Sunday, March 24, 2013

माझ्या आठवणी : विजय तेंडुलकरांच्या


प्रत्यक्ष ओळख नसतांना
मला भेटलेले विजय तेंडुलकर
१९६९ ते १९७६ ह्या काळांत मी यु डी सी टी मध्ये पदार्थविज्ञानात पीएच. डी चे संशोधन करीत होतो. मराठी नाटक बघणे हा माझा छंद होता. तो माझा विरंगुळा होता. प्रायोगिक रंगभूमीवर जे घडत होते ते मला आकर्षित करीत असे. त्यावेळी मी जर सापडत नसेल तर माझे मित्र मला शोधण्यासाठी नाट्यगृहात येत असत. इतका मी नाटकवेडा होतो. मी सर्व प्रकारची नाटके पाहत असे. बाळ कोल्हटकर ते वसंत कानेटकर, विजय तेंडूलकर ते गिरीश कर्नाड, राकेश मोहन ते बादल सरकार. तेजपाल सभागृहामध्ये  होणारी नाटके बंद झाली तेंव्हा छबिलदास चळवळ सुरु झाली. बहुतेक नाटकांचे पहिले प्रयोग मी तेंव्हा  पाहिले आहेत. सखाराम बाईंडर आणि गिधाडे ह्या दोन्ही नाटकांचे पहिले प्रयोग पाहिले होते. एका पहिल्या प्रयोगाला शेवटच्या रांगेत बसलेले नाटककार विजय तेंडूलकर ही जवळून बघितले होते. त्यावेळी मला तेंडुलकरांचे सगळ्यात जास्त आवडलेले नाटक म्हणजे “ अशी पाखरे येती “. जब्बार पटेल ह्यांनी सादर केलेले ते अप्रतिम नाटक. अनेक दिवस मी त्या नाटकातील अलिबागच्या नायिकेच्या शोधात होतो. म्हणजे अशी मुलगी कुठे दिसते का हे शोधीत होतो. मला वाटते माणसाच्या मनाची अशी अवस्था जेंव्हा असते तेंव्हा त्याला अशी पात्रें किंवा कलाकृती ( सिनेमा-नाटक) आवडू लागतात. बहुधा नाटककाराची ही अशी अवस्था असते किंवा तो अशा पात्रांना शोधून काढतो.
हसत खेळत  , थट्टा मस्करी करीत वेगाने पुढे जाणारे नाटक म्हणजे  “ शांतता , कोर्ट चालू आहे “. ह्या नाटकाचा शेवट जेंव्हा जवळ येतो तेंव्हा मन सुन्न करणारा अनुभव घेऊन आपण नाट्यगृह सोडतो. त्यानंतर मी बघीतले ते “ गिधाडे”. मन अस्वस्थ करणारा हा नाट्यप्रयोग . डोकं दुखविणारा हा प्रयोग. मला वाटतं आशयगर्भ नाटकाच्या सामर्थ्याचा विचार केला तर नाटककाराने तो परिणाम ह्या नाटकातून साधला होता असे हे वेगळे आणि जबरदस्त नाटक. त्याला माधव मनोहर ह्यांनी मराठी रंगभूमीवर “वयात आलेले नाटक” असे म्हंटले होते.  
"सखाराम बाईंडर"चा तर खूप बोलबाला झाला.. “ हे माझं घर आहे. इथं माझं राज्य आहे. मला पाहिजे तसेच करायला पाहिजे. राहायचे असेल तर राहा. नाहीतर खुशाल निघून जा – तुझ्या सारख्या पुष्कळ बघितल्या. “ असा अरेरावीपणा असलेला सखाराम बाईंडर तुमच्या – माझ्यात किंवा बहुसंख्य पुरुषात असतो – ही मनुष्य प्रवृत्ती स्पष्टपणे सखारामच्या भूमिकेत दिसून येते. त्या नाटकाने बरेच वादळ निर्माण केले होते. त्यानंतरचे “ घाशीराम कोतवाल “ . त्या नाटकाला तर आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली. मोहन आगाशे पुढे आले.वादळे निर्माण करणारा नाटककार अशीच तेंडुलकरांची प्रसिद्धी झाली होती. "पाहिजे जातीचे " ह्या छबिलदास रंगभूमी चळवळीतून नाना पाटेकर पुढे आला.
