Tuesday, July 7, 2020

असा मी घडलो : प्राध्यापक , संशोधक , तंत्रज्ञ आणि उद्योजक


डॉ नरेंद्र गंगाखेडकर 
१९६८ साली मी मराठवाडा विद्यापीठातून एम.एससी. पदार्थविज्ञान ह्या विषयात प्रथम श्रेणीत सर्व विद्यार्थ्यात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. आमची विद्यापीठाची दुसरी Batch. परभणीच्या कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीनिवासन ह्यांनी त्यापूर्वीच माझी मुलाखत घेतली होती. रिझल्ट लागला की लगेच ये . तुला नेमणुकीचे पत्र मिळेल’,  असे त्यांनी मला स्पष्टपणे  सांगितले होते. रिझल्ट लागला आणि मी लगेच परभणीला गेलो आणि त्यांना भेटलो. त्यांनी दुपारीच नेमणूक पत्र दिले व दुसरे दिवशी प्राध्यापक म्हणून कृषी महाविद्यालयात रुजू झालो. त्यांनी मला राहण्यासाठी निवासही दिला .
परभणी हे माझे आजोळ. सगळे नातेवाईक तेथेच रहातात. माझा मोठा भाऊ रवी हा तेथेच मराठवाडा विद्यालयात शिक्षक होता . त्याचे तेथे घर होते. आजोळची बरीचशी  मंडळी परभणी येथेच स्थायिक होती.पण मी कृषी महाविद्यालयातील निवासातच राहिलो .
आमचा पदार्थविज्ञान विभाग Agriculture Engineering विभागाच्या प्रोफेसर घरत सरांच्या हातात होता. ते एक नावाजलेले प्राध्यापक होते . माझा विषय पहिल्या दोन पदवीपूर्व वर्गासाठी होता . पदव्युत्तर मुलांच्यासाठी Agriculture Physics आणि Soil Physics हे विशेष विषय होते. मला ते शिकवायचे होते. पदार्थविज्ञानाची वेगळी प्रयोगशाळा होती. मी त्यांत रमलो होतो . तसे माझे मन परभणीत रमणारे नव्हते.
स्टेशन रोडच्या एका हॉटेलमध्ये एका संध्याकाळी मित्राबरोबर चहा पीत असताना TOI च्या जाहिराती वाचत बसलो होतो. बीएआरसीची एक जाहिरात बघितली. नव्या पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी एका ट्रेनिंग कोर्ससाठी अर्ज मागविण्यात आले होते. मी दुसरे दिवशीच त्यासाठी अर्ज केला. एक महिन्यांनी मला मुलाखतीला बोलावण्यात आले. जेमतेम मी दोन अडीच महिने त्या महाविद्यालयात असेल. तेथे रमलो होतो. Agriculture Physics/ Soil Physics ह्या विषयांशी माझी ओळख झाली होती व ते विषय शिकवणे सुरु केले होते.
मुंबईला मुलाखतीला गेलो आणि मुलाखतीनंतर १५ दिवसात माझी निवड झाल्याचे पत्र मला  मिळाले आणि सप्टेंबरमध्ये कोर्स सुरु होणार आहे असे कळविले होते. हा कोर्स होता Diploma in Radiological Physics ( DIP.R.P). सर्व भारतातून विद्यार्थी निवडले गेले होते. महाराष्ट्रातून आम्ही ३ जण  होतो.  त्यात मुंबईचा रामनाथन होता. प्रत्येक राज्यातून एक किंवा दोन विद्यार्थी होते. हा कोर्स होता – Use of Radio Isotopes in Medicine, Agriculture, Research and Industries. आम्हाला शिष्यवृत्ती होती दरमहा रुपये ३००/-. त्यातील रुपये १५०/- हे बीएआरसीकडून मिळत असत तर रुपये १५०/- हे International Atomic Energy Agency ( IAEA ) ह्यांच्यातर्फे मिळत असत. बीएआरसीचे बांद्र्याला Bandstand च्या समुद्र किनारी हॉस्टेल होते.
