Thursday, May 31, 2018

माणसं: विजय तरवडे


आपल्या आयुष्यात भली-बुरी माणसे येतात , चांगली- वाईट भूमिका पार पडतात आणि भूमिका संपली की विंगेत जातात . आपण वाईट लोकांना हाकलू शकत नाहीत नि चांगल्या लोकांना थांबवू शकत नाही.” हाच माणसाकडे बघण्याचा विजय तरवडे ह्यांचा दृष्टीकोण .
अशीच विविध रंगी माणसे त्यांच्या जीवनात आली आणि गेली .त्या माणसांच्या आठवणीतून त्यांनी उभी केली व्यक्तिचित्रे . त्या माणसांच्या चटका लावणाऱ्या आठवणी त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेतमाणसंह्या त्यांच्या पुस्तकातूनदीडदोन पानांत असे व्यक्तिचित्रण करणे तसे कठीण . मोजके शब्द .खुसखुशीत भाषा . मित्राशीच बोलतो आहोत असे संवाद . विजय तरवडे ह्यांना ही माणसे शाळेत , कॉलेजमध्ये आणि ते ज्या छोट्यामोठ्या नोकर्या करीत असत त्या कार्यालयात भेटली. म्हणजे ही सारी माणसं आपल्याही  आजूबाजूची . त्यांनी विमा कंपनीत अनेक वर्षे विविध पदावर काम  केलं असल्यामुळे त्यांना अनेक बेरकी , विचित्र स्वभावाची माणसे भेटली. ह्या कनिष्ठ- मध्यम वर्गीय माणसात त्यांचा माणूस शोध चालू होता .तसे पाहिलं  तर हे लिखाण थोडेसे आत्मचरित्रात्मक असेल जर ही माणसे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात आली असतील तर किंवा त्यांचा माणूस शोध चालू असेल आणि एखाद्या कथाकादंबर्यातील ही पात्रे असतील. मला ती शक्यता कमी वाटते कारण ह्या पुस्तकातीलमीविजय तरवडेच आहेत. खरं तर ही माणसं तुम्हा-आम्हाला नेहमीच भेटतच असतात म्हणून हे पुस्तक वाचताना आपणच आपल्या जीवनातील अशी माणसं शोधत जातो किंवा आठवत राहतो
विजय तरवडे ह्यांना परचुरे सरांसारखा माणूस भेटला नसता तरजिंदगी जिंदादिली का नाम है ! ‘ हे सहजासहजी समजलं नसतं .
भावे आणि शंकर सारडा सारखी माणसं भेटली नसती तर त्यांचालेखकूझाला नसता
विजय तरवडेसाधनापरिवाराशी संबंधित . त्यामुळे लेखक, स्तंभ लेखक आणि पत्रकार .
विजय तरवडे ह्यांनी वसंत बापट , प्र प्रधान , रवींद्र पिंगे , सुहास शिरवळकर , शी भावे , जयवंत दळवी आणि शंकर सारडा ह्यांची व्यक्तिचित्रे खूप सुंदर उभी केली आहेत . ही मंडळी जनातली आणि मनातली . आपण ह्या सर्वाना त्यांच्या साहित्यातून अनेकदा भेटलेलो आहोतच . शेवटी लेखकातील माणूसही आपण शोधतच असतो. त्यांनी तो जवळून पाहिला.
विजय तरवडे त्यांच्या एका प्राध्यापकाच्या आठवणीने फार व्याकूळ होतात . ते लिहितात ....
तो भूतकाळ आता फक्त माझ्या मनात आहे . तो पुन्हा जीवंत करण्याचा अट्टाहास का धरू ? तो आहे फक्त माझ्या आणि कुणा कुणा संबंधित स्वजनापुरता. कधी कधी तो स्मरतो . कंठ दाटून आला तर आवंढा गिळतो. वर्तमान हा फक्त नावापुरता वर्तमान असतो . त्यांचे एकमेव शांतीस्थान म्हणजे भूतकाळ , स्मरणकाळ !’ 
वय झालं की आपण सगळे तेथेच रमतो . हे सत्य नाही का ? हेच त्यांनी ह्या पुस्तकातून त्यांना भेटलेल्या माणसाविषयी सांगितलं आहे . ते खूप भावपूर्ण आहे . अंतर्मुख करणारे आहे
ह्या पुस्तकातील माणसं त्यांना जीव लावतात . भांडकुदळ नातेवाइकांच्या आणि खडूस साहेबांच्या विश्वात त्यांना आपण एकटे नाहीत असे वाटते म्हणून ते भरभरून ह्या माणसांवर लिहितात
अग्निमित्र प्रधान सरांनी त्यांना लिहितं केलं , वसंत बापटानी विजय तरवडे ह्यांची कवितासाधनेतछापली . कुसुमाग्रजांनी त्या कवितेचे कौतुक केलं . विजय तरवडे ह्यांच्या सारख्या नवोदित लेखकाला त्यावेळी नोबेल प्राईज मिळाल्यासारखा आनंद झाला . त्याच वेळी जयवंत दळवी ह्यांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केलं पण सत्यकथेने  त्यांना नव्याने लिखाण करण्याचा सल्ला दिला . त्यामुळे त्यांनी तो नादच सोडून दिला
असा हा लेखक, कथाकार , कादंबरीकार आणि स्तंभ लेखक विजय तरवडे
ह्या पुस्तकात वर्णन केलेली काही माणसे त्यांना सोडून गेली. तेव्हा त्यांना अशा बातम्यांची संवय करून घ्यावयास हवी असे वाटू लागते ते भावनाविवश होताना दिसतात
अशा माणसातच रमायला हवे. जिंदगी जिंदादिली का नाम है ! हेच खरं .
( विजय तरवडे माझे फेसबुक मित्र . अजून आमची प्रत्यक्ष भेट झालेली  नाही. एकदा फोनवर बोलणे झाले होते .भेटू लवकरच . पुण्यात किंवा मुंबईत )

