Follow by Email

Saturday, October 7, 2017

न्यूटन‘न्यूटन’ हा अमित मसुरकर ह्यांचा चित्रपट गाजतो आहे. ४० आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनात तो दाखविण्यात आला असून बर्लिनच्या प्रदर्शनात त्याला पारितोषिक मिळाले आहे .काल मी हा चित्रपट पाहिला तेव्हा ३०- ४० प्रेक्षक ही चित्रपटगृहात नव्हते ,
नक्षलवादी दशहतवाद ,छत्तीसगढच्या दाट जंगलातील आदिवासी लोकांचे जीवन , भयानक गरिबी , जुलूमजबरदस्ती ,  दशहतीमुळे सर्वत्र असलेले भीतीचे वातावरण , कायद्याचे नसलेले राज्य , नागरी सुविधांचा अभाव , त्यात आलेल्या निवडणुका , बुथवर जाण्यास  कोणीही तयार नाही अशी भितीजन्य परिस्थिती. असे असताना एक नितीमत्तेची चाड असणारा न्यूटनसारखा एक निवडणूक अधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतो.  त्याची ही गोष्ट .विषय वेगळा . नट नवे . आपल्या नागरी जीवनाची आणि लोकशाही व्यवस्थेची एक शोकांतिका . अशा निराशाजनक समाजव्यवस्थेत लोकशाही वाचविण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुका . नेते , मोर्चे , घोषणाबाजी , सभा , मिडिया , निवडणूक अधिकाऱ्यांची परीक्षा हे सर्व काही आपण चित्रपटात पहात जातो. फारसे संवाद नाहीत . जे दाखविलं जातं ते खूप बोलकं असतं . अंतर्मुख करायला लावणारं . चित्रपट तसा खूप बोलका आहे . उत्तम चित्रण , सुरेख अभिनय. नर्म विनोद . मग दिग्दर्शक कुठे कमी पडलाय ? कथा कुठे कमी वाटतेय ? चित्रपट का परिणाम करीत नाही ? मला का आवडला नाही ?
नक्षलवाद म्हंटलं की पहिल्यांदा आठवतो तो महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा . विदर्भ – तेलंगाना सीमाभाग . नक्षलवाद्यांनी माजवलेले थैमान . हिंसा . दशहत . आदिवासी लोकांचे हाल . ह्या भागात ड्युटीवर जाण्यास पोलीस आणि पोलीस अधिकारी धजत नसत . मंत्री – गृहमंत्री जे पोलीस अधिकारी त्यांच्या मर्जीत नाहीत त्यांना शिक्षा म्हणून ह्या भागात ड्युटीवर पाठवित असत . अशाच एका तडफदार पोलीस अधिकार्याची एकदा भेट झाली. तेव्हा गप्पा मारताना त्यांच्या कठीण जीवनाची संपूर्ण कल्पना आली. हे सर्व  तसे “ न्यूटन"च होते . जीवावर उदार होऊन नक्षलवादाशी लढत होते. हे पोलीस अधिकारी असोत की सुरक्षादलाचे आपले सैनिक असोत. त्यांचे जगणे आपल्याला त्या दशहतवादी हिंसेपासून दूर ठेवते म्हणून आपण सुखाने जगतो. नेमक्या ह्या आणि अशा लोकांच्या विषयी आपल्या मनात थोडेसे किल्मिष निर्माण करणारा हा चित्रपट मला आवडला नाही . येथेच दिग्दर्शक कमी पडला .
कथा , कादंबरी किंवा चित्रपट ह्या कलाकृतीतून आपल्याला वास्तवता आणि कल्पनासृष्टी ह्या दोन्हींचा संगम पहायला मिळत असतो. कलाकृतीतून दिसणारी वास्तवता आपण आपल्यात आणि आपल्या आजूबाजूच्या विश्वात पहात असतो. कधीकधी ती आवडू लागते . साहित्यिक / सिने दिग्दर्शक कलाकृतीची उत्सुकता वाढविण्यासाठी वास्तवतेपासून दूर जातात . त्यांची एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी असते आणि ते त्या विचारसरणीचा आधार घेऊन कलाकृती बदलून टाकतात आणि त्यांच्या कलाकृतीतून आपल्याला वेगळाच संदेश देऊ पहातात . हा चित्रपट पहाताना असं तर झालं नाही ना?,  अशी दाट शंका येऊन जाते , तेथेच खटकते . त्यामुळेच नक्षलवादी दशहतवादाशी झगडणाऱ्या सुरक्षा अधिकार्याच्या केलेल्या विपर्यस्त चित्रणामुळे हा चित्रपट चुकीच्या दिशेने गेला आहे असे मला जाणवते . ते खटकते . चित्रपट तेथेच कमी पडतो. सद्यस्थितीत तो चुकीची बाजू दाखवितो आहे , असे प्रकर्षाने जाणवते .
नक्षलवादी पार्श्वभूमीवर लिहिलेली झुम्पा लाहिरी ह्यांची “ THE LOW LAND “ ही कादंबरी आठवते . ती कादंबरी पहिल्यांदा हा विषय हाताळीत होती. ती कादंबरी आवडून गेली . ह्या चळवळी संबंधी खूप काही सांगून गेली . मसूरकरांची ही कलाकृती नक्षलवादी दशहतीशी झगडणाऱ्या सुरक्षा यंत्रणेलाच कटघरात उभी करते, अशा यंत्रणेत असतील दोन चार माणसे . पण जो मेसेज द्यायचा आहे तोच चुकीचा आहे . ते विशेष खटकते . तेथेच चित्रपट उंचावर जाऊन खाली पडतो, “ न्यूटन” खूप हवेत . ह्यात वाद नाही .  

     

No comments:

Post a Comment