Wednesday, April 28, 2021

राजकीय रंगतरंग: शरद मराठे / विजय तरवडे लिहितात ..

 

शरद मराठे ह्या पुस्तकावर लिहितात..

सध्या सगळ्या गोष्टींचे खापर हे सोशल मीडियावर फोडण्याची सवय सर्वांना जडली आहे. गमतीचा भाग म्हणजे हे खापर फोडण्यासाठी सुद्धा सर्वांना सोशल मीडियाच लागतो. या माध्यमाच्या चुकीच्या वापराने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत यात शंकाच नाही. मात्र याच माध्यमाने सर्वसामान्य लोकांना व्यक्त व्हायला, विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधायला, इतकेच कशाला कोणत्याही देशाच्या प्रमुखापासून महापालिकेच्या वार्ड ऑफिसरपर्यंत सर्वांशी थेट संभाषण साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.

मला व्यक्त होण्यासाठी, तसेच स्वतःचा मर्यादित परीघ विस्तारण्यासाठी फेसबुक हे व्यासपीठ खूप उपयोगी पडले. फेसबुकवर स्वतःच्या पोस्ट्स लिहिणे ही एक बाजू, तर विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी थेट संवाद करण्याची संधी मिळणे ही दुसरी व अतिशय महत्त्वाची बाजू. पुलंच्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर आपण कोण आहोत, आपले ज्ञान किती, आपले शिक्षण किती, आपली कुवत किती, समोर कोण आहे, याचा किंचितही विचार न करता समोरच्या व्यक्तीला थेट भिडायची संधी फेसबुकने दिली. कला, क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, उद्योग, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात आपली स्वतःची अशी ओळख  घडवणाऱ्या अनेक व्यक्तींशी थेट संपर्क साधता येणे ही मोठी कमाई.
डॉ. नरेंद्र गंगाखेडकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व. पहिल्या पिढीतील उद्योजक, केमिकल्स विशेषतः रासायनिक रंग या विषयाचे मोठे जाणकार, व्यवसाय व पर्यटनाच्या निमित्याने डोळस आणि चिकित्सक नजरेने अर्ध्याहून अधिक जग फिरलेले गंगाखेडकर सर. आपले वय, शिक्षण, ज्ञान, अनुभव याचा कोणताही अहंगंड न बाळगता मुद्देसूद, सभ्य भाषेत चर्चा करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्याशी झालेला परिचय ही माझ्यासाठी सोशल मिडियामुळे झालेली मोठी कमाई. सुखनैव जीवन जगतांना देखील त्यांनी आपले समाजभान सोडलेले नाही, ही मोठी कौतुकाची गोष्ट. त्यामुळे त्यांचे ब्लॉग्ज व पोस्ट्सच्या माध्यमातून त्यांनी केलेले विपुल लिखाण आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन अनुभव देऊन जातात. याचेच पुढचे पाऊल म्हणून विविध विषयांवरील आपले लिखाण हे माहितीच्या महापुरात विखुरले जाण्याआधीच त्यांचे विषयानुरूप इ-बुक स्वरूपात करणे हा प्रकल्प सध्या सरांनी हाती घेतला आहे. याच मालिकेतील 'राजकीय रंग-तरंग' या पुस्तकाची प्रकाशन पूर्व आवृत्ती कालच हाती लागली. त्यांचे लेखन वाचताना कायम जाणवणारी गोष्ट म्हणजे विषयाबद्दल त्यांना असणारी  कळकळ व आस्था. त्यांचे नेहरू, गांधी, पटेल, सावरकर यांच्यावरचे लेख खुपच वाचनीय आहेत. माझे निरीक्षण कदाचित चुकत असेल, पण तरीही मला एक बदल जाणवला. त्यांचे २०१३ किंवा आधीचे लिखाण हे मला संयत आणि सकारात्मक वाटले. मात्र नंतरच्या लिखाणात मात्र व्यवस्थेविषयी, नेत्यांविषयी राग, चीड व थोडी नकारात्मकता दिसू लागली. कधी कधी तर पुरोगामी, सेक्युलर किंवा समाजवादी विचारसरणीची खिल्ली उडवणे या सध्याच्या प्रपौगंडाला सर सुद्धा खरं मानतात की काय असे वाटू लागते. सेक्युलर आणि समाजवादाची झालर पांघरून अनेक नेत्यांनी या चळवळीला बदनाम केले आहे यात शंकाच नाही. परंतु चळवळीचे यश किंवा अपयश हे फक्त किती जागा जिंकल्या, किती राज्यात सत्ता मिळवली यावर ठरत नसते. तर सत्तेत कोणीही असो पण त्यांच्या मनमानीला आवर घालायला, नेमस्तपणाने आपली मते मांडणारे प्रेशर ग्रुप्स हे लोकशाहीसाठी पोषक असतात. तुम्ही जिंकून येत नाहीत, याचा अर्थ तुम्हाला लोकांचा पाठिंबा नाही, मग कशाला टीका करता अशा पद्धतीने त्यांची संभावना केल्यासारखे जाणवले. अर्थात हा प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशनमधील फरक सुद्धा असू शकतो. अर्थात सर याकडे टीका म्हणून नव्हे तर फक्त निरीक्षण म्हणूनच बघतील याची मला खात्री आहे.
एक मोठ्या कालखंडाची ओळख सरांच्या या संकलनातुन लोकांना होईल हे मात्र नक्की. सर, असेच लिहिते राहा, आणि आम्हाला ज्ञान, माहिती, विचारधन वाटत रहा हीच विनंती. नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्याने आपले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