Sunday, May 27, 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर

माझ्या शालेय जीवनात नेहरू - गांधी , नेताजी - सावरकर ह्यांच्यासंबंधीचे धडे अभ्यासक्रमात होते . ' गाऊ त्यांना आरती ' असा आमच्या मनांत भाव असायचा . आज सामाजिक - राजकीय वातावरण गढूळ झाले असून एक विद्वेषाचे वातावरण सर्वत्र दिसते  आहे .
गोपीनाथ तळवलकर ह्यांचे ' आनंदभुवन ' हे नेहरूंचे पुस्तक आम्हाला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते . त्याचे जवळजवळ पाठांतर केले होते . नेहरू औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पहाण्यासाठी आम्ही मुलं  किती उत्सुक होतो . त्यांच्या शेरवाणीवर असलेल्या गुलाबाच्या फुलाचे आम्हाला खूप कौतुक होते . अलाहाबादला जाऊन 'आनंदभुवन 'पहायचे राहून गेले पण दिल्लीला पहिल्यांदा गेलो तेव्हा 'त्रिमूर्ती'ला आवर्जून भेट दिली . आम्ही नेहरू भक्त लहानपणापासूनच होतो .
सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतलची हा 
सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा 

ह्या ओळी शाळेतील पुस्तकात वाचल्या तेव्हाच पाठ झाल्या होत्या . शिक्षकांनी ही कविता खूप छान शिकवली होती . त्यानंतर ' सागरा प्राण तळमळला ...' हे गीत जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा सावरकरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली . ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' ह्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता त्यापूर्वी सावरकरांचे पुस्तक वाचलं होतं . सावरकर गेले तेव्हा शाळकरी मुलगाच होतो .औरंगाबादच्या बळवंत मोफत वाचनालयात वर्तमानपत्र वाचायला जात असे . तेथे ' मराठा ' तील आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरावरील लेख  वाचला  तो आजही आठवतो . त्यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण सर्वात वेगळं होतं ते ही वाचलेलं आठवतं .त्यांचा  गायीवरचा लेख आणि  इतर विज्ञानवादी निबंध वेगळी दृष्टी देऊन गेले . मणीशंकर अय्यर ह्या केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरु केली तेव्हा सावरकर विरोधकांची दुसरी बाजू समोर आली . तो पर्यंत सावरकर द्वेष प्रखरपणे जाणवला नव्हता . पु नी अटलजींच्या बरोबर ठाण्यातील एका सभेत सावरकरांच्यावर केलेलं भाषण आजही आठवतं . अलीकडे फेसबुकवर सावरकरविरोधी जे लिहिलं जातंय ते पाहिलं म्हणजे ह्या लोकांना हा क्रांतिकारक , मराठी कवी , वैज्ञानिक दृष्टी असलेला राजकारणी समजलाच नाही . भले त्यांचा हिंदुत्ववाद लोकांना मान्य नसेल पण ह्या सोकॉल्ड सेक्युलरवादी लोकांनी ७० वर्षात देश कुठे नेऊन ठेवलाय ? तो मणीशंकर अय्यर काश्मीरमध्ये जाऊन त्या गिलानीबरोबर कसली खलबतं करीत असतो आणि दुसर्यांना राष्ट्रद्रोही म्हणतो . त्या अरुंधती रॉयची बाजू घेणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना तिच्या फुटीरतावादी मंडळीबरोबरच्या गाठीभेटीबद्दल एक  चकार शब्द बोलत नाहीत . तो कन्हय्या काहीही बोलला तरी चालतं . विक्रम गोखलेपरेश रावळ बोलले की किरट्या समजेचे वाचाळपंथी  अशी संभावना करणारे हे डावे , पुरोगामी , समाजवादी आणि निधर्मी विचारवंत . गांधीजींचा पराभव करणारे हे गांधीवादी . ह्यांना गांधीही समजले नाहीत  , नेहरूही समजले नाहीत . सावरकर असो का नेताजी सुभाष , त्यांना समजून घेता येतील असे वाटत नाही . गांधी , नेहरू , नेताजी आणि सावरकर ह्यांचे जे योगदान आहे ते आहेच . त्यांच्या काही चुका झाल्या असतील . पण त्यांनी जेवढं दिलंय तेच अधिक महत्वाचं आहे .मला हे सारेच वंदनीय .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एकेवर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले  आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफारखान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला  झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखीकष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही  मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही  त्यांची कविता आठवली .
मणी शंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी  नेते एस. एम. जोशी ह्यांना  १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत असे ते म्हणाले होते . नंतरचे हिंदुत्ववादी सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे  एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात . आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरांच्यावरचा मृत्यू लेख आजही आठवतो .  मुंबईला प्रथम आलो तेव्हा शिवाजी पार्कला भेट दिली तेव्हा सावरकर सदनाच्या जवळ जाऊन थोडा वेळ उभा राहिलो तेव्हा मला दारात सावरकर उभे आहेत असाच भास झाला होता .
सावरकरांच्या विषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत . 

