Tuesday, November 16, 2021

अनंतरावांच्या आठवणी

मी “प्रकाशक” झालो आणि मला जीवन समृद्ध करणारा अनुभव मिळाला.  अनंत भालेराव ह्यांचे कावड हे माझे पहिले प्रकाशन होते.  मी प्रकाशक कसा झालो?, ह्यासंबंधी मी जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा नकळत “पुस्तकांच्या जन्मकथा“ सांगण्याचा मोह मला होतो.

मी पदार्थविज्ञान संशोधक. रंगविज्ञानावर आधारित रंगतंत्रज्ञान विकसित केल्यानंतर मी  स्वतःचा छोटासा उद्योग सुरू केला. प्रकाशन व्यवसाय हा माझा नवा उपक्रम होता. मी संगणकाच्या व्यवसायाशी निगडीत होतो. 30-32 वर्षापूर्वी डीटीपी तंत्रज्ञान हे संगणकाच्या माध्यमातून पुढे येत होते. त्याची नुकतीच सुरुवात झाली होती. आज इंटरनेटच्या माध्यमातून वेब पब्लिशिंग हे एक मोठे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. डीटीपी आणि लेझर प्रिंटींग ह्यांच्या विकासामुळे मी नकळत प्रकाशन क्षेत्रात ओढला गेलो व पंचवीस वर्षापूर्वी  एक  स्वतंत्र धंदा म्हणून तीन डीटीपी केंद्रे सुरु केली. काही पुस्तकांची कामे आमच्याकडे येऊ लागली. परचुरे प्रकाशनाचे जी..कुलकर्णी ह्यांचे “कुसुमगुंजा” आणि “माणसे आरभाट आणि चिल्लर” ही दोन पुस्तके संगणकीय अक्षर जुळवणीसाठी आमच्याकडे आली होती. आम्ही  औरंगाबादला क्षितिजा कम्प्युटर सर्व्हिसेस हे डीटीपी सेंटर सुरू केले होते.  “मराठवाडा” आणि  “तरुणभारत” ह्या दैनिकाची कामे आम्हाला मिळत होती. तेथील काही प्रकाशकांची पुस्तके डीटीपीसाठी येऊ लागली. आम्ही काही पुस्तकाची अक्षर जुळवणी आणि पृष्ठरचना केली होती.  तेंव्हाच माझ्या डोक्यात विचार आला की आपणही स्वतःच प्रकाशक व्हावे व चांगली देखणी, सुंदर व विचार करावयास लावणारी, वेगळी पुस्तके बाजारात आणावी.  पुस्तकांचा व लेखकांचा विचार सुरु झाला. माझ्या आवडीचे लेखक शोधत होतो. आणि पहिलाच विचार आला तो “मराठवाडा” दैनिकाचे झुंजार पत्रकार अनंत भालेराव ह्यांच्या लिखाणाचा. त्यावेळी दैनिकाची संपादकीय खुर्ची सोडून अनंतराव विविध लिखाणाकडे वळले होते. “पेटलेले दिवस” प्रसिद्ध झाले होते. “मांदियाळी“ हे पुस्तक मौज प्रकाशनाकडे प्रसिद्धीसाठी दिले होते व प्रकाशनाची वाट पाहत  होते. त्या वेळी अनंतराव आजारी होते पण त्यांचा लिखाणाचा झपाटा चालूच होता. “कावड“ हे सदर ते लिहीत असत. पत्रकार अनंतराव साऱ्या महाराष्ट्राला माहीत होते. परंतु अनंतरावातील साहित्यिक “कावड“ मध्ये प्रकर्षाने दिसत होता. ते लिखाण सर्वस्वी वेगळे होते. मला ते खूप आवडले होते.

अनंतराव भालेराव आणि सुशीला भालेराव मुंबईला आले  होते  तेंव्हा माझ्या कार्यालयात आले होते.  माझ्याबरोबर रंगविज्ञान आणि तंत्रज्ञान हया माझ्या विषयावर त्यांनी चर्चा केली.  

चांगल्या संपादकाची दोन वैशिष्टे असतात. १) चालू राजकीय, सामाजिक घडामोडीवर जनमत तयार करणे. २) वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाज मन व्यक्त करणे. आपले सारे जीवनच राजकारणाने व्यापून टाकलेले असते. राजकारणाचे बरे वाईट परिणाम आपल्या जीवनावर कळत नकळत होत असतात. आपण राजकारणापासून कितीही अलिप्त असलो तरीही त्याचे परिणाम भोगत असतो. अशावेळी आपली काही मते तयार होतात. आपल्याला जे वाटते ते अग्रलेखातून किंवा स्तंभ लेखनातून व्यक्त करणारा ‘संपादक’ आपल्याला आवडतो. अर्थात हे प्रत्येक बाबतीत खरे असते असे नाही. अनंतराव हे असे संपादक होते की जे मला त्यांच्या अग्रलेखामुळे आवडत असत. कारण त्यांची समाजमनाची जाण उल्लेखनीय होती. ते मला आवडणारे संपादक होते.

ह. रा. महाजनी, द्वाभ. कर्णिक, माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर हे त्या काळातील आघाडीचे पत्रकार. ते मुंबईच्या वर्तमानपत्रांचे संपादक. अनंतराव मराठवाड्याचे संपादक. त्यांचे शब्द म्हणजे शस्त्र होते. महाराष्ट्र टाइम्सच्या गोविंद तळवलकर ह्यांना हे माहीत होते. ते अनंतराव  ह्यांचे चांगले मित्र आणि चाहते होते. त्यांनी अनंतराव ह्यांचे अनेक अग्रलेख महाराष्ट्र टाइम्समध्ये अनेकदा छापले होते. हे आपल्याला खूप काही सांगून जाते.
कावड” मधील लिखाण सर्वच अर्थाने वेगळे होते.
 मला आवडणारे ते सदर होते. त्या लिखाणाचे चांगले संकलन करून सुंदर पुस्तक काढावे, असा विचार डोक्यात आला. पुस्तक “देखणे“ असावे, निर्मीती सुंदर असावी. हा एक विचार तंत्रज्ञ असल्यामुळे प्रभावी होता. अनंतरावाचे लिखाण लक्षवेधी तर होतेच. पुस्तक निर्मीतीही सुंदर झाली पाहिजे, असा माझा ध्यास होता. त्यातूनच माझे पहिले प्रकाशन “कावड” हे बाजारात  आले. अनंतरावांच्या राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा ठसा मराठवाड्यातील लोकांना चांगलाच माहीत होता. दै.मराठवाडा म्हणजे अनंतराव, हे समीकरण सर्वांनाच ठाऊक होते. त्यांच्या लेखणीचा प्रभाव इतर महाराष्ट्रावर ही दिसू लागला होता. "मराठवाडा मोलाचा नि तोलाचा" हे राज्यकर्त्यांना समजू लागले होते. त्याहीपेक्षा अधिक चिरंतन अशा त्यांच्या भाषाशैलीचा माझ्यावर विशेष प्रभाव होता आणि म्हणूनच त्यांच्या साहित्याचा अनमोल ठेवा असलेला “कावड” ह्या स्तंभ लेखनावर आधारित पुस्तक प्रसिद्ध करावे असे वाटू लागले. मराठवाड्याच्या साहित्य संस्कृतीचा हा ठेवा मला फार मोलाचा वाटला. शब्दांतून व्यक्त होणार्या ह्या अलौकिक भाषासौंदर्याला उत्कृष्ट रचनेचे कोंदण असावे व तशी पुस्तक निर्मिती करावी असे वाटू लागले. मी अनंतरावांना भेटलो. माझा विचार बोलून दाखवला. त्यांना माझी पूर्वपिठीका माहीत होती. त्यामुळे त्यांना थोडेसे आश्चर्यच वाटले. "हा काय नवा उद्योग सुरु करतोयस?", असे ते म्हणाले. त्या नंतर ते “हो“ म्हणाले. प्रा. सुधीर रसाळ, प्रा. भगवंत देशमुख आणि अनंतराव ह्यांनी लेखांची निवड केली. आणि मी प्रकाशनाचे काम हाती घेतले. चित्रकार श्याम जोशी ह्यांनी मुखपृष्ठाचे सुंदर चित्र काढले. अरुण नाईक ह्यांच्या छापखान्यात पुस्तक छापले.  माझ्या ह्या पहिल्याच प्रकाशनाचे खूप कौतुक झाले. “पुस्तक फार छान काढले आहे, देखणे आहे“, असा अभिप्राय कविवर्य कुसुमाग्रजांनी पत्र लिहून कळविला. माझे  मन आनंदून गेले.
शब्द व भाषा या मानवी अभिव्यक्तीच्या व अस्मितेच्या माध्यमाद्वारे व्यक्तिचित्रे, मृत्युलेख, राजकीय भाष्य,
समाजप्रबोधन, आणि अनुभव कथन या निरनिराळ्या विषयावरील बेचाळीस निवडक स्तंभ लेखाचा संग्रह म्हणजे “कावड”. ”ऋतू प्रकाशनाचे हे पहिलेच प्रकाशन असून देखील उत्कृष्ट निर्मिती हा ह्या ग्रंथाचा विशेष आहे“, अशी प्रतिक्रिया “रविवार सकाळ” मध्ये समीक्षकांनी नोंदवली. बहुतेक सर्व मराठी वर्तमानपत्रातून त्यावर समीक्षा लिहून आली. ”लक्षवेधी पुस्तक” म्हणून त्याचा उल्लेख अनेकदा झाला. “कावड”चे मुद्रण आणि मांडणी उत्कृष्ट आहे, असा अभिप्राय अनेकांनी नोंदवला.
ह्या पु
स्तकाचा प्रकाशन समारंभ परभणीला विजय तेंडुलकराच्या हस्ते झाला होता. “शब्द नव्हे शस्त्र”, असा अनंतरावाच्या लेखनशैलीचा गौरव करणारे तेंडुलकरांचे ते भाषण खूप रंगले आणि गाजले. सर्व मराठवाड्यातून निरनिराळ्या ठिकाणाहून,  दूरदूरची  मंडळी कार्यक्रमाला आली होती. दीड दोन हजार लोक पुस्तक प्रकाशनासाठी येतात आणि अनंतरावाचे पुस्तक विकत घेतात हा अनुभव विलक्षण होता. अनंतराव ह्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे ही सारी मंडळी जमली होती. विजय तेंडुलकरही भारावून गेले होते. बहुधा, अनंतरावाचा तो शेवटचा सार्वजनिक कायक्रम असावा. त्या दिवशीचे त्यांचे भाषण मनाला चटका लावणारेच होते. “कावड”चा प्रकाशन समारंभ सर्वांनाच भारावून टाकणारा होता. कार्यक्रमाच्या स्मृती आजही ताज्याच वाटतात. जेव्हाजेव्हा मी मराठवाड्यात जातो तेव्हातेव्हा सारेच जण त्या कार्यक्रमाची आवर्जून आठवण काढतात. कावड नंतर रामप्रहर हे विजय तेंडुलकर ह्यांचे पुस्तक आमच्याकडे प्रकाशनासाठी आले. ही दोन्ही पुस्तके म्हणजे वर्तमानपत्रीय लिखाणाचे मानदंड आहेत.

