Sunday, March 10, 2019

औरंगाबादच्या आठवणी - ५

बळवंत मोफत वाचनालय

१९७४ साली ही नवी इमारत उभी राहिली. मी १९५८ ते १९६८ पर्यंत येथे नियमित येत असे .

औरंगाबादच्या जुन्या आठवणीत मला नेहमी आठवण  होते ती बळवंत मोफत वाचनालयाची. १९२० साली लोकमान्यांच्या स्मरणार्थ सुरु झालेले हे वाचनालय. माझ्या शाळकरी जीवनात मी संध्याकाळचा रोजचा दीडदोन तास वेळ  ह्या वाचनालयात घालविला आहे. औरंगपुर्यातून खडकेश्वरकडे जाताना हे वाचनालय लागत असे. मी ५वी - ६ वीत होतो. वर्तमानपत्र घरी येत नस , वडिलांना तुटपुंजा पगारामुळे वर्तमानपत्र घेणे  परवडत नव्हते. मला खेळापेक्षा वाचनाची अधिक आवड होती. हे मोफत वाचनालय होते. मराठी आणि इंग्रजी दोन्ही वर्तमानपत्रे तेथे येत असत. उभे राहून  Stand वर ठेवलेले वर्तमानपत्र वाचावे लागत असे. काही वर्तमानपत्र वाचण्यासाठी लोकांची रांग लागत असे. त्यावेळी माझे दुसरे वर्तमानपत्र चाळून होत असत. केसरी - मराठा - लोकसत्ता ह्यासाठी वाचक नंबर लावत असत. इंग्रजीमध्ये टाइम्स लोकप्रिय होताच. नोकरीसाठी जाहिराती बघण्यासाठी तरुण मुले आवर्जून हे वर्तमानपत्र वाचत असत. आमच्या इंग्रजी शिक्षकाने रोज इंग्रजी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचत जा, असा सल्ला दिला होता. त्यामुळे तुमचे इंग्रजी सुधारेल असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रजीतील अग्रलेख  वाचून त्यावेळी फारसे कळत नसे. मराठी माध्यमाच्या मुलांना काय कळणार तो इंग्रजी भाषेतील अग्रलेख ?
मला त्यावेळी आचार्य अत्रे ह्यांचा 'मराठा' आणि 'नवयुग' हे दोन्हीही  खूप आवडत असे . त्यानंतर  ह रा महाजनी ह्यांचा 'लोकसत्ता' आवडत असे . 'सकाळ' आणि 'केसरी' ही  वाचत असे . अधूनमधून पुण्याचा 'सह्याद्री'. आमच्या अनंतराव भालेराव ह्यांचा 'मराठवाडा' वाचूनच आम्ही मोठे झालो. आचार्य अत्रे ह्यांचा मराठा वाचल्याशिवाय मात्र चैन पडत नसे. अत्रे -फडके, अत्रे - खांडेकर, अत्रे - प्रबोधनकार, हे सगळे वाद आजही स्मरतात. नुसती धमाल. अत्रे ओरबाडून काढीत असत. त्यांची भाषा शैली तुफान होती. मी ते सारे लेख ह्याच वाचनालयात उभे राहून वाचले होते . त्यावेळी पंडित नेहरू आमचे आराध्य दैवत होते . ते गेले तेंव्हा आचार्य अत्रे ह्यांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख आजही आठवतात. सावरकर गेले तेंव्हा अत्र्यांनी लिहिलेला लेख आजही आठवतो. मी मुंबईला पहिल्यांदा शिवाजी पार्कला गेलो तेंव्हा सावरकर सदन बघितले ते अत्र्यांनी त्याबद्दल लिहिले होते ते आठवले म्हणून. त्यावेळी अत्र्यांचा 'नवयुग' अधिक आवडत असे.  नंतर 'मार्मिक' मधील व्यंगचित्रे बघू लागलो. अत्रे - ठाकरे वादाने फार गचाळ वळण घेतले होते. ते फारसे आवडत नसे. ह रा महाजनी ह्यांची 'रविवारची चिंतनिका' आवडत असे. महाराष्ट्र टाइम्स सुरु झाला आणि पहिल्या दिवसापासून तो घरी येऊ लागला. कित्येक वर्ष आणि आजही मी 'मटा'चा वाचक आहे . 'काय सांगू तुम्हाला' हे द्वा.भ .कर्णिकांचे सदर हे माझे त्यावेळचे आवडते सदर. विजय तेंडुलकरांची 'कोवळी उन्हे' हे माझे दुसरे आवडते सदर. परुळेकरांचा 'सकाळ' म्हणजे खरे बातमी पत्र. त्यात बातमी ही 'बातमी' असे . तिखटमीठ लावून बातम्या छापत नसत. आज तशा  बातमीपत्राची विशेष गरज आहे असे वाटते. आज आपला पत्रकार किंवा बातमीदार ह्यांच्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही. विकाऊ पत्रकारिता आणि टेबल न्यूजमुळे वर्तमानपत्रे वाचणे मी जवळजवळ सोडून दिले आहे. केवळ ५-१० मिनिटे वर्तमानपत्र चाळत असतो.

आज ह्या वाचनालयास खूप वर्षाने भेट दिली. वाचनालयाचे सगळे रूपच बदललेले दिसून आले. छान इमारत उभी आहे. १९७१ सालीच बांधलेली आहे. खरोखरच  सुंदर इमारत. बसण्याची छान व्यवस्था आहे. तसे वर्तमानपत्रे वाचणे मोफतच  आहे. वाचकांची चांगली सोय झाली आहे. स्टाफ चांगले स्वागत करतो.
स्टाफच्या परवानगीने मी ह्या वाचनालयाचे काही फोटो घेतले. ते फोटो खाली देत आहे. बदललेल्या औरंगाबादेत हे एक सुरेख वाचनालय आहे . माझे आयुष्य ह्या वाचनालयाने बदलले. त्यामुळे मी विविध विषयावर वाचू लागलो . माझ्यात वाचण्याची आवड निर्माण झाली आणि माझे आयुष्य समृद्ध झाले. असेहे बळवंत मोफत वाचनालय १९२0 साली सुरु झाले होते. औरंगाबादच्या वाचन संस्कृतीचा हा एक भाग.
बळवंत मोफत वाचनालय, औरंगाबाद 

वाचकांची  बसण्याची सुरेख व्यवस्था 

वाचनालयाचा दर्शनी भाग 

आम्ही उभे राहून वाचत होतो. आज अशी सुंदर आसन व्यवस्था आहे . 
ह्या वाचनालयाला भेट दिल्यानंतर खडकेश्वरकडे चालू लागलो. न्यु मिडल स्कूलच्या इमारतीनंतर बाळकृष्ण महाराजांचे मंदिर लागले. बाहेरून ओळखलेच नाही, समोर दोनमजली इमारत उभी आहे. मंदिर मागे आहे. ते शोधत मुख्य गेटमधून मागच्या बाजूस गेलो आणि ते समाधी स्थळ दिसले. मी लहान असताना वडिलांच्या बरोबर येथे आलो होतो. वडिलांची खूप श्रद्धा होती. ते रोज येथे येत असत. आज त्यांची आठवण झाली. ते बरोबर नव्हते: पण मी त्यांच्या आठवणीमुळे ह्या समाधीचे  दर्शन घेतले . एकेकाळी फार सुंदर , शांत आणि टुमदार असे हे मंदिर होते . आज दर्शनी भागात दुकाने आहेत . मंदिराची फारशी देखभाल होत नाही असे दिसते .
गुलमंडीकडून खडकेश्वरकडे जाताना अनेक देवळे लागतात. सरस्वती भुवनकडे जाताना नाथांचे देऊळ लागते. एकनाथ महाराज औरंगाबादेत असत तेंव्हा ते त्यांचे घर होते. त्या नाथ मंदिरात मी लहान असताना अनेक किर्तने ऐकली आहेत. सिन्नरकर महाराज, पाचलेगांवकर महाराज , कीर्तनकार आफळे ही नांवे आठवतात. किर्तन हा प्रकार मनोरंजक आहे. भाषावृद्धीसाठी खूप छान आहे. गोष्ट कशी रंगवावी हे त्यातून समजते. संत वांग्मयाची छान ओळख होते. अभंगाची गोडी लागते.
औरंगपुर्यात एकानंतर एक देवळे आहेत. दत्तमंदिर , नाथ मंदिर , ओंकारेश्वर , नागेश्वर , बाळकृष्ण महाराज समाधी आणि खडकेश्वर. ग्रामदैवत सुपारी मारुती.