Tuesday, April 24, 2018

सतत कार्यरत : कुमुदिनी देशपांडे


कुमुदिनी देशपांडे ह्या माझ्या सासूबाई . आज ९० व्या वर्षीही त्यांचा उत्साह 
खूप दांडगा आहे. तेच त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे एक समृद्ध जीवन. त्यांचं बालपण पुण्यात गेलं . त्यामुळे त्या थोड्याशा “ पुणेकर” आहेत, असा आमचा सुरुवातीचा समज. बाकीचं आयुष्य मराठ्वाड्यात गेलेलं असल्यामुळे त्यांच्यात ‘ पुणेरी- मराठवाडी’ संगम दिसून येतो. त्यांच्या स्वयंपाकाला ‘पुणेरी’ गोड चव आहे तसेच ‘ मराठवाडी ‘ तिखटपणा नाही.
मी त्यांचा जावई असल्यामुळे माझे कौतुकच जास्त व बडदास्त खास मराठवाडी 
.हेच तर आमच्या सासू- जावई नात्याचे वैशिष्ट्य.
त्यांच्या घरातील हसत्या-खेळत्या वातावरणात मी तसा गंभीर असे. मी कमी बोलतो असा त्यांच्या घरातील सर्वांचा एक गोड समज होता.  सुरुवातीचे  दिवस तसेच असतात. जसाजसा सहवास वाढत गेला , तसातसा कौटुंबिक जिव्हाळा वाढत गेला , येणे-जाणे वाढत गेले . एकमेकांच्या सुख -दु:खात आम्ही सहभागी होत गेलो. निमित्ताने एकत्र येत गेलो आणि मला त्यांचे ‘सासू’ असूनही “आई” सारखे प्रेम मिळाले.
‘ मुलगी शिकली , प्रगती झाली’ , ही सरकारी जाहिरात मी जेंव्हा जेंव्हा पहातो 

तेंव्हा तेंव्हा मला त्यांची आठवण होते . जाहिरातीतील हे विधान तंतोतंत खरं 

आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या अतिशय कठीण अशा काळात स्त्री शिक्षण असे नव्हतेच, पुण्याच्या नाना सावळेकरांनी त्यांच्या शांतेला ( त्यांचे माहेरचे नांव ) आणि इतर मुलीना शिक्षण दिले . आज त्याच शांतेच्या तीन मुली उच्चविद्याविभूषित झाल्या आहेत . एव्हढेच नव्हे तर त्यांच्या नातीसुद्धा उच्च विद्याविभूषित आहेत व महत्वाच्या पदावर समर्थपणे काम करीत आहेत . 