त्याच वेळी चि त्र्यं खानोल्कारांचे ‘अवध्य ‘ आणि “एक शून्य बाजीराव” ही दोन नाटके गाजली. तेंडुलकरांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी मराठी रंगभूमीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले.मराठीत असे दुसऱ्या कोणत्याही नाटककाराला जमले नाही. (अलीकडे महेश एलकुंचवार ह्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे).  तेंडुलकरानी “ मराठी नाटक वयात आणलं “.” घाशीराम”ला जर्मनीला नेलं. दिल्लीच्या इंटूक समाजाला तेंडुलकरानी वेड लावलं. राष्ट्रीय रंगभूमीवर मराठी नाटकाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
आचार्य अत्रे ह्यांनी “ मी जिंकलो , मी हरलो “ हे तेंडुलकरांचे सुरुवातीचे नाटक बघितल्यावर असे म्हंटले होते की ,” माझ्या नंतरचा सर्वात मोठा नाटककार विजय तेंडूलकर “. ते शेवटी खरेच ठरले.
खरे म्हणजे नाटककार तेंडुलकरापेक्षा “कोवळी उन्हे “ आणि “रातराणी”  ही सदरे लिहिणारे तेंडूलकर मला जास्त आवडतात. मला पहिल्यांदा ते भेटले ते “ कोवळी उन्हे” ह्या सदरातून. डोंबिवली ते व्ही टी किंवा बोरीवली ते चर्चगेट हा प्रवास पोटापाण्यासाठी  करणाऱ्या मुंबईकरांना सूर्यकिरणे अशी दिसतच नाहीत.कोवळी उन्हे त्यांना माहीतच नसतात.  उकडून घामाने बेजार झालेल्या मुंबैकराला मुंबईत रातराणीचाही सुगंध येत नाही. लोकलमध्ये चवथी अर्धी सीट मिळाल्यावर वर्तमानपत्र उघडले की “ कोवळी उन्हे” हे सदर जेंव्हा दिसायचे तेंव्हा तो लोकलचा प्रवास थोडासा सुखकर व्हायचा.  तसेच सायंकाळी थकलेले शरीर घराकडे धावत जात असे तेंव्हा तेंडूलकरांच्या ‘माणूस’ मधील  “रातराणी” चा सुगंध मनात दरवळत होता.” सारा आकाश “ आणि “भुवन सोम “ ह्या चित्रपटावर त्यांनी जे समीक्षण लिहिले ते वाचून आधुनिक चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा हे मी तरी त्यावेळी शिकलो. काही लेखक प्रत्यक्ष ओळखीचे नसतात पण तरीही आपल्या ओळखीचे असतात. तसे तेंडूलकर माझ्या ओळखीचे होते. परिचयाचे होते.
आणि मग योगायोगाने ओळख झाली
खूप उशिरा आमची ओळख झाली. त्यावेळी नाटक लिहिणे त्यांनी जवळ जवळ सोडून दिले होते. माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख “ कावड”च्या प्रकाशनाच्या वेळी झाली. मी अनंत भालेराव ह्यांच्या “ कावड” ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यासाठी त्यांना पहिल्यांदा भेटलो. त्यासाठी ते औरंगाबाद – परभणीला आले आणि आमची ओळख वाढत गेली. परभणीला झालेला तो प्रकाशन सोहळा अविस्मरणीय होता. परभणीला असताना एका मुलींच्या शाळेचे संचालक त्यांनी शाळेला भेट द्यावी म्हणून आमंत्रण देण्यास आले होते . ते लगेच तयार झाले. समोर बसलेल्या शाळेतील मुलीना संबोधून “चिमण्या- पाखरानो “ अशी त्यानी सुरुवात केली आणि जे भाषण केले ते आजही मला आठवते. मुला-मुलींशी संवाद कसा करावा हे त्यादिवशी माझ्या लक्षात आले. आईच्या ममतेने ते मुलींशी बोलत होते. संवाद साधत होते. गप्पा मारीत होते. तेंव्हा मला खालील कवितेच्या ओळी आठवल्या.
ज्यांची हृदये झाडांची असतात
त्यांनाच फक्त फुले येतात
तेच वाढतात , प्रकाश पितात
सारे ऋतू झेलून घेतात.
तेच फक्त गुच्छासारखा  -
पावसाळा हुंगून घेतात
असे हे विलोभनीय व्यक्तिमत्व मी त्या दिवशी त्या शाळेत पहिले.
