Sunday, May 27, 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर

माझ्या शालेय जीवनात नेहरू - गांधी , नेताजी - सावरकर ह्यांच्यासंबंधीचे धडे अभ्यासक्रमात होते . ' गाऊ त्यांना आरती ' असा आमच्या मनांत भाव असायचा . आज सामाजिक - राजकीय वातावरण गढूळ झाले असून एक विद्वेषाचे वातावरण सर्वत्र दिसते  आहे .
गोपीनाथ तळवलकर ह्यांचे ' आनंदभुवन ' हे नेहरूंचे पुस्तक आम्हाला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते . त्याचे जवळजवळ पाठांतर केले होते . नेहरू औरंगाबादला आले तेव्हा त्यांना पहाण्यासाठी आम्ही मुलं  किती उत्सुक होतो . त्यांच्या शेरवाणीवर असलेल्या गुलाबाच्या फुलाचे आम्हाला खूप कौतुक होते . अलाहाबादला जाऊन 'आनंदभुवन 'पहायचे राहून गेले पण दिल्लीला पहिल्यांदा गेलो तेव्हा 'त्रिमूर्ती'ला आवर्जून भेट दिली . आम्ही नेहरू भक्त लहानपणापासूनच होतो .
सुनील नभ हे सुंदर नभ हे नभ हे अतलची हा 
सुनील सागर सुंदर सागर सागर अतलची हा 