मराठवाड्यात तर स्त्री शिक्षण फारसे पुढे गेले नव्हते. ७०-८० वर्षापूर्वी लग्नानंतर 

कुमुदिनी देशपांडे ह्यांनी S.Sc. आणि Teacher's Training Course पूर्ण केला.शिक्षिकेची नोकरी केली. एखाद्या शाळेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ती शाळा म्हणजे एक इमारत नसते. ते एक ज्ञान मंदिर असते. त्या ज्ञान मंदिरात ज्ञान साधनेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे काम करणारा शिक्षक हा एक दैदिप्यमान माणसांच्या पुंजक्यातील महत्वाचा घटक असतो . त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत आणि आपल्या बाईना मात्र विसरलेले नाहीत. ते त्यांना आवर्जून भेटत असतात. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले आहे .
कुमुदिनी देशपांडे ह्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रसिद्ध 
शिक्षिका. समाजकार्याचे भान असलेल्या. त्यांनी  मराठवाडा विकास आंदोलनात सक्रीय भाग घेतला होता. १९८६ साली शाळेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी पुन्हा 
नव्याने सुरुवात केली आणि आपल्या घरातच किलबिल बालक मंदिर सुरु केले. हे लहानसे रोपटे वेगाने मोठे झाले आणि त्याचे रुपांतर ‘अनंत भालेराव विद्या मंदिर’ ह्या प्रसिद्ध शाळेत झाले आहे.
शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्या नव्या उत्साहाने कामाला लागल्या . असे जेष्ठ नागरिक फार थोडे असतात. त्यांचा लोकसंग्रह खूप दांडगा आहे. 
त्यांच्यातील नवे नवे प्रयोग करण्याची जिद्द खूप कांही सांगून जाते .  
सतत स्वतःला कामात गुंतवून ठेवणारी वृत्ती असल्यामुळे जेष्ठ नागरिक 
संघाच्या कामात सहभागी होऊन त्यांनी विविध कार्यक्रम राबविले आणि हे सर्व चालू असतानाच आपले जीवानुभव सांगणारे लेखन चालू ठेवले आहे . समृद्ध 
जीवनानुभव असल्यामुळे मराठी वर्तमानपत्रातून विविध विषयावर सातत्याने सदर लेखन केले आणि त्या  लिहितालिहिता कथाकार झाल्या. त्यांना माणसे वाचतां येतात, हे त्यांच्या कथेतील पात्रावरून दिसून येते . ती माणसे आजूबाजूची असतात , त्यांची सुखदु:खे त्यांनी जाणून घेतलेली असतात. त्यांच्या ह्या कथा विविध मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. आजवर  त्या चार पुस्तकांच्या लेखिका तर झाल्याच पण औरंगाबादच्या  स्त्री लेखिकांच्या साहित्य चळवळीत त्या सक्रीय सहभाग घेत होत्या . आज ९० व्या वर्षीही त्यांच्यात तोच उत्साह दिसून येतो. सामन्यातील ‘ असामान्य ‘ असलेली माणसे फारसा गाजावाजा न करिता किती मोठी कामे करीत असतात हे त्यांनी सुरु केलेल्या अनंत विद्या मंदिर ह्या शाळेच्या जवळून जाताना मला नेहमी जाणवते.

उच्च हेतूने ध्येयस्वप्ने पहात स्वतःचे आणि इतरांचे जीवन समृद्ध करणारी ही पिढी पाहिली की आपल्या जीवनाला नवी उभारी येते. आपल्याला खूप काही शिकवीत असते . त्यांची जिद्द खूप काही सांगून जाते . त्यांच्या आयुष्याच्या गोष्टीमध्ये जगण्याचा एक मोठा चित्रपट असतो. तो आपण समजून घेतला पाहिजे . त्यांचं आयुष्य साधं नव्हतं . त्यांच्या आयुष्यात गुंते तर होतेच . वैयक्तिक अडचणी होत्या. कौटुंबिक प्रश्न होते . तरीही उत्साह आणि परिश्रम ह्याच्या जोरावर त्यांनी जे यश मिळवले , त्यातून खूप कांही शिकण्यासारखे आहे.
अलीकडेच त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणीचे पुस्तक “ स्मृतीची पाने चाळताना” प्रकाशित झाले आहे . त्यांना खूप काही सांगायचं असतं . समृद्ध जीवनाचे असंख्य अनुभव. पुढच्या पिढीने ते ऐकून घेऊन शिकलं पाहिजे. त्यांच्यासारखी माणसं वाचता आली पाहिजेत. त्यांच्या जीवनातून एक गोष्ट घेतली पाहिजे . ती म्हणजे आपण आपलं जीवन जगताना आपल्याबरोबरच्या इतरांची आयुष्ये सुखकर आणि समृद्ध केली पाहिजेत. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत . “ स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा “ हे त्यांचे चार बालनाटिका असलेले पुस्तक खूप लक्षवेधी आहे . त्यांच्या तीन मुली , दोन सुना आणि सहा नाती ह्यांच्याकडे जेव्हा मी पहातो तेव्हाच मी आवाक होतो आणि मला स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसू लागतात ,

त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात आम्ही (मुले –मुली – जावई – सुना - नाती ) त्यांच्यासंबंधी लिहिलं आहे. ह्या पुस्तकात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसून येतात . एकच व्यक्ती कुटुंबातील प्रत्येकावर वेगवेगळा ठसा उमटवीत असते. आपली आई – सासू – आजी कशी आहे ह्याचा शोध घेताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू माझ्या समोर येतात.
त्यांची मोठी मुलगी डॉ कुंदा दंडारे लिहितात , “ आमच्या आईच्या आईपणाला तोड नाही. हे आईपण तिने फक्त पांचजणावरच शिंपडले नाही तर इतर ही अनेक जणांवर उधळून दिले”. त्या पुढे लिहितात, “ आई , हे माझे ‘ पहिले विदयापीठ ‘ आहे . खरं म्हणजे माझी आई म्हणजे एक ‘ मुक्त विदयापीठ ‘.
नीलिमा गंगाखेडकर ( कल्पना देशपांडे ) ही त्यांची दुसरी मुलगी एका शब्दात आईचे वर्णन करते . “ आभाळमाया” . 
त्यांच्याकरिता आईची दोन मोहक रूपे 
*  ध्रुव तार्यासारखे अढळ स्थान असणारी स्त्री 
फिनीक्स पक्षासारखी उंच भरारी घेण्याचे मनोबळ देणारी आई . 
त्या पुढे लिहितात. कंटाळा हा शब्द माहित नसणारी स्त्री , शांत आणि समजून घेणारी आई , निराशेचा सूर माहित नसणारी स्त्री , दांडगी श्रवणशक्ती असणारी शिक्षिका , मानसिक आधार कसा द्यावा ते शिकविणारी आई , मनाच्या स्पंदनातून ( वाचन  -मनन – चिंतन करून ) लेखनातून व्यक्त होणारी लेखिका , कथाकार आणि बालनाट्य लिहिणारी नाटककार , उत्तुंग मनोबल , दुर्दम्य आशावाद  , विलक्षण जिद्द आणि ध्येयवेडी असलेली स्त्री म्हणजे आमची आई. 
मंजिरी तुलसीदास कुंभारे ( पूनम ) ही त्यांची तिसरी मुलगी “ माझी माय सरस्वती ...” असा उल्लेख करून पुढे लिहितात , ‘ आई म्हणजे उत्साहाचा धबधबा . टापटीपपणा शिकावा तो आईकडूनच . खंबीरपणा , प्रचंड इच्छाशक्ती , न कंटाळता , न कुरकुरता , न चिडता सतत काम करीत रहाणे, हे शिकावे ते आईकडूनच . आईचे वैशिष्ट्य म्हणजे – सर्वासाठी सर्व केलं पण आपलं व्यक्तिमत्व मात्र जपलं .
विनय देशपांडे हा त्यांचा मोठा मुलगा . त्याला नेहमी ‘ आई काय म्हणाली ? ‘ , ह्या पेक्षा ‘ आई –काका काय म्हणतात ?’ असाच प्रश्न पडत असे . त्याला त्याचे आई –काका म्हणजे हायड्रोजनच्या अणूसारखे एकरूप वाटत असत. पती –पत्नीची विलक्षण एकरूपता त्याला दिसते . आई-काकाच्या प्रकृती भिन्न , प्रवृत्ती भिन्न . तरीही एकरूपता वाखाणण्यासारखी . माणूस जोडणे हा त्यांचा एक मोठा गुण. त्याला आपली आई ही विचाराने काळाच्या पुढे असणारी स्त्री वाटते.
केदार देशपांडे हा त्यांचा धाकटा मुलगा . उद्योजक आहे . तो दोन शब्दात आईचे वर्णन करतो . ‘Social Entrepreneur’ . स्वत:च्या कारखान्यात तो जपानी TPM कार्यप्रणालीचा वापर करतो . तेंव्हा त्याच्या  लक्षात येतं की ही प्रणाली तर तो आईकडूनच शिकला . मोठी मुलगी “ पहिले विदयापीठ “ असा आईचा उल्लेख करते तर धाकटा मुलगा आईला “ Management Guru “ असे मानतो. निवृत्तीनंतर सुखाने उर्वरित आयुष्य न जगता नव्या शाळेची उभारणी करणाऱ्या कुमुदिनी देशपांडे ह्या खर्या Social Entrepreneur आहेत.
त्यांचे मोठे जावई डॉ मधुकर दंडारे ह्यांना प्रश्न पडतो , “ ह्या बाईना एवढा उत्साह येतो कुठून ? “ . ते पुढे लिहितात , “ ह्या बाईना ‘ वयस्कर ‘ असे कधी मी बघितलेच नाही ‘. नाविन्याचा लोभ असणारी व मूर्तिमंत नेटकेपणा असणारी ही स्त्री म्हणजे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे.
मोठी सून कीर्ति विनय देशपांडे लिहितात , “ सासू नव्हे आई “. ‘घराला घरपण कसं द्यावे’,  ह्याचे पहिले धडे मी माझ्या सासूकडूनच शिकले असे त्या आवर्जून सांगतात . सासूची सुनेला भीती न वाटणे ह्यातच त्यांचे वेगळे सासूपण त्यांना दिसून येतं.
धाकटी सून बकुळ केदार देशपांडे . त्यांचे आणि सासूच्या वयातील अंतर ४५ वर्षाचे . दोन पिढ्यांचे अंतर  असणार्या ह्या सासू – सुना . जनरेशन ग्याप. सर्वच बाबतीत . त्या सासूकडून Event Management शिकल्या . संघर्ष न करिता  संसाराची सूत्रे हातात सोपविणारी सासू त्यांना मिळाली . असे करताना त्यांनी पुन्हा स्वतःला समाजकार्यात गुंतून  घेतलं हे त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व वाटते.
डॉ क्षितिजा कुलकर्णी ही त्यांची नात लिहिते , “ लहानपणी आजोळी जायचे  म्हणजे  खरं ‘व्हेकेशन ‘.  नातवंडाना असे वाटणे ह्याचे सारे क्रेडीट आजीलाच . आजीची घरासमोरील  सुंदर बाग , गुलाबाचे ताटवे, बोगन वेलीची कमान , पेरूचे झाड , प्राजक्ताचा सडा ... असं त्या तिथे पलीकडे .... असलेलं सुंदर घर आजही वाकुल्या दाखवीत बोलवीत असतं .ते आजही स्वप्नघर आहे . ही नात पुढे लिहिते की आजीचा निवृत्ती नंतरचा उत्साह पाहिलाकी आम्ही नातवंडे अचंबित होतो. माझी आजी म्हणजे आम्हा आजच्या स्त्रियासाठी रोल मॉडेल आहे . स्त्री स्वातंत्र्याचे बाळकडू पाजणारी माझी आजी असा विशेष उल्लेख क्षितिजा करते .
पल्लवी गणेश देशपांडे ही डोंबिवलीला वास्तव्य करणारी नात लिहिते ..’ माझी आजी म्हणजे माझी प्रेरणा “ . आजीचा उत्साह दांडगा आहेच. प्रेमळ , लाघवी , व्यवस्थितपणा , नीटनेटकेपणा  ह्या सर्वांचे संस्कार न कळत करणारी आजी म्हणजे आमचे खरे प्रेरणास्थान .आम्ही सामाजिक बांधिलकीचे धडे नकळत शिकलो  ते आजीकडूनच. आधुनिक विचारसरणी आणि परंपरा ह्यांची उत्तम सांगड घालणारी ही वेगळी स्त्री .
फ्लोरिडा हून ऋतुगंधा हृषीकेश नूलकर लिहिते की तिला कायम आठवते ते उन्हाळ्याच्या सुट्टीतील आजोळी जाण्याची गंमत . सकाळी परडीभर फुले गोळा करणे , आजीने केलेली साबूदाणा खिचडी खाणे वगैरे . आजही आजीसारखी पुरणपोळी करता येत नाही ह्याचे तिला वाईट वाटते . आजीचे “ किलबिल” बालक मंदिर तिला नेहमी आठवते . जेव्हा मी माझ्या मुलांना डेकेअर मध्ये सोडायला जाते तेव्हा मला आठवते ते आजीचे किलबिल बालक मंदिर . माहेरी आलेल्या मुलीपेक्षा नातीचेच जास्त लाड  करणारी आजी ! एक उत्साह मूर्ती !