शरद मराठे

(शरद मराठे हे माझे फेसबुक मित्र. आमची प्रत्यक्ष भेट अजून झालेली नाही. आम्ही समाजमाध्यमावर नेहमीच भेटत असतो. आम्ही विचारांचे आदानप्रदान करीत असतो. ते टीसीएस सारख्या कंपनीत अधिकारी आहेत,)

 प्रसिद्ध साहित्यिक विजय तरवडे लिहितात ...

‘राजकीय रंगतरंग’ हे ई-बुक डॉ. गंगाखेडकरांचे एकूण राजकीय-सामाजिक इतिहासावर आणि विद्यमान वातावरणावरचे मुक्त चिंतन आहे. गंगाखेडकरांचा विविध विषयांवरचा व्यासंग दांडगा आहे. त्यांना अनेक विभूतींचा, साहित्यिकांचा सहवास लाभला आहे. तरी देखील साधीसुधी माणसे ज्या पातळीवरून विचार करतात, आसपासची परिस्थिती पाहून प्रतिसाद देतात त्याच पातळीवरून आणि त्याच सोप्या भाषेत त्यांनी हे लेखन केले आहे. त्यामुळे याचे मुद्रित पुस्तक उपलब्ध झाले तर तंत्रज्ञानाभिमुख नसलेल्या त्यांच्या-माझ्या पिढीतल्या सामान्य वाचकांपर्यंत ते पोचेल असे वाटते.

ई-बुकची ३९ पर्यंतची पाने सरदार पटेल, नेहरू, गांधी, कस्तुरबा, सावरकर, भारतीय मुसलमान आणि हिंदुत्व या विषयाशी संबंधित आहेत. सरदार-नेहरूंच्या परस्पर सौहार्दावर, नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीवर, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लेखकाने भाववश होऊन उत्कटपणे लिहिले आहे.

सरदार पटेल हिंदुत्ववादी होते, ते पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र निराळे झाले असते असा एक विचारप्रवाह समाजमाध्यमांवर आणि इतरत्र आढळतो. दुसऱ्या प्रकरणात यावर ऊहापोह लेखकाने केला आहे. सरदार पटेलांचे वय आणि प्रकृती यांचाही विचार त्या वेळी झाला असणार.