ह्यापूर्वी मला प्राध्यापक म्हणून दरमहा ५२१/- रुपये पगार होता. म्हणजे मी सुखासीन नोकरी सोडून मुंबईत शिकायला आलो होतो . नातेवाईकांनी मला वेड्यात काढले. वडील म्हणाले, ‘ You are the best judge.You can take your own decision ‘. मी  माझा निर्णय घेतला आणि निघालो मुंबईला.
माझे मूळ धेय्य होते Ph.D. करावे , विद्यापीठात संशोधन करावे व तेथेच प्राध्यापक व्हावे.  मराठवाडा विदयापीठ त्यावेळी नवे होते . आमची दुसरी तुकडी होती . त्यावेळी विद्यापीठात मला  खूप वाव होता. पण तो योग नव्हता. कधी कधी योग्य संधी चालून येतात. त्याचा  योग्य तो फायदा घेतला नाही तर संधी तर हुकतेच पण नवी संधी कधी मिळेल हे सांगता येत नसते. विद्यापीठाचे कुलगुरू होते  प्रसिद्ध पदार्थवैज्ञानिक डॉ नानासाहेब तावडे . आमचे विभागप्रमुख होते डॉ बी बी लाड. दोघांचेही माझावर विशेष लक्ष होते. त्याचे कारण मला त्यावेळी  भारत सरकारच्या Atomic Energy Department ची दरमहा  १५०/-रुपये शिष्यवृत्ती होती. तसे माझे सर्व शिक्षण  इयत्ता वी पासून शिष्यवृत्तीवारच झाले होते . मला बीएआरसीत प्रवेश मिळाला हे ऐकून तावडे आणि लाड सरांना खूप आनंद झाला आणि त्या दोघांनी मला सुंदर शिफारस पत्रे दिली. ती पत्रे मला नंतर खूप कामाला आली. मी त्यांचा विद्यार्थी म्हणून माझे अनेकांनी कौतुक केले. तावडे सर मुंबईलाच रॉयल विज्ञान संस्थेत अनेक वर्षे प्राध्यापक असल्यामुळे खूप प्रसिद्ध होते तर लाड सर पुणे विद्यापीठाचे नावाजलेले प्राध्यापक होते . माझे औरंगाबाद आणि परभणी हे दोन्ही असे सुटले आणि मी मुंबईला आलो. ते एका नव्या विश्वात. एका प्रतिष्ठित अशा बीएआरसीत.
डॉ होमी भाभांनी भारतात जे नवे विज्ञानविश्व उभे केले त्या संस्थेत मला प्रवेश मिळाला . तो एक विलक्षण आनंदाचा क्षण होता. विज्ञान संशोधनासाठी आणि पुढील शिक्षणासाठी ह्यापेक्षा अधिक सुंदर संस्था कोणती असेल? शिष्यवृत्ती मिळून अशी  शिक्षण संधी मिळणे हे तर माझ्यासाठी अधिक महत्वाचे होतेएक नवे विश्व ! एक नवा प्रवास ! एक पाहिलेले नवे स्वप्न !
मी मुंबईत तसा प्रथमच येत होतो असे नाही. एक वर्षापूर्वीच  मराठवाडा विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मी आणि विद्यापीठाचे चार विद्यार्थी आमच्या दोन प्राध्यापकाबरोबर All India Student's and Teacher’s Camp साठी के एम मुन्शी ह्यांच्या भारतीय विद्याभवनच्या अंधेरी येथील संस्थेत एका शिबिरासाठी आलो होतो. संयोजक होते  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती गजेन्द्रगडकर आणि प्रसिद्ध राजकीय नेते जयप्रकाश नारायण.  आमच्याबरोबर होते आमचे रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ जहागीरदार आणि इतिहासाचे प्राध्यापक ( साम्यवादी विचारसरणीचे ) पंढरीनाथ रानडे. माझा रसायनशस्त्र विभागाचा मित्र लिमये बरोबर होता. अगदी धमाल आली ह्या शिबिरात. विविध विषयावर गाजलेली चर्चासत्रे आजही आठवतात . सर्व देशभरच्या विद्यापीठातून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक ह्यांचा हा एक अनोखा मेळावा होता .