सोहम विनय देशपांडे लिहितो , “  I am sure every grandmother loves 
her grandchildren but my Aaji is on a whole different level because her love for her family will always be measured as an  infinite even by the measurement which is used to measure the area of the universe.”
अनुप्रिता भाले त्यांच्या सहवासात आली ती डीटीपीचे काम करून देणारी संगणक सहाय्यक म्हणून . ती म्हणते , ' नाते माझे व आजीचे' -  ते कायम बहरत राहील. कारण आजीच्या स्वभावातील आपलेपणा , प्रेम आणि माणसं जोडण्याची कला मला त्यांच्या जवळ नेते . 
अशा ह्या नव्वद वर्षाच्या कुमुदिनी देशपांडे . त्यांच्याबद्दल आमची एकच तक्रार आहे . त्या स्वतः वयस्कर कधीच होत नाहीत आणि आम्हा सर्वाना होऊ देत 
नाहीत . त्यांचा उत्साह पाहून आम्ही वयस्कर होऊ शकत नाहीत हेच खरं !
त्यांच्याकडे पाहिलं की खालील काव्यपंक्ती आठवतात .....

What you are is God’s gift to you.

What you are going to make of yourself

Is your gift to God !

'स्मृतीची पाने चाळताना'  आणि 'स्त्री शक्तीच्या पाऊलखुणा' ह्या कुमुदिनी देशपांडे ह्यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन जयदेव डोळे आणि रामकृष्ण जोशी  करीत असताना .



   

ओवी:मराठी नाटक




' ओवी ' नांव काव्यमय . नाटक मात्र भयनाट्य . पूर्वार्धात डोकं दुखू लागतं . विकृती आणि भय ह्यावर आधारलेलं नाटक डोकं सुन्न करू लागतं . फार वर्षापूर्वी विजय तेंडुलकरांच्या ' गिधाडे ' ह्या नाटकामुळे असाच सुन्न झालो होतो . विकृत वासनेला जे बळी पडतात त्यांच्यात एक प्रकारचे भय निर्माण होतं . ओवी ह्या मुलीवर असे संकट कोवळ्या वयात येते . त्यातून ती भयग्रस्त अवस्थेत जीवन जगते . भयातून भुताटकीचा अनुभव घेऊ लागते . व्हर्च्युअल वर्ल्ड आणि रिअल वर्ल्ड ह्यांच्यातील फरकच तिला जाणवत नाही . लहान वयात झालेला मानसिक रोग तिचा पाठलाग करतो .अनाथाश्रमातील ह्या मुलीला रिअल वर्ल्ड मध्ये आणण्यासाठी तेथील संचालिका डॉक्टरच्या मदतीने जे प्रयत्न करते ते पाहिले म्हणजे माणुसकीचा झरा किती महत्वाचा आहे, हेच नाटककाराने उभे केलेलं नाट्य . डोक्याला त्रासदायक वाटलं तरी एकदा तरी अनुभवण्यासारखं हे महानाट्य . एक दर्जेदार निर्मिती . ह्यातील नेपथ्य , प्रकाशयोजना , ट्रिक सीन्स अफलातून . कलाकार जीव तोडून काम करताना किती मानसिक त्रास सहन करीत त्या भूमिका वठवीत असतील व जगत असतील ह्या कल्पनेनेच आपण आवाक होतो . उत्तरार्ध खूप काही देऊन जातो . असा हा एक आगळा वेगळा नाट्यप्रयोग . एकदा बघाच .

मदनलाल धिंग्रा आणि स्वा. सावरकर : मैत्री



इंडिया हाउस , लंडन : स्वा. सावरकर आणि त्यांचे सहकारी - मदनलाल धिंग्रा , वर्मा , सेनापती बापट , अय्यर
आज मुक्ता बर्वे ह्यांनी सादर केलेलं' चॅलेंज ' हे नाटक पाहिलं . क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या मैत्रीचे दिवस लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कसे होते , ह्यावर आधारित हे नाटक आहे . ह्या भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याची पहिली क्रांतिकारक चळवळ येथे सुरु केली .त्यांच्याबरोबर सेनापती बापट , कृष्णा वर्मा , एम आर टी आचार्य हे क्रांतिकारक होते . त्यांच्या चळवळीचे चित्रण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ह्या नाटकातून आपल्यासमोर उभे रहातात . मदनलाल धिंग्रा ह्यांनी करझन वायलीचा वध कसा केला आणि तात्याराव सावरकर आणि धिंग्रा ह्यांनी हे कसे घडवून आणले आणि इंग्रजी साम्राज्याला कसा दणका बसला, ह्या घटनेवर आधारलेलं हे नाटक तो काळ जसाच्या तसा उभे करते .
 इंडिया हाऊसचे नेपथ्य एकदम सुरेख . करझन वायली ह्यांची मुलगी मदनलाल धिंग्रा ह्यांच्या प्रेमात पडलेली असते आणि ती त्यांना भेटायला इंडिया हाऊसवर नेहमी येते त्यामुळे इतर क्रांतीकारकांना धिंग्रा ह्यांच्याबद्दल नेहमी शंका येते . पण सावरकर आणि धिंग्रा ह्यांचे वेगळेच नाते असते . धिंग्रावर सावरकरांचा प्रचंड विश्वास असतो आणि धिंग्रा सावरकरांच्या नेतृत्वावर आणि व्यक्तिमत्वावर भाळलेला असतो आणि त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही . नाटकातून ह्या दोघांचे अतूट नाते जसे पुढे येते तसेच धिंग्रा आणि करझन वायलीच्या मुलीचे प्रेम ह्यातील नाट्य लक्ष वेधते . ही फारशी माहित नसलेली उपकथा .
क्रांतिकारकांचे काम करणारे सर्वच कलाकार कायम लक्षात राहतील इतका सुंदर अभिनय करतात . निखिल राऊत ह्यांनी सावरकरांचे काम केलेलं असून लेखक , दिग्दर्शक , वेशभूषा आणि मदनलाल धिंग्रा ह्यांची भूमिका करणारे दिगपाल लांजेकर सबकुछ आहेत . एक लक्षवेधी प्रयोग .
अलीकडे सोशल मीडियावर अतिशय गलिच्छ भाषेत सावरकरांवर लिहिले जाते . त्यांच्या सर्वच विचारांशी सहमत होणे शक्य नसलेतरी त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेले क्रांतिकार्य अनमोल आहे . त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग खूप महत्वाचा आहे .
मुक्ता बर्वे ह्यांनी मराठी रंगभूमीवर हा देखणा प्रयोग सादर करून क्रांतिकारकांच्या जीवनाची ओळख करून दिली असून त्यांच्या जीवनातील नाट्य उभे केले आहे . अभिनंदन ! हा प्रयोग अवश्य पहा . रंगभूमीवर दिसणारे १९०२ चे लंडनचे इंडिया हाऊस आणि क्रांतिकारकांचे ते दिवस खूप काही सांगून जातात . अवश्य बघा .असा हा एक सुंदर नाट्यानुभव .