बाळकृष्ण महाराज समाधी स्थळ 
बाळकृष्ण महाराज समाधी दर्शनानंतर पुढे चालू लागलो. नागेश्वर मंदिर दिसले. समोरचा भाग वेगळाच वाटत होता .तसाच पुढे चालत गेलो. समोर खडकेश्वर मंदिर दिसले. दुरूनच फोटो घेतला. ह्या मंदिराचे तसे खूप महत्व . ह्या मंदिराजवळ एक मोठी विहीर होती.आजही असेल. औरंगाबाद शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन ह्या  विहिरीत होत असे. मिरवणुकीने सर्व गणपती येथे येत. त्यांची सामुदायिक आरती होत असे  आणि त्यानंतर विसर्जन होत असे. मी तो सोहळा अनेक वर्षे पाहीला होता त्याची आठवण झाली. आज मंदिर नवे दिसते आहे. प्रत्यक्ष मंदिरात गेलो नाही.
मंदिरांच्या बाजूला एकनाथ संशोधन मंदिर आहे. मराठवाड्यातील इतिहास संशोधक येथे काम करीत असत . न शे पोहनेरकर ह्यांचा ह्या संस्थेशी जवळचा संबंध होता. आज ही इमारत जुनीच दिसते . ह्या संस्थेने इतिहास संशोधनाचे महत्वपूर्ण काम केले आहे.
खडकेश्वर मंदिर 
एकनाथ संशोधन मंदिर 





Saturday, March 9, 2019

औरंगाबादच्या आठवणी -४

शासकिय ज्ञानविज्ञान महाविद्यालय , औरंगाबाद
Government College of Arts and Science , Aurangabad

मी औरंगाबादच्या सरकारी ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. १९६२ साली पीपीसीसाठी ह्या महाविद्यालयात दाखल झालो. आमचे महाविद्यालय होते औरंगजेबाने बांधलेल्या किलेअर्क ह्या इमारतीत. त्या इमारतीचे हे सुंदर चित्र . आज तेथे इतर कांही संस्था कार्यरत आहेत असे दिसते. ह्या किलेअर्कमध्ये जनाना महल आणि मर्दाना महल असे दोन महाल होते. आमचे वर्ग आणि प्रयोगशाळा येथेच भरत होते. हा परिसर अतिशय निसर्गरम्य होता. खूप दाट झाडी होती . किलेअर्कच्या मागेच हिमायत बाग होती. अशी ही सुंदर ऐतिहासिक वास्तू. आमचे  वर्ग ज्या दिवाणखान्यात भरत असत तेथे १२०-१३० विद्यार्थी सहज बसत असत, शिक्षकांचा आवाज शेवटच्या बाकावरील मुलालाही स्पष्ट ऐकू येत असे.  काही वर्षांनी सुभेदारी गेस्ट हाउसच्या बाजूला महविद्यालयाची नवी इमारत झाली .

किलेअर्क: औरंगजेबाने बांधलेली ही इमारत. दाट झाडी. सुंदर कारंजी, पायर्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला तळमजल्यावर गणिताचा वर्ग, डाव्या बाजूला वनस्पतीशास्त्र / जीवशास्त्र वर्ग. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर पदार्थविज्ञान प्रयोगशाळा आणि  दोन्ही बाजूला दोन मोठे वर्ग . त्याच्याच मागील बाजूस रसायनशास्त्र प्रयोगशाळा. इमारतीच्या मागे हिमायत बाग, एका मोगल राज्याच्या राणीच्या महालात असलेले हे ज्ञानविज्ञान महाविद्यालय.
( Picture: Taken from Google Images - Thanks to Google )

शासकीय गेस्ट हाउसच्या बाजूने गेलो तर किलेअर्कला जाण्यासाठी हा दरवाजा लागत असे. आजची नवी इमारत हा दरवाजा ओलांडलाकी लागते . 
ह्या दरवाजातून सुभेदारी गेस्ट हाउसच्या मार्गे किलेअर्कला जाण्याचा मार्ग आहे. एका बाजूला जिल्ह्याधिकारी निवासस्थान होते. ते आज तेथे  दिसत नाही.
आज  किलेअर्कला असलेले महाविद्यालय राहिलेले नाही. त्यावेळी आमचे प्राचार्य होते डॉ मा. गो.देशमुख. नागपूरहून आलेले. त्यावेळी ह्या मराठी साहित्यिकाने औरंगाबाद खुप  गाजविले. वक्ता असावा तर तो मा.गो. देशमुखासारखा . त्यांची अनेक भाषणे ऐकली. तसा मराठी हा आमचा दुय्यम विषय. आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी. मराठी साहित्याची गोडी लावली ती त्यांनी आणि त्यांचे सहकारी गो.मा.पवार आणि वसंत कुभोजकर. त्यावेळी अनेक मोठे मराठी साहित्यिक आमच्या महाविद्यालयात येऊन गेले ते ह्या मराठीच्या प्राध्यापकामुळेच.
डॉ मुतालिक हे आमचे इंग्रजी विभागप्रमुख. त्यांचा इंग्रजीचा तास आजही आठवतो. त्यांनी इंग्रजी भाषेची गोडी लावली. त्यांचे रसाळ बोलणे मंत्रमुग्ध करीत असे. Bernard Shaw समजला तो डॉ मुतालिक ह्यांच्यामुळेच. नाट्यवाचन ऐकावे ते त्यांचेच. मला नाट्यविषयाची गोडी लागली ती त्यांच्यामुळेच. नाटक हा प्रकार त्यावेळीपासून आवडू लागला. त्याच वेळी कुलकर्णी नावाचे दुसरे इंग्रजी प्राध्यापक होते. ते होते कर्नाटकी.  नंतर ते मराठवाडा विद्यापीठात गेले.
विज्ञान विषयाचे सर्व प्राध्यापक फार  नावाजलेले होते. डॉ करंबेळकर हे रसायन शास्त्र विभाग प्रमुख. हा माणूस देवमाणूस होता. अतिशय शांत, धीर गंभीर व्यक्तिमत्व. त्यांचा एक  दरारा होता. ते  अतिशय मृदु बोलणारे होते. Organic Chemistry सारखा किचकट विषय  ते फार सुंदर पद्धतीने शिकवीत असत. कब्बीनवाऱ सर Inorganic Chemistry हा विषय शिकवीत असत तर संपतराय  सर Physical chemistry हा विषय अतिशय छान शिकवीत असत. १९६२च्या युद्धानंतर महाविद्यालयात NCCचे  शिक्षण सक्तीचे झाले होते. कब्बीनवार सर  NCC प्रमुख होते. लष्करी शिक्षण सक्तीचे करणे आवश्यक आहे, हे आज मला विशेष जाणवते. माझे अनेक मित्र NCC चे 'C' Certificate घेऊन पदवीनंतर लष्करात गेले आहेत. मला त्यावेळी B Certificate मिळाले होते.
 करंबेळकरांचे धाकटे बंधू आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल होते. हा काहीच न बोलणारा ग्रंथपाल एक आगळावेगळा ग्रंथपाल होता.आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथालय एक सुंदर ग्रंथालय होते . मराठवाड्यात असे दुसरे ग्रंथालय नव्हतेच. जे काही विविध विषयावर वाचन केले ते ह्या ग्रंथालयातच. हा ग्रंथपाल मी कधीही विसरणार नाही.
Mathematics ला यशवंत देव आणि प्रोफेसर मुळे होते. देव सर माझ्या मित्राचे म्हणजे ललित पाठकचे मेव्हणे होते त्यामुळे आमची चांगली ओळख होती. ललितमुळे आमचा घरोबा होता. त्यांचा अनेक वर्षांचा सहवास मला लाभला. नंतर त्यांची मुंबईत  बदली झाली आणि मुंबईत त्यांच्याशी माझा संपर्क होताच. मुळे सर अतिशय कडक, वक्तशीर आणि तापट स्वभावाचे होते. त्यांचे शिकविणे अप्रतिम होते. ते हाडाचे गणित शिक्षक होते. आमचा विज्ञानाचा पाया त्यामुळे पक्का झाला.
पदार्थविज्ञान हा विषय शिकविणारे प्राध्यापक होते - मार्तंडराव शेळगांवकर , मिश्रा आणि मुंबईचे पारसी असलेले उमादीकर . तिघांनीही माझ्यात ह्या विषयाची गोडी निर्माण केली. मी त्यावेळी ह्या विषयात विद्यापीठात दुसरा आलो आणि त्याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मला दक्षिणा फेलोशिप मिळाली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी केंद्रीय अणूउर्जा  खात्याची १५० रुपये दरमहा शिष्यवृत्ती मिळाली. माझे महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण हे ह्या शिष्यवृत्तीमुळेच शक्य झाले. पुढे मी भाभा अणू संशोधन केंद्रात गेलो व मुंबई विद्यापीठाच्या UDCTमध्ये  पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केले. मला ह्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाबद्दल विशेष आपुलकी वाटते त्याचे कारण म्हणजे  माझे जीवन बदलून टाकणारी ही शिक्षणसंस्था आहे. माझा व्यक्तिमत्व विकास येथेच झाला. अनेक विषयांची येथे गोडी येथेच लागली. साहित्य, शास्त्र आणि मनोरंजन ह्या क्षेत्रात मी येथेच रमलो. मी Natural Science Association आणि मराठी मंडळात हिरीहीरीने भाग घेतला. अनेक वादविवाद स्पर्धेत  भाग घेतला. अनेकदा महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.  माझ्या जीवनातील ती सोनेरी वर्षे मी कधीच विसरू शकणार नाही . त्या महाविद्यालयाच्या जागेचे काही फोटो मला गतकाळात रमण्याचा आनंद देतात.
पुढे १९७३-७४ साली ह्याच महाविद्यालयात एक वर्ष पदार्थविज्ञान विषयाचा प्राध्यापक होतो. माझ्या शिक्षकांच्या बरोबरच मी अध्यापन केले. ते वर्ष खूप काही देऊन गेले. माझ्यापूर्वी एक वर्ष  माझी पत्नी ह्याच महाविद्यालयात पदार्थविज्ञान विषयात अध्यापन करीत होती. हा एक योगायोग.

