Wednesday, March 13, 2019

कुंभमेळा आणि स्वच्छता अभियान

कुंभमेळा आणि स्वच्छता अभियान
मला कुंभमेळा असो की खूप गर्दी जेथे होते व तेथील  देवाचे दर्शनही नीट होत नाही अशी  देऊळे ह्याबद्दल फारसे आकर्षण वाटत नाही. तिरुपती असो की पंढरपूर, तेथील रांगेत उभे राहून दर्शन घेणे महाकठीण. दोनतीनदा गेलो आहे ह्या देवळात. आतां जाईलच असे नाही. अजून काशी विश्वेश्वराला गेलो नाही. हृषिकेशला गेलो ते हिमालयात जातांना दिसणारी गंगा पाहण्यासाठी. त्यावेळी गंगा आरती हा प्रकार फार आवडला. पंचमहाभूतांची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आणि निसर्ग म्हणजेच देव. मूर्ती ही देवाचे  प्रतीक असते.
ह्यावर्षीचा कुंभमेळा खूप गाजलाय. २१ कोटी लोक ह्या मेळ्याला जाऊन आले. जे लोक प्रत्यक्ष जाऊन आले त्यांनी जी रसभरीत वर्णने केली ती ऐकून मी खरोखरच आश्चर्यचकित झालो.
माझा मुंबईत स्थायिक झालेला युपीचा एक मित्र आहे. त्याने कुंभमेळ्याचे जे वर्णन केले आहे ते कितपत खरे आहे, असे मला वाटत होते. काल माझ्या बायकोची एक  मैत्रीण भेटली. ती जाहिरात क्षेत्राशी संबंधित आहे. काही कामानिमित्त ती यूपीत गेली होती. तिला वाटलं, आलो आहोत तर जाऊन बघावे कुंभमेळा. ती एकटीच रेल्वेने अलाहाबादकडे निघाली. आपण एकटीच आहोत. एव्हढी प्रचंड गर्दी. बरोबर ओळखीचे कोणीही नाही. ह्या बद्दल थोडीशी चिंतीत होती. तरीही  ती  निघाली. तिला रेल्वेत एक कुटुंब भेटले. गप्पा झाल्या. कुटुंब प्रमुख म्हणाला, 'एकट्याच आहात. काही काळजी करू नका. आमच्या बरोबरच चला. आम्ही जेथे रहाणार आहोत तेथेच आमच्याबरोबर रहा. आमच्याबरोबरच वाहनातून प्रवास करा'. प्रवासात असे सहप्रवासी कुटुंब मिळाले. ती त्यांच्याबरोबरच राहिली. ते गंगा दर्शनासाठी निघाले. तिला त्यांच्या वाहनात जागा नसल्यामुळे ती त्यांना म्हणाली, 'तुम्ही जा, मी दुसरे वाहन करून येते. काळजी करू नका'. तिने दुसरे वाहन केले. थोड्या अंतरावर तिची  रिक्षा थांबली. रिक्षेवाल्याने विचारले, 'दोघांना बरोबर घेऊ कां?' .तिला शंका वाटली. एक व्यक्ती अपंग होती. तिने परवानगी दिली. रिक्षा गंगेकडे निघाली. एक थांबा आला. सर्व वाहने तेथेच थांबली आणि लोक वाहनातून उतरून गंगेकडे चालू लागले. एक पोलीस त्यांच्या रिक्षेजवळ आला. त्याने त्या अपंग व्यक्तीला पाहिले आणि तो रिक्षेवाल्याला म्हणाला, 'पुढे जा. जितके गंगेजवळ जाता येईल तितक्या अंतरावर जा आणि ह्यांना तेथे सोडून येथेच परत घेऊन ये'. ते  सर्वजण अगदी गंगे जवळ गेले. आणि  ती आश्चर्यचकित झाली. सर्वत्र स्वच्छता पाहून ती आवाक झाली. आजूबाजूला खूप गर्दी. लोक गंगेतील स्वच्छ पाण्यात डुबकी घेत होते. तिनेही गंगेच्या पाण्यात डुबकी घेतली. आजूबाजूला कपडे बदलण्यासाठी सोयी सुविधा होत्या. स्नानगृहे होती. स्वच्छतागृहे होती. स्वच्छता कर्मचारी स्वच्छता राखीत होते. लोकही स्वच्छता पाळीत होते. तिला सगळेच आश्चर्यकारक वाटले.
हा तिचा - एका मुंबईच्या स्त्रीचा - प्रत्यक्ष अनुभव ऐकून मी मात्र  चाट पडलो.
योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारने हे जे काम करून दाखविले आहे,  ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. लोकांच्या कांही  श्रद्धा असतात. त्यासाठी लोक अशी गर्दी करतात. गर्दी म्हणजे अस्वच्छता. गर्दी म्हणजे  गैरसोयी. एक सरकार अशी नवी यंत्रणा उभी करते. लोकांच्यासाठी सोयीसवलती उभी करते. सर्व परिसर आणि नदीचे पात्र स्वच्छ ठेवते. हे उल्लेखनीय काम आहे.
आजूबाजूला कच्छसारखे टेन्ट सिटी उभारले आहे, असेही वाचले होते. तशी एका प्रवास कंपनीची जाहिरात ही  वाचली होती. हे प्रत्यक्षात उभे केलेले त्या मैत्रिणीने पाहिले आणि आम्हाला सर्व वर्णन करून सांगितले. अश्रध्द व्यक्ती सुध्दा ह्या कामामुळे चाट पडतात.
मोदी आणि आदित्यनाथ ह्यांच्या टीकाकारांनी ह्या त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे.
बदल रहा है| भारत बदल रहा है|

No comments:

Post a Comment