द्रोणाचार्य असलेले जयप्रकाश नारायण हे आमच्यासाठी प्रमुख आकर्षण होते .  ही सर्व दिग्गज मंडळी चार दिवस आमच्या बरोबरच होती. असे हे शिबीर मी कधीच विसरणार नाही. पंढरीनाथ रानडे सर श्रीपाद डांगे ह्यांना अगदी जवळून ओळखणारे होते . त्यांनी अनेक राजकीय घडामोडी जवळून पाहिलेल्या होत्या . त्यांचे जयप्रकाशजीबद्दल फारसे चांगले मत नसावे. कम्युनिस्ट आणि समाजवादी वितुष्ट तेंव्हाही होतेच. रानडे सरांनी रामायण महाभारताचा अभ्यास साम्यवादी दृष्टीकोनातून केला होता . त्यावर आमची खूप चर्चा झाली होती  .
के एम मुन्शी प्रमुख संयोजकापैकी एक होते . डॉ गजेन्द्रगडकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते . त्यांचे भाषण म्हणजे एक पर्वणीच होती. जयप्रकाशजीनी नंतर जी युवाचळवळ उभी केली ती अशा विध्यार्थी युवकांना आव्हान करीतच, असे आज मला वाटते. मी कधीही युवक चळवळीच्या भानगडीत पडलो नाही कारण माझे क्षेत्र होते ते विज्ञान आणि संशोधन. ह्या शिबिरातून राजकीय चळवळी आणि Intellectual मंडळींची ओळख झाली हे नक्की. ह्या शिबिरामुळे मला मुंबई दर्शन जवळून झाले. राज्यपालांच्या बंगल्यावर आम्हाला खास पाहुणे म्हणून पार्टी देण्यात आली होती. हे आठवले की राज्यपालांचा तो थाट आजही आठवत राहतो.

बीएआरसीच्या Modular Lab मध्ये Department of Radiation Protection  मध्ये आमचा कोर्स सुरु झाला. अतिशय तज्ञ शास्त्रज्ञ आम्हाला शिकवीत असत. पी एन कृष्णमुर्ती हे विभाग प्रमुख होते. जागतिक अणुशक्ती संस्थांशी संबंधित असलेले त्यांचे व्यक्तिमत्व. आम्ही त्यांचे भारावून टाकणारे वक्तृत्व ऐकून भारावून गेलो होतो . शास्त्रज्ञ सुद्धा चांगला मार्केटिंग करणारा किंवा विक्रेता असावा हे मला त्यावेळी समजले. शास्त्रज्ञ  हा शासक आणि सेल्समन असला पाहिजे तरच तो त्याला हवे  ते करून दाखवू शकतो. सर्वच शास्त्रज्ञाना हे जमत नसते. हे एक सत्य.
आमचे हॉस्टेल बांद्र्याला . समुद्र किनारी . मिलिटरी शेड असणार्या आमच्या  त्या बराकी असलेल्या  खोल्या. जेवणाची उत्तम व्यवस्था होती . आमचा रोजचा प्रवास बीएआरसी बसनेच होत असे  . त्यामुळे मुंबईचा लोकल प्रवास माहित नव्हता. तशी लोकलला आजच्यासारखी गर्दी नसे .आमच्या खोलीच्या बाहेर समुद्राला भरती आली की लाटा कम्पाउंडला येऊन धडकत असत . आमची  रोजची संध्याकाळ फार रम्यच  असे.  ‘सुनील नभ हे सुंदर नभ हे , नभ हे अतलची अहा, सुनील सागर सुंदर सागर , सागर अतलची अहा’, हे वर्णन रोजच अनुभवण्याचे ते सुंदर दिवस होते . मुंबईत इतक्या रम्य ठिकाणी रहाण्याचे ते माझे  सुंदर दिवस. BANDSTAND हेच ते प्रसिद्ध ठिकाण. ते  होते मुंबईतील प्रेमी युगुलांसाठी..आजूबाजूच्या खडकावर ही मंडळी रमलेली असत. आम्ही मात्र आमच्या अभ्यासात कार्यमग्न असू . उद्याचा अभ्यास करण्यासाठी जेवणानंतर रूमवर पळणारे आम्ही तरुण युवक तसे दुर्दैवी  . आज तेथे एक सुंदर हॉटेल झाले आहे. पण एके काळी तेथे मिलिटरीच्या  अर्धगोलाकृती पत्र्याच्या खोल्या होत्या हे सांगितले तर खरे वाटणार नाही . समोर निळा समुद्र. धडकणार्या त्या फेसाळ लाटा. संध्याकाळी त्या परिसरांत फेरफटका मारणे हा एक वेगळा आनंद होता. अधूनमधून सिने कलावंत आजूबाजूला दिसत असत.