हे आजचे शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. येथे मी १९७३-७४ मध्ये प्राध्यापक होतो.

आजची इमारत ही जुनी झाली आहे. किलेअर्कची मजा ह्या इमारतीत नाही.

हाच तो दिल्ली दरवाजा. आज रस्ता खूप मोठा झाला आहे. दरवाजा अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. हिमायत बागेकडे आणि हरसुल तलावाकडे जाणारा हाच रस्ता. 

शहरातून म्हणजे मच्छली खडक, सिटी चौक मार्गे ह्या मकई गेट मधून किलेअर्क कडे जाता येत असे. आता आजूबाजूला असलेली जागा झोपड्यांनी आणि घरांनीआक्रमित केली असून तेथे बकाल वस्ती झाली आहे . पूर्वी सायकलने ह्या भागातून चढ चढताना आमची दमछाक होत असे. आज कारने रस्ता ओलांडणेही कठीण होऊन बसले आहे. रस्ता असा राहिलाच नाही. सर्वत्र आक्रमण ,


महाविद्यालयात सायकलवरून जाण्याचा रस्ता म्हणजे  व्हाया शहागंज. आज तिकडे जाताना तसाच प्रवास केला. शहागंजाचे  घड्याळ त्यावेळी एक आकर्षण होते . आज तो परिसर पाहिल्यावर अतिशय वाईट वाटले. काय झाले आहे ह्या शहराचे! सर्वत्र अस्वच्छता. येथून जवळच भरणारा आठवडी बाजार आठवतो. येथील कापडाची दुकाने आठवतात. बस स्थानक आठवते. गुलमंडीनंतर बघण्यासारखे शहरातील हे दुसरे ठिकाण होते.   त्याचे काढलेले काही फोटो .

शहागंज 

शहागंजातून सिटी पोलीस चौकीकडे जाणारा हा रस्ता 

शहागंजासमोरील हा आजचा परिसर 

असे हे  आजचे जुने औरंगाबाद शहर 

असे रस्ते, असे शहर. कधी होणार स्मार्ट शहर? पूर्वी हे स्मार्ट शहर होते. छान आणि टुमदार.

Friday, March 8, 2019

औरंगाबादच्या जुन्या आठवणी - ३


औरंगाबादला नुकताच जाऊन आलो. पुन्हा जुन्या शहरात फेरफटका मारला. आठवणी जाग्या झाल्या. काही फोटो काढले. मागच्या आठवणीत फोटो टाकले नव्हते पण त्यावर लिहिले होते. ह्यावेळी फोटो काढले.
मी त्यावेळच्या  न्यु मिडल स्कूलचा विद्यार्थी. १९५६ ला त्या शाळेत प्रवेश घेतला. आम्ही हैदराबादहून नुकतेच आलो होतो. भाषिक प्रांतरचनेनंतर मराठी भाषिक आणि मुळ मराठवाड्याचे म्हणून येथे परत आलो. सुपारी मारुतीजवळ रहात होतो. औरंगपुऱ्यातून खडकेश्वरकडे जाणार्या रस्त्यावर आमची शाळा होती. एक दिमाखदार इमारत. त्यापूर्वी त्या शाळेला निझामाच्या काळात उर्दू नावाने ओळखले जात असे. खालील चित्रात ती इमारत दिली आहे . ह्याच इमारतीत मराठवाडा विदयापीठ सुरु झाले होते. आज तेथे जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे. मूळ इमारत आजही तशीच आहे. ह्या इमारतीबद्दल आजही मला प्रेम वाटते. माध्यमिक शाळेची ३ वर्षे (१९५६-५८) आणि एम.एस,सी (पदार्थविज्ञान) चे एक वर्ष (१९६६ -६७) ह्याच इमारतीत काढले. ते दिवस आठवले की मोठी गंमत वाटते. ह्या भेटीत तो परिसर पुन्हा पाहिला. परिसर स्वच्छ तर नाहीच. इमारतीही पहिल्यासारखी दिमाखदार दिसत नाही. एका सुंदर वास्तूची वाट लावली आहे,असे खेदाने म्हणावेसे वाटते. मूळ इमारत आजही बरी आहे. देखभाल ठीक नाही. समोरची गोलाकार बाग अतिशय सुंदर होती त्याची आठवण झाली.


New Middle School , Aurangabad (1956). In the same Building, Marathwada University was started

New Middle School :This is the right side of the building. Similar building is there on the left side of the main building. These side buildings are now modified. Front portion is totally changed by adding to the main building . Our 6A, 6B , 6C and 6D Classes were held in the Square building.

मूळ इमारतीच्या दोन्ही बाजूला दोन छोट्या इमारती. त्या इमारतीचे रूपच बदलून टाकले आहे, समोरच्या आणि आजूबाजूच्या  भागात उगाचच वाढ केली आहे. वरच्या छतावरून थोडीशी कल्पना येईल. या ठिकाणी आमचे ६वीचे चार मोठे वर्ग होते. दोन पुढे आणि दोन मागे. आज तेथे नुसते केबिनचे जाळे झाले आहे. 
This was the backside of our Marathwada University (1967-68).We  we’re here for a year and shifted to University Campus in 1968
मूळ शाळेच्या इमारतीच्या मागे  मराठवाडा विदयापीठ झाल्यानंतर अशा शेड्स बांधल्या होत्या. आजही त्या इमारती दिसतात. तेथे आमच्या एम.एससी.च्या प्रयोगशाळा होत्या. 
 When Marathwada University was started in School  building of our New Middle School , on the back side of the building  new shades were constructed. Our M.Sc. Physics Lab was in this shade.
(1967-69 ).


This is the backside of Marathwada University in 1967-68. Our M.Sc. Classes were taking place in these shades. University was shifted to New campus in 1968, इन University Campus there are   beautiful buildings for each Department.

