माझ्याशी झालेले
“ शिवरायांचे ऐसे बोलणे ........”
दादरला शिवतीर्थावर गेलो
होतो. शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसलो. थंड वाऱ्याची झुळुक आली. मन थोडे स्थिरावले.
इकडे तिकडे बघत होतो. आणि कानात शब्द घुमले. “ अशीच अमुची आई असती , आम्हीही सुंदर
झालो असतो ..” प्रत्यक्ष शिवराय माझ्याशी बोलतायत असा क्षणभर भास झाला. ते दिल्लीला झालेले बलात्कार प्रकरण आठवले, शिवरायांनी फाशीच दिले असते त्या
स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या तरुणांना. मी पुनः शिवरायांच्या पुतळ्याकडे बघू लागलो.
आणि खरोखरच शिवराय माझ्याशी बोलत होते. मी ऐकत होतो. मी हाताला चिमटा घेऊन पहिला.
शिवराय म्हणत होते ...
“ काय मला बघायला समोर बसला
आहात काय? थोडे अंतरावरच बसा. मला ह्या कबुतरांनी अगदी वैताग आणलाय, सगळी घाण करून ठेवतात.
वास येतो नुसता. आम्हा साऱ्या पुतळ्यांचे हे असेच हाल होतात . आम्हाला चांगल्या जागी का
हलवत नाहीत. त्या पुराण वस्तूसंग्रहालयात नको. एखाद्या ए सी मॉल मध्ये बरे असेल.
तेथे कृत्रिम धबधबाही असेल. सुवासिक वातावरण असेल. छान ,थंड ,स्वच्छ सुंदर जागा
असेल. त्या लंडन – न्यूयॉर्क मध्ये ते मादाम टूसो ह्यांचे मेणाचे पुतळे असलेले
म्युझीअम आहे म्हणे. जगातले सगळे नावाजलेले लोक पुतळ्यासारखे उभे आहेत म्हणे. तो
अमिताभ आणि शाहरुखखान पण पुतळ्यासारखे उभे आहेत.पहायला गेलेले सारे भारतीय लोक,त्यांच्याबरोबर
फोटो काढून घेतात म्हणे. ते पुतळे फार मजेत असतात, असे ऐकले. नाहीतर मला
उन्हातान्हात उभे केले आहे. येथे, गेटवे वर आणि त्या जुहूच्या समुद्रकिनारी. तसा
मी सगळीकडे असाच उभा आहे. त्या प्रतापगडावर , राजगडावर, आणि जवळ जवळ
महाराष्ट्रातील सगळ्या मोठ्या शहरात. सर्वत्र माझा पुतळा असतो. माझ्या नावाचा चौक
असतो. रस्ता असतो. नाटकाचा हॉल असतो. आतातर म्हणे अरबी समुद्रात जगातले सगळ्यात
चांगले स्मारक उभे करणार आहेत म्हणे. त्या अमेरिकेतील स्वतन्त्रातादेवीच्या
पुतळ्यासारखे. म्हणजे मुंबई बघायला येणाऱ्या लोकांना एक चांगला पिकनिक स्पॉट. त्या
अरबी समुद्राच्या दमट हवेत, माझे मात्र फार हाल होतील. चौपाटीवर टिळकांचा पुतळा
आहे ना? “ती निधडी छाती ,धीट मराठी थाट,आदळतो जीवर अजून पश्चिम वात” असे त्या
प्रसिद्ध कवीला टिळकांच्या पुतळ्याकडे पाहून वाटले.होते. कोणाचे तिकडे लक्षच नसते.
भेळ खायला येतात मुंबईकर. मी गेटवे असाच उभा आहे पण समुद्राकडे माझी पाठ आहे. मी हॉटेल ताज कडे बघत असतो. त्या कसाब टोळीने
पार उध्वस्थ करून टाकले होते ताज. तो पश्चिम वारा, तिकडे जुहूवर आदळत असतो माझ्या
निधड्या छातीवर. पण सगळे मुंबईकर भेळपुरी खाताना दिसतात मला. झुणका भाकर केंद्र दिसत
नाही. हे महापालिकेचे माझ्यावर प्रेम करणारे सैनिक साफसफाईकडे लक्षच देत नाहीत.