मी जेंव्हा “कावड” आणि विजय तेंडुलकरांच्या “कोवळी उन्हे” ह्या दोन पुस्तकांची
 तुलना करतो  तेंव्हा मला त्या दोन पुस्तकातील काही  साम्य लक्षात येतात. तसेच दोघांच्या लेखनशैलीची वेगळी वैशिष्ट्ये माझ्यासमोर येतात,  म्हणून दोघांचेही लिखाण मला विशेष आवडते॰

पुस्तक मिळाल्यावर महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या  पु..देशपांडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया  अनंतराव ह्यांना पत्र लिहून कळविली होती. ती अशी: एखाद्या कुमार गंधर्वाने मैफिलीत शांतपणे मांडलेल्या एखाद्या रागातला धीमा ख्याल असो की सहज बोलता बोलता गळ्यातून निघालेली लकेर असो, तिच्या मधून कुमारचं गंधर्वपण आपल्या अस्तित्वाची खूण पटविल्याशिवाय रहात नाही. “कावड“ मधले तुमचे लेखन “झरा मुळचाचि खरा“ ह्याची आल्हाददायक साक्ष पटवून देते. अचानक धनलाभ व्हावा तसा ग्रंथलाभ झाल्याच्या आनंदात मी आहे“

श्रीखंड्याने एकनाथांच्या घरच्या रांजणात रोज कावड घातली. अनंतरावांनी वाचकांच्या रांजणात घातलेल्या कावडीचे रसग्रहण करताना प्रा. . प्र. प्रधान म्हणतात “परिपक्व पत्रकाराच्या व्यक्तिमत्वाचा विलोभनीय अविष्कार म्हणजे “कावड”.  असे खूप काही लिहून आले. पंतप्रधान नरसिंहराव ह्यांनीही ह्या पुस्तकाचे कौतुक केले. ते अनंतरावांचे चाहते होते व मराठी साहित्याचे रसिक वाचक होते.

प्रकाशकाला मान्यवरांचे अभिप्राय जसे मोलाचे वाटतात तसेच सामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया ही खूप काही सांगून जातात. मला खूप वाचकांची पत्रे मिळाली.  श्री न. सा. सत्तूर मला लिहितात, माझे जीवनच मुद्रणालयमय झाले आहे. कारण मी मुद्रितशोधक म्हणून येरवडा कारागृहातील शास्त्रीय मुद्रणालयातून निवृत्त झालो. वाचनाची गोडी. त्यातील निवडक विचार टिपणे हा माझा छंद. मराठवाड्याचा संपूर्ण इतिहास मला “कावड” मधून भावला. ही कावड अनेकांच्या घरी आपले म्हणणे सांगत राहील.” किती बोलका अभिप्राय.
शब्द नव्हे शस्त्र
असा ज्यांचा बाणा होता त्या “मराठवाडा” कार अनंत भालेराव आणि स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ह्या दोघांचे अगदी जवळचे सहकारी, जयहिंद प्रकाशनाचे प्रमुख जगन्नाथराव बर्दापूरकर ह्यांचे निकटतम मित्र आणि सहकारी अशी ज्यांची सार्वजनिक ओळख होती ते केशवराव देशपांडे. मराठवाडा” ह्या भाषिक वर्तमानपत्राचे ते सरव्यवस्थापक होते. अनंतराव, जगन्नाथराव बर्दापूरकर आणि  केशवराव देशपांडे हे प्रसिद्ध त्रिकुट आणि एकमेकांचे सहकारी. आपले सहकारी  “केशवराव देशपांडे: आमचे ब्रदर जॉन” ह्या लेखात अनंतराव लिहितात, 'मला पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही थोडेफार यश मिळाले असेल त्यावर शंभर टक्क्यांचा अधिकार हा केशवरावांचा आहे. ते प्रत्येक प्रसंगी माझ्या पाठीशी राहिले व खर्या अर्थाने पाठीशी राहिले. प्रसिद्धीच्या झोतात मी सातत्याने राहिलो मात्र केशवराव त्या झोतापासून प्रयत्नपूर्वक दूर राहिले. त्यांच्या परिश्रमाचे, कौशल्याचे व गुणाचे श्रेय नकळत मला मिळत गेले. केशवरावांचा मोठेपणा असा की, ते सदैव उदार दात्याची व घरातल्या वडील माणसांची भूमिका मन:पूर्वक पाडीत राहिले. वयाने ते माझ्यापेक्षा लहान परंतु वृत्तीने जेष्ठ. त्यांचे हे जेष्ठत्व मला अखेरपर्यंत उपयोगी तर पडत गेलेच परंतु मराठवाडा दैनिकाच्या प्रगतीला ते अधिक उपयोगी ठरले. साप्ताहिकापासून दैनिकापर्यंतचा या वृत्तपत्राचा प्रवास प्रामुख्याने केशवरावांच्या नेतृत्वाखालीच होत गेला'. सेतू माधवराव ह्यांचे जसे ब्रदर जॉन होते तसेच केशवराव अनंतरावांचे 'ब्रदर जॉन' होते. ह्यात अनंतराव ह्यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांची आपल्या सहकार्याबद्दलची आत्मीयता दिसून येते.   