नेपथ्य : इंडिया हाउस 

Saturday, October 7, 2017

न्यूटन



‘न्यूटन’ हा अमित मसुरकर ह्यांचा चित्रपट गाजतो आहे. ४० आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनात तो दाखविण्यात आला असून बर्लिनच्या प्रदर्शनात त्याला पारितोषिक मिळाले आहे .काल मी हा चित्रपट पाहिला तेव्हा ३०- ४० प्रेक्षक ही चित्रपटगृहात नव्हते ,
नक्षलवादी दशहतवाद ,छत्तीसगढच्या दाट जंगलातील आदिवासी लोकांचे जीवन , भयानक गरिबी , जुलूमजबरदस्ती ,  दशहतीमुळे सर्वत्र असलेले भीतीचे वातावरण , कायद्याचे नसलेले राज्य , नागरी सुविधांचा अभाव , त्यात आलेल्या निवडणुका , बुथवर जाण्यास  कोणीही तयार नाही अशी भितीजन्य परिस्थिती. असे असताना एक नितीमत्तेची चाड असणारा न्यूटनसारखा एक निवडणूक अधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतो.  त्याची ही गोष्ट .विषय वेगळा . नट नवे . आपल्या नागरी जीवनाची आणि लोकशाही व्यवस्थेची एक शोकांतिका . अशा निराशाजनक समाजव्यवस्थेत लोकशाही वाचविण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुका . नेते , मोर्चे , घोषणाबाजी , सभा , मिडिया , निवडणूक अधिकाऱ्यांची परीक्षा हे सर्व काही आपण चित्रपटात पहात जातो. फारसे संवाद नाहीत . जे दाखविलं जातं ते खूप बोलकं असतं . अंतर्मुख करायला लावणारं . चित्रपट तसा खूप बोलका आहे . उत्तम चित्रण , सुरेख अभिनय. नर्म विनोद . मग दिग्दर्शक कुठे कमी पडलाय ? कथा कुठे कमी वाटतेय ? चित्रपट का परिणाम करीत नाही ? मला का आवडला नाही ?
नक्षलवाद म्हंटलं की पहिल्यांदा आठवतो तो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा . विदर्भ – तेलंगाना सीमाभाग . नक्षलवाद्यांनी माजवलेले थैमान . हिंसा . दशहत . आदिवासी लोकांचे हाल . ह्या भागात ड्युटीवर जाण्यास पोलीस आणि पोलीस अधिकारी धजत नसत . मंत्री – गृहमंत्री जे पोलीस अधिकारी त्यांच्या मर्जीत नाहीत त्यांना शिक्षा म्हणून ह्या भागात ड्युटीवर पाठवित असत . अशाच एका तडफदार पोलीस अधिकार्याची एकदा भेट झाली. तेव्हा गप्पा मारताना त्यांच्या कठीण जीवनाची संपूर्ण कल्पना आली. हे सर्व  तसे “ न्यूटन"च होते . जीवावर उदार होऊन नक्षलवादाशी लढत होते. हे पोलीस अधिकारी असोत की सुरक्षादलाचे आपले सैनिक असोत. त्यांचे जगणे आपल्याला त्या दशहतवादी हिंसेपासून दूर ठेवते म्हणून आपण सुखाने जगतो. नेमक्या ह्या आणि अशा लोकांच्या विषयी आपल्या मनात थोडेसे किल्मिष निर्माण करणारा हा चित्रपट मला आवडला नाही . येथेच दिग्दर्शक कमी पडला .
कथा , कादंबरी किंवा चित्रपट ह्या कलाकृतीतून आपल्याला वास्तवता आणि कल्पनासृष्टी ह्या दोन्हींचा संगम पहायला मिळत असतो. कलाकृतीतून दिसणारी वास्तवता आपण आपल्यात आणि आपल्या आजूबाजूच्या विश्वात पहात असतो. कधीकधी ती आवडू लागते . साहित्यिक / सिने दिग्दर्शक कलाकृतीची उत्सुकता वाढविण्यासाठी वास्तवतेपासून दूर जातात . त्यांची एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी असते आणि ते त्या विचारसरणीचा आधार घेऊन कलाकृती बदलून टाकतात आणि त्यांच्या कलाकृतीतून आपल्याला वेगळाच संदेश देऊ पहातात . हा चित्रपट पहाताना असं तर झालं नाही ना?,  अशी दाट शंका येऊन जाते , तेथेच खटकते . त्यामुळेच नक्षलवादी दशहतवादाशी झगडणाऱ्या सुरक्षा अधिकार्याच्या केलेल्या विपर्यस्त चित्रणामुळे हा चित्रपट चुकीच्या दिशेने गेला आहे असे मला जाणवते . ते खटकते . चित्रपट तेथेच कमी पडतो. सद्यस्थितीत तो चुकीची बाजू दाखवितो आहे , असे प्रकर्षाने जाणवते .
नक्षलवादी पार्श्वभूमीवर लिहिलेली झुम्पा लाहिरी ह्यांची “ THE LOW LAND “ ही कादंबरी आठवते . ती कादंबरी पहिल्यांदा हा विषय हाताळीत होती. ती कादंबरी आवडून गेली . ह्या चळवळी संबंधी खूप काही सांगून गेली . मसूरकरांची ही कलाकृती नक्षलवादी दशहतीशी झगडणाऱ्या सुरक्षा यंत्रणेलाच कटघरात उभी करते, अशा यंत्रणेत असतील दोन चार माणसे . पण जो मेसेज द्यायचा आहे तोच चुकीचा आहे . ते विशेष खटकते . तेथेच चित्रपट उंचावर जाऊन खाली पडतो, “ न्यूटन” खूप हवेत . ह्यात वाद नाही .