माझे सहकारी मित्र भारतातील सर्व प्रांतातून आलेले होते  . कर्नाटकाचा तटीतल्ली, तामिळनाडूचा रामनाथन , केरळचा नायर , राजस्तानचा माथुर , बिहारचा यादव , पंजाबचा गिल , बंगालची असीमा चॅतर्जी  , ओरिसाचा महापात्रा, आसामचा देबनाथ , महाराष्ट्राचा चाबके .. असे माझे माझ्या वर्गातील १७-१८ मित्र होते . मी ह्या सर्वांच्या आठवणीवर  एक  लेख लिहिला होता  – ‘माझे काही अमराठी मित्रह्या नावाने तो मराठवाडादैनिकात प्रसिद्ध झाला होता.  . त्यावेळी मराठी मराठीअसा आवाज उठविणारी सेना मुंबईत सक्रीय झाली होती. मला ती कधीच आपलीशी वाटली नाही. मी मात्र माझ्या अमराठी मित्रात रमलो होतो. त्यांच्याकडून खूप शिकत गेलो. त्यानाही मी वेगळा मराठी माणूस वाटत असे. ते कधीही माझा द्वेष करीत नसत .कोर्सनंतर आम्ही अनेक वर्षे एकमेकांच्या संपर्कात होतो. भारतीय एकात्मतेचे इतके सुंदर दर्शन मी त्या संपूर्ण वर्षात अनुभवले होते . बीएआरसीमध्ये ते नेहमीच दिसून आले.
एक वर्षाचा तो काळ . खूप काही शिकायला मिळाले. Use of Isotopes in Medicine हा आमचा प्रमुख विषय . कोबाल्ट ६० गामा रे चा वापर करून कर्क रोगावर उपचार कसे करावयाचे ? हा आमचा प्रमुख विषय होता . त्यासाठी आम्ही टाटा मेमोरिअलमध्ये प्रात्यक्षिकासाठी जात असू.  त्यावेळी तेथे दोन युनिट होते. तेथील पदार्थवैज्ञानिक ही व्यक्ती इतर डॉक्टर मंडळीसारखीच महत्वाची होती. पदार्थवैज्ञानिक रेडीएशन डोस कसा मोजत असत ह्याचे तंत्र आम्ही तेथे शिकलो . त्यावेळी संगणक नसल्यामुळे हे करणे अतिशय अवघड होते. आम्ही ३ महिने हे तंत्र शिकलो. रेडीएशन तंत्रज्ञान नुकतेच विकसित झाले होते. आजही टाटा मेमोरिअल त्यात अग्रेसर आहे. कोर्सनंतर माझ्या बरोबरचे सर्व मित्र भारतातील निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये तज्ञ म्हणून काम करीत होते. 
मी कोर्सनंतर औरंगाबादला गेलो होतो. एका कार्यक्रमात कुलगुरू तावडे ह्यांची भेट झाली. त्यांनी मला सहज विचारले ,' सध्या काय करतोस ?' . मी कोर्स पूर्ण झाल्याचे सांगितले. ते म्हणाले , ' औरंगाबाद मेडिकल कॉलेजला यायचे आहे का ? येथे कोबाल्ट युनिट सुरु होते आहे ' . त्यांनी मेडिकल कॉलेजचे डीन झाला ह्यांना माझ्याबद्दल  सांगितले. मला काही दिवसांनी त्यांचे पत्र आले व त्यात त्यांनी संपर्कात रहाण्याचे सांगितले .  मी मात्र ह्या  कोर्स नंतर हे क्षेत्र सोडून दिले आणि मुंबई विद्यापीठाच्या युडीसीटी ह्या संस्थेत पीएच.डी.साठी प्रवेश घेतला.