‘बा आणि बापू’ या प्रकरणात गांधीजी आणि हरीलालचा विषय येतो. गांधी हा चित्रपट, ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे नाटक आणि रामदास भटकळ यांचे ‘जगदंबा’ नाटक या सर्वांवर एकत्रित लिहिले आहे. शिवाय लेखाच्या उत्तरार्धात लेखक आणि गांधीजी यांचे सुंदर भावनिक नाते दिसते.

इथे सहज आठवले औरंगजेबाने आपल्या लाडक्या मुलाला – काम बख्श - वारस नेमण्याचा प्रयत्न केला. पण औरंगजेबाच्या पश्चात झालेल्या लढायांमध्ये सर्वात प्रथम काम बख्श उडाला. मुघल साम्राज्याच्या विघटनाला देखील नंतर वेग आला. एकूण काय, वारस देखील आपल्याला नेमता येतो, लादता येत नाहीच. राजकारणात देखील अपवाद (नेहरू-केनेडी) वगळता घराणेशाही दीर्घकाळ लोकप्रिय झाल्याची उदाहरणे नाहीत. आणि हे अपवाद देखील आता संपुष्टात आलेले दिसतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे संपूर्ण प्रकरण लेखक आणि त्यांच्यातील भावनिक नाते आणि जवळीक व्यक्त करते. लेखात आचार्य अत्रे आणि पुलंच्या सावरकरविषयक लेखांचे ह्रद्य उल्लेख आहेत.

हिंदुत्व, मुस्लिमांचा प्रश्न, सेक्युलरवाद यावर दोन संपूर्ण प्रकरणे आहेत. यानंतर प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्राचा आढावा घेताना पुरोगामी, समाजवादी आणि हिंदुत्ववादी यावर पुन्हा एक प्रकरण आहे. या ठिकाणी पुरोगामित्वावर दोन मुद्दे मांडायला हवेत. गेल्या शतकात ना. सी. फडक्यांनी सावरकरांचे गायीविषयक विचार पुढे नेताना म्हटले होते की पावित्र्याचा उगम उपयुक्ततेत होतो आणि उपयुक्तता सापेक्ष असते. शेतकर्‍यांना पूर्वी वाटणारी गायबैलांची उपयुक्तता ट्रॅक्टरच्या आगमनाने नष्ट झाली आहे.

रेडिओवरच्या एका भाषणात नवससायास, व्रतेवैकल्ये किंवा देवभक्तीसारख्या विषयावर बोलताना फडक्यांनी अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केला होता या गोष्टीची आवर्जून दखल घ्यायला हवी. दैववादाला त्यांचा कडवा विरोध होता. माणसाने प्रयत्नवादी असावं असा आग्रह धरताना ते म्हणतात, “आपण शरणागतीचं किंवा भक्तीचं संकट घातलं म्हणजे ईश्वरी इच्छा बदलते अशी भ्रामक समजूत ईश्वरवाद्यांच्या ठिकाणी असते अन् ही समजूत त्याला दुर्बल केल्यावाचून रहात नाही... सामान्य दैववादी मनुष्य दैवापुढं इलाज नाही असं म्हणून स्वस्थ बसतो. मी म्हणतो, दुःखापासून आणि अपयशापासून मनुष्यानं धडा घ्यावा.”

म्हणजे नेमकं काय करायचं, दुःखे आणि संकटे निर्माण करणाऱ्या शक्तींना ‘दैव’ म्हणावं, पण या शक्तींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा! (समग्र ना. सी. फडके: खंड १० पृष्ठ ८०)

या निमित्ताने लेखकाने अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आपले चिंतन मांडायला हवे होते असे वाटते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न करणाऱ्या सर्वधर्मीयांना त्यांच्या-त्यांच्या धर्मातील सनातन्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. काही वेळा जीव गमवावे लागतात. प्रत्येकाने आपापल्या धर्मातील पुरोगाम्यांचे हात बळकट केले तर सर्वच धर्मातील समाजात वैज्ञानिक दृष्टी विकसित होऊन समाज पुढे जाईल. बुवाबाजीपासून कोणाचे आर्थिक, लैंगिक शोषण होणे टळेल. असो.

