Thursday, March 14, 2013

नामंजूर


कवी संदीप खरे ह्यांची ही कविता त्यांच्याच कार्यक्रमात बहुतेकांनी ऐकलेली असणार. हा तरुण कवी अगदी मोजक्या शब्दात जे काही सांगून गेला आहे ते आपल्या सगळ्यांना मनापासून पटले आहे. कारण आपण ही कविता रोजच जगतो आहोत. ही खरी वस्तुस्थिती आहे. हे आपले कविता जगणे आहे. ती आपली हतबलता आहे. आपल्याला भोवताली जे घडते आहे,दिसते आहे ते नामंजूर आहे.
वेळ पाहून खेळ मांडणे नामंजूर ..
आपण साधी भोळी माणसे. राजकारण आपल्याला समजत नाही. मध्यमवर्गीय विचारसरणी. त्यात आपण जर नितीमत्तेला विशेष महत्व देणारे असलो तर आणि Non-compromising attitude असलेला असलो तर जगताना खूप त्रास सहन करतो .शासकीय नोकरीत आणि राजकारणात अशी माणसे कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. राजकारणावर आपण बोलतो. आपल्याला त्याचा वीट येतो.आपली मूळ प्रवृत्ती तशी नसते. आपल्याभोवती वेळ पाहून खेळ मांडणारी अगणित माणसे असतात. ज्यांना हे सहज जमते त्यांच्या स्वभावात ती लवचिकता असते.
“आपला तुपला हिशोब आहे हा सगळा ......”
हे खरंच आहे. ज्याला हा हिशोब जमला नाही त्यामुळे तो स्वतःचेच नुकसानच करून घेतो.
“मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची .....”. किती खंबीर विचाराने हा कवी बोलतो आहे.
जी माणसे dominating personality  ची असतात त्यांनाच वाहत्या पाण्याची दिशा ठरविता येते. मी म्हणतो तीच पूर्व दिशा आणि मी म्हणतो तेच खरे असा स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास असेल तर व दुसऱ्या कोणाची मते जाणून घेण्याची क्षमता नसेल तर त्यामुळे माणूस एकटा होतो. त्याला एकटेच लढावे लागते , हे त्याच्या फार उशिरा लक्षात येते.
“लपत किनारा शीड सोडणे नामंजूर ....”
एकदा घेतलेला बरा वाईट निर्णय, मग त्याकरिता वादळातील बोट सोडून जाणे ज्याला माहित असते तो खरा निश्चयी असतो.
“डोंगर बघता उंची नाही, खोली आठवते ......”
हिमालयात किंवा सह्याद्रीच्या उंच टोकावर आपल्याला फक्त खोलीचीच जाणीव होते. फक्त चढताना आपण उंचीचा विचार करीत असतो. आणि एकदा उंची गाठली की आपल्याला आपल्या मर्यादित यशाची जाणीव होते व नव्या उंचीचे टोक दिसू लागते. प्रत्यक्ष जीवनातही एका मिळालेल्या यशानंतर आपण दुसऱ्या यशासाठी धडपडत असतो. आपण “आणखी,आणखी” च्या मागे लागतो.
आणि जेंव्हा आपली मानसिक वैफल्याची अवस्था असते तेंव्हा....
“ राखण करीत बसतो येथे कंटाळा.”  आणि “ मग “कंटाळ्याचाही येतो कंटाळा”. हा कंटाळा “Killing” असतो. तो सतत येणे थांबविणे आपल्याच हातात असते. Frustration येते. आणि तेच आपल्याला गारद करते. निराशा झटकली की कंटाळा जातो. आणि कंटाळा गेला की उत्साह आनंद निर्माण करतो.त्यासाठी जगण्याची त्रिज्या सतत वाढवीत गेले पाहिजे. इतर अनेक गोष्टीत रस घेतला पाहिजे. बहुविध विषयात रस असला पाहिजे. व्यक्तिमत्व बहुविध विद्यात पारंगत असायला पाहिजे.
आपण मध्यम वर्गीय माणसे नेहमीच हजार चिंतानी डोके खाजवीत बसतो. नको त्या गोष्टीवर विनाकारण चिंता करणे हा आपला स्वभावधर्मच असतो. ही चिंता आपल्याला खात असते. निराश करते. ह्या चिंतेपासून दूर होण्यासाठी आपण आपले मन रिझवले पाहिजे. एखाद्या माणसात गुंतवून घेतले पाहिजे. हुरहूर वाटली पाहिजे. डोळ्यात मोर नाचू लागले पाहिजेत. मेघ नसतानाही किंवा विजेचा कडकडत नसतांनाही जो मोर नाचतो तो जीवनावर खरा प्रेम करणारा मोर. अशा अवस्था असण्याकरिता कोणीतरी जवळची व्यक्ती सहवासात असावयास हवी. त्या अवस्थेत मग जीवनाचा भार वाटत नाही. हळवे मन सुंदर असते. संवेदनशील मन शहाणे असते. जीवनात अत्तराचा सुगंध पसरविण्याचे आपल्याच हातात असते. आपण सौंदर्याचा पुजारक असले पहिजे. “ सुंदरतेच्या सुमनावारचे दंव चिम्बुनी घ्यावे” अशी बालकवींची कविता जगता आली पाहिजे. आपण कोणासाठी तरी आहोत आणि कोणीतरी आपल्यासाठीच आहे असे आसुसलेपण म्हणजे प्रेम. आणि त्यातच जेंव्हा आपल्याला जीवनाचा अर्थ जाणवू लागतो. तोच खरा रम्य क्षण.
आपल्याला आलेली कळ जेंव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला कळते आणि तिला वाटलेल्या प्रेमामुळे आपल्याला नकळत बरे वाटू लागते, तेंव्हा मोर नाचू लागतात. रिमझिम पावसात आपण चिंब भिजून जातो. “मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मजला उलगडले” ,अशी भाव अवस्था असते.  आपल्याला मग तो व्याप वाटत नाही. त्यामुळे कुठलाही ताप होत नाही. आपली प्रश्नांची उत्तरे शोधण्यापासून सुटका होते. असे हे आपले जगणे सुंदर होते. जगणे एक गाणे होते. “माझे जीवन गाणे गाणे” असे आपण गाऊ लागतो. जगणे ही कविता होते. अर्थात हे सारे तरुण वयात खरे असते. कविता जगणे हे फक्त संवेदनशील व्यक्तीलाच शक्य असते.   
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

No comments:

Post a Comment