तेंडूलकरानी “ कोवळी उन्हे “, “रातराणी” ही सदरे लिहिले. त्यावेळी मी वयाने तरुण होतो. मला ती सदरे आवडत होती. वय वाढत जाते. अनुभव गाठीशी येतो .जीवनातील टक्के टोणपे खाल्ल्यानंतर , जीवनाचा नवा दृष्टीकोन तयार होऊ लागतो. तेंडूलकर ही असेच बदलत गेले.. “कोवळी उन्हे” लिहिणारे तेंडूलकर “ रामप्रहर” लिहू लागले. सदर सुरु केल्यानंतर काही दिवसातच अयोध्याकांड झाले. आणि त्या  सदराला नवा अर्थ प्राप्त झाला. त्यातून नवा विचार, नवी दिशा, नवे राजकीय अर्थ जाणवू लागले. एका साहित्यिकाची पत्रकारिता म्हणजे “रामप्रहर .फारच थोड्या साहित्यिकांना असे लिहिणे जमते. असे माझे वैयक्तिक मत आहे. अल्पशब्द शैली हा तेंडूलकरांच्या लिखाणाचा विशेष. फारच थोडे साहित्यिक असे अल्प्शब्दात लिहितात. आपल्या अल्पशब्द शैलीतून खूप काही सांगणारा हा मनस्वी साहित्यिक . सामाजिक बांधिलकीचा विचार देणारा हा वेगळा साहित्यिक. तो तुमच्या – माझ्या मनातलं बोलणारा ,लिहिणारा मनस्वी लेखक. म्हणून ते मला लेखक म्हणून  आवडतात.
आणि तेंडुलकराची मैत्री झाली
“कावड “च्या प्रकाशनानंतर त्यांच्या भेटी होतच गेल्या. कधी कधी मालवीय रोड वर असलेल्या माझ्या कार्यालयात ते येत असत. त्या रस्त्यावरूनच ते घरी जात असत. आमच्या गप्पा होत. अनेक विषयावर आम्ही बोलत असुत. ते जास्त ऐकून घेत असत. मीच जास्त बोलत असे. ते जेंव्हा बोलत असत तेंव्हा त्यांचे विचार ठाम असत. त्यांचा मुद्दा मांडण्याची एक विशिष्ट पद्धत होती. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे असे. एखादेच वाक्य बोलत आणि जीवनाचा नवा अर्थ कळत असे.  कधी कधी त्यांचा फोन येत असे, बरेच दिवस झाले आहेत .आपली भेट भेट झाली नाही. येवून जा . आणि मी फोन करून त्यांना भेटावयास जात असे, खूप गप्पा होत. विविध विषयावर. खरे म्हणजे मी तसा वयाने आणि अनुभवाने लहानच. ते अगदी एखाद्या मित्रासारखे बोलत. लोकांनाही वाटे की माझ्याशी त्यांचे असे कसे जमते. मला तर ते मित्रासारखेच वाटत. एकदा असाच संवाद चालू असताना ते मला म्हणाले ,” गंगाखेडकर, तुम्ही अजून लहान आहात. अजून पुरेसे जग पाहिलेले नाही. लोक असेच असतात. ते असेच वागतात. कळेल तुम्हाला हळू हळू”. ते खरे होते. हे काही दिवसांनी माझ्या लक्षात आले.  
मी त्यांना एकदा सेलूला व्याख्यानासाठी घेऊन गेलो. माझा मित्र प्रा बालाजी भोसकर ह्याने नूतन महाविद्यालय ,सेलू  येथे त्यांची  दोन दिवसाची व्याख्याने ठेवली होती. दरवर्षी नामांकित मंडळी ह्या व्याख्यानमालेसाठी येत असतात. तेंडुलकरानी व्याख्यानास येण्यास होकार दिला.  आम्ही मुंबईहून बरोबरच प्रवास केला. एकाच सरकारी गेस्ट हाऊसवर आमची रहाण्याची व्यवस्था केली होती. सकाळी फिरावयास गेलो तेंव्हा आमच्या खूप गप्पा झाल्या. सेलूच्या महाविद्यालयातील पटांगणावर भाषणासाठी खूप गर्दी जमली होती. आजकाल मुंबई-पुण्यात अशा व्याख्यानमालांना फारशी गर्दी जमत नाही. पण सेलूला  आणि परभणीला खूप लोक आले होते. त्यांचे भाषण सुंदर झाले . सेलूकर फारच प्रभावित झाले होते. तो मराठवाडी पाहुणचार. ते तिखट जेवण . तक्रार न करता ते जेवले. कसलीही तक्रारही केली नाही. नाहीतर पुण्या – मुंबईची इतर मंडळी फार कुरकुर करतात असे ऐकले होते.. तेंडूलकर एकदम Down to Earth  माणूस. माणसात रमणारा हा माणूस. पात्रांना शोधणारा हा नाटककार.