येथून पुढे खडकेश्वरकडे जातांना एक नाला ओलांडून जावे लागे. उजव्या बाजूला भडकल गेटकडे जाणारा रस्ता होता. दूरवर सरकारी मल्टीपर्पज हायस्कूलची सुंदर इमारत आहे. तिथे सध्या महाराष्ट्र शासनाचे एक कार्यालय आहे. जाणारा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. सध्या इमारत दिसत नाही. समोर शाळेचेच प्रचंड मैदान होते. ते  ताब्यात घेऊन मोठे स्टेडीयम बांधले आहे. आमच्या शाळेच्या इमारतीची वाट लावली आहे. शाळेला खडकेश्वर कडून वळसा घेऊन पुढे जावे लागले. समोरच्या बाजूनी शाळेकडे गेलो. त्याचा दर्शनी भाग हा असा दिसतो. एक दिमाखदार इमारत. अतिशय वाईट अवस्थेत पाहून वाईट वाटले. ह्याच इमारतीत हायस्कूलची चार वर्षे काढली. अनेक आठवणी जाग्या झाल्या. आमचा १० वी एस.एस. सी.चा अभ्यासक्रम नव्हता. ११ वी चा  H.S.M.P.(Higher Secondary Multi-purpose) अभ्यासक्रम होता. मुदलियार कमिशनने सुचविलेला तो अभ्यासक्रम होता . महाविद्यालयाचे एक वर्ष ह्यात समाविष्ट केले होते. अभ्यासक्रम अतिशय अवघड होता. नापास होणार्यांचे प्रमाण ६५ ते ७० % होते. पहिल्या श्रेणीत ४-५ विद्यार्थीच पास होत असत. बायोलॉजी,गणित - पदार्थविज्ञान, सोशलस्टडीज आणि टेक्निकल म्हणजे इंजिनियरीग अभ्यासक्रम आठवीपासूनच  सुरु होत असे.  खालील चित्रात आमच्या शाळेचे चित्र दिले आहे .
This is our Government Multi-Purpose High School, Aurangabad  (1958 - 1963)  I studied in this school  for four years from 8th  to 11th Standard. I got my School certificate HS(MP)SC from this School with Technical subject as optional subject.


This is the backside of  the Govt. Multipurpose High School,  Aurangabad. During Nizam period , it was known as City Intermediate College.
आमच्या शाळेचा हा मागचा भाग. त्या मैदानावरील हा कचरा बघून कुठे आहे "स्वच्छ भारत" असा मला प्रश्न पडला. आजही ही इमारत सुंदर दिसते. येथेच पूर्वी सिटी कॉलेज होते. इंटर झाल्यानंतर विद्यार्थी हैदराबादला उस्मानिया विद्यापीठात पदवी शिक्षणासाठी जात असत. 


This is back side of the Govt. MPHS, Aurangabad. You see shades below the trees. That is our Technical Department equipped with very good Workshop with all industrial equipment. It was the first Technical School in Marathwada. We studied Mechanical and Electrical Engineering, Engineering Drawings, Applied Mathematics, Workshop practical including Carpentry, Lathe Machines, Welding etc. were taught to us from 8th to 11th Standard. If you get first class in 11th standard, admission was given to second year of Diploma in Engineering.
ह्या मूळ इमारतीच्या मागील बाजूस दूरवर ज्या शेड्स दिसत आहेत तेथे टेक्निकल विभाग होता . मोठे वर्कशॉप होते . येथेच मी कारपेंटरी, लेथ मशीन , ड्रिलिंग , वेल्डिंग , इंजिनीअरिंग Drawing इत्यादी अभियांत्रिकी विषय शिकलो . आजही ते स्कील म्हणून मला रोजच्या जीवनात कामाला येत असतात .


आमच्या शाळेच्या मागे प्रचंड मैदान होते . त्या मैदानाचा मोठा भाग सध्या  स्टेडीयमसाठी घेतला आहे . त्याची अवस्था सुद्धा फारशी चांगली नाही.


आज  आमच्या शाळेच्या  इमारतीच्या आजूबाजूची घाण आणि अस्वच्छता बघून वाईट वाटते. भडकल गेटकडून खडकेश्वरकडे जाणारा रस्ता वाईट अवस्थेत आहे. शहराचे जुने सौंदर्य नाहीसे झाले आहे. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी', असे असले तरी नवे कुठे दिसते आहे .

Monday, November 26, 2018

Ha Long Bay : Wonder of the World

Ha Long Bay - Wonder of the World


युरोप - अमेरिका बघण्यासाठी सगळेच जण पहिली पसंती देतात. अलीकडे पूर्वेकडील देशांना बरेच जण जात आहेत. अमेरिका- व्हिएतनाम युद्धापासून मला व्हिएतनामला एकदा जावे असे वाटत असे. अमेरिकेत एका व्हिएतनामी विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती . तेव्हा खूप गप्पा झाल्या आणि तेव्हाच ठरवले व्हिएतनामला जायचे. व्हिएतनाम दक्षिण- उत्तर खूप पसरलेला देश आहे . रुंदीला थोडा लहान आहे. कम्बोडिया , लाओस आणि चीन हे आजूबाजूचे देश. व्हिएतनामने तीन मोठी युद्धे पाहिली आहेत. चीन, कम्बोडिया आणि अमेरिकेबरोबरच्या तीन युद्धात व्हिएतनामची पूर्ण वाताहत झाली आहे. लाखो व्हिएतनामी ठार झाले . हो ची मिन्ह हा एक असा नेता मिळाला की ज्याच्यामुळे दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम एकत्र आले आणि मध्य व्हिएतनामच्या भागातून कंबोडियाला माघार घेऊन परतावे लागले . अमेरिकेबरोबरच्या १७ वर्षाच्या युद्धात अमेरिकेला सळो की पळो करून सोडणारे व्हिएतनामी सैनिक म्हणजे देशभक्तीचे उत्तम उदाहरण . आजही व्हिएतनामी ' My Country  ' असा सतत उल्लेख करताना दिसतात . आमचा गाईड एक व्हिएतनामी तरुण होता . खूप बोलका . हसविणारा . स्वतः बद्दल, आई - वडिलांबद्दल - बायकोबद्दल मोकळेपणाने बोलणारा . सतत व्हिएतनामचा इतिहास सांगताना '  My Country 'असा उल्लेख करणारा .
अशा व्हिएतनाममध्ये दोन ठिकाणांना भेट देणे आवश्यक आहे. एक उत्तरेतील हनोई तर दक्षिणेतील हो ची मिन्ह सिटी ( पूर्वीचे सायगांव).
हनोई शहर एक  व्हायब्रण्ट सिटी. न झोपणारे  शहर. गर्दीचे शहर. उत्साही शहर. गरीब - श्रीमंतांचे शहर. कामकरी लोकांचे शहर. उद्योगी शहर. येथील धडपडणारी उद्योगी माणसं पाहिलीकी आपल्यात उत्साह शिरतो . मला मुंबईकरांची आठवण झाली.
'No trip to Vietnam is complete without a visit to Halong Bay' , असं वाचलं होतं . हनोईला आलो आहोत तर १८० किलोमीटर दूर असलेल्या हालॉंग बे ला गेलंच पाहिजे . जगातील ७ नव्या नैसर्गिक आश्चर्यापैकी एक म्हणजे हालॉंग बे. असंख्य छोट्या छोट्या बेटांचा समूह . निसर्गरम्य समुद्र किनारे. ह्या असंख्य बेटावर जाणे तसे कठीण नाही पण तेवढा वेळ असावा लागतो . त्यावर उत्तम उपाय म्हणजे क्रूजची सफर . दिवसभर क्रुजमधून ही बेटं पहात फिरायचे . २००० बेटं आहेत. युनेस्को ने वर्ल्ड हेरिटेज दर्जा दिल्यापासून प्रवासी संख्या खूप वाढली आहे. लाइमस्टोन च्या टेकड्या असलेली छोटी छोटी बेटं. निसर्गाचा चमत्कार . ५००० लाख वर्षांपूर्वीची ही निसर्गनिर्मिती .माणूस जन्माला येण्यापूर्वी चा हा पृथ्वीचा पूर्वेकडील भाग. तेही एक आश्चर्यच . आयलंड टॉवर्स ची उंची ५० मीटर ते १०० मीटर. १५५३ चौरस किलोमीटरच्या परिसरात १९६० टेकड्या असलेली बेटं.  अप्रतिम निसर्ग सौन्दर्यानी नटलेला हा हालॉंग बे. आजूबाजूला फ्लोटिंग फिशिंग व्हिलेजेस . ह्या छोट्या छोट्या बेटावरील दाट जंगल खुणावत राहते . आपली बोट अगदी जवळ जाते. आपण चिंचोळ्या मार्गाने पुढे जात राहतो आणि पुन्हा आपण नवीन बेटांच्या परिसरात जातो . सगळेच आश्चर्यकारक . आपण एक दोन बेटावर जातो. लाइमस्टोनच्या टेकड्या चढतो . आतमध्ये गुहेत जातो आणि निसर्गाच्या चमत्कारांनी तोंडात बोटे घालतो . गुहेमधील प्रकाश किरणांचा खेळ अचंबित करणारा. लाइमस्टोनच्या गुहेत अनेक शिल्पाकृती . आपण बघावी आणि आपल्याला कल्पनेला जे वाटतं ती शिल्पाकृती समोर दिसते . आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेर असा हा खेळ. ३६० डिग्री कोनातून कुठेही पहा . अनेक शिल्पाकृतींचे म्युझियम पाहिल्यासारखे आपण फिरत राहतो.
Magnificent , Gracious and Graceful Country , Towering Limestone Pillars , Tiny  Islets , Emerald Waters of Gulf of Tonkin , Ethereal Beauty , Classic cruise journey  , To see the Wonder of the World ....Wow !!! Wow !!! Worth visiting !  Must visit ! East  is East as good as West !!! My impressions of Ha Long .