“मराठवाडा” हे भांडवलदाराचे वर्तमानपत्र नव्हते. सरकार आणि सरकारी धोरणावर सतत हल्ले करणारे व घनघोर टीका करणारे वर्तमानपत्र म्हणून त्याचा नावलौकिक होता. टिळक-आगरकरांच्या परंपरेतील वृतपत्र म्हणून ते नावाजले होते. "मराठवाड्या"चा श्वास होता. मराठवाड्याची अस्मिता होती. मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन सरकारशी लढणारे वर्तमानपत्र होते. अशा वर्तमानपत्राला शासकीय जाहिरातींचा पाठिंबा नसतो. असे वर्तमानपत्र चालविण्याचे अर्थशास्त्र फार कठीण असते. त्यामुळेच अनंत भालेराव नेहमी म्हणत असत की अग्रलेख लिहिणे सोपे आहे परंतु  रोजचे वर्तमानपत्र काढण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन अतिशय अवघड आहे. त्या काळात वर्तमानपत्राला कागद मिळवण्यासाठी फार कष्ट पडत असत. टंचाईच्या काळात कागद कसा उपलब्ध करून घ्यायचा हे अतिशय कर्मकठीण काम होते. त्याच बरोबर भांडवली वर्तमानपत्राची स्पर्धा जीवघेणी होती. वृतपत्र वितरकांना फूस लाऊन देणे हे स्पर्धात्मक वर्तमानपत्राचे काम जोरांत चालू होते. आणि अशी स्पर्धा औरंगाबादेत नुकतीच सुरु झाली होती. नियमित कागद पुरवठा आणि आवश्यक असलेल्या जाहिराती ह्यावर वर्तमानपत्र चालतात. त्यामुळेच ती रोजच्या रोज प्रसिद्ध करता येतात. त्याचे गणित अनंतराव भालेराव ह्यांना चांगले जमले आणि त्यांचा “मराठवाडा” महाराष्ट्रात गाजू लागला. असंख्य व्यावसायिक अडचणींना तोंड देत मराठवाडा दैनिक लोकांचे प्रश्न मांडत प्रसिद्ध होत होते.

मराठवाड्याचा दिवाळी अंक अगदी झोकात निघत असे. अनंत भालेरावांच्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक, लेखक आणि कवी मराठवाडा दिवाळी अंकासाठी आवर्जून लिहित असत. मराठवाड्यातील आजचे जे नावाजलेले साहित्यिक, कवी आणि चित्रकार आहेत ते मराठवाडा दिवाळी अंकातील लिखाणामुळेच पुढे आले आहेत. “मराठवाडा’ दिवाळी अंकाला मुंबई पत्रकार संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून लागोपाठ तीन चार वर्षे पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे मराठवाडा दिवाळी अंक खूप नावाजला होता.  "मराठवाडा" दिवाळी अंक नेहमीच लक्षवेधी ठरला.
माझा मोठा भाऊ रवींद्र गंगाखेडकर  हा “मराठवाड्या”चा परभणी जिल्ह्याचा
प्रतिनिधी होता. मुलाखती घेणे, संपादन करणे हा त्याचा आवडीचा विषय होता. राजकीय मंडळींच्या गोटातून बातम्या कशा मिळवायच्या हे त्याला अवगत होते. जेंव्हा नुकताच ‘दैनिक मराठवाडा’ सुरु झाला होता  तेंव्हा परभणी जिल्ह्याचा वार्ताहर म्हणून त्याची नेमणूक झाली. सामाजिक आणि राजकीय मंडळीत त्याची उठबस असे. त्याची परभणी जिल्ह्याची वार्तापत्रे दर आठवड्याला प्रसिद्ध होत असत. ती खूप गाजली. मानवत खून खटला उजेडात आणण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ते प्रकरण खूपच गाजले. त्यावेळी तो अनेकदा जीव धोक्यात घालून खूप हिंडला. स्थानिक राजकारणाची त्याला चांगलीच जाणीव होती. त्याने अनेक गोष्टी उजेडात आणल्या. भ्रष्टाचार शोधून काढले. 'शोध पत्रकारिता', असे ज्याला म्हणतात ते त्याने 3०-3५ वर्षापूर्वी प्रस्थापित केले ते मराठवाड्याचा एक वार्ताहर म्हणूनच. अनंत भालेराव ह्यांचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्यांच्या पठडीतच तो पत्रकार म्हणून तयार झाला. आठवड्यातून एकदा तो औरंगाबादला येत असे आणि त्याची अनंतरावांशी भेट होत असे. त्यांच्याशी चर्चा होत असे. मी अनंतराव भालेराव ह्यांचे ‘कावड’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आम्ही परभणीला ठरविला होता. तो देखणा समारंभ तेथे आयोजित केला त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी रवींद्रनेच घेतली होती. अनंतराव ह्यांच्यावरील प्रेमामुळे सर्व मराठवाड्यातून लोक आले होते. सभागृह संपूर्ण भरले होते. दोन दिवस परभणी शहरात रवीने ३ कार्यक्रम ठेवले होते. कार्यक्रमाच्या आयोजनावर अनंतराव खूष होते. त्यांचे परभणीवर विशेष प्रेम होते.  आजही परभणीकर त्या कार्यक्रमाची नेहमी आठवण काढतात.

असा पत्रकार पुन्हा होणे नाही.

****

 

1 comment: