बळवंत मोफत वाचनालय
 |
१९७४ साली ही नवी इमारत उभी राहिली. मी १९५८ ते १९६८ पर्यंत येथे नियमित येत असे . |
औरंगाबादच्या जुन्या आठवणीत मला नेहमी आठवण होते ती बळवंत मोफत वाचनालयाची. १९२० साली लोकमान्यांच्या स्मरणार्थ सुरु झालेले हे वाचनालय. माझ्या शाळकरी जीवनात मी संध्याकाळचा रोजचा दीडदोन तास वेळ ह्या वाचनालयात घालविला आहे. औरंगपुर्यातून खडकेश्वरकडे जाताना हे वाचनालय लागत असे. मी ५वी - ६ वीत होतो. वर्तमानपत्र घरी येत नस , वडिलांना तुटपुंजा पगारामुळे वर्तमानपत्र घेणे परवडत नव्हते. मला खेळापेक्षा वाचनाची अधिक आवड होती. हे मोफत वाचनालय होते. मराठी आणि इंग्रजी दोन्ही वर्तमानपत्रे तेथे येत असत. उभे राहून Stand वर ठेवलेले वर्तमानपत्र वाचावे लागत असे. काही वर्तमानपत्र वाचण्यासाठी लोकांची रांग लागत असे. त्यावेळी माझे दुसरे वर्तमानपत्र चाळून होत असत. केसरी - मराठा - लोकसत्ता ह्यासाठी वाचक नंबर लावत असत. इंग्रजीमध्ये टाइम्स लोकप्रिय होताच. नोकरीसाठी जाहिराती बघण्यासाठी तरुण मुले आवर्जून हे वर्तमानपत्र वाचत असत. आमच्या इंग्रजी शिक्षकाने रोज इंग्रजी वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचत जा, असा सल्ला दिला होता. त्यामुळे तुमचे इंग्रजी सुधारेल असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रजीतील अग्रलेख वाचून त्यावेळी फारसे कळत नसे. मराठी माध्यमाच्या मुलांना काय कळणार तो इंग्रजी भाषेतील अग्रलेख ?
मला त्यावेळी आचार्य अत्रे ह्यांचा 'मराठा' आणि 'नवयुग' हे दोन्हीही खूप आवडत असे . त्यानंतर ह रा महाजनी ह्यांचा 'लोकसत्ता' आवडत असे . 'सकाळ' आणि 'केसरी' ही वाचत असे . अधूनमधून पुण्याचा 'सह्याद्री'. आमच्या अनंतराव भालेराव ह्यांचा 'मराठवाडा' वाचूनच आम्ही मोठे झालो. आचार्य अत्रे ह्यांचा मराठा वाचल्याशिवाय मात्र चैन पडत नसे. अत्रे -फडके, अत्रे - खांडेकर, अत्रे - प्रबोधनकार, हे सगळे वाद आजही स्मरतात. नुसती धमाल. अत्रे ओरबाडून काढीत असत. त्यांची भाषा शैली तुफान होती. मी ते सारे लेख ह्याच वाचनालयात उभे राहून वाचले होते . त्यावेळी पंडित नेहरू आमचे आराध्य दैवत होते . ते गेले तेंव्हा आचार्य अत्रे ह्यांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख आजही आठवतात. सावरकर गेले तेंव्हा अत्र्यांनी लिहिलेला लेख आजही आठवतो. मी मुंबईला पहिल्यांदा शिवाजी पार्कला गेलो तेंव्हा सावरकर सदन बघितले ते अत्र्यांनी त्याबद्दल लिहिले होते ते आठवले म्हणून. त्यावेळी अत्र्यांचा 'नवयुग' अधिक आवडत असे. नंतर 'मार्मिक' मधील व्यंगचित्रे बघू लागलो. अत्रे - ठाकरे वादाने फार गचाळ वळण घेतले होते. ते फारसे आवडत नसे. ह रा महाजनी ह्यांची 'रविवारची चिंतनिका' आवडत असे. महाराष्ट्र टाइम्स सुरु झाला आणि पहिल्या दिवसापासून तो घरी येऊ लागला. कित्येक वर्ष आणि आजही मी 'मटा'चा वाचक आहे . 'काय सांगू तुम्हाला' हे द्वा.भ .कर्णिकांचे सदर हे माझे त्यावेळचे आवडते सदर. विजय तेंडुलकरांची 'कोवळी उन्हे' हे माझे दुसरे आवडते सदर. परुळेकरांचा 'सकाळ' म्हणजे खरे बातमी पत्र. त्यात बातमी ही 'बातमी' असे . तिखटमीठ लावून बातम्या छापत नसत. आज तशा बातमीपत्राची विशेष गरज आहे असे वाटते. आज आपला पत्रकार किंवा बातमीदार ह्यांच्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही. विकाऊ पत्रकारिता आणि टेबल न्यूजमुळे वर्तमानपत्रे वाचणे मी जवळजवळ सोडून दिले आहे. केवळ ५-१० मिनिटे वर्तमानपत्र चाळत असतो.
आज ह्या वाचनालयास खूप वर्षाने भेट दिली. वाचनालयाचे सगळे रूपच बदललेले दिसून आले. छान इमारत उभी आहे. १९७१ सालीच बांधलेली आहे. खरोखरच सुंदर इमारत. बसण्याची छान व्यवस्था आहे. तसे वर्तमानपत्रे वाचणे मोफतच आहे. वाचकांची चांगली सोय झाली आहे. स्टाफ चांगले स्वागत करतो.
स्टाफच्या परवानगीने मी ह्या वाचनालयाचे काही फोटो घेतले. ते फोटो खाली देत आहे. बदललेल्या औरंगाबादेत हे एक सुरेख वाचनालय आहे . माझे आयुष्य ह्या वाचनालयाने बदलले. त्यामुळे मी विविध विषयावर वाचू लागलो . माझ्यात वाचण्याची आवड निर्माण झाली आणि माझे आयुष्य समृद्ध झाले. असेहे बळवंत मोफत वाचनालय १९२0 साली सुरु झाले होते. औरंगाबादच्या वाचन संस्कृतीचा हा एक भाग.
 |
बळवंत मोफत वाचनालय, औरंगाबाद |
 |
वाचकांची बसण्याची सुरेख व्यवस्था |
 |
वाचनालयाचा दर्शनी भाग |
 |
आम्ही उभे राहून वाचत होतो. आज अशी सुंदर आसन व्यवस्था आहे . |
ह्या वाचनालयाला भेट दिल्यानंतर खडकेश्वरकडे चालू लागलो. न्यु मिडल स्कूलच्या इमारतीनंतर बाळकृष्ण महाराजांचे मंदिर लागले. बाहेरून ओळखलेच नाही, समोर दोनमजली इमारत उभी आहे. मंदिर मागे आहे. ते शोधत मुख्य गेटमधून मागच्या बाजूस गेलो आणि ते समाधी स्थळ दिसले. मी लहान असताना वडिलांच्या बरोबर येथे आलो होतो. वडिलांची खूप श्रद्धा होती. ते रोज येथे येत असत. आज त्यांची आठवण झाली. ते बरोबर नव्हते: पण मी त्यांच्या आठवणीमुळे ह्या समाधीचे दर्शन घेतले . एकेकाळी फार सुंदर , शांत आणि टुमदार असे हे मंदिर होते . आज दर्शनी भागात दुकाने आहेत . मंदिराची फारशी देखभाल होत नाही असे दिसते .
गुलमंडीकडून खडकेश्वरकडे जाताना अनेक देवळे लागतात. सरस्वती भुवनकडे जाताना नाथांचे देऊळ लागते. एकनाथ महाराज औरंगाबादेत असत तेंव्हा ते त्यांचे घर होते. त्या नाथ मंदिरात मी लहान असताना अनेक किर्तने ऐकली आहेत. सिन्नरकर महाराज, पाचलेगांवकर महाराज , कीर्तनकार आफळे ही नांवे आठवतात. किर्तन हा प्रकार मनोरंजक आहे. भाषावृद्धीसाठी खूप छान आहे. गोष्ट कशी रंगवावी हे त्यातून समजते. संत वांग्मयाची छान ओळख होते. अभंगाची गोडी लागते.
औरंगपुर्यात एकानंतर एक देवळे आहेत. दत्तमंदिर , नाथ मंदिर , ओंकारेश्वर , नागेश्वर , बाळकृष्ण महाराज समाधी आणि खडकेश्वर. ग्रामदैवत सुपारी मारुती.
 |
बाळकृष्ण
महाराज समाधी स्थळ
|
बाळकृष्ण महाराज समाधी दर्शनानंतर पुढे चालू लागलो. नागेश्वर मंदिर दिसले. समोरचा भाग वेगळाच वाटत होता .तसाच पुढे चालत गेलो. समोर खडकेश्वर मंदिर दिसले. दुरूनच फोटो घेतला. ह्या मंदिराचे तसे खूप महत्व . ह्या मंदिराजवळ एक मोठी विहीर होती.आजही असेल. औरंगाबाद शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन ह्या विहिरीत होत असे. मिरवणुकीने सर्व गणपती येथे येत. त्यांची सामुदायिक आरती होत असे आणि त्यानंतर विसर्जन होत असे. मी तो सोहळा अनेक वर्षे पाहीला होता त्याची आठवण झाली. आज मंदिर नवे दिसते आहे. प्रत्यक्ष मंदिरात गेलो नाही.
मंदिरांच्या बाजूला एकनाथ संशोधन मंदिर आहे. मराठवाड्यातील इतिहास संशोधक येथे काम करीत असत . न शे पोहनेरकर ह्यांचा ह्या संस्थेशी जवळचा संबंध होता. आज ही इमारत जुनीच दिसते . ह्या संस्थेने इतिहास संशोधनाचे महत्वपूर्ण काम केले आहे.
 |
खडकेश्वर मंदिर |
 |
एकनाथ संशोधन मंदिर |
No comments:
Post a Comment