पंडित नेहरू |
माझ्या शालेय जीवनात नॅशनल हिरो हेे पंतप्रधान पंडित नेहरूच होते. आजही मी त्यांना त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक दृष्टिकोनामुळे मानतो. महात्मा गांधीजींनी सरदार पटेल ह्यांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केले ते एका दृष्टीने बरेच झाले. तसे पाहिले तर सरदार पटेल आजारी असत व त्यांचे वय ही जास्त होते. फारतर सरदार पटेलांच्या नंतर नेहरूच पंतप्रधान झाले असते.
नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गांधीजींचे सर्व काही ऐकले नाही. त्यांनी विज्ञान आणि उदयोगाला विशेष महत्व दिले. रशियन दौऱ्यानंतर त्यांनी समाजवादी विचारधारेला अधिक महत्व देऊन सरकारी सार्वजनिक उद्योगाची उभारणी केली. पोलाद कारखाने उभे केले. भाक्रा नानगल धरणाची उभारणी करून पंजाबला अधिक सुजलाम सुफलाम बनविले. त्यावेळी सरदार सरोवरसारखा ह्या धरणाला कोणीही विरोध केला नव्हता. भाक्रानानगल धरण आणि पोलाद कारखाना यांना त्यांनी आधुनिक तीर्थस्थळांचा दर्जा दिला. हे सर्व गांधी विचारांशी जुळणारे नव्हते. सोव्हिएत रशियातील विकास पद्धती म्हणजे पंचवार्षिक योजना त्यांनी भारतात अंमलात आणली. ते विकासाचे मॉडेल त्यांनी स्विकारले. ते रशियाकडे झुकलेले असले तरी तसे अमेरिकावादी होते. त्यामुळे त्यांनी अलिप्ततावादी चळवळ उभी करून १०० देशांचे नेतृत्व केले. अलिप्त देशांचा वेगळा गट निर्माण करणारे व त्याचे नेतृत्व करणारे नेहरू आठवतात व आजची बदललेली जागतिक स्थिती आठवत राहते.
डॉ होमी भाभा ह्यांची मदत घेवून भारतात अणूशक्ती विकासाचा पाया रचणारे नेहरू नेहमीच आठवतात.
अणूसंशोधन आणि अणूऊर्जा ह्यांचे महत्व त्यांना माहित होते म्हणून त्यांनी अणूऊर्जा विभाग निर्माण केला. डॉ होमी भाभा ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. हे गांधीवादी विचाराच्या विरोधी होतं.
आय.आय. टी., भारतीय कृषी संशोधन संस्था, एनसीएल, एनपीएल अशा संस्था उभ्या करून आधुनिक भारताची उभारणी केली. आय.आय.टी.तील हीच मंडळी पुढे एन.आर.आय. झाली. त्यांच्याकरिता येथे कमी वाव होता.
डॉ होमी भाभा ह्यांनी मात्र अणुऊर्जा संस्था उभी करताना कोणत्याही विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक अशा मंडळींना न घेता तरुण पदवीधर - पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेऊन त्यांना विशेष शिक्षण देऊन समाविष्ट करून घेऊन एक वैज्ञानिक संस्था उभी केली. नेहरूंनी भाभांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. आज मुंबईचे भाभा अणू संशोधन केंद्र हे मातृसंस्थेचे काम करते. तसे पाहिले तर खरी सुरुवात झाली ती बंगलोरच्या इन्स्टिट्युट ऑफ सायन्स आणि मुंबईच्या टी.आय.एफ.आर. मुळेे. त्यामुळेच भारतातील विज्ञान युगाला येथून कलाटणी मिळाली आहे.
नेहरूंची ही दृष्टी आणि डॉ होमी भाभा ह्यांचे नेतृत्व ह्यामुळे भारताने विज्ञानयुगात प्रवेश केला. गांधीजींच्या विचारापासून हे सर्व दूर होते. म्हणून मला नेहरूंचा हा पैलू वेगळा वाटतो.
मी नेहरूंचा चाहता होतो आणि आहे, हे त्यांच्या वैज्ञानिक पैलूमुळे.
अशा ह्या उत्तुंग नेत्याला अभिवादन करण्याचा आजचा दिवस. त्रिवार अभिवादन !
No comments:
Post a Comment