स्वतःला सैनिक म्हणवतात. त्यांना भारतीय सैन्यात का पाठवत नाहीत? सैनिकीकरणाची फार
गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत होते सैनिकीकरण आवश्यक . पण त्यांचे कोण ऐकणार? त्यांचे समाजसुधारणेचे विचार
ही कोणी ऐकले नाहीत. त्यांची वैज्ञानिक दृष्टी ही कोणी घेतली नाही. नुसते हिंदुत्व हिंदुत्व करतात ही सगळी मंडळी. माझे पुतळे
कशाला उभे करतात हेच समजत नाही. सैनिकी शाळा , सैनिकी महाविद्यालये काढा. तिकडे तवांग सीमेवर सैनिकांची फार
गरज आहे. सगळ्यांना लष्करी शिक्षण सक्तीचे करा. किमान दोन वर्षे लष्करात काम केल्याशिवाय
कोणतीही नोकरी देऊ नका. अगदी राजकीय पक्षातसुद्धा प्रवेश देऊ नका. शिस्त हवी.लष्करी
शिक्षण हवे. त्या एन. सी. सी व ए. सी. सी मध्ये हा तरुण वर्ग जातच नाही. ते ट्रेनींग
सक्तीचे करा. सर्व तरुण विद्यार्थ्यांना दोन वर्षे सीमेवर काम द्या. चीन तुमच्या
दारात उभाच आहे. नुसते पुतळे उभे कशाला करतात? नुसता माझा जयजयकार करतात. सकाळ संध्याकाळ माझा
जप करतात.
माझेच काय? त्या गांधीजीचेही असेच झाले. डॉ आंबेडकर ह्यांचेही असेच झाले.
तिकडे तर मायावतींनी उभारले पुतळेच पुतळे. डॉ आंबेडकर, शाहू महाराज, कांशीराम
आणि स्वतः खुद्द मायावती. सर्वांचे पुतळेच पुतळे. पुतळ्यांचे आंबेडकर
पार्क. त्यांच्याबरोबर हत्तींचेही पुतळेच पुतळे. काझीरंगामध्ये हत्तींची संख्या
कमी झाली पण ह्या पार्कमध्ये इतके हत्ती पाहून कोणी काझीरंगाला जायलाच तयार नाही असे म्हणतात. हत्ती पाहायला सगळे लखनौला जातात म्हणे . मायावतींनी त्या कबुतरांचे काय केले? त्यांच्या पुतळ्यावर बसतात का लखनौची
कबुतरे?”
मी म्हणालो ,” शिवाजी राजे , खरे आहे तुमचे म्हणणे. मला ही वाटते, पुतळे नकोच. बरे झाले. तुम्ही माझ्याशी हे बोललात. मी सांगून बघतो सगळ्यांना. कोणाचेच पुतळे नको. काहीतरी ठोस करून दाखवा. तुमच्यासारखे. गांधीजी सारखे. डॉ आंबेडकरांसारखे.”
मी म्हणालो ,” शिवाजी राजे , खरे आहे तुमचे म्हणणे. मला ही वाटते, पुतळे नकोच. बरे झाले. तुम्ही माझ्याशी हे बोललात. मी सांगून बघतो सगळ्यांना. कोणाचेच पुतळे नको. काहीतरी ठोस करून दाखवा. तुमच्यासारखे. गांधीजी सारखे. डॉ आंबेडकरांसारखे.”
पण माझे ऐकणार कोण? तिकडे
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीय. अरबी समुद्रात शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार. जागाही निश्चित केलीय.
स्मारक लवकर पूर्ण झाले तर येईन
भेटायला.
No comments:
Post a Comment