Tuesday, June 4, 2019

भाई

'भाई ' चा उत्तरार्ध आज संध्याकाळी ६ चा शो-  बिग  सिनेमा  संगम , अंधेरी  येथे पाहिला . मोजून १६ प्रेक्षक होते . पहिल्या भागावर लोकसत्तेतील लेखामुळे परिणाम झाला  होता . टीव्ही चॅनेल्सवर उलटसुलट चर्चा झाली . दुसऱ्या भागाकडे प्रेक्षक वळलेच नाही असे दिसते . मिडीयाचा असा परिणाम होतो आणि चित्रपट डब्यात जातो . मीडियावर फारसा विश्वास ठेऊ नका .
हा चित्रपट मला तर आवडला . ज्यांनी पुलंना पाहिले आहेत ,त्यांना ऐकले आहे ,त्यांचे साहित्य वाचले आहे, त्यांना  ह्या चित्रपटातून पुलं सतत भेटत राहतात , त्यांचे संवाद  आपल्या कानांत घुमत राहतात , त्यांचे गाजलेले विनोद  आपल्याला हसवत राहतात .  ' आहे मनोहर तरी ' ह्या त्यांच्या पुस्तकातील सुनीताबाई  आणि पुलं सतत भेटत राहतात . पुलं आणि त्यांचे गायक मित्र - कुमार गंधर्व ,वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी  चित्रपटातील संगीत मैफलीतून भेटतात आणि त्या सर्वांच्या  अजरामर गाण्यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो . आपण ती गाणी असंख्य वेळा ऐकलेली असली तरी ह्या मंडळींच्या एकत्र मैफलीची आपल्याला नुसती ऐकीव माहिती असते . त्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी ह्या संगीतामुळेच पडल्या  होत्या .त्यांचे  ते  विलक्षण मैत्री असलेले लोभस चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते . ह्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खूप काही सांगून जाते . बाबा आमटे ह्यांच्या आनंदवनात  रमणारे  पुलं बघताना  आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत राहते.  पुलं हा  नुसता विनोदाचा बादशहा नाही  तर 'देणार्याने देत जावे ' हे  सांगणारा  महामानव आहे . मध्यांतर होण्यापूर्वी असलेले  ते प्रसंग  नकळत  आपल्या डोळ्यात पाणी आणतात. आणीबाणीतील पुलं आपल्याला माहित आहेतच.   पहिला ' महाराष्ट्र भूषण ' हा राज्य पुरस्कार ज्यांनी त्यांना दिला त्यांचे  त्या मागचे नंतरचे राजकारण आपल्यात विलक्षण  चीड निर्माण करते . पण  पुलं ह्या माणसाची मान कशी ताठ होती ह्याचे दर्शन आपल्याला अधिक आनंद देते .
हा चित्रपट अवश्य पहा . हा एक सुंदर चित्रपट आहे . उत्तरार्ध मला अधिक आवडला . सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम .पुलंसाठी  पहा  पण ह्या  सर्व कलाकारासाठी  अवश्य पहा . पुलं च्या चित्रपटासाठी   रिकाम्या खुर्च्या  पाहतांना मला थोडं वाईटच वाटलं .

'आहे मनोहर तरी' मधील पु ल आणि आपण पाहिलेले , ऐकलेले आणि आपल्याला समारंभातून दिसलेले पु ल थोडेसे वेगळे आहेत. तसेच मांजरेकर दिग्दर्शित 'भाई 'मधील पु ल अनेक बाबतीत वेगळे आहेत . 'भाई 'मधील संवाद रत्नाकर मतकरी ह्यांचे आहेत .त्यांनी पु ल ना जवळून बघितले असेलच .म्हणूनच पटकथाकार गणेश मतकरी ह्यांनी मांजरेकर ह्यांना रत्नाकर मतकरी ह्यांच्याकडून संवाद लिहून घेण्यास  सांगितले असावे. मांजरेकर ह्यांनी त्यांचे स्वातंत्र्य वापरले असेलच. शेवटी सिनेमाच्या गुणदोषात सर्वच थोडेबहूत जबाबदार आहेत. शेवटी हा सिनेमा त्या सर्वानी मिळून तयार केला आहे. प्रेक्षकांनी ज्याचेत्याचे पु ल शोधावेत .

मुकुंद संगोराम हे चांगले कला समीक्षा करणारे लेखक आहेत. आजचा लोकसत्तेतील त्यांचा ' भाई : पुलंचे भंपक चित्रण ' हा लेख वाचला. त्यांची टीका मला तरी चुकीची वाटते. सिनेमा भंपक नाही. तो बघण्यासारखा आहे. असामान्य माणसेही रोजच्या जीवनात तशी सामान्यच असतात.पुलंचं  ' आहे मनोहर तरी ' असं जे वर्णन सुनीताबाईनी  केलं आहे ते खरं असलं तरी त्यामुळे पुलंचे मोठेपण कमी होत नाही. पु लं च्या जीवनाची विविध रूपे पहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातील दु:खद घटना मनाला चटका लावून जातात. हा सिनेमा भंपक मुळीच नाही. असे हेडींग देउन सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न वाटतो.

बायोपिक चित्रपटात असे होत रहाणारच.
आत्मचरित्रात तरी सगळे कुठे खरे असते.

खरं म्हणजे अनेक नावाजलेले कलाकार हे दारू पिल्यानंतर अधिक खुलतात . त्यांच्या संगीत मैफिली त्यानंतर अधिक रंगतात. ह्याची अनेक उदाहरणे माहितीची आहेत. बायोपिक सिनेमात ह्याचा खुबीने वापर करणारे दिग्दर्शक गल्ला भरण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेतात असे म्हणणे तसे चूकच आहे.

No comments:

Post a Comment