Tuesday, June 4, 2019

मुसाफिर

'मुसाफिर' अच्युत गोडबोले ह्यांचे ४७४ पानाचे ( आवृत्ती ४५ ) आत्मचरित्र वाचायला घेतलं. आज वाचून संपवलं. हा इन्फोटेकमधला दादा माणूस. नारायण मूर्ती ह्यांनी पटणी कॉम्पुटर सोडली तेंव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलेला हा गृहस्थ. पुढे अनेक मोठ्या आय टी  कंपन्यात सीइओ. हे माहित असल्यामुळे पुस्तकातील त्या भागापासून वाचायला सुरुवात केली. मी गणकयंत्राशी त्यावेळपासून संबंधित असल्यामुळे मला विशेष उत्सुकता होती. अर्थात मी बिझिनेस Application मध्ये कधीच नव्हतो. पण technical application मध्ये सर्व जनरेशनचे कॉम्पुटर वापरले होते. त्यामुळे हा भाग मी प्रथम वाचला. हा तर भारतीय आय टी व्यवसायाचा इतिहास. प्रत्येक आयटीवाल्याने अवश्य वाचावा. सुंदर. अच्युत गोडबोले ह्यांच्या करिअरचा ग्राफ.
सोलापूरच्या मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी. मुंबईला आय आय टीत प्रवेश घेतो. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयात रस. चौफेर वाचन. त्याच्यासारखेच त्याचे अनेक मित्र. डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. वेगळं काहीतरी करू पाहणारे. बीटेक झाल्यावर नोकरीचा विचार सोडून आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी चळवळ उभारणारे.
दहा दिवसाची तुरुंगाची हवा खाल्यानंतर अच्युतच्या लक्षात येते की हे आपलं काम नाही. मुंबईला परतल्यानंतर असेच भटकणे. वाचत राहणे. बेकारीचे दु:ख सोसणे. नाटक , साहित्य , तत्वज्ञान , चित्रकला . अर्थशास्त्र , कामगार  चळवळी दलित चळवळी, ह्या सर्वच क्षेत्रात रस. केमिकल  इंजिनीअरिंग विसरून जाणे. आणि मग नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या आयटी क्षेत्रात नोकरी. तेथे मन लागतच नाही. Jack of All - Master of  None अशी अवस्था. विलक्षण जिद्दीने प्रोग्रामिंग मध्ये तज्ञ होणे. हा प्रवास उल्लेखनीय. मग वाटचाल व्यवस्थापकीय पदाकडे. यशामागून यश. आर्थिक सुबत्ता. एक देखणे यश. हा प्रवास म्हणजे हे आत्मवृत्त. वाचण्यासारखे.
ह्या आत्मचरित्राचा मन हेलावून सोडणारा भाग म्हणजे अच्युत आणि त्याच्या पत्नीने सोसलेले दु:ख . त्यांच्या मुलाला ऑटीझमचे दुखणे आहे. कोणताही माणूस कोलमडून पडेल. पण अच्युत त्यातून कसा उभा राहतो हे वाचताना आपण त्याच्या जिद्दीने प्रभावित होतो.
असा हा चौफेर व्यक्तिमत्वाचा माणूस समजून घेतला तर आपलेही जीवन समृद्ध होते. एक विलक्षण व्यक्तिमत्व.

No comments:

Post a Comment