Sunday, November 25, 2018

Silicon Valley : जगाला डिजिटल वर्ल्ड बनविणारी अनोखी वसाहत

Silicon Valley म्हंटलं की आपल्याला आठवतं ते गूगल, फेसबूक आणि Apple ह्यांची मुख्य कार्यालये असलेले जगप्रसिद्ध ठिकाण. ह्या Silicon Valley चा  गतइतिहास मोठा मनोरंजक आहे आणि त्यासंबंधी जाणून घ्यायचे असेल तर ज्यांनी तो घडविला आहे त्यांच्याकडून समजून घेणे अधिक चांगले . Adam Fisher ह्या लेखकाने त्या लोकांना बोलते केले आहे . ते काय म्हणाले तेच ‘Valley of Genius'  ह्या पुस्तकांत वाचांवयास मिळते.
संगणक तंत्रज्ञान उदयास कसं आलं ?, कसं वेगाने बदलत गेलं ?, जुन्यातून नवे कसे निर्माण झालं ?, हे  समजून घेतांना आपण आवांक होतो.
आज संगणक , इंटरनेट आणि स्मार्ट  फोन ह्यांनी आपलं सगळं जीवन व्यापून टाकलं असून  एक अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. आपण डिजिटल युगांत जगतो आहोत . आपल्या जगण्यांत वेगाने बदल घडत आहेत. लहान मुलेही ipad घेऊन अभ्यास करतांना किंवा गेम खेळताना दिसत असतात. खरं म्हणजे कॉम्पुटरचा शोध लागल्यानंतर १५-१६ वर्षाच्या शाळकरी मुलांनी कॉम्पुटरचा उपयोग गेम खेळण्यासाठी सुरु केला . ह्या मुलांनीच नवे नवे गेम्स शोधून काढले . त्यांनी बेसिक आणि इतर  भाषेतून असंख्य नवे कॉम्पुटर गेम्स उपलब्ध करून दिले आणि पर्सनल कॉम्पुटरची निर्मिती सुरु झाली . हे सगळं वेगाने घडत गेलं . शाळाकॉलेज सोडून हा Computer Games चा उद्योग करणारी हीच मुले ह्या नव्या डिजिटल क्रांतीला जबाबदार आहेत . हे फार मजेशीर आणि मनोरंजक आहे .
स्टीव्ह जॉब्स म्हणतो , “ लोक शंभर वर्षापूर्वी काय घडलं ? ह्यात फारसे स्वारस्य दाखवीत नसतात . ते गेल्या ४०-५० वर्षात नवीन काय घडतय? ह्यात जास्त स्वारस्य दाखवितत असतात”.
त्याचाच सहकारी स्टीव्ह वोझनिक म्हणतो , “ सिलिकॉन Valley म्हणजे Place of Creativity – इथे लोक स्वप्नरंजन  करतात , त्यातच रमतात आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात घडवून आणतात . त्यासाठीच प्रयत्नशील असलेली ही वेडी माणसे !”.
Jamis MacNiven  म्हणतो , ‘ आजची Silicon Valley ही एकेकाळी सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध होती. ह्या सुवर्णभूमीकडे लोक आकर्षित झाले . सोने शोधायला आले आणि इथेच राहू लागले . अजूनअजुनच्या मागे लागले . सोने संपले आणि नवे काहीतरी शोधू लागले . ‘शोध घेणे’ हा ह्यांचा स्थायीभाव होता’.
Scot Hasan म्हणतो , ‘ अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर नव्याचा शोध घेणारे फार थोडे लोक होते . नव्याची शोध घेणारी भूमी म्हणजे सिलिकॉन Valleyच ’. इथे काय नव्हतं? . रेल रोड , बांधकाम व्यवसाय , विमान निर्मिती करणारे कारखाने , खनीज तेलाच्या विहिरी आणि मोठा व्यापार आणि प्रसिद्ध हॉलीवूड. खरा तंत्रज्ञान विकास येथेच सुरु झाला आणि सर्व जग बदलू लागलं . Lee De Forest ह्या माणसाने Vacuum tube चा शोध लावला आणि इलेक्ट्रोनिक आणि दूरसंचार क्रांती सुरु झाली . हिटलरने vacuum tube तंत्रज्ञान म्युझिकसाठी वापरण्यास सुरुवात केली तो रेडिओचा अधिक वापर करीत होता आणि त्याच काळात म्युझिक इंडस्ट्री विकसित झाली ती ह्या भागातच .
स्टीव्ह जॉब्स म्हणतो ,’ दुसर्या महायुद्धापूर्वी Stanford च्या दोन पद्विधरानी – Bill Hewlett आणि Dave Packard ह्यांनी Hewlett- Packard ही इलेक्ट्रोनिक कंपनी सुरु केली आणि नव्या युगाला खरी सुरुवात झाली’.
Stanford विद्यापीठामुळे ३०-४० नव्या कंपन्या सुरु झाल्या. हे विदयापीठ नव्या युवकांना  खुणावीत होते . ते त्यांना आमंत्रित करीत होते . “ या ! , या ! असे खुणावीत असताना नवे शोध लावा . व्यवसाय उभे करा आणि बाहेरच्या जगांत जावून मोठे  उद्योग उभे करा’, असे आवाहन करीत होते . Stanford University मुळेच येथे नवे उद्योग सुरु झाले .
स्टीव्ह जॉब्स म्हणतो , ‘ १९४८ ला इथे बेल टेलिफोन इंडस्ट्री सुरु झाली आणि एक नवी दिशा मिळाली’.
इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञानात स्विचेस (on-off) करण्याचा प्रगत शोध इथेच लागला .Fast- Faster- Fastest असे बायनरी on-off तंत्रज्ञान इथेच विकसित झाले.
William Shockley इथे जन्मला होता पण तो इथे परत आला आणि त्याने SHOCKLEY LAB सुरु केली . त्याने १५-२० पदार्थवैज्ञानिक/ रसायन शास्त्रज्ञ ह्यांना  संशोधनासाठी आमंत्रित केले आणि नवे संशोधन विश्व उभे केले. फार थोडे लोक असा विचार त्यावेळी करीत असत .
स्टीव्ह जॉब्स म्हणतो , ‘ Hewlett- Packard नंतर फेअरचाइल्ड ही सेमीकंडकटर कंपनी उभारली गेली आणि नव्या युगाची खरी सुरुवात झाली’.
एकातून एक – नवे घडत गेले . Bob Noyce आणि Gordon Moore ह्यांनी फेअरचाइल्ड कंपनी सोडली आणि Intel सुरु केली .  हे असं इथेच घडू शकतं .इथे कामगार कायद्यांचे बंधन नव्हते. तंत्रज्ञ असेच सोडून जात. 
मूर ह्याने दर अठरा महिन्यांनी संगणकाची शक्ती दुप्पट करण्याची क्षमता निर्माण केली . FAST- FASTER- FASTEST ह्याचे वेड लावणारी संगणक यंत्रें तयार होऊ लागली. 
