच्या उपमहासागराला मिळते व सर्व  देशाला सुजलाम सुफलाम करते. बॉन्ड लिहितात की  "त्या गौरी कुंडाजवळ एक रात्र राहावे आणि सकाळी सोनेरी किरण पडल्यावर हिमालयातून ग्लेसीयर मधून उगम पावणारी  ही भागीरथी बघत बसावे. ते विहंगम दृश्य ज्याने पाहिले तो धन्य झाला. सकाळची ती सोनेरी किरणे तुमच्या गालांनाही गुलाबी करतात असे जे म्हणतात ते  १०० टक्के सत्य आहे. ती गुलाबी थंडी अनुभवावी. तो ROSE GOLD हिमालय अवर्णनीय  आहे"  अर्थात हे सर्व ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत. नंतर तेथे सर्वत्र बर्फाचे राज्य असते. 

DEVPRAYAG – CONFLUENCE OF ALAKNANDA AND BHAGIRATHI 


अशीही भागीरथी म्हणजे गंगा. हिरवेगार पाणी असलेली ही नदी. अलकनंदा नदी म्हणजे एक अवखळ तरुणी. धडाडणारी. हिमालयातील डोंगराना पोखरत त्यांचे गोटे करणारी. अलकनंदा अडकून पडते डोंगर दर्यात तर भागीरथी वाहत असते संथपणे. देवदारच्या दाट जंगलातून.  उत्तरकाशीतून आपण प्रवास करतो तेंव्हा ही भागीरथी आपल्याबरोबरच चालत असते. संथ गतीने.

आज टेहरी धरण बांधले आहे तिच्यावर. २६६ मीटर उंच. ४२ चौरस मैल परिसरलेले. ३० गावे गिळंकृत केली आहेत ह्या धरणाने. आता टेहरीच्या पुढेच भागीरथीचा प्रवास आपण पाहू शकतो. अशीही गंगा मय्या.  फेडरीक विल्सन सारखे इंग्रज तिच्या प्रेमात पडले ते तेथील निसर्ग सौंदर्‍यामुळे, सफरचंदाच्या शेतीमुळे आणि देवदारच्या दाट जंगलामुळे.  

******

REFERENCE 

GANGA DESCENDS - By Ruskin Bond , THE WRITER ON THE  HILL 

Photos From GOOGLE 


No comments:

Post a Comment