मी पुन्हा माझा मार्ग बदलला. मी केलेला कोर्स खूप क्षेत्रासाठी होता. शेती  संशोधयासाठी उपयुक्त होता तसेच औद्योगिक क्षेत्रात विशेष उपयुक्त होता . वैद्यकीय क्षेत्र तर त्याने व्यापून टाकले होते. मिळविलेले ज्ञान हे वाया जात नसते . हे माहित होते. एक वेगळी व्यापक दृष्टी मिळते .
My  Biodata 
मला बीएआरसीतच वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली होती. त्यांनी मला दोनवेळा स्मरणपत्रे पाठविली. ती चांगली संस्था तर होतीच . केंद्रीय नोकरी असल्यामुळे उत्तम पगार होता. माझ्या वडिलांना मी ही केंद्रीय नोकरी सोडू नये असे वाटत असे. अर्थात तेथेही येत्या काळात अनेक संधी मिळण्याची शक्यता होतीच . जीवनात स्थिरस्थावर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.  
असे सारे असताना मी पुन्हा एक संधी घालवली पण त्याचवेळी मला दुसरी संधी खुणावत होती. अर्थात माझे त्यात आर्थिक नुकसान होते . १८०० रुपये पगाराच्या ऐवजी  मी  २५० रुपयाची शिष्यवृत्ती स्वीकारली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मला भेटलेले गाईडमार्गदर्शक. त्यांचे नांव होते  डॉ एन सी चौधरी. ते नुकतेच अमेरिकेतून युडीसीटीत प्राध्यापक म्हणून आले होते. ते मूळ कलकत्याचे. तसे सुरवातीला डाका युनिव्हार्सिटीचे . त्यांनी १६ वर्षे संशोधन करून डी.एससी. ( Doctor Of Science ) ही पदवी मिळविली होती. जगातील प्रसिद्ध अशा नियतकालिकातून त्यांचे सोळा संशोधन पेपर्स  डिग्री मिळवण्यापुर्वीच प्रसिद्ध झाले होते. ते अमेरिकेत प्राध्यापक होते .त्यांची माझी  - वेळा भेट झाली . आमची खूप चर्चा झाली . मी युजीसीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. 
मला त्यावेळी युजीसी शिष्यवृत्ती मिळाली आणि मी युडीसीटीत त्यांच्या हाताखाली  संशोधक झालो. असा मी शिकत राहिलो. संशोधन हे तसे कठीण असते. मार्गदर्शक हा फार महत्वाचा असतो. प्रयोगात सर्व काही पाहिजे तसे परिणाम  मिळत नसतात . त्यासाठी खूप चिकाटी आवश्यक असतेखूप वेळा प्रयोग करावे लागतात . जे मिळाले आहे ते पुन्हापुन्हा सिद्ध करावे लागते. त्यात अचूकता खूप महत्वाची असते. हे अतिशय जिकीरीचे काम असते. त्यात कसलीही तडजोड नसते. जे आपण शोधून काढतो ते साध्य झाल्यावर आपल्याला विलक्षण आनंद होतो , हे वेगळे  . तो आनंद हा आपला स्वतःचा असतो.
