Wednesday, April 14, 2021

सनातन : शरणकुमार लिंबाळे

 

शरणकुमार लिंबाळे

सरस्वती सन्मान पुरस्कार मिळविलेले दलित साहित्यिक

 


सध्यां शरणकुमार लिंबाळे ह्यांचे 'रामराज्य' हे पुस्तक वाचायला घेतलंय. त्यातील त्यांचे प्रास्तविक काल वाचले.  त्यातील त्यांचे विचार माझ्या विचारांशी इतके मिळतेजुळते होते, हे बघून मलाच आश्चर्य वाटले. आज 'लोकरंग' मधील 'समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ!' हा त्यांचा लेख वाचला आणि त्यांची भूमिका अधिक स्पष्ट आणि स्वच्छ झाली. मी ह्यापुर्वी त्यांचे साहित्य वाचले नव्हते. ह्याचे कारण मी त्या साहित्याकडे दुर्लक्ष केले, हेच असावे. विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार ह्यांचे साहित्य त्यांना सरस्वती सन्मान मिळण्यापुर्वी म्हणजे अनेक वर्षांपासून वाचत आलो आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक भूमिका मला माहित होत्या. दोघांनी लिहिलेली नाटके मला प्रभावित करून गेली. दलित साहित्य मी (१९६०-७०) ५-१० वर्षे वाचले. त्यातून त्यांच्या व्यथा वेदना मला समजत गेल्या. नंतर त्यांच्या 'वेगळी चूल मांडण्याच्या चळवळीमुळे' ते साहित्य वाचणे सोडून दिले. त्यांनी विद्रोही भूमिका घेतली आणि विराट समुहातील अनेक घटकांना वेगळे पाडले आणि आज  तेच एकाकी झाले. बिर्ला फाउंडेशन ह्यांनी लिंबाळे  ह्यांना पुरस्कार देण्याचे ठरविले तेंव्हा फोन केला आणि  त्यांच्या एका  प्रश्नांला जे उत्तर दिले ते त्यांना स्वतःला आवडले. त्यातून त्यांची भूमिका ही इतर दलित साहित्यिकासारखी नकारात्मक नाही, हे लक्षांत आले. 'आपण एकमेकांत मिसळून मने जोडली पाहिजेत', हे त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत. ते असे म्हणतात, हे खूप महत्त्वाचे आहे. 'माझे सगळे प्रकाशक आणि अनुवादक ब्राह्मण आहेत', असे ते आवर्जून लिहितात. 'हिंदू समाजामध्ये प्रचंड बदल झाला आहे', असे ते लिहितात. दलित साहित्यिकांनी वेगळा सुभा निर्माण केल्यामुळेच आज ते अधिक दुर्लक्षित झाले असतील तर ते बरोबर नाही. शरणकुमार लिंबाळे ह्यांनी नवी दिशा दिली आहे, हे नक्की. त्यांची 'सनातन'' ही कादंबरी अलीकडेच वाचली.  त्याबद्दल खाली लिहिले आहे. 

रामराज्य  वाचल्यानंतर

शरणकुमार लिंबाळे ह्यांचे 'रामराज्य' वाचलं. वाचताना अधूनमधून कंटाळा आला. हा लेखक खूप काही सांगतांना दिसतो आहे. म्हणून कादंबरी पूर्ण वाचली.  गेल्या ६०-७० वर्षात आपली सामाजिक प्रगती शून्य झाली आहे, असे वाचताना वाटू लागतं. हे विदारक चित्र बघून मन खिन्न होतं. 'जात नाही ती जात', हेच खरं.

आपली खेडी, तेथील जाती व्यवस्था, दलितांचे  हलाखीचे जगणं, सवर्णांची अरेरावी आणि स्त्रियावर होणारे बलात्कार आणि त्यांची होणारी अवहेलना हे सर्व वाचताना डोकं दुखू लागतं. थोडावेळ पुस्तक बाजूला ठेवून दूसरं काही बघावं आणि पुन्हां पुस्तक हातात घेवून पुढे जावं तर काही वेळाने पुन्हा तेच. तशीच माणसं. तसेच अत्याचार. तीच रोगट समाजव्यवस्था.  विजय तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे नाटक पहाताना मी असा सुन्न झालो होतो. ह्या कादंबरीत मला 'गिधाडे'च दिसत होती. मन अस्वस्थ करीत होती. कधी बदलणार आपली समाजव्यवस्था.

 लेखक एका ठिकाणी लिहितो, ' आपल्या पुढार्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं आणि आपण जय शिवाजी जय भवानी म्हणत तलवारी घेऊन फिरायचं.असं हे त्रांगडं आहे'. यशा मनातलं बोलत होता. ' महार पुढं जात आहेत आणि आपण मागे पडत आहोत.' वशानं आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 

 वस्तुस्थितीचे खरं वर्णन दिसून येतं. आज मराठा आरक्षण हा प्रश्न उभा आहे तो ह्या खदखदीतूंन. 

एके ठिकाणी लेखक लिहितो... ' धर्म आणि गुन्हे एकत्र आले तर सांस्कृतिक क्रांती व्हायला वेळ लागत नाही'. असं झालं तर आपला समाज कुठे असेल ? हा लेखक  कांदबरीच्या माध्यमातून विचारांचे अनेक  तरंग मनात उठवित जातो.

सनातन

हे पुस्तक एक महिना झाला. वाचनालयात मिळत नव्हते. शेवटी किंडलवर विकत घेतलं. 

ह्या पुस्तकावर खूप लिहिण्यासारखे आहे. प्रदीर्घ लेख होईल. एक अप्रतिम दस्तावेज. इतर दलित लेखकांची पुस्तके वाचली होती. नंतर गेली अनेक वर्षे ती वाचणे सोडून दिले. 'जात नाही ती जात', हे खरं कटू सत्य आहे. हजारो वर्षे ज्यांनी सहन केलं त्यांची दु:खे समजून घेतली नाहीत आणि समाज बदलला नाही हे जरी खरे असलं तरी गेल्या काही वर्षांपासून आपली वेगळी साहित्य चळवळ उभी केल्यामुळेच उर्वरीत सवर्ण समाज दलितापासून अधिक दूर होत गेला. 

शरणकुमार लिंबाळे ह्यांचे लेखन हे इतर दलित लेखकांच्यापेक्षा वेगळं आहे, हे जाणवलं. त्यांच्या लेखनांतून इतर लोकांची दलित समाजाकडे बघण्याची मानसिकता बदलेल, असे मला वाटते. त्यांना मिळालेला सरस्वती सन्मान हा त्यांचा गौरव आहे. पण त्यामुळे त्यांचे लेखन वाचून सवर्ण आपली मानसिकता बदलतील तर आपला समाज बदलेल ,असे मला वाटते.

वर लिहिलेली माझी प्रतिक्रिया मी  शरणकुमार लिंबाळे सरांना लिहून कळविली. त्यात वरील मुद्दे लिहिले होते.  

प्रिय शरणकुमार लिंबाळे सर,

सप्रेम नमसकार. 

रामराज्य आणि सनातन वाचल्यानंतर तुम्हांला पत्र लिहावं असे वाटलं म्हणून हे पत्र.

त्या मेलला त्यांचे उत्तर मिळाले ते असे.


sharankumar limbale

Sun, Apr 11, 2:06 PM (3 days ago)

to me

Dear sir, 

Thanks for appreciating my work. I'm very delighted. Stay safe and healthy. 

Regards 

Sharankumar Limbale 

हा प्रतिसाद वाचून आनंद झाला. 

 


 

No comments:

Post a Comment