जिद्द हरवलेली माणसे
जगणे, भोगणे आणि संपवणे
अमेरिकेवर आलेल्या आर्थिक
संकटाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. बरीच वर्षे अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीयानाही
विलक्षण चटके बसू लागले आहेत. लॉसएनजीलीस मधील एका भारतीयाने स्वतःच्या संपूर्ण
कुटुंबाला ठार मारून स्वतः आत्महत्या केली हे भयानक वृत्त वाचले. एम.बी.ए( फाय्नानंस) असलेला ४०-४२ वर्षाचा हा भारतीय इतके भयंकर कृत्य करतो
ह्याचा अर्थ मानसिक तणाव किती असह्य झालेला असेल व जगणे संपवण्याचा विचार प्रबळ
होऊन अघोरी कृत्य करण्यास तो कसा प्रवृत्त झाला असेल हे ऐकून मन सुन्न होते. माणूस
इतका असहाय्य का होतो? त्याला इतकी टोकाची भूमिका का घ्यावीशी वाटते? त्याची
मनोदुर्बलता काय दर्शविते? आर्थिक प्रश्न नं सोडवता इतके टोकाची जीवन संपवण्याची
भूमिका घेणारी ही माणसे ४२ वर्षाच्या आयुष्यात काहींच कसे शिकत नाहीत. ह्याचा अर्थ
निव्वळ पैसा पैसा म्हणून करिअरच्या मागे लागणारी ही दुबळी माणसे वयानी वाढली पण
जगण्याचा अर्थच हरवून बसली. ह्यांची मानसिक वाढ झालीच नाही. असेच म्हणावे लागते.
भारतात अनेकांना “अमेरिकेचे स्वप्न “ दिसत असते. अशाच एका भारतीयाच्या “अमेरिकन स्वप्ना”चा झालेला हा चक्काचूर. जगण्याचा
अर्थच हरवून बसलेली ही माणसे . त्याना जगणे कळलेच नाही.
आजूबाजूला अतिशय गरीबीतही
खूप आनंदी दिसणारी माणसे बघीतली की ह्या सुबत्तेमुळे मानसिक दृष्ट्या दुबळी असलेली
ही माणसे पाहिलीकी मन विचारते की हे असे का? आयुष्यात “आनंद” कसा मिळवायचा हे ही
शिकवायला पाहिजे. इतर शिक्षण काय कामाचे? आयुष्याचा अर्थ नं उमगणारी ही दुबळी
माणसे म्हणजे समाज अविकसित असल्याचे लक्षण होय.
मुंबईच्या जुहू येथील एका
पबमध्ये २५० मुले-मुली डीस्कोचा आनंद घेत असताना कोकेन सारखी नशा आणणारे पदार्थ सेवन करताना न्याक्रोटीक पथक
छापा घालून त्यांना पकडते. ही बातमी मन सुन्न करणारीच आहे. २५ ते ३० हजार रुपये
खर्च करून रेवस पार्टीत सामील होणारी ही उच्चभ्रू समाजातील ही मुले-मुली.
त्यांच्याकड एवढा पैसा येतो कुठून? ह्यांचे आई-वडील त्यांना एवढे पैसे देतात कसे?
कोणत्या मार्गांनी ते हे पैसे कमावतात? हे पब- बार असे अवैध मार्गाने व्यवसाय तरी
कसा करतात? अशा घटना मुंबई-पुणे आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात घडताना दिसतात.
सुनील दत्तचा मुलगा संजय दत्त , प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल, शक्ती कपूरचा मुलगा
अशी कितीतरी उदाहरणे समोर येतात. मोठ्या लोकांचे सोडा. पण मध्यम वर्गातील मुलेही
ह्या सापळ्यात अडकताना दिसत आहेत. ह्या मुलांचे हे स्वैर वागणे काय दर्शविते आहे?
पैसा मिळवून समृद्धी
प्राप्त झाल्यावर हे मार्ग का आवडू लागतात? समाजाची जडणघडण बिघडत आहे ह्याचेच हे
लक्षण आहे. त्यांच्या जगण्याचे हे नवे अर्थ समजणे कठीण आहे.
अलीकडेच जवळच्या कनिष्ठ
मध्यमवर्गीय कुटुंबातील एका वाढत्या वयाच्या तरुणाने बेकारीला कंटाळून , व लग्न
होत नसल्यामुळे स्वतःला गळफास देऊन लटकावून घेतले. आत्महत्या केली पण भाऊ आणि
वडिलांना इतका मन:स्ताप होऊन बसला की तेच वेडे होतात की काय अशी अवस्था निर्माण
झाली. जाणारा गेला पण राहणार्याला जगणे कठीण होऊन बसले. पोलीस अधिकारी सांगत होते
की अशी संख्या वरचेवर वाढत आहे आणि आम्हाला ही एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली आहे.
म्हणजे एका बाजूला खूप पैसा आहे म्हणून तर दुसऱ्या बाजूला पैसा नसल्यामुळे. ही
सामाजिक दुखणी बरी झाली नाही तर सर्वांचेच जगणे कठीण होणार आहे हे निश्चित.
त्याच वेळी दिवसातून २०-२२
सिगारेट ओढून क्यान्सर च्या विळख्यात अडकलेली जवळची माणसे बघीतली की मन विषन्न
होते. सिगारेट –तंबाखूचा विळखा पडलेली माणसे आपल्या शरीराची वाट लावतात व क्यान्सरच्या
असाध्य दुखण्यामुळे तडफडत मरताना पाहिलीकी मन उदास करतात. दोन घटकांचा हा धूर
ओढण्याचा क्षणिक आनंद, आप्तस्वकीयांना कायमचे
दु:ख देऊन जातो. मरण वेदना देणारी ही जीवन अवस्था जीवनाचे मोल अधिक ठळकपणे सांगते.
जगण्याचा नवा अर्थ आपणास कळतो. पण तो जीव निघून जातो. आपण काहीच करू शकत नाही. समाज
अविकसीत असल्याचेच हे लक्षण आहे.
जगण्यासाठी आसुसलेला जीव
महत्वाचा असतो. हे आसुसलेपण जिद्दीतून येते. जिद्द आशा- आकांक्षातून निर्माण होते.
जगण्यासाठी प्रयोजन असावे लागते. प्रयोजन नसेल तर जगण्याला अर्थच उरत नाही. जिद्द
आणि प्रयोजन हरवलेली ही माणसे . त्यांना मार्ग दाखवला तरच ह्यात बदल होतील.
No comments:
Post a Comment