मुलभूत संशोधन हे म्हणूनच इतर संशोधनापेक्षा खूप वेगळे संशोधन असते. मी तो मार्ग स्वतः निवडला होता . त्यात माझी वर्षे गेली. चार वर्षाच्या शिष्यावृत्तीनंतर पुन्हा दोन तात्पुरत्या नोकर्या केल्या .संशोधनात अडथळे येत गेले . मी पिच्छा मात्र  सोडला नाही . मार्गदर्शकाचे उदाहरण समोर होतेच. एक वर्ष औरंगाबादच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक झालो. माझ्या मुंबई- औरंगाबाद चकरा सुरु झाल्या
एका रविवारी प्रोफेसर जे जी काणेयुडीसीटीचे डायरेक्टर माझ्या प्रयोगशाळेत मी काम करीत असताना आले. त्यांना मी औरंगाबाद - मुंबई सतत चकरा मारून राहिलेले संशोधन पूर्ण  करीत आहे हे समजले होते . त्यांनी मला मुंबईतच जवळपास नोकरी शोध असा सल्ला दिला . दुसरे दिवशी त्यांनी मला निरोप पाठविला आणि भेटण्यास बोलविले . मी त्यांच्या कार्यालयात गेलो . त्यांनी मला माटुंग्याच्या कॉटन टेक्नॉलॉजीकल रिसर्च संस्थेत जागा आहे , तेथे अर्ज करण्याचा सल्ला दिला. मी तेथे अर्ज केला . आणि माझी संचालकांचा सहाय्यक म्हणून सायंटिफिक रिसर्च असिस्टंट म्हणून नेमणूक झाली. पगार चांगलाच होता . दिवसभर नव्या नोकरीचे काम आणि संध्याकाळी रात्रीपर्यंत  युडीसीटीत संशोधन करू लागलो. माझे काम संपत आले होते . थिसीस सबमिट केला आणि शेवटी संशोधन पूर्ण झाल्याचे यश पदरांत पडलेडॉ काणे ह्यांनी माझ्यासाठी मार्ग शोधून दिला. मला मार्गदर्शन केले. असे शिक्षक मिळतात तेंव्हा आपले आयुष्य व्यवस्थित मार्गी लागते .अनेक अडथळे दूर होतातअसा मी डॉक्टरेट  ( Ph.D) झालो. माझे मार्गदर्शक मला  D.Sc. साठी प्रयत्न कर असे म्हणत होते. ते मात्र करायचे राहून गेले .
गंमत बघा. मी अध्ययन , अध्यापन आणि संशोधन ह्या त्रिसूत्रीवर आधारित माझे ध्येय निश्चित केले होते. आणि झाले मात्र वेगळेच. मी एशियन पेंट्स ह्या कंपनीत कलर टेकनॉलॉजी शास्त्रज्ञ म्हणून सात वर्षे काम केलेती कम्पनी सात वर्षांनी सोडली आणि स्वतःचा कलर टेक्नॉलॉजी उद्योग उभा केला. माझी  स्वतःची कम्पनी उभारून ३०० हुन अधिक उद्योगांना ( टेक्सटाईल्स , पेंट्स , प्लॅस्टिक , इंक कंपन्या )  सहाय्य करून त्यांना नव्या तंत्रज्ञानामुळे ते वापरत असणाऱ्या रंगद्रव्यात  १५ ते २० टक्के फायदा करून दिला

विज्ञान , मूलभूत संशोधन ,उपयोजित संशोधन , तंत्रज्ञान आणि त्याचा उद्योगासाठी तंत्रज्ञानाचा वापर तसेच मार्केटिंग ह्या सर्वच क्षेत्रात मी भरारी मारली . शेवटी माझे विज्ञान शिक्षण मला कामी आले . आणि असा मी घडलो . घडत गेलो


7 comments:

  1. very nice to read your 1ife 's educational journey

    ReplyDelete
  2. Sir, thanks for sharing your educational journey. Really inspiring.

    ReplyDelete
  3. चाकोरीबद्ध वाटचाल नाकारून आपण स्वकष्टाने, स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा पथ स्वतः निर्माण केलात आणि त्यावरून यशस्वी वाटचाल केलीत. आपला हा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे, नवीन पिढीसाठी मार्गदर्शक आहे.
    आपण प्रकाशनाच्या क्षेत्रातही मुशाफिरी केली आहे, हे आपल्याशी झालेल्या एका वार्तालापात आपणाकडून मला कळले होते. या सर्वांबरोबरच आपण उत्तम लेखकही आहात आणि कलेस, कौशल्यास उत्तम दाद देणारेही आहात.
    औरंगाबादवर प्रेम असणारे हा आपल्याला जोडणारा दुवा आणि त्यातून आपणासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाशी माझे स्नेहबंध ईश्वरकृपेने जुळले याचा मला आनंद आहे. जगदंबेच्या कृपेने आपणास आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

    ReplyDelete