आमचा औरंगाबादला मुक्काम होता. न्या. चपळगावकरांच्या घरी त्यांचे नाट्यवाचन आणि रात्रीचे भोजन ठरले होते. तेंडुलकराना नाटककार अजित दळवी ह्यांची आठवण झाली. त्यांनी आठवणीने त्यांना फोन करून बोलावून घेतले. नव्या लेखक – नाटककराबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. हे मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. नव्या पिढीचे अनेक लेखक –लेखिका ,नाटककार त्यांच्या संपर्कात असत. त्यांच्याकडे चर्चेसाठी ,मार्गदर्शनासाठी येत असत. अनेकाना त्यांनी लिहिते केले.
तेंडूलकर “ पेशा लेखकाचा” हे आठवडी सदर महाराष्ट्र टाइम्स मधून लिहीत असत. त्यांचे लिहून झाल्यावर अक्षर जुळवणसाठी ती प्रत ते आमच्या DTP सेंटरकडे पाठवीत असत. त्यामुळे छापून येण्यापुर्वीच मला तो लेख वाचायला मिळत असे. त्या अक्षर जुळवणीचे मुद्रित शोधन ते स्वतःच करीत असत. ती प्रत मग मटा कडे प्रसिद्धीसाठी जात असे. एक –दोन लेख आधीच लिहून तयार असत. पाठविण्याचा क्रम त्यांच्या हातात असे. मटा चे ते लेखन त्यांनी एकाएकी बंद केले. कारण त्यांचा एक लेख मटा च्या संपादकांनी छापला नाही.  संपादकांना तो काही कारणामुळे  छापवायाचा नसावा. संपादकाच्या काही अडचणी असतीलही. पण लेखक स्वतःच जबादारी घेत असेल तर छापणे आवश्यक आहे. किंवा सदर लिहिण्यास आमंत्रित केलेल्या लेखकास संपादकाने तसे कळविणे आवश्यक आहे.तसे त्यांनी कळविले नव्हते . त्यांचे इतर दोन-तीन लेख छापून आले .परंतु तो लेख प्रसिद्ध होत नव्हता. त्यामुळे तेंडुलकरानी "पेशा लेखकाचा" हे सदर लिहिणेच सोडून दिले. सर्व लेख माझ्याकडेच DTP वर मुद्रित होत असल्यामुळे मला ते पुस्तक लगेच काढता आले असते. प्रकाशक म्हणून माझा एक प्रकल्प असा बंद पडला.
“रामप्रहर” च्या काही आठवणी 
एकदा रामप्रहरच्या लेखांची कात्रणे त्यांनी मला वाचावयास दिली. मला ती खूप आवडली. मी पुस्तक काढण्याचे ठरविले . त्यांनी लगेच होकार दिला आणि मी “रामप्रहर “ चा प्रकाशक झालो. “ रामप्रहर” प्रकाशनासाठी तयार होते. प्रकाशन कोणाच्या हस्ते करावयाचे ह्याचा विचार करीत होतो. तेंडुलकरानी काही नावें सुचवली. मी काहींना फोन केलें . वेळा जमत नव्हत्या. आणि तेंडुलकरानीच स्वतःच नाव सुचवले ते विजयाताई लवाटे ह्यांचे. माझी ओळख नव्हती. मी त्यांना लगेच फोने केला आणि त्या “हो” म्हणाल्या. अर्थात हे तेंडुलकराच्या मुळेच.
विजयाताई विशेष परिचयाच्या नव्हत्या. मला त्यांच्याविषयी जे समजले ते “रामप्रहर” वाचूनच. तेंडुलकरानी लिहिलेला पहिलाच लेख त्यांच्यावर होता. त्यांची प्रकाशनाच्या दिवशी सकाळी त्या मुंबईत आल्या तेंव्हा भेट झाली. “स्वतःच्या पलीकडे पाहणारी , इतरांसाठी कष्ट्णारी , कशाचेही उपकार नं मानणारी आणि उलट अपेक्षा नं ठेवणारी माणसें कशी घडतात?  परंतू माणसे खरीच मोठी असतात कां ? की ती आपल्यासारखीच असतात? नव्हे ती वेगळी असतात. विजयाताई सारखी”. “आठवणीतल्या गोष्टी” ह्या पुस्तकासंबंधी लिहिताना तेंडुलकरानी विजयाताईचे केलेले हे वर्णन. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि सामान्य माणसातील असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख झाली. मोठी माणसे खरीच मोठी असतात का? ती तशी नसतात. ती छोटीही असतात हे मी जवळून पहिले आहे. पण विजयाताईसारखी अगदी तुमच्या –आमच्यासारखी साधी दिसणारी माणसे खूप मोठे काम करताना दिसतात. तेंव्हा आशेचा नवा किरण दिसू लागतो. समाज मन बदलण्यासाठी मनापासून लिहिणाऱ्या तेंडूलकरांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला विजयाताई सारख्या समाजसेविका मिळाव्या हा एक दुर्मिळ योग होता. आणि अशी माणसे शोधणार्या व त्यांच्यावर लिहिणाऱ्या तेंडुलकरांचे वेगळेपण त्यामुळेच लक्ष वेधून घेते.
विजयाताईनी तेंडूलकरांच्या पुस्तकावरच बोललेच पाहिजे असे नाही तर त्यांनी ह्या निमित्ताने आपल्याला भेटावे व आपले आगळे-वेगळे अनुभव सांगावेत ह्या उद्देशांनेच मी त्यांना आमंत्रित केले होते. नव्हे, तेंडुलकरानीही मला तसेच सूचित केले होते. त्या कार्यक्रमात विजयाताई जे बोलल्या ते मनाला स्पर्शुन गेले. तो एक वेगळा अनुभव होता.
न्या. नरेंद्र चपळगांवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते प्रा वा ल कुलकर्णी ह्यांचे शिष्य. ज्यांच्या पुस्तकांच्या कपाटात न्याय ,कायदा आणि साहित्य एकत्र नांदतात असे ते व्यक्तिमत्व. मराठवाडा साहित्य परिषदेसाठी सतत प्रयत्न करणारे व आपल्या वक्तृत्वाने मराठवाड्यात नावाजलेले न्या. चपळगावकर एक दर्जेदार समीक्षक,अभ्यासू आणि रसिक साहित्यिक. त्यांचे “उन सावली” हे लोकांना आवडलेले सदर. विविध विषयावर केलेले सुंदर लिखाण. ते आवर्जून ह्या कार्यक्रमासाठी आले होते.  
मुख्य निवडणूक आयुक्त श्री शेषन ह्यांनी “Third class journalists asking fourth class questions “, अशी पत्रकारांची निर्भत्सना केली होती. श्री शेषन ह्यांना महाराष्ट्रातील पत्रकारांची विशेष माहिती नसावी. मी अरुण साधूना पत्रकार आणि लेखक म्हणून ह्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून आमंत्रित केले होते. “First class journalist with top class literary sense”, असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे ते अभ्यासू पत्रकार –लेखक आणि कादंबरीकार आहेत. मुंबई दिनांक – सिंहासन ह्यामुळे ते सर्वांनाच परिचित झाले आहेत. त्यांचे स्तंभ लेखनही बरेच लोकप्रिय झाले आहे. साहित्य वर्तुळात त्यांचे स्वतः चे असे वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. (नंतर ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले). त्यांनी तेंडूलकरांच्या पुस्तकावर बोलण्याचे मान्य केले. त्यांचे ते अभ्यासपूर्ण भाषण आज ही माझ्या लक्षात आहे.
महाराष्ट्रात जे चांगल्या दर्जाचे पत्रकार आहेत त्यात अरुण साधू आणि अरुण टिकेकर ह्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अरुण टिकेकर हे लोकसत्तेचे संपादक होते आणि त्यांनी विजय तेंडुलकराना “रामप्रहर” हे सदर लिहिण्यास आमंत्रित केले. ते चालू ठेवले. तेंडुलकराना अगदी थकवा येईल इतके त्यांच्याकडून लिहून घेतले. तेंडूलकर हा एक Difficult माणूस होता . असा एक समज होता.त्यांच्या विचारांशी सहमत नसताना आणि इतर दडपणे असताना त्यांनी लिहिलेले छापणे ,त्याची जबाबदारी घेणे व अशाही परिस्थितीत लिहिते ठेवणे हे फार मोठे कठीण काम अरुण टीकेकरानी केले होते ,असे माझे मत होते. अग्रलेखाइतकेच स्तंभ लेखनातून विचारवंत लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत ,एका आगळ्या वेगळ्या संवादातून वाचकापर्यंत कसा पोहोचू शकतो व खऱ्या अर्थाने कोणत्याही एका विशिष्ट राजकीय ,सामाजिक ,आर्थिक प्रणालीशी बांधिलकी न ठेवता सामाजिक बांधिलकीचा आपला विचार एक विचारवंत म्हणून स्तंभ लेखनातून व्यक्त करीत असतो. रामप्रहरचे यश जेवढे तेंडुलकरांचे होते तेवढेच ते लोकसत्तेचे संपादक अरुण टीकेकारांचे होते, असे मला वाटते.
ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ वसंत सरवटे ह्यांचे होते. त्यांची आणि तेंडुलकरांची घनिष्ठ मैत्री. तेंडुलकरामुळेच त्यांची ओळख झाली. एका चित्रकाराला जवळून बघितले. त्यांची साहित्य रसिकता समजली. एक वेगळा दृष्टीकोन समजला. वेगळा विचार करायला शिकलो.
रामप्रहरमुळेच दिनकर गांगल भेटले. वाचक चळवळीचे ते नेते. अगदी शांत स्वभावाचे , फार कमी पण मुद्देसूद बोलणारे गांगल म्हणजे एक अजब रसायन आहे. “ग्रंथाली” ही चळवळ ते चालवतात. साहित्य “रुची “ वाढविण्याचे काम ते करतात. त्यांचा हिशोब चोख असतो. त्यांच्या संस्थेशी मी जोडला गेलो आणि त्यांच्याकडून न कळत खूप काही शिकलो. त्यांनीच पुस्तके वितरणासाठी खूप मदत केली व सहकार्य दिले. त्यामुळे प्रकाशन व्यवसायातील अडचणी समजल्या. ग्रंथाली चळवळ चालवणे हे किती कठीण काम आहे हे अगदी जवळून बघितले. कितीतरी लोकांना लिहिते करणारा हा माणूस. एकदम वेगळा आहे.
तेंडूलकरानी “सरदार “ ची पटकथा लिहिली होती. ते पुस्तक रूपाने त्यांनी आधीच प्रकाशित केले. त्यावेळी त्यांनी P.C. विकत घेतला. लहान मुले जशी शिकतात तसे ते computer शिकत होते. माझा इंजिनिअर त्यांच्या घरी जाऊन त्यांना काही अडचणी आल्यातर समजावून सांगत असे. मला त्यांचे हे computer शिकणे खूप काही सांगून गेले. नंतर ते अमेरिकेला गेले तेंव्हा त्यांनी देवनागरी लेखनाचे प्याकेज आणले होते. ते शिकताना अडचण आली की माझा इंजिनिअर त्यांच्याकडे जात असे. असा हा खूप मेहनत घेऊन computer शिकणारा साहित्यिक मी फार जवळून पहिला आहे.
एकदा मी त्यांना विचारले की आजकाल तुम्ही नवे नाटक का लिहीत नाहीत. तेंव्हा ते म्हणाले होते" नाटक हे एकट्याचे मध्यम नसते. एकदा लिहून झाले की  ते दिग्दर्शक . निर्माता आणि नट ह्याचे होते. त्याचे पुढे काय होते. ते सांगता येत नाही. म्हणून आता नाटक लिहिणे नकोसे वाटते." आणि ते कादंबरी लिखाणाकडे वळले. मी त्यांची पहिली कादंबरी वाचली. पण ती फारशी आवडली नाही. त्या कादंबरीवर फारशी चर्चा ही झाली नाही .
त्यांनी मला दोन पुस्तके भेट दिली होती. “ सरदार” आणि “हे सर्व कुठून येते?” . “सरदार” च्या प्रकाशन समारंभाला मला आमंत्रण पत्रिका ही दिली होती. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला “ सरदार” खूप आवडले होते. चित्रपटासाठी कसे लेखन करतात हे त्या पुस्तकावरून शिकण्यासारखे आणि समजण्यासारखे आहे. त्यावर मी एक मोठा लेख ही लिहिला होता. आणि माझ्या रोटरी मित्रासाठी दोन-तीन रोटरी क्लबातून भाषणेही दिली होती. हा चित्रपट बराच उशिरा प्रदर्शित झाला. पण “गांधी” सारखाच तो महत्वाचा आणि चांगला चित्रपट आहे  हे लोकांच्या विशेष लक्षात आले नाही ह्याचे वाईट वाटते.
अशा आहेत माझ्या विजय तेंडूलकरांच्या आठवणी.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर 

No comments:

Post a Comment