Sunday, June 9, 2019

पाहिलेल्या कलाकृती आणि माझ्या प्रतिक्रिया

हैदर ते Hamlet
विशाल भारद्वाज ( विभा ) हा डाव्या विचारसरणीचा लेखक. “मी डाव्या विचारसरणीचा आहे म्हणूनच कलावंत / कलाकार/ लेखक आहे” असे ज्यांना वाटते त्यांचा हा नवा चित्रपट “ हैदर “ . सध्या खूप चर्चेत असलेला. शेक्सपियरच्या Hamlet ह्या नाटकावर आधारलेला किंवा बेतलेला. “शेक्सपियर /Hamlet” ही नावे घेतलीकी प्रेक्षक थोडे आकर्षित होतात. मी ही त्यापैकी एक. काही परीक्षणे वाचली. विभाच्या मुलाखती वाचल्या.  म्हणून सिनेमा पहावयास गेलो. शेवटी शेवटी कंटाळलो. सिनेमा पूर्ण पाहिला. ह्या शेक्सपियरला ( विभा ) नेमके काय म्हणायचे आहे ह्याचा शोध घेऊ लागलो. कलाकृतीची एक मोठी गंमत असते. प्रेक्षक आपला आपला अर्थ लावतो. त्याच्यासाठी दोन शब्द पुरे असतात . १) आवडले २) नाही आवडले. पण समीक्षक खूप लिहून जातात. मग माझ्यासारखा गोंधळून जातो. समीक्षकाला आवडलेले आपल्याला आवडत नाही तेंव्हा मन जास्त विचार करू लागते. कलाकृतीचा असा आस्वाद घेण्याची मला सवय झाली आहे.
हैदरची गोष्ट अशी. हैदरचा काका त्याच्या डॉक्टर असलेल्या वडिलांना मारतो आणि त्याच्या आईशी लग्न करतो. आपल्या वडिलांना कोणी मारले हे त्याला समजते आणि आपली आई त्याच्याशी लग्न करणार आहे हे त्याला जेंव्हा समजते तेंव्हा ह्या हैदरचा शेक्सपियरचा Hamlet होतो. “ सूड घ्यायचा की घ्यायचा नाही “ अशा द्विधा मनस्थितीत तो असतो.
अशी ही विभाच्या  शेक्सपियरच्या Hamlet वर बेतलेली कलाकृती. काहीजणांना ती खूप लक्षवेधी वाटली. ह्या कलाकृतीत काश्मीर हे एक नवीन पात्र. विभाच्या ह्या काश्मीरमध्ये शिकारा आणि शम्मीकपूरची प्रेमाची गाणी नाहीत. तेथे आहे भारतीय सैन्य. सैन्य आणि तेथील नागरिक ह्यांच्यातील तणाव. डाव्या विचारसरणीचा लेखक असल्यामुळे मानवी अधिकाराची गळचेपी करणारे सैनिक अधिकारी तेथे नकोसे वाटतात.
हैदरचे डॉक्टर वडील हिलाल मीर एका आतंकवादी काश्मिरीला आपल्या घरी आणतात आणि त्याच्यावर घरातच शस्त्रक्रिया करतात . हे त्याच्या बायकोला धोक्याचे वाटते. डॉक्टर म्हणून मानवतावादी प्रवृतीचा असलेला हा डॉक्टर हा धोका पत्करतो. मिलिटरीच्या लोकांना ह्या आतंकवादीचा सुगावा लागतो. ते डॉक्टरला पकडतात . त्याला बंदिस्त करतात. त्याचे घर उध्वस्त करतात कारण त्यात आतंकवादी असतात व ते सैनिकावर उलट गोळीबार करीत असतात. ह्या डॉक्टरला  छावणीत ठेवतात व  माहिती काढून घेण्यासाठी त्याचा छळ करतात. हा डॉक्टर तेथून सुटतो खरा पण त्याचाच भाऊ त्याला झेलम नदीत बुडवून मारण्याचे षड्यंत्र रचतो कारण त्याला आपल्या वहिनीबरोबर लग्न करावयाचे असते. आणि अलीगढला शिकण्यासाठी गेलेला हैदर परत येतो. आपले उधवस्त घर पाहतो. वडिलांचा शोध घेतो. आई काकाबरोबर रमलेली पाहून दु:खी कष्टी होतो. आणि ह्या सर्वांचा बदला कसा घ्यावयाचा ह्याचाच विचार करीत तो आतंकवादी होतो.
असा हा हैदर. माणसे आतंकवादी कां होतात ? ह्याचा शोध घेण्यासाठी विभाने घेतलेला शेक्सपियरचा आधार.
मुख्य भाष्य आहे ते AFSPA ह्या आर्मीला दिलेल्या विशेष अधिकारावर. स्वतंत्र काश्मीर कां हवे ? भारतापासून आणि पाकिस्तानपासून स्वातंत्र्य कां हवे हे मांडण्याचा केलेला प्रयत्न. सार्वमतावर मांडलेले हैदारचे विचार. हे लेखकाचे भाष्य की तेथील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन. सैनीक अधिकारी कसे छळ करतात व त्यांना मिळालेल्या अमर्याद अधिकाराचा दुरुपयोग करतात असे सांगण्याचा प्रयत्न ह्या कलाकृतीतून करण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे सर्व हैदरच्या तोंडून व्यक्त होते. सिनेमाला प्रेमाची  गोष्ट असावी लागते म्हणून ती सारी पात्रे आहेतच. कुटुंबातील गुंतागुंतीचे संबंध असावे लागतात म्हणून हैदर , त्याचे काका व त्याची आई ह्यांच्यातील संबंध , हैदरची प्रेयसी , प्रेयसीचे वडील आणि त्यांचा काकाला असलेला छुपा पाठींबा . अशा अनेक कौटुंबिक व राजकीय गुंतागुंती. त्याचा काका म्हणजे तेथील राजकारणातील एक कारस्थान करणारे पात्र.