१९६५ नंतर संगणक अधिक शक्तिमान होऊ लागले . त्यांचा आकार लहान होऊ लागला . आजचा स्मार्ट फोन म्हणजे एक शक्तीमान परसनल कॉम्पुटर तुमच्या मुठीत आला आणि तुम्ही खिशात घेऊन फिरू लागला.
मूर म्हणतो, ‘ संगणक आकार लहान होत गेला आणि शक्ती आणि वेग वाढत गेला’. आज तो आपल्या मुठीत असतो आणि आपण जगभर जोडले जातो . 
 स्टीव्ह वोझनिक म्हणतो , ‘ Transister बदलले .नव्या चिप्स आल्या .त्यानंतर मोठ्या चिप्स आल्या आणि त्यामुळेच Silicon Valley वेगाने वाढत गेली . तेथील अर्थशास्त्र बदलत गेलं’,
Alvy Ray Smith म्हणतो , ‘ ह्या नव्या नव्या शोधामुळे Venture capitalists आकर्षित झाले . ते अधिक जोखीम पत्करतात . त्यांना अपयशाची भीती नसते . ते नव्या तंत्रज्ञानात पैसे गुंतवित जातात .ते जुगार खेळतात .ते त्यांत तरबेज असतात’.
Marc Porat मार्क म्हणतो , ‘ हे गुंतवणूक करणारे भांडवलदार म्हणजे एक अजब जमात असते. ते पैसे ओतत जातात आणि वाढ बघत बसतात . जर नवे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर ते अधिक पैसे ओतत्तात .त्यांना हे ही माहित असते की ते यशस्वी झालं नाहीतर त्यातून दुसरे नवे तंत्रज्ञान जन्माला येतेच’.
स्टीव्ह जॉब्स म्हणतो ,’ हे तंत्रज्ञ एक कंपनी सोडून  दुसर्या कंपनीत अगदी सहजपणे जातात किंवा स्वत:ची नवी कंपनी सुरु करतात . एखाद्या फुलातील परागकण वार्यामुळे उडून जमिनीत जाऊन मिसळतात आणि नवी फुलझाडे उगवतात  तसे नव्या कंपन्या सुरु होतांना दिसतात. असे एकातून दुसरे तंत्रज्ञान निर्माण होत राहते’.
एखादा तंत्रज्ञ मोठी कंपनी सोडून  देतो आणि स्वतःची दुसरी कंपनी  टाकतो . नवे यंत्र तयार करतो. तुमच्याकडे संकल्पना (Idea) हवी. बुद्धिमत्ता हवी. नव्याचा ध्यास हवा. जिद्द हवी . असे तंत्रज्ञ हे नवे  उद्योजक असतात , हेच सिलिकॉन Valley चे  कल्चर आहे. नव्याचा ध्यास . निर्मितीचा ध्यास .ठिणगी पडली की नवे काहीतरी घडून येतेच . त्यांना स्पार्क हवा असतो .नवा ध्यास हवा असतो .दुसरे महत्वाचे असे की शार्प माणसेच  शार्प माणसाकडे आकर्षित होतात .त्यातूनच तंत्रज्ञानात नवनिर्मिती होत असते .
गूगल आणि याहूचे जे निर्माते होते त्यांच्याकडे साधी कार नव्हती . पैसे नव्हते . बाईकवर फिरणारी ही तरुण मुले .त्यांच्याकडे असंख्य संकल्पना होत्या. त्यांनी त्यांच्या आयडीयाज व्हेन्चर भांडवलददारांना विकल्या आणि भांडवल उभे करून कंपनी उभी केली . तसे ते कफल्लक होते पण बुद्धीच्याच जोरावरच मोठे झाले .
तंत्रज्ञ ही जमात अशी असते की त्यांच्या जवळ विलक्षण प्रतिभा असते . ते तसे जादुगार असतात .ते देवदूतासारखे असतात . त्यांना अर्थसहाय्य मिळालेकी ते एक नवे विश्व उभे करतात.
स्टीव्ह जॉब्स म्हणतो ,’ १९७०-८० च्या काळांत संगणक क्षेत्रात जी मंडळी आली ती प्रतिभावान मंडळी होती. त्यांत कवी , लेखक , संगीतकार ह्या क्षेत्रातील खूप माणसे होती. ती मंडळी नाईलाजाने इकडे आली असतील. पण ह्या क्षेत्रात  त्यांनी उत्तुंग काम करून दाखविले .त्यांच्यात एक चैतन्य होते . ती नव्या युगाची  सुरुवात होती. त्यांनी एक नवी संस्कृती उदयास  आणली. त्यांच्यात विलक्षण उत्साह होता . नवेपणा होता आणि एक धुंदी होती’.
Stanford आणि Berkley ह्या विद्यापीठांचे वातावरण तरुणांना मोहित करणारे होते. “ I am giving power to people” , असं स्टीव्ह जॉब्स म्हणत असे.
पदार्थविज्ञान शास्त्रातील नव्या नव्या शोधामुळे रोज नवे तंत्रज्ञान उदयास येत होते. डिजिटल क्रांतीमुळे जग लहान होत होते . वेगाने बदलत होते .CONNECT PEOPLE हा नव्या तंत्रज्ञानाचा संदेश होता . गूगलने जग बदलून टाकले .ब्लॉगच्या शोधामुळे ट्विटर आणि फेसबुकचा जन्म झाला .तरुन्नांच्या जगण्यात एक मजा ( FUN ) निर्माण झाली .फोन संगणक झाला . तुम्ही जगाशी कनेक्ट झाला . तुम्ही स्मार्ट झाला .कलात्मक संकल्पना तंत्रज्ञानात आल्या .भावभावनांचा चेहरा स्क्रीनवर दिसू लागला . स्मार्ट  फोन तुमचा एक आवश्यक असा एक भाग होऊन बसला .
स्टीव्ह जॉब्स सारखी क्रेझी माणसं कलात्मक मनोवृत्तीची असल्यामुळे विज्ञानांत काव्य निर्माण झालं .गूगलच्या पेज आणि ब्रिन ह्यांनी डिजिटल क्रांती आणून आपल्या सर्वांचे जगणेच  बदलून टाकले .
स्टीव्ह जॉब्स म्हणतो ,’ विचारवंत आणि कृतीशील माणसेच नवनिर्मिती करू शकतात . कृतीशील माणसे ( Doers ) हे खरे निर्मिती करणारे असतात . हे सारे लिओ नारडो द व्हिन्ची सारखे असतात . ते नुसते कलावंत नसतात तर एकाच वेळी अनेक शास्त्रांना कवेत घेतात . द व्हिन्ची नुसता कलावंत नव्हता तर तो रसायनतंज्ञ आणि बरेच काही होता . Arts, Science, Engineering, Technology , Thinking, Skills, and doing makes a new World. हे लक्षात ठेवले पाहिजे .
अर्धवट शाळाकॉलेज सोडून नवे काहीतरी करून दाखविणारी ही त्यावेळची पिढी – गूगल / फेसबूक अशा 'कनेक्ट द वर्ल्ड' ह्या  कंपन्या उभ्या करीत होती आणि डिजिटल क्रांती करून  दाखवित होती हे एक आश्चर्यच! असे हे नव्या युगाचे ... नव्या मनुचे ... नव्या दमाचे ....तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ . 



Thursday, November 22, 2018

Apple चा मनोरंजक इतिहास



Steve Jobs: एस्किमोलाही फ्रिज विकणारा विक्रेता !

स्टीव्ह वोझनीक आणि स्टीव्ह जॉब्स दोघेही Apple चे  निर्माते. वोझनीक म्हणतो , ‘ Apple संबंधी लोकांना थोडीच माहिती आहे. मी आणि जॉब्स ह्यांनी Apple उभी केली हे तेवढे खरे नाही ‘.
अल अलकॉर्न म्हणतो, ‘ आम्ही त्यांना सुरुवातीला खरी मदत केली. त्यांना ६५०२ हा   मायक्रोप्रोसेसर हवा होता. १८ - १९ वर्षाचे जॉब्स आणि वोझनीक  ह्यांच्याकडे काहीच पैसे नव्हते. त्यांच्याजवळ क्रेडिट कार्ड नव्हते. बँक अकाउंट नव्हते. ट्रेड अकाउंट नव्हते. ते अल कडे आले आणि म्हणाले , ‘ आम्ही हायस्कुल किड आहोत. आम्हाला धंदा उभा करायचा आहे’ . अल म्हणाला , ‘मी माझ्या मित्रांशी बोलेन. थोडे भांडवल मिळवुन देईन. तुमच्याबद्दल बोलेन’. अल त्याच्या मित्राशी बोलला . तो मित्र म्हणाला, ‘ दोन्ही स्टीव्ह आम्हाला भेटले , त्यांना आमच्याकडून पार्टस पाहिजे होते . त्यांचे ट्रेड अकाउंट नव्हते. बँक अकाउंट नव्हते. आमच्याशी जॉब्स किंमत कशी कमी करायला पाहिजे ह्याच्याच गप्पा मारीत होता. कोणाचीही गॅरंटी देत  नव्हता.अशा माणसाला पार्टस कसे देणार? ,वोझनीक जॉब्सला समजावून सांगत होता. पण जॉब्स किंमत कमी करण्याच्या गप्पा मारीत होता. जॉब्स वोझचे तोंड गप्प करण्याचाच प्रयत्न करीत होता. टेबलाखाली जॉब्स वोझनीकचे पाय दाबून खुणा करीत होता. ह्या खटपटीत बारका असलेला जॉब्स टेबलाखाली पडला . त्याला शेवटी ओढून काढावे लागले . शेवटी अलकॉर्नने त्यांच्याशी ९० दिवसाची मुदत असलेला करार करायचे ठरविले .
त्यांचे ९० दिवस असलेले क्रेडिट अकाउंट काढून दिले खरे. वोझनीक पुढे सांगतो , ‘ आम्हाला एक एंजेल भेटला . नशीब आमचे . तो आमच्यासाठी देवदूत निघाला . तो आमच्यावर खूष होता, आमच्या धंद्यात पैसे घालण्यास तयार झाला . तो गृहस्थ तरुण आणि खूप श्रीमंत होता. त्याचे नांव माईक मारकुला .
मारकुला म्हणतो, ‘ जॉब्स आणि  वोझनीक मला भेटले खरे. त्यांचे व्यक्तिमत्व मला विशेष वाटले नाही. दाढीचे खुंट वाढविलेली ती दोन तरुण शाळकरी दिसणारी मुले . अंगाला कसला तरी  वास येणारी.गंमतीदार कपडे घालणारी . हिप्पी वाटणारी’. माइकने त्याचा मित्र आर्थर रॉकला विचारले , ‘ तू Apple मध्ये पैसे घालायला तयार आहेस का ? रॉकला त्यात काही स्वारस्य नव्हते. त्याचे कारण म्हणजे त्या दोघांनी ब्लुबॉक्स नावाचे एक यंत्र तयार करून पैसे चोरणारी खोटी टेलिफोन कंपनी चालविण्याचा उद्योग केला होता. ते त्याला मुळीच आवडले नव्हते.
मार्कला मात्र वोझनीकचे कॉम्पुटर डिझाईन खूप आवडले होते.
अलकॉर्न म्हणतो, ‘ १८ - २० वर्षाची तरुण पोरं ! त्या मुलांना धंदा काय जमणार ? , त्यांना साधे ड्रिंक कसे घेतात ?, हे माहित नाही! कसली कम्पनी सुरु करणार ? वेडी मुले!
आणि माईक मारकुला ह्याने जॉब्स आणि वोझनीक ह्यांच्या कंपनीत पैसे ओतले आणि १९७७ साली Apple  सुरु झाली . वेस्ट कोस्टच्या प्रदर्शनात त्यांनी Apple कॉम्पुटर दाखविला आणि ते नावारूपाला आले. अशी ही धडपडणारी मुले. त्यांना भांडवल पुरवणारा माईक मारकुला. स्टीव्ह  वोझनीक खरा निर्माता तर जॉब्स हा एस्किमोलाही फ्रिज विकणारा विक्रेता!
( Reference: Valley of Genius by Adam Fisher )

Monday, October 29, 2018

पेज आणि ब्रिन – GOOGLE चे निर्माते



दहा वर्षापुर्वीची गोष्ट आहे.  इंटरनेटचे दिवस सुरु झाले होते . आयटी सिटी बंगलोरला मुलीकडे होतो. संध्याकाळची वेळ होती. रात्री जेवायला बाहेर जायचा विचार होता . कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे ह्यावर आम्ही बोलत होतो . कोणत्या  हॉटेलमध्ये जायचे आणि कुठे जेवायचे टेबल बुकिंग करायचे ? , हा विषय चालला होता . शेजारी ६-७ वर्षाचा नातू बसला होता. तो त्याच्या बाबांना पटकन म्हणाला , “ बाबा , गूगल कर . हॉटेल शोधून काढ ,फोन नंबर मिळव आणि टेबल बुक कर”. “ गुगल कर” असा सल्ला देणारा तो लहान मुलगा नव्या युगाचा खरा प्रतिनिधी . कुठे काय शोधायचे , हे त्याला त्या वयात गणकयंत्राची फारशी ओळख नसतानाही ऐकून माहित झाले होते . मी थोडासा आश्चर्यचकितच झालो. तसा मी अनेक वर्षे संगणकाशी संबंधित आहे. जग वेगाने बदलत आहे . संगणक आकाराने लहान होतहोत स्मार्टफोनमध्ये सामावले असून त्यांचा वेग वाढत आहे.

Larry Page & Sergey Brin
Adam Fisher “ह्याचे व्ह्याली ऑफ जीनियस” हे पुस्तक वाचतो आहे . त्यांत The Shape of Internet ह्या भागात Larry Page आणि Sergey Brin ह्या Stanford विद्यापीठातील दोन मुलांच्या गंमतीजमती वाचत होतो . हेच ते गूगल चे शिल्पकार . विद्यापीठात प्रवेश घेतला खरा पण त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या . डोक्यात भन्नाट कल्पना . त्यांना कॉम्पुटर सायन्स मध्ये Ph.D. करावयाचे होते . त्यांना इंटरनेटवर काही विकायचे नव्हते , विकत घ्यायचे नव्हते . त्यांना इंटरनेटवर ब्लॉग लिहायचा नव्हता किंवा कसलेही लिखाण करावयाचे नव्हते . त्यांना पीएच.डी. साठी संशोधन करावयाचे होते. त्यासाठी नवे शोधून काढणे आवश्यक होते . त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी गणकयंत्र आणि इंटरनेट ह्याचा वापर करणे आवश्यक होते . ब्रिनला Data मायनिंग करणे आवडत असे. त्या दोघांनी गणकयंत्रावर माहिती जमविणे सुरु केले. त्यावेळी माहिती मिळविणे आजच्यासारखे सोपे नव्हते. हजारो पाने उघडूनही पाहिजे ती माहिती मिळवणे खूपच त्रासदायक होते . तसा तो वैतागच होता . ब्रिनला वाटले की ही माहिती मिळवताना जो प्रोग्राम आहे त्यात गणिती सूत्र वापरले तर नेमकी माहिती मिळविणे सहज सोपे होईल. त्या दोघांनी रात्रंदिवस गणकयंत्राशी झगडून एक प्रणाली तयार केली. आणि त्याच प्रणालीचे आजचे रूप म्हणजे "गुगल". त्यांनी इंटरनेटला तर्कशास्त्रीय , उपयुक्त आणि माहिती शोधक यंत्र बनविले . आज माझा ६-७ वर्षाचा नातू मला माहितीशोधक यंत्र ( गुगल ) वापरून टेबल बुक करा असा सल्ला देतोय.
Larry आणि ब्रिन बद्दल त्यांचे मित्र आणि सहकारी अनेक गंमतीजमती सांगतात. ही मुले Stanford पीएच.डी.शिक्षणासाठी आली . त्यांना पीएच.डी साठी पूर्व परीक्षा देणे आवश्यक होते . ती परीक्षा खूप अवघड असते . दहा परीक्षा उतीर्ण व्हाव्या लागतात . अनेकजण बर्याचवेळा २-३ दा नापास होतात . त्यात २-३ वर्षे जातात. ब्रिन हा अतिशय हुशार मुलगा . पहिल्याच झटक्यात तो सर्व पेपर मध्ये पास झाला . असा हा अतिशय बुध्दिमान . Larry ला तेवढे चांगले यश मिळाले नव्हते . त्याचा कल ऑटोमेशन आणि नव्या कारच्या डिझाईनमध्ये होता .
ब्रिन हा खूप गप्पिष्ट आणि सर्वांशी मैत्री करणारा तर पेज हा खूप कमी बोलणारा – घुमा . दोघेही भिन्न स्वभावाचे . पेजला आपल्याला काय करायचे हे निश्चितपणे माहित होते . १९९५ मध्ये पेजला अत्यंत आधुनिक अशी स्वयंचलित कार तयार करावयाची होती. आजही त्याचे स्वप्न अंतराळात लिफ्टने कसे जाता येईल असे आहे .
Stanford मध्ये अनेक संशोधन प्रकल्प चालू असतात . विद्यार्थी त्यांना आवडलेल्या प्रकल्पात भाग घेतात . ते दोघे 'डिजिटल लायब्ररी' ह्या प्रकल्पात सामील झाले . On Line Information कशी शोधायची ह्यावर काम चालू होते . त्यासाठी तेंव्हा पैसे द्यावे लागत असत . अचूक माहितीसाठी खूप जास्त पैसे द्यावे लागत असत . ब्रिन आणि पेज ह्यांना हे काम आवडू लागलं . ब्रिनला data mining ह्या विषयाची आवड होती तर पेजला वेब पेज शोधणे आणि संशोधनासाठी त्याचा क्रमवार अभ्यास करणे आवडू लागले . पेज २३ वर्षाचा असेल . एके दिवशी पेजला स्वप्न पडले. त्याने सर्व वेब पेज डाऊनलोड केले आणि केवळ त्या पेजच्या लिंक तेवढ्या नोंद करून ठेवल्या . लिंक उघडली की पाहिजे ती माहिती उपलब्ध होईल , असे त्याला वाटले . हे एका स्वप्नात . तो कामाला लागला . वेब मध्ये मागे आणि पुढे कसे जाता येईल हे त्याला करून बघावयाचे होते. त्याचे विचारचक्र सुरु झाले. ब्रिनला माहिती जमविणे आणि त्याचा कसा उपयोग करता येईल ह्याची अधिक आवड होती. पेजने त्याच्या मार्गदर्शक शिक्षकाला आपण सर्व वेबपेज ८ दिवसात लोड करून दाखवितो, असे सांगितले. मार्गदर्शक त्याला म्हणाला , 'करून बघ' . त्याला माहित होते की हे काम ८-१० दिवसांत होणे शक्य नाही. तो मनांतल्या मनांत हसला . पेजने त्यासाठी Web Crawler हा प्रोग्राम लिहिला . संपूर्ण वेब डाउनलोड करणे अवघड होते कारण संगणकाच्या मेमरीची क्षमताच तेव्हढी नव्हती. त्यासाठी किती संगणक लागतील? , त्यांना कसे जोडता येईल ?, पाहिजे ती माहिती पाहिजे त्या संगणकाकडून कशी मिळवता येईल ?, त्यासाठी किती वेळ थांबावे लागेल ?, कळ दाबली की माहिती कशी समोर दिसेल ?, असे अनेक प्रश्न होते . ते महाकठीण काम होते . स्कॉट हसन हा पेजच्या कामात मदत करू लागला . पेजने जावा ह्या भाषेत प्रोग्राम लिहिला होता हसनला लिनक्स अधिक चांगली अवगत होती.  हे सर्व काम पीएच. डी. च्या संशोधनात बसत नव्हते . त्यात ओरिजिनल रिसर्च नव्हते . त्यांच्या हे लक्षांत आले की जावा किंवा लिनक्स मध्ये एव्हढी माहिती जमा करणे शक्य नाही . त्यासाठी त्यांनी पायथोन ह्या संगणकीय भाषेचा वापर करण्याचा विचार केला . १९९६ च्या शेवटी हसनने नवीन Web Crawler लिहून  काढले १५० लाख वेबपेज डाऊनलोड करणे त्यांना शक्य झाले . वेबवर मागे – पुढे पाहिजे त्या पेजवर जाणे शक्य झाले . पेजच्या लक्षांत आले की आपण एक सर्च इंजिन तयार करू शकतो. त्यावेळी अनेक सर्च इंजिन बाजारात होते .पण ते वेगवेगळ्या विषयांचे होते . वैद्यकीय विषयाचे  वेगळे , अभियांत्रिकी विषयाचे वेगळे . त्यांना एकत्र कसे जोडणार ? त्यासाठी ते लोक कसे तयार होणार ? अनेक प्रश्नांचा गुंता होता .त्यावेळी Alta Vista ह्या नावांचे एक वेगवान सर्च इंजिन होते . हे सर्व डिग्री मिळवण्यासाठी उपयुक्त नव्हते . ह्या संबंधी इतर काही लोकांनी आधीच काम करून ठेवले होते . नवे शोधणे आवश्यक होते . त्यामुळे पदवीही मिळणार नव्हती. Web Crawler हा काही गुगलचा शोध नाही . त्यांनी नंतर PageRank शोधून काढले आणि त्यामुळे गुगलची वेगाने वाढ झाली. पेजचे लक्ष होते “ Random Surf” . ब्रिनला पेजची कल्पना आवडली आणि त्यासाठी आवश्यक असलेले गणित ( Eigenvector of a matrix ) वापरून सिस्टीम तयार केली. त्यातून PageRank हा प्रोग्राम तयार झाला . ब्रिनला चार गिगाबाईटचा गणकयंत्र पाहिजे होता . त्यांच्या विद्यापीठात ग्राफिक Lab मध्ये असा गणकयंत्र होता. पेजला त्या गणकयंत्रावर काम करण्याची परवानगी होती. त्यावर त्यांनी PageRank हा प्रोग्राम चालविण्याचा प्रयत्न केला .BackRub हे सर्च इंजिन ही चालवून बघितले .मग नवे  अधिक शक्तिमान सर्च इंजिन बनविण्याचे ठरविले .त्यात अनेक अडचणी आल्या .हसन आणि ब्रिन ह्यांनी ८ आठवड्यात नवे सर्च इंजिन बनविले . त्यावेळी अनेक सर्च इंजिन होते आणि त्यांच्याशी जोडणे ह्या मंडळीना जमले .काही नवे प्रश्न निर्माण झाले . बाकीच्या सर्च इंजिनचे लायसन्स असणे आवश्यक होते. पेजला पीएच .डी पूर्ण करणे अधिक महत्वाचे वाटत होते . ही मंडळी व्हेन्चर कॅपिटल कसे मिळेल ह्याचा विचार करू लागले . माहिती शोधून काढणे म्हणजे १२० इतर सेवा पुरवन्यासारखी एक सेवा असा लोकांचा दृष्टीकोण होता ,१९९७ साल  उजाडले . त्यांनी विद्यापीठातील सर्वं SUN , IBM , Number of PCs जमा केले आणि त्यांचे प्रोग्राम  चालविले. त्यामुळे  विद्यापीठातील सर्व गणकयंत्रे बंद पडली. आणि विद्यापीठाने त्या सर्वाना चांगल्या पद्धतीने विदयापीठ सोडून जाण्यास सांगितले .  गंमत म्हणजे जर तुम्हाला पीएच.डी. करावयाचे असेल तेंव्हा विद्यापीठात अवश्य या असे ही सांगितले . असे हे आगळे विदयापीठ.
त्यांना नवा उत्साह होताच . प्रकल्पाला पैसे कसे उभे करायचे ? , हा मुख्य प्रश्न होता . David Cheriton ह्या त्यांच्या सहकार्याने Andy Bechtolsheim ह्या पैसे गुंतवणार्या व्यक्तीची त्यांच्याशी ओळख करून दिली. पेज आणि ब्रिन इतर सहकार्याबरोबर त्याला भेटायला गेले. Andy ह्यांनी पहिला प्रश्न केला , “ तुम्ही ह्यातून पैसे कसे मिळवणार ?” . त्यांनी ते पैसे कसे मिळवणार ह्याचे तोडकेमोडके उत्तर दिले . Andy ह्यांना त्यात व्यवसाय आहे असे वाटले नाही. मिटिंग संपली . ते उठून जाण्यास निघाले . Andy उठले .त्यांनी कपाटातले चेकबुक काढले . एक चेक लिहिला . त्यांनी ब्रिनला हंड्रेड थाऊजंड डॉलरचा एक चेक दिला . हे सर्व नाट्यमय होते . चेकवर लिहिले होते “ Google Inc.”. ही कंपनी त्यावेळी अस्तित्वात नव्हती. आणि तोच मोठा प्रश्न ब्रिन आणि पेज समोर उभा होता .त्यांची कंपनी नव्हती. कसलीही यंत्रणा उभी नव्हती. जागा नव्हती. गणकयंत्रे नव्हती. त्यांच्याकडे काहीही नव्हते . फक्त आयडिया होती. त्या आयडियावर आधारित प्रकल्प होता .त्यांना पैसे गुंतवणारा  मिळाला आणि त्यांनी GOOGLE INC ही  कंपनी सुरु केली .
अशी ही बुद्धीवान माणसे – Larry Page / Sergey Brin  . असा हा व्हेन्चर भांडवल देणारा - Andy Bechtolsheim . अशी ही जिनिअस माणसे . असे गुंतवणूक करणारा लक्षाधीश . 

Reference: Valley of Genius, “ The Shape of the Internet” , Adam Fisher Pg 268-282 , Hachette Book Group, NY 10104 ( 2018)
Photo credit : Google Image