Tuesday, April 24, 2018

मदनलाल धिंग्रा आणि स्वा. सावरकर : मैत्री



इंडिया हाउस , लंडन : स्वा. सावरकर आणि त्यांचे सहकारी - मदनलाल धिंग्रा , वर्मा , सेनापती बापट , अय्यर
आज मुक्ता बर्वे ह्यांनी सादर केलेलं' चॅलेंज ' हे नाटक पाहिलं . क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या मैत्रीचे दिवस लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कसे होते , ह्यावर आधारित हे नाटक आहे . ह्या भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याची पहिली क्रांतिकारक चळवळ येथे सुरु केली .त्यांच्याबरोबर सेनापती बापट , कृष्णा वर्मा , एम आर टी आचार्य हे क्रांतिकारक होते . त्यांच्या चळवळीचे चित्रण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू ह्या नाटकातून आपल्यासमोर उभे रहातात . मदनलाल धिंग्रा ह्यांनी करझन वायलीचा वध कसा केला आणि तात्याराव सावरकर आणि धिंग्रा ह्यांनी हे कसे घडवून आणले आणि इंग्रजी साम्राज्याला कसा दणका बसला, ह्या घटनेवर आधारलेलं हे नाटक तो काळ जसाच्या तसा उभे करते .
 इंडिया हाऊसचे नेपथ्य एकदम सुरेख . करझन वायली ह्यांची मुलगी मदनलाल धिंग्रा ह्यांच्या प्रेमात पडलेली असते आणि ती त्यांना भेटायला इंडिया हाऊसवर नेहमी येते त्यामुळे इतर क्रांतीकारकांना धिंग्रा ह्यांच्याबद्दल नेहमी शंका येते . पण सावरकर आणि धिंग्रा ह्यांचे वेगळेच नाते असते . धिंग्रावर सावरकरांचा प्रचंड विश्वास असतो आणि धिंग्रा सावरकरांच्या नेतृत्वावर आणि व्यक्तिमत्वावर भाळलेला असतो आणि त्यांच्या शब्दाबाहेर जात नाही . नाटकातून ह्या दोघांचे अतूट नाते जसे पुढे येते तसेच धिंग्रा आणि करझन वायलीच्या मुलीचे प्रेम ह्यातील नाट्य लक्ष वेधते . ही फारशी माहित नसलेली उपकथा .
क्रांतिकारकांचे काम करणारे सर्वच कलाकार कायम लक्षात राहतील इतका सुंदर अभिनय करतात . निखिल राऊत ह्यांनी सावरकरांचे काम केलेलं असून लेखक , दिग्दर्शक , वेशभूषा आणि मदनलाल धिंग्रा ह्यांची भूमिका करणारे दिगपाल लांजेकर सबकुछ आहेत . एक लक्षवेधी प्रयोग .
अलीकडे सोशल मीडियावर अतिशय गलिच्छ भाषेत सावरकरांवर लिहिले जाते . त्यांच्या सर्वच विचारांशी सहमत होणे शक्य नसलेतरी त्यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेले क्रांतिकार्य अनमोल आहे . त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग खूप महत्वाचा आहे .
मुक्ता बर्वे ह्यांनी मराठी रंगभूमीवर हा देखणा प्रयोग सादर करून क्रांतिकारकांच्या जीवनाची ओळख करून दिली असून त्यांच्या जीवनातील नाट्य उभे केले आहे . अभिनंदन ! हा प्रयोग अवश्य पहा . रंगभूमीवर दिसणारे १९०२ चे लंडनचे इंडिया हाऊस आणि क्रांतिकारकांचे ते दिवस खूप काही सांगून जातात . अवश्य बघा .असा हा एक सुंदर नाट्यानुभव .



नेपथ्य : इंडिया हाउस 

No comments:

Post a Comment