ह्या सिनेमातील काश्मीरमधील अलगतावादी म्हणजे शेक्सपियरच्या नाटकातील राजे , हैदरचा काका खुर्रम म्हणजे क्लाऊडीयस हे पात्र,
विभा एका बाजूला म्हणतात की मी राजकीय भाष्य करीत नाही. मी फक्त माणूस म्हणून राजकीय प्रश्नाकडे बघतो आहे. काश्मीरमधील विचित्र परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्तींच्या दृष्टीकोनातून बघतो आहे. AFSPA ह्या राजकीय समस्येकडे मी लक्ष वेधून घेतो आहे. त्या पैलूचा काय परिणाम होतो आहे ते शोधतो आहे. त्याचप्रमाणे असंख्य विधवा बायकांच्या प्रश्नाकडे पाहतो आहे.
हाच तर ह्या फिल्मचा उद्देश होता. पण भाष्य करताना विभांचा कल कोणत्या बाजूला आहे हे सतत जाणवते आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीमुळे ह्या संपूर्ण प्रश्नाकडे कसे बघतात हे प्रकर्षाने जाणवते. आणि तेथेच ह्या कलाकृतीचे कलामूल्य नाहीसे होते व शेक्सपियरच्या पात्राशी  ह्याचा काहीच संबंध नाही असे वाटू लागते.
आतंकवादी का होतात ? हे शोधताना एका बाजूला आतंकवादी समर्थन, सार्वमताचा मुद्दा ठासून मांडणे , मानव हक्क चळवळीचे आपण विचारवंत असल्यामुळे भारतीय सैनिकांनी केलेला अत्याचार योग्य नाही अशी भूमिका घेणे हाच तर ह्या कलाकृतीचा उद्देश असावा हे चित्रपट पाहून जाणवते. काश्मीर मधील अलगतावादी मंडळीना हा सिनेमा अधिक आवडण्याची जास्त शक्यता आहे. ते अंतर्मुख होऊन विचार करणारे असतील असे वाटत नाही. आपल्यासारख्या प्रेक्षकांना हा विचार मुळीच योग्य वाटणार नाही म्हणून हा चित्रपट कितीही कलात्मक करण्याचा प्रयत्न केला असला तरी आवडत नाही. काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. तेथील राजकर्ते , केंद्रात राज्य करणारे आपले सरकार , तेथील अलगतावादी  गट आणि भारतीय सेनेला देण्यात आलेले विशेष अधिकार ह्या सर्वांचा विचार सर्वांनी करावा म्हणून मी हा चित्रपट काढला असे विभांचे म्हणणे आहे. पण त्यांचे भाष्य हे संतुलित नसल्यामुळे पटणारे नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. 
विभा म्हणतात मी हे सारे मला मांडायचे म्हणून मांडतो.  मी अंतर्मुख होऊन विचार केला आहे. तुम्हीही विचार करा असे ते एका बाजूला सांगतात तर मला प्रेक्षकाशी काही देणं घेणं नाही. त्यांना पाहिजे तो अर्थ त्यांनी लावावा. मी लोकप्रियतेच्या मागे लागून काहीही लिहित नाही, असेही ते म्हणतात.
शेक्सपियरकडे लोक पुन्हा पुन्हा जातात. त्याच्या Hamlet चा आधार घेऊन काश्मीर प्रश्नाकडे तेथील आतंकवादी चळवळीकडे एक छोटीशी गोष्ट घेऊन जाणारा हा कलावंत उगाचच साम्य शोधतो आहे असे मला तरी सिनेमा बघितल्यावर वाटले. शेक्सपियरच्या नाटकात मानवी संबंधाचे गुंतागुंतीचे संबंध दिसून येतात. अनेक भावभावनांना वाट करून दिलेली असते. प्रेम , राग , द्वेष , मत्सर , कुटुंब व त्यातील विविध प्रकारची माणसे आणि देश आणि प्रांत ह्या सर्वांचे विलक्षण मिश्रण त्याच्या नाटकात होते. तसे काही ह्या चित्रपटात दिसून आले नाही. तेंव्हा शेक्सपियरचा आधार घेऊन असा चित्रपट काढला असे म्हणणे योग्य नाही.

वाडा चिरेबंदी....

'वाडा चिरेबंदी' नंतरचा दुसरा भाग 'मग्न तळ्याकाठी' चा देखणा नाट्यप्रयोग पाहिला . हे नाटक अधिक कसदार आणि काव्यात्म आहे . ह्या  नाटकात निसर्गकविता ( नाट्यकाव्य ) आहे . विश्व निर्मिती करणारा कोण हा निर्माता ? ह्या संबंधीचे  थोडेसे गूढ चिंतन आहे .
वाडा चिरेबंदी आहे कारण कॊटुंबिक नात्यात घट्ट वीण आहे .Intimacy at a Distance असे ज्याला म्हणतात त्याचे उदाहरण म्हणजे हे कुटुंब .
महेश एलकुंचवार हा मराठी नाट्यसृष्टीला लाभलेला  जबरदस्त नाटककार आहे . चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी आपला दिग्दर्शनाचा ठसा उमटवला असून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले . सगळे कलाकार ह्या नाटकामुळे अधिक लोकप्रिय होतील ते त्यांच्या कलागुणांमुळे . त्यांनी ह्या नाटकाचे सोने केले आहे . एक कायमचा लक्षात राहणारा नाट्यप्रयोग .

एका निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी

ह मो मराठे ह्यांची ' एका निष्पर्ण  वृक्षावर भर दुपारी ' ही कादंबरी खूप वर्षापूर्वी वाचली होती . वेगळी होती. तशी निराश आणि दु:खी करणारी .  त्या नंतर त्यांच्या काही कथा दिवाळी अंकातून वाचल्या होत्या. खूप वर्षांनी त्यांच्या ' न्यूज स्टोरी ' ह्या कथेवरून क्षितीज पटवर्धन ह्यांनी ' दोन स्पेशल ' हे नवे नाटक रंगमंचावर आणले . ते सध्या गाजते आहे . १६ पुरस्कार मिळाल्यामुळे प्रेक्षक नाटक पाहायला येऊ लागले आहेत . नाट्यनिर्मिती छान . कलाकार मन लावून काम करणारे . जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक गोडबोले ह्यांचा अप्रतिम अभिनय . जितेंद्र जोशी ह्यांची सहनिर्मिती . दोन जीवांच्या संवादावर चाललेले नाटक. दोघेही पत्रकार . एकाच वर्तमानपत्रात काम करणारे . दोघांचे एकमेकावर प्रेम . नियतीमुळे घटना घडत जातात आणि ते एकमेकांच्या आयुष्यातून नाहीसे होतात . पुन्हा काही वर्षांनी ते समोरासमोर येतात तेव्हा एकदम वेगळेच असतात . परस्पर विरोधी . असहाय . आयुष्याचे भजं असं होतं . हे असं कां होतं ?, काहीच माहित नाही . बहुधा त्याला नियती असे म्हणतात. माणसाचं आयुष्य फार कमी वेळा आखीवरेखीव असतं . त्यामुळेच अशी दोन जीवांची वेगळी गोष्ट पाहायला मिळते . तशी दु:खदायक . निराश करणारी.
पत्रकारितेत असलेला हा नायक . कोणताही दबाव न मानणारा . निर्भीड . पैश्याने विकत न घेता येणारा . संवेदनशील मनाचा . आपल्यापरीने लढणारा . न वाकणारा. आज असे पत्रकार फार थोडे . आजच्या च्यानेल्च्या दुनियेत कोट्याधीश झालेले पत्रकार पाहीले म्हणजे  हा पत्रकार आणि त्याचे असहाय जीवन मनाला निराश करून जाते . पब्लिक रिलेशन ऑफिसर असलेली नायिका काय काय करते आणि तिचे जगणं कसं तिचं रहात नाही. असहाय जगणारी ही स्त्री .
लेखक - नाटककार ह्या दोघांची गोष्ट संवादातून चांगली सांगत जातात. कलाकारांच्या अभिनयामुळे आपण ती शेवट पर्यंत पहात जातो . एक चांगला नाट्यानुभव. आनंद देणारा नसला तरी अंतर्मुख करणारा . प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत हेच ह्या नाटकाचे खरं यश .
खरं म्हणजे मराठी नाटकाचे आजचे प्रेक्षक हे जेष्ठ नागरिकच . कलाकार तसे तरुण . आणि प्रेक्षक वय झालेले. हा प्रेक्षक वर्ग अधिक वयाचा झाला की मराठी नाटक बंदच पडेल असे दिसते .


No comments:

Post a Comment