कार्यकर्ते हे प्रकरण वाचनीय आहे. अनेक पक्षात असे भाबडे निःस्वार्थी कार्यकर्ते असतात. भाजपला असे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिळाले. म्हणून तो आज यशस्वी आहे. काँग्रेसला ते टिकवता आले नाहीत म्हणून काँग्रेस मागे पडली. समाजवादी मंडळींच्या शोकांतिकेवर एक प्रकरण आहे. ‘लंबक कुठे झुकतोय?’ या प्रकरणात भारतीय जनतेचा ‘मूड’ उजवीकडे झुकल्याचे नोंदवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस असो की इतर पक्ष, सर्वत्र उजव्यांची लॉबी होतीच. ‘नवरोजी ते नेहरू’ या पुस्तकात हे निरीक्षण गोविंद तळवलकरांनी खुबीने मांडले आहे. मोदींना गांधी जवळचे आणि नेहरू दूरचे होते असे लेखकाचे प्रतिपादन आहे. पंधराव्या प्रकरणात लेखक माझ्यापासून दूर गेल्यासारखे वाटले. राहुल गांधींचे अपयश हा वेगळा आणि स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण आपल्या सोशल मिडियातील ट्रोल परंपरेने त्यांना ‘पप्पू’ ठरवून चूक केली आहे. राहुल स्वतः विद्याविभूषित आहेत, ते सतत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधत असतात. या संवादांचे फलित एकत्रित उपलब्ध होत नाही आणि त्याची चिकित्सा देखील होत नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि डॉ. स्वामीनाथन यांच्यावरचे प्रकरण अभ्यासपूर्ण आहे. शेवटचे प्रकरण गुजरातच्या विकासावर आहे.

असे हे मुक्त चिंतन. दक्षिण भारतातील राजकारण, साक्षरता आणि उत्तर प्रदेश-बिहार पट्ट्यातले प्रश्न असे काही विषय राहून गेलेले आहेत. पण तरी हे चिंतन वाचताना माझ्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीशी मित्राप्रमाणे गप्पा मारल्याचा अभिजात आनंद लाभला. काही ठिकाणी या ज्येष्ठ मित्राशी मतभेद झाले, नाही असे नाही. पण कोणत्याही दोन व्यक्तींची मते १०० टक्के कुठे जुळतात? शुभेच्छांसह –

विजय तरवडे

( प्रसिद्ध कथालेखक, कादंबरीकार, स्तंभ लेखक )


राजकीय रंगतरंग

१. सरदार, नेहरू आणि गांधी - १८             

२. सरदार पटेल हिंदुत्ववादी होते का? - २६            

३. पंडित नेहरु – ३१

४. बा आणि बापू – ३४

५. स्वातंत्र्यवीर सावरकर – ४२

६. भारतीय मुसलमान आणि हिंदुत्व - ४७

७. सेक्युलर आणि हिंदुत्व – ५१

८. प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून - ५६ 

९. पुरोगामी - समाजवादी- हिंदुत्ववादी – ५८

१०. रास्वसं , हिंदुत्व , सावरकर आणि इतर काही ...... – ८७

११. कार्यकर्ते – ९४

१२. लंबक कुठे झुकतोय? – ९८

१३. मोदीना गांधी जवळचे तर नेहरू दूरचे – ९९

१४. आपल्या देशाच्या नेतृत्वाला झालं आहे तरी काय? – १०२

१५. हा देश कधी कधी माझा आहे ......... -११२

१६. मी अण्णा हजारे नाही – ११६

१७. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कां होतात ? - ११९

१८. गुजरातचा विकास – १२५

१९. कुंभमेळा आणि स्वच्छता अभियान- १२६

२०. विनोबा भावे: एक आठवण – १२९

२१. जात नाही ती 'जात' – १३१

२२. जागतीकरण आणि भारत- १३४

*****

(Please send me your e-mail address. I will send you the e-Book.)


2 comments: