Saturday, June 8, 2019

खाकी वेषातील माणुसकीची कहाणी


 लोकसत्तेच्या ' चतुरंग ' मध्ये ' वळणवाटा ' ह्या सदरात माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार ह्यांचा लेख वाचला. ' आज आई नाही , पण गीताई आहे ' , अशी सुरुवात करून लिहिलेले हे लिखाण खूप काही सांगून जाते. मी एकदाच त्यांना जवळून पाहिले. त्यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. पण त्यांना जवळून पाहणे , ऐकणे आणि हे व्यक्तिमत्व कसे आहे हे समजून घेण्याचा योग जुळून येणे कठीणच होते. पोलिस ह्या व्यक्तीची लहानपणापासून भीतीच. त्यामुळे मी पोलिस आणि पोलिस चौकीला फार भितो. पण पोलिसातील माणसे खूप वेगळी असतात. अभ्यासू असतात. विलक्षण कर्तृत्वान असतात. जिद्दीची असतात. तत्वनिष्ठ असतात. खूप प्रामाणिक आणि मदत करणारी असतात. हे समजायला खूप वर्षे गेली.  अरविंद इनामदार ह्यांना मी एकदाच जवळून पाहिले . ते पत्रमहर्षी ' मराठवाडा 'कार अनंत भालेराव ह्यांना भेटण्यासाठी घाटकोपरला त्यांच्या मुलाच्या घरी आले होते. त्यावेळी मी तेथे होतो. अनंतराव ह्यांच्यावर केइएम मध्ये मोठी शस्त्रक्रिया झाली होती. ते घरी परतले होते . अनंतरावांना भेटण्यासाठी इनामदार आले होते. त्यांची जुनी ओळख होती. त्यांच्या अनेक विषयावर गप्पा चालल्या होत्या. मी ऐकत होतो. पोलिस खात्यातील हे वेगळे व्यक्तिमत्व आहे,  हे माझ्या लक्षात आले.
आज त्यांचा लेख वाचला आणि त्यांचे अनुभवाचे बोल खूप काही सांगून गेले. माणूस घडतो तो संस्कारामुळेच. ' आज आई नाही , पण गीताई आहे ' हेच वाक्य खूप काही सांगून जाते.
गेल्या काही दिवसापासून ' पुरोगामित्वाच्या र्हासामागे दलितांचा ब्राम्हणद्वेष ' ह्या विषयावर उलटसुलट चर्चा चालू आहे. ब्राम्हणेतर मंडळींचा हिंसक ब्राम्हणद्वेष सुरु झाला तो गांधी हत्तेनंतर. अरविंद इनामदार हे सांगलीच्या ब्राम्हण कुटुंबातील. गांधी हत्त्या झाली आणि गांधीच्या नावाखाली लोकांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरु केली आणि ब्राम्हणांची घरे जाळण्यास सुरुवात केली. ह्या लेखात त्यांनी त्यावेळचे जे वर्णन  केलं आहे ते वाचलं की लक्षात येतं की ह्या लोकांना अहिंसा पूजक गांधी समजला नव्हताच. आणि येथून पुढे ब्राम्हणद्वेष सुरु झाला. तो हिंसक होत गेला . जेंव्हा त्यांचे घर जळत होतं तेंव्हाच इनामदारांनी प्रेमळ माणुसकी अनुभवली , हे ही विलक्षण आहे.
त्यांचे वडील त्यावेळी त्यांना म्हणाले , ' आता इनामदारी विसरा , भरभर शिका . मोठे व्हा . कुणावर अन्याय करू नका ' ते पुढे म्हणतात , ' बरं झालं सर्व गेलं . भांडणाचं मूळ गेलं ' . अशा प्रसंगी सुचलेलं जगण्याचं हे तत्वज्ञान.
इनामदार पुढे लिहितात .... ' जसजसं कळूं लागलं तसतसं गांधीजी जास्त आवडू लागले . आणि आईनी पाठ करून घेतलेली गीताई आयुष्यभर साथ देऊ लागली ....
' अरे असं चोरी करून मोठ्ठं होता येणार नाही रे ! खूप डोळसपणे कष्ट करा .चांगलं ध्येय पुढे ठेवा ... '  हे    वर्गमास्तर कुलकर्णीसरांचे संस्कार पुढे कामी आले. आणि इनामदार मोठ्या पदावर जाऊन पोहोचले. ' ' माणुसकी खाकीपेक्षा मोठी ' हे त्यांना चांगलंच माहित होतं म्हणूनच एका असहाय मातेनं प्रेमाने दिलेला चहा पिताना त्यांना वाटलं ' तो माझ्या आयुष्यातील सर्वात छान , चवदार , माणुसकीनं वाफाळलेला चहा होता ... परत असा चहा मिळाला नाही.'  माणसं जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. खाकी वेषातील ही माणुसकीची अनोखी कहाणी आहे.
पोलिस आणि राजकारणी. एक वेगळच समीकरण असतं. फार गुंतागुंतीचं. माणसाना अधिकार मिळाला की माणसं कशी बदलतात हे त्यांनी चांगलच अनुभवलं आहे. त्याचा एक किस्सा त्यांनी ह्या लेखात दिला आहेच.
त्यांच्या बरोबर काम केलेलं , त्यांच्याच तालमीत तयार झालेले आणि एसीपी म्हणून निवृत्त झालेले एक अधिकारी माझ्या परिचयातले आहेत . त्यांनी पोलिस खात्यातील अनेक गमतीजमती आणि राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपाबद्दल सहज गप्पा मारताना खूप काही सांगितलं आहे . इनामदारासारखी माणसे पोलिसात राहून खूप काही करतात पण त्यांना खूप काही त्रास होत असतो हे ही तितकेच खरं.