ह्या ओळी शाळेतील पुस्तकात वाचल्या तेव्हाच पाठ झाल्या होत्या . शिक्षकांनी ही कविता खूप छान शिकवली होती . त्यानंतर ' सागरा प्राण तळमळला ...' हे गीत जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा सावरकरांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली . ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' ह्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता त्यापूर्वी सावरकरांचे पुस्तक वाचलं होतं . सावरकर गेले तेव्हा शाळकरी मुलगाच होतो .औरंगाबादच्या बळवंत मोफत वाचनालयात वर्तमानपत्र वाचायला जात असे . तेथे ' मराठा ' तील आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरावरील लेख  वाचला  तो आजही आठवतो . त्यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण सर्वात वेगळं होतं ते ही वाचलेलं आठवतं .त्यांचा  गायीवरचा लेख आणि  इतर विज्ञानवादी निबंध वेगळी दृष्टी देऊन गेले . मणीशंकर अय्यर ह्या केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा त्यांच्या विरुद्ध मोहीम सुरु केली तेव्हा सावरकर विरोधकांची दुसरी बाजू समोर आली . तो पर्यंत सावरकर द्वेष प्रखरपणे जाणवला नव्हता . पु नी अटलजींच्या बरोबर ठाण्यातील एका सभेत सावरकरांच्यावर केलेलं भाषण आजही आठवतं . अलीकडे फेसबुकवर सावरकरविरोधी जे लिहिलं जातंय ते पाहिलं म्हणजे ह्या लोकांना हा क्रांतिकारक , मराठी कवी , वैज्ञानिक दृष्टी असलेला राजकारणी समजलाच नाही . भले त्यांचा हिंदुत्ववाद लोकांना मान्य नसेल पण ह्या सोकॉल्ड सेक्युलरवादी लोकांनी ७० वर्षात देश कुठे नेऊन ठेवलाय ? तो मणीशंकर अय्यर काश्मीरमध्ये जाऊन त्या गिलानीबरोबर कसली खलबतं करीत असतो आणि दुसर्यांना राष्ट्रद्रोही म्हणतो . त्या अरुंधती रॉयची बाजू घेणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना तिच्या फुटीरतावादी मंडळीबरोबरच्या गाठीभेटीबद्दल एक  चकार शब्द बोलत नाहीत . तो कन्हय्या काहीही बोलला तरी चालतं . विक्रम गोखलेपरेश रावळ बोलले की किरट्या समजेचे वाचाळपंथी  अशी संभावना करणारे हे डावे , पुरोगामी , समाजवादी आणि निधर्मी विचारवंत . गांधीजींचा पराभव करणारे हे गांधीवादी . ह्यांना गांधीही समजले नाहीत  , नेहरूही समजले नाहीत . सावरकर असो का नेताजी सुभाष , त्यांना समजून घेता येतील असे वाटत नाही . गांधी , नेहरू , नेताजी आणि सावरकर ह्यांचे जे योगदान आहे ते आहेच . त्यांच्या काही चुका झाल्या असतील . पण त्यांनी जेवढं दिलंय तेच अधिक महत्वाचं आहे .मला हे सारेच वंदनीय .
त्याच वेळी शाळेत वादविवाद स्पर्धा असत . एकेवर्षी विषय होता ' १८५७ चे बंड की स्वातंत्र्य युद्ध ' . आणि सावरकरांचे पुस्तक हातात पडले  आणि भारावून गेलो . तात्या टोपे , महाराणी लक्ष्मीबाई आणि बहादुरशहा जफारखान ह्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याची ओळख झाली . झांशीला अलीकडे गेलो तेव्हा सावरकर आठवले . योगायोगाने जो गाईड होता तो त्या भागातील मुस्लिम होता . त्याच्या अंगात जणूकाही वीरश्रीच संचारली होती . त्याने आपल्या आवाजात त्यावेळचे चित्र उभे केले . मला सावरकरांच्या लिखाणाचीच आठवण झाली . तसेच शब्द . तशीच भाषा .
ग्वाल्हेरला  झांशीची राणी जिथे मारली गेली त्या जागेवर जेव्हा गेलो तेव्हा ग्वाल्हेरच्या शिंद्यानी सहकार्य न दिल्यामुळे राणी कशी दुःखीकष्टी झाली असेल ते आठवले . त्या ग्वाल्हेरच्या फंदफितुरी करणाऱ्या घराण्याबद्दल आजही  मनात राग आहे .
सावरकरांचे ' माझी जन्मठेप ' दोनदा वाचले . अंदमानला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीच्या बाहेरील निळा समुद्र पाहिला तेव्हा ' सागरा प्राण तळमळला ' ही  त्यांची कविता आठवली .
मणी शंकर अय्यर सारखा माणूस इतका सावरकर द्वेषाने बोलतो तेव्हा ह्या पाकिस्तानप्रेमी माणसाविषयी संताप येतो . त्याला सावरकर समजलेच नाहीत म्हणून कींव करावीशी वाटते .
अलीकडेच मुक्ता बर्वे ह्यांनी' चॅलेंज ' हे सावरकर ह्यांच्या जीवनावरचे सुरेख नाटक रंगभूमीवर आणले आहे . ज्यांना सावरकर थोडे समजून घ्यावयाचे आहेत त्यांनी ते अवश्य बघावे .
समाजवादी  नेते एस. एम. जोशी ह्यांना  १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत असे ते म्हणाले होते . नंतरचे हिंदुत्ववादी सावरकर त्यांना आणि इतर समाजवाद्यांना मान्य नाहीत . नसतील मान्य .
मला सावरकरांचे  एक वाक्य नेहमी आठवते ...
' तुम्ही तुमचे अमेरिकत्व विसरणार असाल , तुम्ही तुमचे इंग्रज असणे विसरणार असाल , तुम्ही तुमचे जर्मन असणे विसरणार असाल तर मी माझे भारतीयत्व विसरायला तयार असेल .' त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाची ही व्याख्या .
असा प्रखर राष्ट्रवाद मला व्हिएतनामी लोकात दिसून आला .
शालेय जीवनात सावरकरांचा प्रभाव पडला तो त्यांच्या साहित्यामुळे . विशेषतः कवितेमुळे . साहित्यिक सावरकर नेहमीच मनाच्या कोपऱ्यात वस्तीला असतात . आचार्य अत्रे ह्यांचा सावरकरांच्यावरचा मृत्यू लेख आजही आठवतो .  मुंबईला प्रथम आलो तेव्हा शिवाजी पार्कला भेट दिली तेव्हा सावरकर सदनाच्या जवळ जाऊन थोडा वेळ उभा राहिलो तेव्हा मला दारात सावरकर उभे आहेत असाच भास झाला होता .
सावरकरांच्या विषयी जो विद्वेष पसरविला जातो त्यामुळे मन उदास होते . पटत नसतील त्यांचे विचार .पण द्वेष का ? तसे पाहिले तर नेहरू - गांधींचे सर्व विचार सर्वांना पटतातच असे नाही . त्यांचे मोठेपण त्यामुळे कमी होत नाही .
मार्ग भिन्न . विचार भिन्न . वाटा निराळ्या . मला तरी नेहरू - गांधींसारखे सावरकर - नेताजी सुभाष तेवढेच वंदनीय आहेत . 

1 comment:

  1. मला ही सावरकर,नेहरु,नेताजी,फुले,वन्दनीय आहेत. पण राष्ट्र्पुरुष द्वेशी राजकारणिय लोकान्च्या गोष्टिं मिडीयावर वारनवार दाखवल्यामूळे शिकत्या वयातली लोकं,शिकते डोके यांच्यावर तसाच वाईट परिणाम हितो.असं मला वाटते.🙏

    ReplyDelete