Monday, March 18, 2013


माणूस : एक अगम्य प्राणी

आयुष्य वाहत असते – नदीसारखे. –  अखंड – नं संपणारे
आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे वाटचाल करीत असतो. यश- अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि प्रचंड आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद-दुःख आशा-निराशा , ह्यांच्या हिंदोळ्यावर आपण रमतो, दमतो आणि एकाकी होतो.
माणसं जवळ येतात. आणि दुरावतात. आपली सख्खी माणसे, रक्ताची माणसे दुरावतातही . ओलावा कमी होतो. आपली गुंतवणूक( Involvement ) कमी कमी होत जाते. नवी नाती निर्माण होतात . कधी कधी ती बळकट होतात. काहीं नाती फारशी वाढतच नाहीत. आपल्याला नको असतात. ओलावा नसतो. नाती- गोती आणि ऋणानुबंध वेगळे असतात. कालचे सख्खे मित्र आज थोडेसे दुरावलेले असतात. नाळ मात्र तुटलेली नसते. आपण बदलत जातो. व्यवसायात काहीं मित्र भेटतात. पण त्यात ओलेपणा नसतो.
माणूस मोठा गमतीदार प्राणी आहे. नं कळणारा. कधी आपल्याला खूप समजला असे वाटते .पण खऱ्या अर्थाने कळलेलाच नसतो. माणूस कधी कांद्याच्या एकानंतर एक असणार्या थरासारखा असतो. काही माणसे बिन-बियाच्या द्राक्षासारखी असतात. काही माणसे संत्र्यासारखी आंबट गोड असतात. काही माणसे कलमी आंब्यासारखी गोड. तर काही खरोखरच हापूस.
माणूस जाणून घेणं फार अवघड गोष्ट. व्यवसायात माणसं वाचता येतात असा माझा थोडाफार अनुभव. बेरकी माणसं .सरळ माणसं .समोर अतिशय गोड बोलणारी माणसं .दिखाऊ माणसं . कामापुरता मामा म्हणणारी माणसं .विनाकारण जवळीक साधू पाहणारी माणसं .पहिल्याच भेटीत नकोशी वाटणारी माणसं .प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं . आपण कधीच ज्या पद्धतीने विचार करू शकत नाही त्या वेगळ्या विचारांची दिशा देणारी माणसं. तापट माणसं. रागावणारी माणसं. क्षणात बदलणारी माणसं . खोटी माणसं. नटसम्राट माणसं . नुसताच व्यावहारिक विचार करणारी माणसं. हवीहवीशी वाटणारी प्रेमळ माणसं. हसणारी माणसं. हसवणारी माणसं. तक्रारखोर माणसं. रडकी माणसं. दु:खी माणसं. सहनशील माणसं. हतबल माणसं. खरी प्रामाणिक ,निर्मळ मनाची माणसं. मदत करणारी माणसं. अर्थ व्यवहारात फसवणारी माणसं.
व्यवसायात अर्थकारणामुळे वैतागलेले कारखानदार, स्वतःत रमलेला कवी, विचारात मग्न असलेला शास्त्रज्ञ , विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करणारा शिक्षक, कामगारांच्या हितासाठीच झगडणारा कामगार नेता, बेरकी राजकारणी, समाजात बदल घडवून आणण्यासाठी तळमळणारा समाजसेवक, मुलांच्या भवितव्यासाठी मरमर झटणारा बाप, स्वतःकडे दुर्लक्ष करून मुलासाठीच जगणारी आई, संपतीसाठी एकमेकांच्या उरावर बसणारे भाऊ, मुलींच्या लग्नाच्या काळजीत असलेले आई-बाप, अशी सारी माणसे.
आपण अशी खूप माणसं पाहत असतो. जग बदलून टाकणारी माणसं पाहतो. दुभंग व्यक्तिमत्वे पाहतो.
काही माणसांशी आपले वेगळेच ऋणानुबंध जुळतात. काहीं व्यक्तींशी आपण संपर्क तोडतो. काहीजण खरेच मित्र असतात. त्यांच्याशी आपण सुख-दुख्खाच्या गोष्टी करतो. काही माणसं खूप मोठी असतात. समाजात त्यांना विशिष्ट स्थान असते. प्रतिष्ठा असते. पण ती माणसं फार छोटी असतात असे लक्षात येते. मोठे लेखक, शास्त्रज्ञ , राजकारणी ह्यांची प्रतिमा उजळ असते. पण माणूस म्हणून ती छोटी असतात. आपण जेंव्हा त्यांच्या प्रतिभा आणि प्रतीमेमुळे प्रभावित होतो तेंव्हा प्रत्यक्ष भेटीत त्यांचे छोटेपण लक्षात येते. तेंव्हा आपला भ्रमनिरास होतो. काही मोठी माणसं – त्यांच्याबद्दल आपण फारसं चांगलं ऐकलेले नसते , ती माणसं चांगली असतात. माणसामाणसांचे संबंध वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे असतात. कधी कधी त्यांचा देवाणघेवाणाशी संबंध असतो. आपल्याकडून त्यांना काहीं तरी हवे असते.आपल्याला त्यांच्याकडून काहींच अपेक्षित नसते. ती चांगली वागतात. तात्पुरती . थोडा काळ. पुनः ओळखही दाखवत नाहीत. असा हा विविध मनोप्रवृत्तीचा माणूस. त्यात आपणही असतोच. आपणही बदलत असतो. नेहमी वेगळ्या पद्धतीने,नं कळत वागत असतो.
बाप आणि मुलगा. वय वाढतं. त्यांच्यातील बोलणं कमी कमी होत जातं. मोकळेपणा कमी झालेला असतो. तणाव वाढलेला असतो.” हे आपलेच आई-वडील का? किंवा” हा आपलाच मुलगा/मुलगी का?” असे प्रश्न पडू लागतात. मित्र किंवा बायको ह्यांच्या बरोबरही असेच प्रश्न निर्माण होतात. माणसातले हे दळणवळण नं समजणारे आहे. कथा-कादंबर्यातून, चित्रपटातून  किंवा टी वी सिरीयल मधून जी पात्रें आपल्याला दिसतात त्यांच्यातही आपण माणूस शोधू लागतो.
असा हा माणसांचा शोध चालूच असतो. माणूस अगम्य प्राणी आहे. पूर्ण कधीच कळत नाही. त्यामुळेच आपल्या जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो. एक मात्र खरे, माणूस पारखून व्यवहार केला पाहिजे. 

No comments:

Post a Comment