फेसबुकवरील लिखाणावर काही प्रतिक्रिया आल्या होत्या ,त्याची लिंक खाली दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1119982558017182&id=100000163447478

पोलिस म्हंटलं की लहानपणी घाबरून जायला होत असे . तक्रार करायला पोलिस चौकीत जायचं म्हणजे अंगावर काटा येत असे . सोसायटीच्या वाचमनला एकदा पकडून नेलं होतं . गरीब होता . त्याचा काहीच गुन्हा नव्हता . तेव्हा पहिल्यांदा चौकीत गेलो आणि त्याला सोडवून आणलं .  काही पोलिस अधिकारी  पुढे संपर्कात आले आणि ओळखीचे झाले . पोलिस म्हणजे मित्र , हे खरं आहे असं मत झालं . ह्या पोलिसांचे आयुष्य फारच धकाधकीचं असतं हे लक्षात येऊ लागलं . एक पोलिस अधिकारी मित्र झाले . त्यांच्याशी गप्पा मारताना अनेक सुरस कथा ऐकल्या . गुन्हेगारी विश्व भन्नाट असतं .आपण कल्पनाच करू शकत नाही . अनेक प्रकारची गुन्हे करणारी माणसे ,त्यांचे नातेवाईक , भ्रष्टाचार , राजकारणी मंडळी ,कोर्ट कचेर्या ,संप ,मोर्चे ,बंद ,व्ही आय पी .एक ना अनेक कटकटी .कौटुंबिक आयुष्य असं नसतेच .मी त्यांना पुस्तक लिहिण्यास सांगितलं . नाही म्हणाले .नको त्या आठवणी . असा वैताग दिसला . पण गप्पा मारताना मात्र ते रंगून जात .मूड असेल तर .
' खाकीतील माणूस ' हे अशोक कुमार ह्या आय पी एस अधिकार्याचे गणेश रामदासी ह्यांनी अनुवादित केलेलं पुस्तक वाचतोय . पण मला माझ्या मित्र असलेल्या पोलिस अधिकार्याची सारखी आठवण होते . ह्या पोलिस अधिकार्यांनी निवृत्त झाल्यावर लिहित रहावे . माणूस समजायला ही पुस्तके खूप कामी  येतील . साहित्यात एक वेगळं दालन उघडेल .





No comments:

Post a Comment